केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----अंतीम भाग.

Submitted by पद्मावति on 1 August, 2017 - 06:48

भाग 1 http://www.maayboli.com/node/59911
भाग २ http://www.maayboli.com/node/60016
भाग ३ http://www.maayboli.com/node/60087
भाग ४ http://www.maayboli.com/node/60268
भाग ५ http://www.maayboli.com/node/60576
भाग ६ http://www.maayboli.com/node/62251

<<<न्यास्नाला स्वत:चे विमानतळ नाही. प्रवासाच्या पुढच्या टप्प्याचे विमान पकडायला आम्ही एका तासावर असलेल्या जॉर्ज विमानतळावर पोहोचलो. रेंटल कार परत केली आणि क्रुगर नॅशनल पार्कला जाणार्‍या विमानात जाऊन बसलो...>>>

क्रुगर नॅशनल पार्क. अफ्रिकेतले हे सर्वात मोठे अभयारण्य साऊथ अफ्रीकेच्या उत्तर पूर्वेला सुमारे आठहजार स्क्वेर मील पसरलेले आहे. याच्या उत्तर आणि पूर्व सीमा झिमाब्वे आणि मोझम्बिकला जाउन भिडतात. असंख्य प्राणी आणि पक्ष्यांच्या जाती या क्रुगर मधे पाहायला मिळतात. कुठल्याही सफारीचे बिग फाईव हे आकर्षण सुद्धा अर्थात इथे आहेच. आता बिग फाइव म्हणजे काय? तर बिग फाइव म्हणजे हत्ती, सिंह, गेंडा, बिबट्या आणि केप बफलो हे प्राणी.

क्रुगरला जाण्यासाठी जोहनसबर्गहून दिवसातून भरपूर फ्लाइट्स असतात. अवघा एखाद तासाचा प्रवास. बरेच लोक जोहनसबर्ग ते क्रुगर ड्राइवपण करतात. आम्ही सकाळी न्यास्ना ते जोहानसबर्ग आणि जोहनसबर्ग ते पुमालांगा असा विमान प्रवास करत साधारणपणे १२ वाजता दुपारी पुमालांगा विमानतळावर येऊन पोहोचलो. इथे आल्या आल्याच अगदी प्रसन्न हवामानाने आमचं स्वागत केले. हा विमानतळ सुद्धा छान आहे. लहानसा, नीटनेटका आणि स्वच्छ. येथील स्टाफ सुद्धा मस्तं घरगुती आहे. अतिशय हसरे आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे लोक.

विमानतळावर आम्हाला घ्यायला हॉटेलची गाडी आली होती. सुमारे दोन तासाचा प्रवास तसा आरामाचा होता. मात्र इथे केप टाऊन, गार्डन रूटपेक्षा अगदी वेगळा निसर्ग आहे. समुद्राची निळाई नाही अर्थातच पण तरीही आजूबाजूला हिरवीगार शेती दिसत होती. रस्ता उत्तमच होता. मात्र जसजसे क्रुगरच्या जवळ यायला लागलो तसतसा कच्चा रस्ता सुरू झाला. आमच्या हॉटेलपर्यंत शेवटचा अर्धा पाऊण तासाचा रस्ता चांगलाच हाडे खुळखुळवणारा होता.

हॉटेल मात्र अप्रतिम. भर अभयारण्यात. गाडीतून उतरल्या उतरल्या आमचे स्वागत हसतमुखाने केले गेले. हात, तोंड पुसायला गरम टॉवेल्स, प्यायला थंडगार जूस. या हॉटेलाची रचना भवतालच्या निसर्गाशी जुळवून घेऊन केलेली दिसली. संपूर्ण बांधकाम लाकडी. लॉबी, रेस्टोरेंट्स सगळंच बाहेरच्या निसर्गाचा भाग वाटावा असे... हवेशीर.

