चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग १)

Submitted by पद्म on 22 July, 2017 - 13:09

"दादा........उठ लवकर! ७ वाजले", मम्मीने पांघरूनसुद्धा ओढून घेतलं, "तुला जायला उशीर होईल नाहीतर. आणि पप्पा पण यायचं म्हणताहेत."

"बरंय तेवढाच माझा बसने जायचा त्रास कमी होईल", माझी मेहनत कमी झाली कारण आता पप्पांच्या बाईकने जाणार.

मी शिरपूरला आजी बाबांना भेटायला जातोय, असं मम्मी पप्पांना तरी वाटतंय. पण खरं तर मी फक्त सृष्टीला भेटण्यासाठी हे सर्व प्लॅन केलंय.
__________________________________________________________________________________________________________________________________
माझा जन्म शिरपूरलाच झाला होता, तेंव्हा पप्पा एका कंपनीत एरिया मॅनेजर होते. माझ्या जन्माच्या काही दिवसानंतरच पप्पांच्या मित्रालापण मुलगी झाली, सृष्टी! आम्ही तेंव्हा भाड्याच्या घरात राहायचो, आमचे घरमालक तर इतके खुश झाले होते, जसे त्यांच्या घरी नातू जन्माला आलाय. लहानपणापासूनच मला त्यांचा आणि त्यांना माझा लळा लागला होता, आजीही माझ्यावर तितकंच प्रेम करायच्या. खरंच ते माझे स्वर्गीय दिवस होते.

सृष्टीचे पप्पापण त्याच गल्लीत राहायचे, आणि आजीबाबा तिच्यावरही प्रेम करायचे. तिचे आणि माझे संपूर्ण बालपण बाबांच्या घरीच गेले. सृष्टी माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण होती आणि माझा तिच्याशिवाय दुसरा कोणी मित्रही नव्हता; म्हणून तिचे माझ्या आयुष्यात एक युनिक स्थान होते. ती जरी माझ्यापेक्षा लहान होती, पण खरंच माझ्यापेक्षा जास्त समजदार होती. तिच्याशिवाय मी काहीच करत नसायचो, संपूर्ण दिवस मी तिच्यासोबतच घालवत असे. हळूहळू आम्ही मोठे होत गेलो. शाळेतपण आमचं नाव एकत्रच टाकलं होतं, मग काय शाळेतपण सोबत. लहानपणी मी खूप भित्रा होतो, कोणी जोरात बोललं तरी डोळ्यात पाणी, पण सृष्टी माझ्यासाठी नेहमी भांडायला तैयार असायची. म्हणून तिने माझ्या हृदयात एक कोपरा आधीच बुक करून ठेवला होता.

आनंदाचे दिवस खरंच लगेच सपंतात, माझेही ते दिवस चुटकीसरशी संपले. मी चौथीत असतांना पप्पांनी धुळ्यात एक छोटा बिझनेस चालू केला आणि माझा शिरपूरशी संपर्क तुटला. शिफ्टिंग करायच्या दिवशी आजीबाबा, मम्मी, मी आणि सृष्टी खूप रडलो होतो. मी आणि सृष्टी एकमेकांचे एकमेव मित्र असल्यामुळे थोडे जास्तच रडलो होतो. त्या काळात कोणाकडेच मोबाईल नव्हते म्हणून मोबाईल नंबर्सची देवाणघेवाणही झाली नाही.
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

दिवस कोणासाठीच थांबत नाहीत, मीपण धुळ्यात आल्यावर काही दिवसातच सृष्टीशिवाय राहायला शिकलो आणि नवीन मित्र जुळत गेले. पण माझ्या आयुष्यात तिच्यानंतर कोणतीच मैत्रीण आली नाही. हळूहळू दिवस सरत गेले, मी बारावीनंतर पुण्यात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. तिथलेही दिवस पटापट संपत होते, आणि मी शेवटच्या वर्षाला असताना मला ती बातमी मिळाली, मी खरंच म्हणजे खरंच म्हणजे खरंच शॉक झालो.

मम्मीनेच फोनवर सांगितलं, "पुढच्या आठवड्यात सृष्टीचं लग्न आहे!"

जास्त काही बोललो नाही, कारण तिच्यासाठी सृष्टी म्हणजे पप्पांच्या मित्राची मुलगी; पण माझ्यासाठी ती माझी बेस्ट फ्रेंड होती. अचानक माझ्या हृदयातून कोणीतरी काहीतरी काढून घेतल्याचा भास झाला; कारण तिने हृदयाचा जो कोपरा बुक करून ठेवला होता, तिथे इतके वर्ष अंधार जरी असला, तरी पोकळी मात्र नव्हती. पण आज तिथे पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटत होतं, ती तर माझी फक्त बेस्ट फ्रेंड होती, मग मला हे असं का वाटत होतं याचं उत्तर मात्र मलाही माहिती नव्हतं.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मम्मीचा फोन आला, "दादा, कुठे आहेस?"

