तुम पुकार लो ...

Submitted by शिवाजी उमाजी on 21 July, 2017 - 06:53

तुम पुकार लो ...
 
      "खामोशी" सुरेल गाणी व  संगीताची मेजवाणी असलेला १९६९ साली प्रदर्शीत झालेला चित्रपट, यातील वहिदा रहमान,राजेश खन्ना व अन्य कलाकारांचा अप्रतिम, संयत अभिनय, चित्रपटाची कथा आजही चित्रपट पहाताना प्रेक्षकांना बांधुन ठेवतो.
            चित्रपटातील सर्व गाणी सुरेल तर आहेत, परंतू मला भावलेलं गाणं जे गायक, संगीतकार हेमंतकुमार यांच्या आर्त गंभीर आवाजाने आणि सुमधुर संगीताने शब्दांना लिलया जीवंत करून भावनेत गुंतविणारे व श्रोत्यांना थेट गाण्यात  स्वत:ला शोधायला लावणारं गाणं...
            "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है"
      हे माझ्या मनातलं गाणं. खर सांगायच तर माझे आवडते कवी, गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून  उतरलेल्या प्रत्येक कवितेत, गाण्यातील शब्द मुळातच काळजाला हात घालणारे, भिडणारे असतात. कुणालाही वाटावं कि आपल्या मनातील भाव हा माणुस कसा काय एवढया अलवार पध्दतीने सांगु शकतो? असं प्रतित करणारे... इतके ठाव घेणारे असतात. ह्या गाण्यात सुध्दा तेच आहे.... मनाचा कोपरान् कोपरा ढवळायला लावणारे.... शब्द.
           तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है
            ख्वाब चुन रही है रात, बेकरार है
            तुम्हारा इंतजार है...
            एरव्ही रात्र हि नेहमीचीच रात्र असते पण इथं प्रियकराची, कवीची रात्र मात्र तीची स्वप्न वेचणारी रोमांचित करणारी आणि तीच्या भेटीला आतुरलेली आहे. तुझ्याच प्रतिक्षेत आहे मी, तु मला हाक दे... इथं मी  रात्रभर तुझ्या येण्याची स्वप्ने पहातोय असं सांगणारी.
   ओंठ पे लिए हुए दिलकी बात हम
   जागते रहेंगे और कितनी रात हम?
  मुख्तसरसी बात है, तुमसे प्यार है
     तुम्हारा इंतजार है... तुम पुकार लो...
            माझं तुझ्यावर प्रेम आहे हिच एक छोटीशी गोष्ट,त्याच्या मनातील, हृदयातील भावना, ओठांवर घेउन तो केंव्हाची वाट पहातोय, आणि अजुन किती वेळ मी जागं रहावं असा प्रश्न विचारतोय. प्रतिक्षा कशाचीही असो ती केवळ उत्कंठा वाढविणारीच असते... अगोदरच म्हटल्या प्रमाणे गुलजार सरांच्या शब्दातील प्रतिक्षा वेगळीच. प्रियकराची आपल्या प्रेयसीला भेटण्याची आतुरता यापेक्षा वेगळी नसावी असे म्हणावे लागेल...
          दिल बहल तो जायेगा इस खयाल से
           हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से
            रात है करार कि बेकरार है....
            तुम्हारा इंतजार है... तुम पुकार लो
            कवी म्हणतो, निव्वळ तुझी अवस्था माझ्या सारखीच असेल असा विचार करीत राहीलो तर माझं मन केवळ थोडा वेळ रमेल, जरा विरंगुळा मात्र होइल परंतू रात्री भेटण्याचा तूझा जो वादा आहे, त्याचा आपल्यात तसा करार सुध्दा झाला आहे. ह्या भेटीला तो तर व्याकुळ आहेच आहे पण हि रात्र सुध्दा आतुरलेली आहे, ह्या ओळी म्हणजे प्रतिक्षेतल्या उत्कटतेची परिसीमाच... यात एक गोष्ट अशी आहे व ती सरांची खासियत म्हणायला हवी.,. ती म्हणजे एकच शब्द ते दोन वेगळ्या संदर्भासाठी वापरतात. या गाण्यात करार की रात बेकरार राहते.
      प्रत्यके वेळी हे गाणं ऐकताना त्यातील शब्दांवर लक्ष द्यावे कि आवाजावर? हाच प्रश्न मला पडत इतकी आर्तता यात आहे. या गाण्याच्या प्रसंगात धर्मेंद्र पाठमोरा बसलेला, सावकाश चालत वहिदा त्याच्या पर्यंत जातेय, गाणं मध्यावर येतांना ती मागे फिरते, लांब लांब होत जाणारी तीची सावली गाण्याची खोली आणखीच वाढवते. चित्रपटात अनेक प्रसंगात शँडोप्लेचा खुप खुबीने वापर केलेला आहे.
अशा प्रकारची गाणी म्हणजे कानसेनांना मेजवानीच म्हणावी लागेल. तो काळच मुळी संगीताच्या जादूने भारलेला होता अस म्हणावं लागेल.
©शिवाजी सांगळे, मो.+919545976589
(पुर्व प्रसिद्धी लाईक अँड शेअर, मुंबई टाईम्स, दै. महाराष्ट्र टाईम्स
दि. २०-०४-२०१५)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults