लॉटरी

Submitted by आनन्दिनी on 12 July, 2017 - 04:59

लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे तिला कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं. “परत कोणाशी बोलताना दिसलीस तर तुला सोडणार नाही मी.” हिस्र श्वापदाच्या तावडीत सापडलेल्या हरणासारखी कांचन थरथरू लागली. तिचं ते घाबरण बघून खुनशी हसत त्याने तिला जमिनीवर ढकलून दिलं. तिला तसं लोटून तो दार लावून एकटा घराबाहेर निघून गेला.

या महिन्यातली त्याच्या आक्रस्ताळेपणाची ही चवथी वेळ होती. तिच्या हातावरचे सिगरेटच्या चटक्यांचे डाग अजून फिकेही झाले नव्हते. कांचन कपड्यांनी अंगावरचे ठिकठिकाणचे वळ झाकत असे. झाकायचेही कोणापासून म्हणा! एकटीने बाहेर जायला तर तिला मज्जावच होता. संजय कामाला जाताना बाहेरून दार लॉक करत असे. भाजीपाला, किराणामाल आणायला तो तिच्या सोबत जात असे. कांचनच्या मनात विचार आला, लग्नाची बेडी आपल्यासाठी खरोखरीची बेडीच आहे. कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय आपण? आईवडलांनी ठरवलेल्या ठिकाणी लग्न करायला मुकाट्याने हो म्हटलं, लांब अनोळखी माणसाबरोबर लग्न नको असा विरोध नाही केला या चुकीची की आपले आईवडील भोळे आहेत, संजयची काही चौकशी न करताच त्यांनी विश्वास ठेवला या चुकीची! काय म्हणायचे बाबा नेहेमी “तो परमेश्वर नेहेमी वरून आपल्याला बघत असतो. लक्ष ठेवत असतो, काळजी घेत असतो.....” तिने मान वर करून बघितलं. वर घराच्या पांढर्या छताशिवाय काहीच दिसलं नाही. तिची नजर खिडकीकडे गेली. पंधराव्या मजल्यावरून खालचा रस्ता, त्यावरच्या गाडया खेळण्यांसारख्या दिसत होत्या. ‘नाही हो बाबा तो नाहीये वर. आणि असलाच तर त्याचं लक्षच नाहीये माझ्याकडे. त्याचं आकाश फार दूर आहे माझ्यापासून आणि माझी जमीनही सुटली.’ तिच्या गालांवरून आसवं वाहू लागली. पण पुसणारं कोणीच नव्हतं.

महाराष्ट्राच्या नकाशावरही नसलेल्या छोट्याश्या गावात कांचन लहानाची मोठी झाली. वडिलोपार्जित जमिनीचा छोटासा तुकडा, त्यावर पिकवून त्यांचं कसंबसं चाले. गरिबी तिच्या घराच्या पाचवीलाच पुजलेली होती. पण तिचे आईवडील आहे त्यात संतुष्ट असत. चटणी भाकरी खाऊन आला दिवस साजरा करत. त्यांच्या गावात डांबरी रस्ता बांधण्याचं काम सुरु झालं. कंत्राटदार गावात आला. त्याने संजयचं स्थळ तिच्या वडलांना सांगितलं. ‘फॉरेन’चा मुलगा ! नाते वाईक वगैरे काहीच लटांबर नाही. तुमची मुलगी राणी होईल, त्याने तिच्या वडलांना स्वप्नं रंगवून दाखवलं. आणि एरवी कदाचित ते इतक्या चटकन फसलेही नसते पण तो फकीर..... किती वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ती.......