kruger1.jpgkruger2.jpg

चेक इन केल्यानंतर आम्हाला सावधगिरीच्या काही सूचना देण्यात आल्या. ही जागा क्रुगर जंगलाचच भाग असल्यामुळे हॉटेलच्या आवारात वन्यपशु सहजतेने येतात. बरं, कुंपण वगैरे असा प्रकार नाहीच. रूम्स म्हणजे कॉटेजेस होते. आम्हाला सांगण्यात आले की आपापल्या कॉटेजला जातांना आमच्याबरोबर स्टाफपैकी कोणीतरी असणे अनिवार्य आहे. सकाळची वेळ असेल तर हरकत नाही पण रात्री मात्र जेवायला आम्ही जेव्हा हॉटेलच्या र्रेस्टोरेंट मधे येऊ तेव्हा आमच्या पुढे आणि मागे त्यांचे दोन गार्ड्स असतील. अगदी दोन ते तीन मिनिटांचा काय तो वॉक पण तरीही ते बंदुकधारी आमच्या बरोबर असणार.

सुमारे संध्याकाळच्या पाच सहाला आम्ही जरा ताजेतवाने होऊन आमच्या पहिल्या वहील्या गेम ड्राइव्हसाठी हजर झालो. या हॉटेलमधे दोन- तीन दिवसांचे सफारी पॅकेज होते ते आम्ही घेतले होते. यामधे राहणे, खाणे आणि गेम ड्राइव्स अशाचा समावेश होता.
सफारीसाठी दणदणीत मजबूत गाड्या सज्ज होत्या. प्रत्येक गाडीमधे सात आठ लोक. गाडीचा चालक उत्तम गाइड पण असतो. आम्हाला तीनही दिवस एकच गाइड मिळाला. शेन त्याचे नाव. या शेनला क्रूगरची खडानखडा माहीती होती. अर्थातच तिथल्या सर्वच गाइड्सना असतेच. कुठल्या जागी कुठले प्राणी आढळतील, त्या प्राण्यांविषयी सखोल माहीती आणि मुख्य म्हणजे त्यांच्याविषयी प्रचंड आस्था. या सर्वच लोकांना हे काम करायला फार आवडते. कुठेही पाट्या टाकण्याचा लवलेशही नव्हता.
गाडीच्या पुढयात किंचीत उंचीवर एका खुर्चिवर अजुन एक रेंजर बसलेला असतो. त्याचे काम म्हणजे दूरवर नजर ठेवणे, प्राणी आढळले की चालकाला तसे सांगणे आणि जनावरांकडून काही धोका जाणवल्यास त्याचा प्रतिकार करणे. दोन्ही रेंजर्स कडे बंदुका होत्या पण त्यांनी सांगितले की बंदुका ते कधीच वापरत नाहीत. काही संकट आल्यास बाकीचे सगळे उपाय करतात पण हां अगदी प्राणावर बेतले तरच नाइलाजाने बंदुकीचा उपयोग करतील. पण सुदैवाने अशी वेळ क्रुगरमधे आजतागायत कधीच आलेली नव्हती...येउही नये.

kruger3.jpgkruger4.jpg

आमच्या गाड्यांचा ताफा हॉटेलच्या आवाराच्या बाहेर पडला. बाहेर पडतो ना पडतो तोच ही मंडळी दिसली. यत्र तत्र ही हरणे दिसतात. पण जितकी यांची लोकसंख्या जास्ती तितकी यांची शिकार पण होते. जंगलातील जवळपास प्रत्येक प्राणी या हरणांना आपले भक्ष्य बनवतो. म्हणून या हरणांना प्राण्यांचे फेवरेट फास्ट फुड असे म्हणतात गमतीने Happy

