गुरुदत्त!

Submitted by अदित्य श्रीपद on 7 July, 2017 - 13:08

गुरुदत्त!

तुमच्या मते हिंदी सिनेसृष्टीतले आतापर्यंत झालेले ५ सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते? मला वाटते, कधीही-कुठेही, म्हणजे कॉलेज कॅन्टीन, हॉटेल, मित्रांचे गप्पांचे अड्डे, पेन्शनरांची शिळोप्याच्या गप्पा मारायची ठिकाणं, हा प्रश्न विचारला तर २ मिनिटात रणधुमाळी सुरु होईल. कोणी ‘शोले’ म्हणेल, कोणी ‘मुघल-ए-आजम’ कडे बोट दाखवेल. कोणी ‘मदर इंडिया’ म्हणेल तर कोणी अगदी ‘तेजाब’ किंवा ‘हम आपके है कोन’ सुद्धा म्हणेल. (आपण दचकायाचं नाही, त्याला “फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारलाय, लग्न समारंभाची विडीयो कॅसेट नाही” असं म्हणून गप्प करायचं...) या पाच पैकी पहिला कोण ह्यावर तर कधीच एकवाक्यता होणार नाही. पण एक चित्रपट असा आहे कि ज्याच्या या पाच चित्रपटांच्या यादीत समावेश असण्यावर कुणाचाही आक्षेप असणार नाही आणि जो कोणी आक्षेप घेईल त्याला लगेच एका मुखाने निषेध करून ( थोडक्यात ढोस देऊन)गप्प करण्यात येईल. तो चित्रपट म्हणजे १९५७ साली आलेला आणि प्रचंड गाजलेला गुरुदत्तचा ‘प्यासा’.त्याकाळी जेव्हा लोक आज पेक्षा सर्वच बाबतीत जरा जास्तच सनातनी होते (म्हणजे असं म्हणतात बुवा आपल्याला काय खरं-खोट माहित नाही.)त्याकाळी ह्या हटके सिनेमाने जे अभूतपूर्व यश मिळवलं (कस काय कोण जाणे?) त्याची पूर्ण कल्पना आज आपल्याला येणं तसं अवघड आहे. पण या सिनेमाने इतिहास घडवला हे खरं. त्याकाळी ‘प्यासा’ वर उसासून बोलणे हि फ्याशन झाली होती.गुरुदत्त, ह्या काळाच्या खूप पुढे असणाऱ्या एका संवेदनशील माणसाने काढलेला, दिग्दर्शित केलेला, स्वतः काम केलेला असा हा भावनोत्कट काव्यपट.