कडक उन्हाळ्यातली ती दुपार होती. कांचन, आई, वडील आणि दोन बहिणींबरोबर जेवायला बसली होती. इतक्यात दारातून आवाज आला. “क्या भूखे फकीर को थोडा खाना मिलेगा?” वडलांनी त्यांच्या ताटातल्या एका भाकरीचे दोन तुकडे केले, एक तुकडा आणि त्यावर चटणी, हातांत घेऊन ते दारापाशी आले. वडलांच्या मागे शेपटासारखी तीसुद्धा दाराकडे आली. तिच्या वडलांनी फकिराला ती भाकरी दिली आणि विचारलं, “पानी चाहिये बाबा?” फकिराने मान डोलावली. “कांचन, बाबांना पाणी आण” त्यांनी कांचनला सांगितलं. कांचन आत जायला वळणार तोच त्या फकिराने तिच्याकडे बोट करून तिच्या वडलांना विचारलं, “आपकी बेटी है?” वडलांनी हो म्हणून मान हलवली. तिच्या चेहर्याकडे निरखून बघत फकीर म्हणाला, “इसकी तो लॉटरी आनेवाली है, बहुत पैसा आएगा, बहुत पैसा !!” कांचन तिथेच थबकली. तिच्या वडलांनाही हे अगदीच अनपेक्षित होतं. “आप ज्योतिष जानते हो बाबा?” त्यांनी फकिराला विचारलं. आणि लगेच तिला म्हणाले, “कांचन पाया पड त्यांच्या” आपण पाया पडलो तेव्हा काय बरं म्हणाला तो फकीर, अर्थही नीटसा कळला नव्हता....

त्या दिवसापासून बाबांना मात्र खरंच वाटायला लागलं की लॉटरी लागणार आहे. दर वेळी तालुक्याच्या गावी गेले की ते कांचनच्या हाताने एक लॉटरीचं तिकीट घेत. पण कधी बक्षीस लागलं नाही. संजयचं हे फॉरेनचं स्थळ आलं तेव्हा ते खूष होऊन ज्याला त्याला सांगायचे “बघा तो फकीर म्हणाला होता ती लॉटरी हीच. आमच्या सात पिढ्यांत कोणी मुंबईसुद्धा बघितली नाही. आणि आता आमची कांचन फॉरेनला जाणार. लॉटरी नाहीतर काय म्हणायचं याला ! नक्की हीच ती लॉटरी होती आणि मी वेड्यासारखा तिकीटं घेत बसलो”

“ही लॉटरी?” हातावरच्या वळांवरून अलगद दुसरा हात फिरवून तिने स्वतःला विचारलं. बाबा कसे हो तुम्ही एवढे भोळे. तो फकीर वेडा, की मला एवढं लांब असं पाठवून देणारे तुम्ही वेडे, की काहीही कारण नसताना माझा असा छळ करणारा हा माझा नवरा वेडा, की हे सगळं चुपचाप सहन करणारी मी वेडी....

बर्याच उशिरापर्यंत संजय आला नाही तेव्हा कांचन झोपून गेली. रात्री बर्याच वेळाने, चावीने दार उघडल्याचा आवाज आला. त्याचबरोबर दारूचा उग्र दर्प. संजय लडखडत खोलीत आला. देवा, आज नको...... आज नको..... कांचनने मनात देवाचा धावा सुरु केला. ती झोपल्याचं नाटक करून अंग चोरून तशीच पडून राहिली. तिच्या सुदैवाने तो बिछान्यात पडला आणि पुढच्याच क्षणाला घोरू लागला. तिची झोप मात्र मोडली ती मोडलीच. जुन्या गोष्टी तिला आठवू लागल्या. तिचं लग्नं ठरलं तेव्हा डॉक्टरकाका आणि प्रमिलाताई तिच्या घरी आले होते. हे पतीपत्नी म्हणजे सीतारामाची जोडी होती. ते गावात धर्मदाय दवाखाना चालवत. शिवाय गावात शिक्षणाबद्दल जागरूकता आणण्यासाठीही काहीनाकाही करत असत. प्रमिलाताई घरोघरी जाऊन बायकांशी बोलायच्या. त्यांना आहार, आरोग्य, स्वच्छता, कुटुंबनियोजन सगळ्याबद्दल नीट समजावून सांगायच्या. गावातली एक अनाथ मुलगी यांनी दत्तक घेतली होती. तर डॉक्टरकाका बाबांना सांगत होते, “तुम्ही मुलाची अजून माहिती काढायला हवी. त्याशिवायच कांचनला असं पाठवायचं म्हणजे..... त्यात तिला इंग्रजीही फारसं येत नाही. देव न करो पण तिला मदत लागली तर परक्या देशात ती कसं काय करणार?” “आपले कॉन्ट्रॅक्टर मिश्रा त्यांना ओळखतात ना. आणि आम्ही गरीब माणसं, परदेशात चौकशी करायला आमचं तिथे आहे कोण ! आज कांचन गेली तर उद्या पुढच्या पिढीचं सोनं होईल.....” बाबांनी त्यांचं ऐकलं असतं तर..... पण परदेशाच्या लॉटरीने त्यांना आंधळं केलं होतं.