kruger5.jpg

गाडी चालवतांना शेनच्या अखंड गप्पा चालल्या होत्या. त्याच्या बोलण्यातून क्रुगरची इत्यन्भुत माहीती आम्हाला मिळत होती. थोड्याच वेळात बिग फाईव्हपैकी एकाचे, र्‍हाइनोचे दर्शन झाले. अतिप्रचंड दिसणारा आणि संथ वाटणारा हा प्राणी वाटतो तितका संथ नसतो. धावायला लागला की बर्‍यापैकी वेगाने धावतो. आमच्यापासून काहीशा अंतरावरच हे गेंडे उभे होते. शेन म्हणाला आता बघा हं गंमत. असे म्हणून तो तोंडातून एक विशिष्ठ प्रकारची शिळ घालायला लागला. त्या शिटीचा आवाज इतका कमी होता की गाडीत त्याच्या सीटच्या थेट मागे बसलेल्या मलासुद्धा ऐकू येत नव्हता. मी त्याला विचारले काय करतोयस बाबा? तर बाबा म्हणाला की मी नं मादी गेंड्याचा आवाज काढून त्या नर गेंड्याला बोलवतोय...बेसिकली आय अम फ्लर्टिंग विथ हिम......
आणि खरंच त्यामधला एक गेंडा आमच्या दिशेने झुलत झुलत यायला लागला. आता मात्र आम्ही शेन साहेबांना त्यांचे फ्लर्टिंग आवरते घ्यायला सांगितले आणि तेव्हा कुठे आमची गाडी पुढे निघाली.

kruger6.jpg

अधे मधे जिराफ त्यांच्या माना लांब करून शांतपणे चरत होते. आतापर्यंत झू मधे बघितलेले जिराफ किती केवीलवाणे दिसतात याची आम्हाला नव्याने जाणीव होत होती. इथले सगळेच प्राणी त्यांच्या नैसर्गीक वातावरणात राहात असल्यामुळे अंगपींडाने जबरदस्त होते. हे जिराफ सुद्धा आमच्या आतापर्यंतच्या अनुभवापेक्षा दणदणीत उंच आणि सशक्त दिसत होते.

kruger7.jpg

आता ब्रेकची वेळ झाली होती म्हणून शेननी गाडी थांबवली. मग त्याने आणि दुसर्या रेंजरने छानपैकी एक छोटेसे टेबल मांडले. बरोबर त्याने थोडा खाऊ आणि ड्रिंक्स आणले होते त्याची पटापट मांडणी केली. जंगलाच्या अगदी मधोमध आमची मग छोटीशी पिकनिक सुरू झाली. आमच्या बरोबर जे दुसरे एक कुटुंब होते ते सुद्धा खूप चांगले होते. आमच्या गप्पा अगदी रंगल्या होत्या आणि समोर सूर्यास्त होत होता.....एक अतिशय सुरेख अनुभव घेऊन आम्ही हॉटेलकडे वळलो.

दुसर्या दिवशी सकाळी पाच वाजता आम्हाला वेक अप कॉल आला की फ्रेश होऊन लॉबीमधे या. लॉबीमधे गरम चहा कॉफी आणि बिस्किट्स ठेवली होती. ज्यांना खायचे प्यायचे असेल त्यांनी पटकन खाऊन जीपमधे बसावे असे आम्हाला सांगितले. सकाळी आणि संध्याकाळी प्राणी थंड हवेत बाहेर फिरायला, पाणी प्यायला येतात त्यामुळे एक सकाळी आणि एक संध्याकाळी असे हे गेम ड्राइव्स ठरलेले असतात. आज सकाळी सिंह, चित्ता दिसावेत अशी आम्हाला आशा होती.

आज आणि कालही हत्ती खूप दिसत होते. प्रचंड आकाराचे हे आफ्रिकन हत्ती आपल्या गाडीच्या अगदी जवळ आले की छातीत धडधडायला होतं. बरं हे हत्ती फिरतात सुद्धा एकटे दुकटे नाही किमान तीन, चार च्या झुंडीत. तशी त्यांना माणसांची सवय असते पण डोकं फिरलं तर काय करतील याची कल्पना सुद्धा करवत नाही. शेनने आम्हाला सूचना दिली होती की हत्ती म्हणा किंवा सिंह जर पुढयात आला तर पॅनिक होऊ नका. फक्त गाडीत स्तबधपणे बसून राहा. अशावेळी गाडी मागे फिरवून पळून जाण्यातही काहीच अर्थ नसतो. असे केल्यास प्राणी अधीकच चवताळतात आणि पाठलाग करतात. जवळ आलेल्या हत्तीला आमचा रेंजर दूर हो, दूर हो असे सांगत होता. आम्ही पहिल्यांदाच इतक्या जवळून असे जंगली हत्ती पाहात होतो. इथे हत्तींची फार मोठ्या प्रमाणावर शिकार व्हायची. आता मात्र या प्रकाराला खूप चाप बसलाय. क्रुगर चे शस्त्रधारी रेंजर्स सगळीकडे नजर ठेवून असतात. तरीही अधूनमधून असे प्रकार होतातच. या अवैध शिकारीमागे मोझम्बिकच्या टोळ्यांचा सर्वात जास्ती हात असतो. या टोळ्या मोझंबिकमधून थेट क्रुगरमधे येतात.