गुरुदत्त म्हटलं कि ज्यांना त्याच्याबद्दल फारसं काही माहिती नसते असे लोक त्याने आत्महत्या का केली असावी? यावर गप्पा मारू लागतात. आत्महत्या करणे हा भ्याडपणा कि नैराश्याचा अतिरेक? तुम्ही गुरुदत्तच्या आत्महत्येला काय वाटेल ते नाव द्या. मुळात ती आत्महत्या होती कि अपघात यावरच एकमत नाही. राज खोसला म्हणतो “तो अपघात होता, त्याला दारू बरोबरच झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय होती आणि त्या रात्री नशेच्या अंमलाखाली आपण किती गोळ्या घेत आहोत याच त्याला भान राहिलं नाही.त्याची दुसऱ्या दिवशी राज कपूरशी भेट ठरलेली होती, अगदी वेळ घेऊन. मग तो आत्महत्या कशी करेल? तो अपघातच होता.” तर आदल्यारात्री त्याच्या बरोबर प्यायला बसलेला अबरार अल्वी (त्याच्या आरपार, सी. आय.डी., प्यासा वगैरे चित्रपटांचा संवाद लेखक) म्हणतो, “नाही ती आत्महत्याच होती.’कागज के फुल’चं अपयश, गीता दत्त बरोबरचे वाद, वहिदा प्रकरणाचे ताण तो सहन करू शकला नाही. त्याने या पूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैफल्य, निराशा या मनस्वी कलावंताला वारंवार ग्रासे. त्याच्याच प्यासा मधल्या साहिरच्या गाण्याप्रमाणे ‘तुम्हारी है, तुम् ही संभालो ये दुनिया’ म्हणत तो या जगातून निघून घेला.”
गुरुदत्त पदुकोन(कानडी उच्चार पदुकोने)हा कारवारचा चित्रपूर सरस्वत ब्राह्मण(CSB) – आपल्या कडे जसे मासेखाऊ गौड सरस्वत ब्राह्मण असतात ज्यांना आपण(खरतर ते स्वतःच) GSB म्हणतो तसेच हे कारवारचे. आता विषय निघाला म्हणून सांगायला हरकत नाही कि सध्याच्या आघाडीच्या दीपिका पदुकोनशी व्यवसाय,नाव आणि जात सोडली तर गुरुदत्तचा काहीही संबंध नाही. याचं मूळ नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोन. पण लहानपणी काहीतरी अपघात का आजारपणातून वाचल्याने मातापित्यांनी गुरुदत्त हे नाव दत्ताचा आशीर्वाद म्हणून ठेवलं. सुरुवातीच्या काळात त्याने पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनी मध्ये उमेदवारी, नोकरी केली.विश्राम बेडेकर यांचा ‘लाखाराणी’ या पिक्चरचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता. त्याने याच चित्रपटात नायिकेच्या भावाची छोटी आणि फुटकळ भूमिका ही केली होती. इथेच तो आणि प्रभात मध्ये उमेदवारी करणारा देव आनंद यांची भेट आणि दोस्ती झाली.(त्यांच्या बरोबर ‘रेहमान’ हि असे )स्ट्रगल करणाऱ्या दोघांनी एकमेकांना असं वचन दिलं कि दोघांपैकी जो कोणी आधी निर्माता होईल तो दुसऱ्याला आपलं पिक्चर दिग्दर्शित करायला देईल. हे वचन देताना दोघेही किती गंभीर होते, ते माहित नाही पण देव आनंद हा आधी ‘नवकेतन’ चा मालक झाला आणि त्याच्या ‘नवकेतन फिल्म्स’ चा दुसरा चित्रपट(पहिला चित्रपट ‘अफसर’ देव च्या मोठ्या भावाने चेतन आनंदने दिग्दर्शित केला होता) ‘बाजी’ हा त्याने ‘वादे के मुताबिक’ गुरुदत्तला डीरेक्ट करायला दिला. देव त्याच्या वचनाला जागला आणि गुरुदात्तने या संधीचं सोनं केलं.
१९५१ साली आलेला ‘बाजी’ हा अनेक अर्थाने ट्रेंड सेटर चित्रपट होता. त्याआधी चित्रपट बहुतांश ऐतिहासिक, सामजिक, पौराणिक, कौटुंबिक वगैरे असत आणि त्यातली पात्र बटबटीत असत. म्हणजे नायक हा नेहमी सज्जन, अगदी साधू नसला तरी सत्प्रवृत्त असे तर खलनायक पूर्णपणे वाईट. त्यांना मानवी कंगोरे नसत. चित्रपटात खलनायक असले तरी गुन्हेगारी जगताची झलक फारशी नसे. ‘बाजी’ने गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या चित्रपटची मुहूर्तमेढ रचली.आज जसा ‘सत्या’ हा चित्रपट एक ट्रेंड सेटर म्हणून आपण मानतो किंवा जंजीरला अंग्री यंग मन टाईप नायक प्रथम पुढे आणणारा मानतो तसं बाजी हा त्याकाळातला ट्रेंड सेटर चित्रपट होता. एस. डी. बर्मनची गाणीहि बरीच गाजली. मुख्य म्हणजे गुरुदत्तचं नाव झालं.बाजीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज खोसलाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट. (तोच तो घोडे आणि घोडेस्वारी अत्यंत आवडणारा आणि जवळपास प्रत्येक चित्रपटामध्ये जमेल तिथे घोडेस्वारी चे प्रसंग घुसडणारा) राज खोसला हा देव आनंद चा लंगोटीयार आणि त्यांच्या आधीच्या पिढीत हि घरोबा होता त्यामुळे गायक बनण्याचं वेड घेऊन आलेल्या ह्या मित्राला देवने गुरुदत्त कडे सहाय्यक म्हणून घ्यायची विनंती केली. गुरुदत्तने त्याला विचारलं, “या आधी कधी सहाय्यक दिग्दर्शकाच काम केलय का?” तो म्हणाला, “नाही.” गुरुदत्तने विचारलं, “तुला सिनेमातलं काय माहित आहे ?” तो म्हटला, “कुंदनलाल सैगल.” गुरुदत्त हसला आणि त्याला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ठेऊन घेतलं. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.
‘बाजी’ च्या वेळेसच त्याच्या डोक्यात प्यासाचं कथानक घोळत होतं. पण इतकी तरल भावस्पर्शी कथा प्रेक्षक स्वीकारणार नाहीत अशी भीती वाटून त्याने थोडसं थांबायचा निर्णय घेतला आणि त्याचे जाल(१९५२), बाज(१९५३) आरपार(१९५४) हे सगळे धंदेवाईक चित्रपट ओळीने आले. त्याच्या पहिल्या चित्रपटची नायिका गीताबाली हिला घेऊन जाल आणि बाज काढले होते . बाज अत्यंत भिकार पोशाखी चित्रपट होता तो अर्थातच कोसळला.या चित्रपटाच्या निमित्ताने गुरुदत्त, गीताबाली ची बहिण (योगिता बालीची आई) हिच्या बरोबर भागीदारी करून ‘फिल्म आर्ट’ ही संस्था काढून तो निर्माता आणि नायक हि झाला. खरंतर हा चित्रपट त्याचा नायक म्हणून पहिला चित्रपट पण तो दाणकन आपटला. गाणी हि फारशी बरी नव्हती. त्यामुळे बाजी मध्ये हात दिलेली खेळी ती पुन्हा एकदा आरपार मध्ये खेळला.
१९५४ साली आलेल्या गुरुदत्त प्रोडक्शन च्या आरपार ह्या पहिल्याच चित्रपटाने ओ.पी. नय्यर ला संगीतकार म्हणून नावारूपाला आणले.तसे ह्या आधी त्याने संगीत दिलेले कनीज(१९४९) आणि आसमान(१९५२) हे दलसुखलाल पंचोलीची निर्मिती असलेले चित्रपट येऊन गेले होते पण त्याचं फारसं नाव काही झाल नाही. गुरुदत्तच्या भिकार ‘बाज’ चा हि तोच संगीत दिग्दर्शक होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बेतलेली कथा, धमाल गाणी, श्यामा, शकीला सारख्या नायिका आणि तत्कालीन प्रचलित अशी मुंबईया हिंदी-मराठी भाषेवर बेतेलेले संवाद (म्हणजे ‘हमको’ ‘तुमको’, असे शब्द किंवा स्वतःबद्दल बोलताना ‘याऱोका टाईम आजकल खराब चल रहा है.’ असे संवाद). मुंबईतले गल्लीबोळ, तिथली खट्याळ, वात्रट, काहीशी मवाली मुलं, हे सगळं बारकाईने सिनेमात पहिल्यांदा आरपारने आणले.श्यामा ह्या अत्यंत सुंदर, अवखळ, बोलक्या डोळ्याच्या, फ्रेश नायिकेनी कमाल केली. तिची सगळी गाणी गाजली. आजही ती गाणी नुसती श्रवणीय नाहीत तर प्रेक्षणीय सुद्धा आहेत. ‘ये लो मै हारी पिया’... म्हणताना फक्त गाडीत बसून तिने चेहऱ्यावर जे जे विविध भाव दाखवले आहेत ते पाहून गाणं ऐकायचं विसरायला होतं. या गाण्यात एक प्रसंग आहे. श्यामा ‘लडते हि लडते मौसम, जाये नाही बित रे...’ म्हणत असताना, गुरुदत्त गाडी चालवत असतो अचानक कोणीतरी गाडी समोर येत म्हणून गुरुदत्त पटकन पुढे स्टेअरिंग कडे सरकतो आणि परत मागे सीट कडे येतो तो जसा मागे पुढे सरकतो त्या लयीत श्यामा सुद्धा पुढे मागे सरकते आणि नुसती सरकत नाही तर अगदी तरंगत गेल्यासारखी वाटते. ती त्याच्या चेहऱ्यावरची स्वतःची नजर जरासुद्धा हलवत नाही . मी कितीही वेळा हा प्रसंग पहिला तरी मनाचं समाधान होत नाही. जेव्हा जेव्हा हे गाणं मी पाहतो तेव्हा हा शॉट मी २-३ वेळा रिपीट करून पाहतोच. ते कशाला? खाली लिंक दिलेली आहे गाण्याची, गाणं आणि तो प्रसंग आवर्जून पहाच.
https://www.youtube.com/watch?v=5bEEWUhEwec
संगीत कथा संवाद अभिनय सर्वच बाबतीत ‘आरपार’ ने इतिहास घडवला आणि मुख्य म्हणजे गुरुदत्तला तगवलं. ‘आरपार’ नंतर त्याचे Mr. & Mrs. '55 (१९५५), आणि सी आय डी (१९५६) हे चित्रपट आले.