अंधारात चकाकणारे घड्याळाचे काटे बारा वाजल्याच दाखवत होते पण कांचनला झोप कशी ती नव्हती. कुठूनतरी विचित्र वास येत होता, ती उठून स्वयंपाकघरात गेली. तिथे सगळं ठीक होतं. वास कुठून येतोय कळेना. तिने खिडकीतून खाली बघितलं. रस्त्यावर बरीच गर्दी होती. लोक हातवारे करून काही सांगत होते पण काही ऐकू येत नव्हतं. घराचं दार उघडून बघावं का काय झालंय. पण तिची हिम्मत होईना. घाबरत, दबकत तिने हॉलची खिडकी थोडीशी उघडून ऐकण्याचा प्रयत्न केला. आता किंचाळ्याचे आवाज यायला लागले होते. फायर फायर.... म्हणून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. ती पुरी गोंधळली. काय करावं, काय करावं, जळका वास वाढला होता. फार विचार करायला वेळ नव्हता. ती बेडरूम कडे वळली. संजय अजूनही घोरत होता. आजूबाजूच्या गोंधळाचा त्याला पत्ताच नव्हता. त्याला उठवायला तिने हात पुढे केला तशी तिच्या कुडत्याची बाही जराशी वर सरकली. त्याने दिलेला सिगरेटचा चटका त्या मंद प्रकाशातही दिसत होता. तिने एक वार आपल्या हातावरच्या वळांकडे पाहिलं, आणि मग झोपलेल्या संजयकडे. एक क्षण विचार करून ती उलट्या पावली मागे फिरली. बेडरूमचं दार तिने लावून घेतलं, आणि निघणार इतक्यात ती पुन्हा वळली, नुसतं आड असलेलं दार तिने घट्ट लावून घेतलं आणि त्याला बाहेरून कडी लावली. बंद दाराच्या या बाजूला असण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.