kruger8.jpgkruger9.jpg

पक्षी मात्र आम्हाला फार दिसले नाहीत. या शेनला त्याच्या वॉकी टॉकी वरुन अधेमधे सूचना येत होत्या. मधेच त्याला काहीतरी सूचना मिळाली तशी शेननी जीप गरर्कन वळवली आणि थोड्याच वेळात यांचे दर्शन झाले...

kruger10.jpg

जणू फोटोसाठीच या राणीसाहेब पोज देत होत्या. एकदम रॉयल कारभार. डोळ्यात जरब. एक क्षणभरच मी तीच्या नजरेला थेट नजर द्यायचा प्रयत्न केला.....इतकी तेजस्वी आणि खिळवून टाकणारी नजर आज एक वर्षांनीदेखील मी विसरू शकत नाही. समोर असलेल्या झुडुपात तिची पिल्ले होती. गाडीत पीन ड्रॉप शांतता!
आमच्या गाडीपासून अवघ्या दहा पावलांवर हे राजस सौंदर्य पहुडले होते ....आजचा आमचा गेम ड्राइव सफळ संपूर्ण झाला होता!

kruger11.jpgkruger12.jpg

हॉटेलवर परत आलो तोवर ब्रेकफस्टची वेळ झाली होती. ब्रेकफास्ट चांगलाच होता आणि अगदी त्यांच्याच आवारातल्या ताज्या भाज्या आणि फळे असल्यामुळे जास्तीच चवदार होता. तेथील अंड्यांचे ऑम्लेट मात्र फार उग्र वाटत होतं. त्यांच्या पोल्ट्री फार्मवरची ताजी अंडी आहेत असे तेथील स्टाफ सांगत होता. ते खरंच होतं पण ती इतकी फार्म फ्रेश चव माझ्या शहरी जिभेला मानवली नाही हेही तितकंच खरं. बाकी सकाळ, संध्याकाळचे जेवणही छानच होते. मुख्य म्हणजे माझ्यासाठी असलेले शाकाहारी जेवण पण उत्तम आपल्या भारतीय चवीने बनविले होते. त्यांचा संपूर्ण स्टाफ अतिशय आस्थेने आम्हाला खाऊ घालत होता, अगदी आपुलकीने.

जेवण झाल्यावर हॉटेलच्याच लायब्ररी मधे थोडा वेळ घालवला. एखादे मचाण असावे नां तशा रुपाची इथली लायब्ररी मस्तं होती. म्हणजे पुस्तके यथातथाच पण तिथे बसायला मजा वाटत होती. तिथल्या स्वींमिग पूल मधे जरा वेळ पोहावं म्हणून आम्ही गेलो. तोच तेथील अटेंडेंट भयंकर उत्साहात दिसली. आम्हाला बघताच'' अरे वा पूलवर जाताय नां? जा, जा खूप मज्जा येईल तुम्हाला.'' तिने मज्जा येईल असे म्हणताच आम्ही एकदम अलर्ट!! क्रुगरच्या लोकांच्या मजेच्या कल्पना आमच्यापेक्षा जरा वेगळ्या आहेत हे एव्हाना आम्हाला लक्षात आलंच होतं. साधारणतः ज्या गोष्टी त्यांना खूप मज्जेदार वाटतात त्या आपल्याला वाटतीलच असे नाही. म्हणून विचारले तिला की बाई काय मज्जा आहे तिथे सांग तर आधी. तर म्हणाली त्या स्वींमिंगपूलच्या जवळ जी नदी आहे की नै...तिथे किनै आता हत्तींचा कळप येतोय पाणी प्यायला. मला आत्ताच कळलं. तुम्हाला छान अगदी जवळून बघायला मिळतील हत्ती. ते येतात नां पुलच्या अगदी जवळ......हे ऐकल्यावर आम्ही आमचा स्विमिंगचा प्लान तातडीने कॅन्सल केला आणि सुसाट वेगाने आमच्या कॉटेजच्या दिशेने निघालो Proud