Mr. & Mrs. '55 हा रोमांटिक कॉमेडी होता. मधुबाला, टूणटूण, जॉनी वॉकर, ललिता पवार, यांनी मजा उडवून दिली. यातली गाणी सगळी गाजलीच पण त्याच बरोबर गाणी चित्रित करण्याच एक वेगळ, खास गुरुदत्ती तंत्र इथे पूर्ण पणे विकसित झालेलं पाहायला मिळालं. पुढे हि कला राज खोसला आणि विजय आनंदने अधिक जोपासली.मी काय म्हणतो हे जो पर्यंत तुम्ही ‘जाने कहा मेरा जिगर गया जी...’ किंवा ‘दिल पर हुवा ऐसा जादू...’ हि गाणी पहात नाही तोपर्यंत नीट कळणार नाही. खाली लिंक दिलेली आहे.
https://www.youtube.com/watch?v=F5Tfd1EKtLI
https://www.youtube.com/watch?v=iYfxA5fFpwc
पूर्वी गाणं सुरु होताना आधी चित्रपटात वातावरण निर्मिती व्हायची, काही विशिष्ट प्रसंग, नायक, नायिकेचे हावभाव, संवाद झडायचे. नंतर सुरावट वाजू लागायची. म्हणजे प्रेक्षकांना कळायचं कि आता ‘गाणं होऊ घातलय.’ आणि ते सावरून बसत किंवा झोपायची तयारी करत. पण ‘दिल पर हुवा ऐसा जादू...’ ने प्रथमच हे संकेत पायदळी तुडवले. काहीही वातावरण निर्मिती न करता धाडकन ‘दिल पर हुवा ऐसा जादू...’असे शब्द आपल्या कानावर येऊन आदळतात.मज्जा येते.
ह्या चित्रपटातले प्रसंग हि तसेच खुमासदार होते. ललिता पवार (सीता देवी ) गुरुदत्तने(प्रीतम) काढलेल्या कार्टून मुळे( हे कार्टून प्रत्यक्षात आर के नारायण यांनी काढले होत एव्हढच नाहीतर चित्रपटात कार्टून काढताना दाखवलेला हात त्यांचाच आहे – रोमन ष्टाइल रथात ललिता पवार बसलेली आहे आणि घोड्याच्या जागी गुरुदत्त आणि मधुबाला यांना दावणीला बांधले आहे असे ते कार्टून आहे ) भडकून त्याला जाब विचारायला जाते तेव्हा तिच्या प्रश्नांना तो फक्त ‘जी हां” एवढेच उत्तर देतो. तो एकूण चार वेळा ‘जी हां’ म्हणतो पण प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने म्हणतो. एवढ कमी म्हणून कि काय शेवटी चिडून जेव्हा ललिता पवार वैतागून “तुमसे तो कोईशरीफ इन्सान बात हि नही कर सकता. मेरा वकील हि तुमसे बात करेगा” असे म्हणते तेव्हा गुरुदत्त ‘ क्यु, आपके वकील साहब शरीफ इन्सान नही है क्या?” असे विचारतो तेव्हा ह्या प्रसंगावर कळस चढतो.
‘जाने कहा मेरा जिगर गया जी...’ या गाण्यात साधी exstra असलेल्या जुली हे तिच्या पात्राचे नाव होतं-(यास्मिन -विनिता भट्ट)ने जो अभिनय केला आहे तो नक्कीच तिच्या कडून गुरुदत्तने करून घेतला असेल. “बाते है नजर कि नजर से समझाऊन्गि... म्हणताना तिने केलेले दृष्टीविभ्रम केवळ अप्रतिम. या एका गाण्याने ती अजरामर झाली आहे. आणि श्रेय गुरुदत्तचच आहे.तिला ह्या एका चित्रपटामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली पण तिने त्याच चित्रपटाच्या प्रोडक्शन टीम मधल्या जिमी विनिंग नावाच्या पारशी मेकअप आर्तीस्ट बरोबर लग्न केले, पुढे काम केले नाही किंवा केले असल्यास मला माहित नाही.
‘बाजी’ मध्ये देव आनंदने पाळलेल्या वचनाची परतफेड गुरुदत्तने १९५५ साली आलेल्या ‘सी. आय. डी.’ मध्ये त्याला हिरो करून केली. ‘सी. आय. डी.’हा तुफान चालला. कथा, गाणी सगळ हिट होतं. राज खोसला गाण्याच्या चित्रीकरणाला होता. तो आठवण सागतो, अत्यंत गाजलेल्या ‘लेके लेके पहला पहला प्यार’ च्या चित्रिकरणावेळी देव आनंद विचारत होता “मी या गाण्यात नक्की काय करायचं/ शीला वाज गाणं म्हणत नाचते, पेटीवाला गाणं म्हणतो, शकीला रुसल्याचा अभिनय(?) करते, मी काय करू?” गुरुदत्त म्हणाला “काही नाही तू फक्त चाल.” देवआनंद म्हटला “म्हणजे! मी अभिनय किंवा हातवारे काय करायचे आहेत?” गुरुदत्त म्हणाला “नाही, काही नाही , काहीही नाही, तू फक्त चाल. चालत रहा, तुझा देवानंद म्हणून वावरच पुरेसा आहे.”
हा वहिदा रेह्मानाचा गुरुदत्त कडचा पहिला चित्रपट यात तीची भूमिका काहीशी निगेटिव होती. तिचं गुरुदत्तच्या आयुष्यातलं पदार्पण हि निगेटिवच ठरणार होतं, ह्याची ती नांदी होती.कदाचित..
अजून गुरुदत्तचे प्यासा , साहिब बीबी और गुलाम कागज के फुल अशा अत्यंत महत्वाच्या चित्रपटाबद्दल लिहायचे आहे . पण ह्या एका एका चित्रपटावर एक स्वतंत्र लेख होईल म्हणून आता हा जरा लांबलेला लेख आवरता घेतो. आणि हे चित्रपट पुढच्या लेखाकरता राखून ठेवतो....
---आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख. गुरुदत्त बद्दल कायम कुतूहल वाटत राहील.