संजय कामाची कागदपत्रं बाहेरच्या कपाटातल्या कप्प्यात ठेवायचा हे तिने पाहिलं होत, तिने तो कप्पा उघडला, त्यात तिचा पासपोर्ट समोरच होता तो उचलला आणि ती घराबाहेर जिन्याकडे धावत सुटली. किंचाळ्या, आरडाओरडा, रडणं, कुंथण कसकसले आवाज येत होते पण ती पळत सुटली. आपण आगीपासून पळतोय की संजयपासून.... कुठे जायचं, कसं जायचं, पण पहिल्यांदी या इमारतीतून बाहेर पडायला हवं. मग पुन्हा भारतात जाऊ. आई बाबांकडे. ते कधीच आपल्याला टाकणार नाहीत. आपण निघतानाही ते आपल्याला म्हणाले होते “हे घर नेहेमी तुझंच आहे. काही काळजी करू नकोस, ‘तो’ वरून बघतो आहे, ‘तो’ सगळी काळजी घेईल.” एव्हाना ती तीन माजले खाली आली होती. ‘तो’ वरून बघतो आहे.... ‘तो’ वरून बघतो आहे.... म्हणजे मी आत्ता संजयला वर कोंडून आले तेसुद्धा त्याने बघितलं का? त्याला खरच सगळं दिसतं का? मग माझे हाल होतात तेव्हा?.... तो काहीच कसा करत नाही.... धूर वाढत होता, तिच्या नाकातोंडात धूर जात होता, तिला काही कळेनासं झालं..... फक्त वडलांचं “’तो’ बघतो आहे..... ‘तो’ बघतो आहे.....” वाक्य तिच्या डोक्यात ठाण ठाण वाजू लागलं. असह्य हौऊन तिने दोन्ही हातानी कान दाबले आणि ती उलट पुन्हा वर तिच्या फ्लॅटच्या दिशेने धावू लागली. पळत पळत ती घरात आली. बाहेरचा दरवाजा तिने उघडाच टाकला होता. ती धावत बेडरूमकडे गेली. आतून संजय जोरजोरात ओरडत होता. “दार उघड हरामखोर...... दार उघड, मरेन मी......” तिने कडी काढली त्याबरोबर तो पिसाळलेल्या जनावरासारखा बाहेर आला. बाहेर येऊन खाडकन त्याने तिच्या गालवर जोरदार थप्पड दिली आणि तो दरवाज्याकडे धावला. ती त्याच्या मागे. आता धूर चांगलाच वाढला होता, ते जिन्याच्या दिशेने निघाले एवढ्यात अग्निशमन दलाचा एक फायर फायटर वर आला. त्याने संजयला सांगितलं की आगीने जिन्याचा रस्ता बंद झाला होता, फायर एस्केप (आपत्कालीन मार्ग) म्हणून बिल्डींगच्या मागच्या बाजूला शिडीसारख्या पायर्या होत्या त्यावरून खाली जावं लागणार होतं. ते तिघे बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या शिड्यांवरून खाली जाऊ लागले. पुढे तो फायर फायटर , मधे ती आणि मागे संजय. आग आता चांगलीच पसरली होती. इमारतीत ठिकठिकाणी आगीने पेट घेतला होता. इथल्या घरांच्या बांधकामात लाकूड खूप वापरतात त्यामुळे आगीचा धोका असतो हे कांचनने ऐकलं होतं पण त्याचं एवढं रौद्र रूप बघायची वेळ येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता ते दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. संजय अजूनही खवळलेलाच होता. “मला कोंडून काय पळून चालली होतीस, you...xxxxx” असं म्हणून त्याने पुढे शिडी उतरणार्या कांचनला एक सणसणीत लाथ मारली. कांचन भेलकांडत पुढे असणार्या फायर फायटर वर जाऊन आदळली. त्या दोघांनीही दचकून मागे पाहिलं. इतक्यात वरच्या मजल्यावरून आगीने पेटलेला एक मोठा लाकडी खांब खाली कोसळला आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच संजयच्या अंगावर पडून त्याच्यासकट खाली गेला.

कांचन दवाखान्यात प्रमिलाताईच्या समोर बसली होती. तिच्या हातात एक लिफाफा होता बाहेरून आलेला. तिने तो ताईपुढे केला. “हे काय आहे?” त्यांनी विचारलं. “लॉटरी.... संजयच्या कंपनीने त्यांच्या सगळ्या लोकांचा विमा काढला होता. एक लाख पौंडांचा चेक आलाय माझ्या नावाने. आगीत खूप जणं गेली, सगळ्यांच्या बॉडी सापडल्या नाहीत, ओळखता आल्या नाहीत. पण संजयची बॉडी सापडली आणि फायर फायटरने साक्ष दिली म्हणून माझा चेक लवकर आला.” प्रमिलाताईनी कांचनच्या हातावर थोपटलं. “कांचन, तू खूप हिंमतीची आहेस. ह्या पैशांसाठी तालुक्याच्या बँकेत खातं उघडून देऊ तुला?” “नाही ताई, एवढ्या पैशांची आम्हांला गरजच नाही. आईबाबांना म्हातारपणासाठी पुरतील एवढे पैसे ठेवीन मी पण बाकी सगळे पैसे चांगल्या कामाला वापरले जाऊदेत. बाबासुद्धा हो म्हणालेत. तुम्ही सांगा कसं करायचं ते” प्रमिलाताई अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, “हे बघ बाळा, आत्ता, तुला धक्का बसलाय. अशा वेळी मोठे निर्णय न घेणं चांगलं. थोडा वेळ जाऊदे. मग शांत चित्ताने ठरव.”

“शांत?.... शांत कधी वाटणार मला ताई? झोप लागत नाही, लागली तरी कधी मला मारणारा, छळ करणारा संजय डोळ्यांसमोर येतो. कधी आग डोळ्यांसमोर येते, ती जळकी प्रेतं, ते कळवळणारे, रडणारे लोक डोळ्यांसमोर येतात. आगीने पेटलेला, दहाव्या मजल्यावरून खाली पडणारा संजय डोळ्यासमोर येतो आणि आठवतं की मी त्याला तिथे जळून जायला कडी लावून जाणार होते” कांचन उद्रेकाने थरथरत होती. “पण माझी चूक नाहीये, ‘तो’ वरून बघत होता, मी कडी काढली, मी कडी काढली.....” ती हमसाहमशी रडू लागली. “तुझी चूक नाहीये बाळा, तुझी चूक नाहीये, उलट तू किती भोगलयस.” प्रमिलाताई हळवं होऊन म्हणाल्या.
“मग आता संपूदे ताई. मला शांती मिळू दे. तुम्ही माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्या गावाची काळजी घेता. तुमच्या कामात मला देव दिसतो. माहितीये ताई, त्या फकिराला पाया पडले तेव्हा तो मला काय म्हणाला होता...”
“ते लॉटरीचं?”
“हो लॉटरीचं, पण नंतर अगदी हलक्या आवजात त्याने मला सांगितलं लॉटरी तो लगेगी, बहोत पैसा मिलेगा, लेकीन बेटा सुकून पैसेसे नही, इबादत से मिलेगा”

डॉ. माधुरी ठाकुर (* इबादत = उपासना)
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

chaan lihilay..Kanchan chi avashta pahun vait vatla... "to varun baghtoy" ...(Y)..

छान

फारच नाट्यमय आहे ...

नवरा वाचण्याची शक्यता असलेला बराचसा काळ तिनेच वाया घालवला.

डेथ् क्लेम इतक्या लवकर सेटल होत नाही .. प्रिमियम क्ंपनीच भरत असली तरी क्लेम form क्लेम्ंटनेच म्हणजे नातेवाइकानेच भरावा लागतो. नाही तर मग इन्शुरन्स क्ंपनी चेक कुणाच्या नावे काढेल ? त्यामुळे चेक असा सर्प्राइज म्हणून येउ शकत नाही. नातेवाइकाना पूर्वकल्पना असतेच.

छान लिहिलिय.
पण शिडी उतरताना ते दहाव्या मजल्यापर्यंत आल्यावर वरुन नवर्‍याने जोरात लाथ मारली तर ती आणि फायर फायटर खाली नाही का कोसळणार? आणि शिडी धरुन टिकुन राहिले तर वरुन पडलेल्या संजयमुळे तिघेही पडतील..

छान लिहिलंय. आवडलं.

वर्तमान आणि फ्लॅशबॅक आलटून पालटून लिहिण्याची कल्पना सुंदर!!! एकातून दुसऱ्यात जाताना, परत येताना अजिबात खडखडाट जाणवला नाही. छान जमलंय.

सुरुवातीला नेहमीच्या पठडीतली कथा असावी असं वाटलं पण नंतर उत्कंठा वाढत गेली. वर लिहिल्या आहेत त्या तांत्रिक चुका सुधारल्यात की अतिशय सुंदर कथा होईल.

ironman , किल्ली , प्राची, ९६क , शशांक, तनिष्का, वावे , नॅन्क्स, बाबू, मॅगी , सचिन काळे, मोहना प्रतिक्रियां बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

बाबू, कांचन या घटनेनंतर काही दिवसांनी भारतात आली. या काळात तिला वेगवेगळ्या गोष्टींसाठी मदत लागलीच असेल. कौन्सिल कडून तिने मदत घेतलीच असेल.तेव्हा फॉर्म भरला असेल असं गृहीत धरलं आहे. चेक आला हे सरप्राईज वाचकांना आहे, कांचनला नाही. प्रमिलाताई ज्या धक्क्याबद्दल म्हणतायत तो धक्का पूर्ण घटनेचा आहे, चेकचा नाही.

