शिवी

Submitted by सुबोध अनंत मेस्त्री on 14 July, 2017 - 13:01

"सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती.

"काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत.

"अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती.

"बरं मग", मी विचारलं.

"बर काय? तू समजाव त्याला. मी विचारलं कुठून शिकला तर सांगत होता की बाहेरून एक मुलगा येतो सोसायटीमध्ये. तो शिव्या देतो. तू घरी असशील तेव्हा बघ कोण आहे तो मुलगा आणि समज दे त्याला. बिल्डिंगमध्ये येऊ नको सांग", जशी एका आईची चीडचीड व्हावी तशी स्वाभाविकच तिची होत होती.

"त्याने काय होईल. सार्थक पुन्हा शिवी नाही देणार का?", मी विचारलं.

"अरे तस नाही पण पुढच्या तरी शिकणार नाही", मी एवढा लाईटली का घेतोय याच तिला नवल वाटलं असावं.

"आज मी त्या मुलाला बाहेर काढेन. यापुढे 24 तास आपण त्याच्या बरोबर असणार आहोत का? शाळेतल्या कोणत्या मुलाकडून शिवी शिकला तर? त्याला त्या शिविचा अर्थ माहीत नसेल. त्याने फक्त तो शब्द ऐकला आणि वेगळा वाटला म्हणून बोलला. त्याला ते चुकीचं आहे हे समजलं पाहिजे. उगाच त्याच्या समोर ओव्हररिऍक्ट झालो तर त्याच्या लेखी त्या गोष्टीला महत्व येईल. लक्ष देऊ नकोस. मी बघतो", मी तिला समजावत होतो.

"पण तरीही बघ जरा त्या मुलाकडे आणि सार्थकशीही बोल", मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. प्रतिभानेही विषय टाळला.

मी घरी येऊन त्याच्याशी बोलेन अशी तिची अपेक्षा होती पण मी तस करणार नव्हतो. 10-15 दिवस असेच गेले पण पुन्हा माझ्या कानावर तो शब्द त्याच्याकडून आला नाही.

एक दिवस आम्ही तिघे शॉपिंगसाठी मॉल मध्ये गेलो. प्रतिभा एका बाजूला सामान घेत असताना मी आणि सार्थक शॉपिंग कार्ट घेऊन पॅसेजमध्ये उभे होतो आणि नेमका फोनवर बोलताना एक माणूस आमच्या बाजूने "आयचा घो" अस बोलून गेला.

सार्थकचे कान टवकारले, "पप्पा घो म्हणजे काय ?", त्याची उत्सुकता स्वाभाविकच होती.

"शिवी आहे बाळा. चुकीचा शब्द आहे. लक्ष नको देऊ", आता तो मुद्द्यावर येणार हा त्याचा चेहराच सांगत होता.

"मग पप्पा भें*द ही पण शिवीच आहे ना?", तो एवढ्या मोठया आवाजात बोलला की आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघायला लागले.

मी थोडा खाकरलो. ही योग्य वेळ होती. पण त्या गोष्टीत काही विशेष नाही असं दाखवून मी त्याला विचारलं, "हो शिवीच आहे आणि खूप वाईट शब्द आहे. तू कुठून ऐकला?"

"तो शिवम येतो ना तो बोलतो सारखा", सार्थकने सांगितलं.

या नावाचा मुलगा बिल्डिंगमध्ये नाही हे मला माहित होतं. तरीही मी त्याला मुद्दाम विचारलं, "कोणत्या फ्लोअरला राहतो शिवम?"

"पप्पा. तो आपल्या बिल्डिंगमधला नाही. बाहेरून येतो. विहानदादाला पण मारतो तो. बॅड बॉय आहे एकदम", अशा गोष्टी सांगताना त्याचे विशिष्ट हातवारे असतात आणि मला ते खूप आवडतात. विहान हा आमच्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांचा लीडर. तो चौथीला आहे. आता त्याला मारतो म्हटल्यावर यांच्यावर थोडा प्रभाव असणारच.

"हम्म. असे शब्द बॅड बॉयच वापरतात. तुझ्या दीदीला कुणी वाईट बोललेलं चालेल का तुला?", मी विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली.

"मग ही शिवी म्हणजे आपण दुसऱ्याच्या दीदीला वाईट बोलतो. मला कधी ऐकलस हा शब्द बोलताना?", मी विचारलं

"नाही. कारण आपण दोघेपण गुड बॉय आहोत", हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर चमक होती.

"येस", मी त्याला हाईवफाईव्ह देण्यासाठी हात समोर केला आणि त्याने जोरात त्यावर टाळी मारली.

या गोष्टीला आता जवळपास दोन महिने उलटून गेले. सार्थककडून हा शब्द परत कुणाच्याही कानावर आला नाही. आज मी मुद्दाम त्याच्याजवळ शिवमचा विषय काढला, "सार्थक अरे तो शिवम येतो का बिल्डिंगमध्ये?",

"नाही येत. घाबरतो. देवराडी अंकलने (सेक्रेटरीे) बाहेरच्या मुलांना यायला मनाई केलीय", तो त्याच्या पोकेमॉन कार्डमध्ये बिझी असल्यामुळे माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं.

========================================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656
http://sahajsaral.blogspot.in/2017/07/shivi.html?m=1

#sahajsaral

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान समजावले, हल्ली बॅड बॉय गुड बॉय / गुड गर्ल बॅड गर्ल वगैरे शब्द बरेच पालकांच्या तोंडात ऐकतो. पण एका ठराविक वयानंतर काय गूड आणि काय बॅड हे पोरं आपले आपणच ठरवतात Happy

अवांतर - मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालो तिथे ज्याला शिव्या द्यायला यायच्या नाहीत त्याला अगदीच हा समजले जायचे.

बरेच लोकं म्हणतात की शिव्या दिल्याने रागाचा निचरा होतो आणि मन शाण्त होते.. मला ते पटत नाही. उलट मन अशांत होते. आपणच डिस्टर्ब होतो. घाणेरड्या शब्दांमध्ये एक निहेटीव्ह एनर्जी लपलेली असते. ती आपले स्वास्थ्य बिघडवते.