वर उल्लेखलेले सगळे चित्रपट मी दूरदर्शन च्या कृपेने पाहिलेले आहेत. मिस्टर और मिसेस 55 ची घोषणा झाली तेव्हा कधी नावही ऐकले नव्हते, त्यामुळे 'अरे देवा..आता काय बघायला मिळतेय' अशी मनस्थिती झालेली, पण चित्रपट तुफान हसवतो. त्यातली गाणी तर अतिशय गोड. आधी कित्येकदा ऐकलीत हे चित्रपट पाहताना लक्षात आलेले.

गुरुदत्त ने त्याच्या बॅनर बाहेरील चित्रपटही केलेले ना? आशा पारेख सोबत त्याचा भरोसा आठवतोय पाहिलेला. त्यातली गाणी अतिशय सुंदर होती. साहिब बीबी मधला त्याचा निरागस भूतनाथ अजूनही आठवतो.

मात्र गीता दत्तच्या शोकांतिकेला तो पूर्ण जबाबदार असे मला कायम वाटत राहिलंय. बहुतेक त्याच्यासाठीच म्हणून असेल, तिने स्वतःची करिअर नीट फुलू दिली नाही, स्वतःवर बंधने घालुन घेतली. पण संवेदनशील दिग्दर्शक असलेला गुरुदत्त नवरा म्हणून ती संवेदनशीलता आपल्या बायकोला दाखवू शकला नाही.

छान लिहिले आहे. युटयूबकृपेने बाझी, आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, प्यासा, कागज के फूल, साहिब बीवी और गुलाम, सीआयडी वगैरे पाहून झालेत.

गुरुदत्त, वहिदाच्या 12 ओ क्लॉकबद्दल मात्र कुठेच काहीच वाचायला मिळत नाही. तो युटयूब वरपण नाही. त्यातली गाणीमात्र फार आवडतात.