मॅगी, फायर एस्केप ही अश्या प्रकारची आहे. https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/20/f7/08/20f70800bd09018561d13... संजय कठड्यावरून कलंडून खाली पडला आहे. पायर्या गडगडून नाही. त्यामुळे कांचन आणि फायर फायटर खाली पडले नाहीत.

आपण सगळे इतक्या बारकाव्यांनिशी कथेचा विचार करताय हीसुद्धा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे _/\_

संजयचा खून करण्यापर्यंत कांचनची तयारी होती, ईतका तिरस्कार वाटत असतांना वेळीच आपल्या त्रासाबद्दल परदेशातल्या (ऑथोरिटिजकडे) जाऊन मदत का मागितली नाही कांचनने? तिथले पोलिस नक्कीच अश्या डोमेस्टिक वायलंस बाबतीत कर्तव्यदक्ष असतात.
पासपोर्टही वरतीच होते म्हणजे ती कधीही तिथून निघून जाण्यास समर्थ होती?
वाईट माणसाच्या का असेना पण एखाद्याचा मृत्य्य्पश्चात मिळालेली भरपाई 'लॉटरी' कशी? समजा संजय बंद रूममध्ये जळून मेला असता तर खुनाचे बक्षीस झाले असते. कुठल्याही परिस्थितीत कांचनने पैसे नाकारणे योग्य झाले असते, माणूस नको पण त्याचा पैसा हवा असे वाटते आहे.
कथा फसल्यासारखी वाटली.

सिम्पल कथा दिसली की सगलयांच्या अंगात डिटेक्टिव्ह घुसायल लागतो...
आर काल्पनिक कथा आहे, हलके घ्या...

माणूस नको पण त्याचा पैसा हवा असे वाटते आहे.

Exactly !

वाइट असला तरी नवरा हा स्ंसारी मनुष्य् होता. त्यामुळे पैसा पगार घर इन्शुरन्स ह्या त्याच्या जबाबदाऋया होत्या.

पण आता हिच्यावरती नवरा , पोर कशाचीच जबाबदारी नाही , त्यामुळे पैसे नाकारून ती अगदी जणू काही संतपदी पोहोचतेय हेही पटले नाही.

Proud
.. Proud एकदा फोनवर एक बाई फारच छळत होती .. पॉलिसी किती चांगली आहे इ इ .. मी बोललो मला पॉलिसी नको, तुझा पत्ता दे , मला काय झाले तर बायकोला तुझ्या घरी जेवायला जायला सांगतो !

बाइने फोन ब्ंद केला ! Proud

भारी कथानक आहे, आवडली कथा Happy
शेवटचा फकिराच्या तोंडच्या सुविचारालाही +७८६ !!!

बायकोला अशी फडतूस वागणूक देणारे नवरे कथेतच नाही तर प्रत्यक्ष जगातही कैक असतात.. आहेत..
अश्या नवर्‍याच्या खूनाचा विचार तिच्या मनात आला म्हणून तिला दोषी ठरवणारे प्रतिसाद वर आलेले बघून खरेच आश्चर्य वाटले..
कारण मी कथा वाचत असताना जेव्हा तिने दाराला बाहेरून कडी लावली हे वाचले तेव्हा मनात "है शाब्बास, मस्त केले" असेच आले.. तर त्याउलट जेव्हा तिचे मन खाताच तिने पुन्हा कडी उघडली तेव्हा काय मुर्खपणा करतेय असे आले.. पण शेवटी तिच्या याच चांगुलपणाचे बक्षीस तिला मिळाले समजूया जे त्यामुळेच क्लेम लवकर सेटल होत पैसे मिळाले. पण शेवटी पैसेही भोगलेल्या यातनांची भरपाई करू शकत नाहीच..