मी, "रूमवरच".

"अरे, काल पप्पा आणि मी शिरपूरला गेलो होतो, सृष्टीच्या लग्नाला." मम्मीने खास हे सांगण्यासाठीच फोन केला होता, "मस्त झालं लग्न. आजी बाबांची खूप इच्छा होती तुला बघायची, त्यांना वाटलं होतं तू पण येशील म्हणून, हिरमोड झाला बिचाऱ्यांचा."

"जाऊदे, बाकी सृष्टी काय म्हटली? मला विसरली असेल, नाही?"

"अरे, अशी कशी विसरेल? विचारत होती अनिकेतला का नाही आणलं माझ्या लग्नाला म्हणून."

"मग, तू काय सांगितलंस?"

"मी तर म्हटली, तू बोलावलं असतंस तर आला असता, तूच नाही बोलावलंस मग कसा येईल?"

"ती तरी कशी बोलावेल, तिच्याकडे माझा नंबर वगैरे काहीच नाही. आणि तसंही ती फक्त फॉर्मॅलिटी म्हणून बोलली असेल."

"जाऊदे, बाकी कॉलेज कसं चाललंय? फायनल ईयर आहे, नीट अभ्यास कर."

"ओके! चल ठेऊ फोन? उद्या परवा करेनच परत. बाय!"

त्या दिवशी हृदयाचा कोपरा रिकामा झाला होता. पण करणार काय, ते म्हणतात ना, "जीवनात कुणीच कुणाचं नसतं, जर हे मला आधीच कळलं असतं, तर हे दुभंगणारं नातं कधीच जोडलं नसतं, पण करणार तरी काय, जीवन हे असंच असतं." असो, आयुष्य कुणासाठीच थांबत नाही आणि माझंही थांबलं नाही. ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मुंबईत लेक्चरर म्हणून जॉबही मिळाला. पुन्हा एकदा मी सृष्टीला विसरलो होतो. आणि काही दिवसांपूर्वी अजून एक बॉम्ब पडला.................
मम्मी फोनवर म्हणाली, "अरे आज पप्पा शिरपूरला गेले होते, सृष्टीचे पप्पा भेटले होते म्हणे."

सृष्टीचं नाव आयुष्यात पुन्हा एकदा डोकावलं होतं, "मग काही नवीन विशेष?"

"अरे ते म्हटले, सृष्टीचा घटस्फोट झालाय." हे बोलून ती शांत आणि ऐकून मीपण शांत....

मला या विषयावर काय आणि कसं बोलायचं काहीच कळालं नाही, म्हणून मी विषय बदलून फोनवरचं संभाषण संपवलं. पण मनात कुठेतरी दुःख झालं होतं जे शेअर करायला कोणीच नव्हतं. आणि मला हेही माहिती होतं की सृष्टीचं दुःख शेअर करायला तिच्याजवळ पण कोणीच नसेल.

ह्या वर्षी ठरवलं कि दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी करून सृष्टीला भेटायचं, आणि त्यासाठी कारण शोधून काढणं कठीण नव्हतं. आजीबाबांना भेटायचा मस्त प्लॅन रेडी केला, आणि याच भेटीत सृष्टीचीपण भेट होणार होती, तिलाही जुना मित्र भेटला म्हणून बरं वाटेल.
_______________________________________________________________________________________________________________________________
काल रात्रीच मुंबईहून आलो, शिरपूरला जायचा प्लॅन मम्मीला आधीच सांगितला आहे, म्हणून तिने वेळेवर उठवलं. पप्पापण येणार म्हणून मी खुश आहे; कारण मलाही इतक्या वर्षानंतर, म्हणजे जवळ जवळ १५ वर्षांनंतर तिथे जाणं विचित्र वाटत होतं.

मग काय, मस्त रेडी होऊन शिरपूरला जातोय, "सृष्टी कशी दिसत असेल? ओळखेल का? बोलेल का माझ्याशी? मी तिला भेटल्यावर काय बोलू?..........." असे अनेक प्रश्न आता डोक्यात फिरताहेत.

पण जाऊदे, "आता जे होईल, जसं जमेल तसं........"

भाग २

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद च्रप्स....
@पाथफाईंडर , ट्विस्ट नंतर लग्न नसतं, लग्नानंतर ट्विस्ट असतात.........बाकी गेसिंगचा प्रयत्न चांगला होता.....
@निस्तुला , हा भाग टाकताटाकताच दमून गेलो, रिकव्हर झाल्यावर पुढचा पार्ट...पण उशीर होणार नाही.

>>>>कथा आधीच लिहून पूर्ण झालीये. फक्त टाईप करायचा कंटाळा येतोय<<<<
सगळी कथा एकाच भागात पोस्ट करा, जास्त भाग लांबवू नका

छान लिहीलय
मस्त एकदम ओघवते आणि सहज म्हणूनच जवळचे वाटते