आज आमचा इथला आणि या देशातला सुद्धा शेवटचा दिवस होता. उद्या परतीचे विमान होते. आम्ही संध्याकाळी शेवटच्या गेमड्राइवसाठी आता तयार झालो
आज आम्हाला हिप्पोज बघायला नदीच्या किनारी नेण्यात आले. किनार्यावर खडकांवर बसून पाण्यात डुंबणारे हीप्पोज पहायला गंमत वाटत होती. ते अजस्त्र,माहाकाय प्राणी मोठ्या मजेत पाण्यात डुंबत होते.

kruger14.jpgkruger15.jpg

तेव्हड्यात शेनला सूचना आली की जवळपासच लेपर्ड आहे कुठेतरी. मग काय आम्ही सगळेच उत्साहाने निघालो लेपर्डला शोधायला. फार वेळ शोधावे लागलेच नाही. जवळच एका झाडावर हे ध्यान बसलेलं उंचावर. थोड्यावेळाने त्याला काय वाटले कुणास ठाऊक पण तो त्या झाडावरून खाली उतरला आणि आमच्या गाडीसमोरून आरामात चालत चालत आसपासच्या झाडीत गुडूप झाला.....आमची ही शेवटची ड्राइव पण वसूल झाली होती :))

kruger16.jpgkruger17.jpg

संध्याकाळी डिनरची वेळ झाली तसे आम्ही आवरून रेस्टोरेंटमधे आलो तर आज तिथे काही वेगळाच नूर होता. तेथील जेवण्याचे टेबल्स काढले होते, फक्त बार तेव्हडा ओपन होता. हॉटेलच्या पाहुण्यांसाठी आज आफ्रिकन ड्रम्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम रंगत होता. ड्रिंक्स आणि अपेटायझर्सचे ट्रेज़ सर्वांमधून फिरत होते तेव्हड्यात डिनरची वेळ झाल्याची घोषणा झाली. जेवणाचे ठिकाण नेहमीच्या रेस्टोरेंटमधे नाही तर आज दुसरीकडेच आहे असे आम्हाला सांगण्यात आले. नेहमीप्रमाणेच बंदुकधारी रेंजर्स बरोबर आम्ही निघालो पायीच. बाहेर पडून हॉटेलच्याच आवारातून आम्ही चालत होतो. सबंध काळोख...रातकिड्यांची किरकीर तेव्हडी फक्त ऐकू येत होती. अगदी तीन ते चार मिनिटातच आम्ही एका बंदिस्त पण प्रशस्त अंगणात येऊन पोहोचलो. गडद अंधारातून जेव्हा त्या अंगणात पोहोचलो तेव्हा तेथील नजारा पाहून अक्षरश: स्तब्ध झालो. त्या अंगणात चहुबाजूंनी लखलख मशाली उजळलेल्या होत्या. मशालींचा तो उजेड, माथ्यावरचे काळेभोर आकाश, जागोजागी कंदील टांगलेले..अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटलेली आणि अशा वातावरणात जेवणाचे टेबल्स मांडलेले......सुख, सुख म्हणतात ते तरी दुसरं काय असावं??

इतके लोकं असूनही सभोवताली एक मंद तृप्त शांतता पसरली होती. त्या मंतरलेल्या वातावरणाची धुंदी आमच्या तनमनावर हळूहळू साचत होती...दुरून येणारा ड्रम्सचा नाद आता गुंगी आणत होता.. डोळे जड जड होत होते...

या अविस्मरणीय सफरीचा शेवटचा दिवस आता संपला होता...आमच्या मनात सुखाची सप्तरंगी उधळण करीत क्रुगरमधे अलगद रात्र उतरत होती...

समाप्त!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह , लाजवाब. अतिशय सुंदर शैली. रोमांचकारी अनुभव. एक्दम डोळ्यांसमोर चित्र उभे केलेत