अश्या नवर्‍याच्या खूनाचा विचार तिच्या मनात आला म्हणून तिला दोषी ठरवणारे प्रतिसाद वर आलेले बघून खरेच आश्चर्य वाटले. >> खून पकडला गेल्यास आज एक जण कोंडून ठेवतो तिथे सरकार कायदेशीर रित्या दोषी ठरवून जेलमध्ये कैक वर्ष कोंडून ठेवेल आणि आज एक जण टॉर्चर करतो तिथे असे शेकडो जण टॉर्चर करतील हा विचार तुमच्या डोक्यात आला नाही ह्याचे खरंच आश्चर्य वाटले नाही.
न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग ऊपलब्धं असतांना खुनाची भलामण करण्याच्या तुमच्या वाक्याचा निषेध.
दुसर्‍याला त्रास देतांना आपल्याला मजा आली पाहिजे ही तुमची सॅडिस्ट मानसिकता तुम्ही वेळोवेळी मायबोलीवर बोलून दाखवलेली आहेच, तेव्हा कथेतल्या नवर्‍याच्या वागणुकीला फडतूस म्हणतांना तुम्हीही थोडे आत्मपरिक्षण करावे.

न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग ऊपलब्धं असतांना खुनाची भलामण करण्याच्या तुमच्या वाक्याचा निषेध.
>>>>>

कायदेशीर मार्ग Happy

तुम्ही हा मुद्दा घेऊन माझ्या या धाग्यावर याल का?

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!
http://www.maayboli.com/node/51663

किंबहुना हा धागा पुर्ण वाचून घेतलात तर तुम्हाला तुनच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मला पुन्हा तेच लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास तिथेच विचारलेल्या आवडतील जेणेकरून ईथे अवांतर चर्चा होणार नाही Happy

किंबहुना हा धागा पुर्ण वाचून घेतलात तर तुम्हाला तुनच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मला पुन्हा तेच लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास तिथेच विचारलेल्या आवडतील जेणेकरून ईथे अवांतर चर्चा होणार नाही Happy >> किंबहुना तुम्ही कुठलाही धागा पूर्ण वाचून घेतल्यास तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरं मिळतीलच आणि पुन्हा प्रतिसाद जमवण्यासाठी शाहरूख, गर्लफ्रेंड वगैरे तेच ते लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास मुद्दाम थापा, खोटे, सनसनाटी, भावना ऊचकावण्यासाठी भडकाऊ असे न लिहिता तिथेच विचारलेल्या सगळ्यांनाच आवडतील जेणेकरून मला ईथेच काय ईतर कुठेही तुमच्याशी अवांतरंच काय पण कुठलीही चर्चा करावी लागणार नाही.

{{{ आगीने पेटलेला, दहाव्या मजल्यावरून खाली पडणारा संजय डोळ्यासमोर येतो आणि आठवतं की मी त्याला तिथे जळून जायला कडी लावून जाणार होते” }}}

हेच जर तिने केले असते मग तो प्रोव्होक्ड सिनेमाचा पूर्वार्ध झाला असताना?

{{{ कांचन उद्रेकाने थरथरत होती. “पण माझी चूक नाहीये, ‘तो’ वरून बघत होता, मी कडी काढली, मी कडी काढली.....” }}}

ही कलाटणी वगळता कथेत प्रोव्होक्डच्या पूर्वार्धापेक्षा वेगळं काहीही नाहीये.

सिम्पल कथा दिसली की सगलयांच्या अंगात डिटेक्टिव्ह घुसायल लागतो...
आर काल्पनिक कथा आहे, हलके घ्या... >>>>>>>>>>>> =+११११

छान कथा !

नेहमीप्रमाणे छान... " आनन्दिनी " हे नाव वाचूनच काहीतरी आनंद देणारं, शांत करायला लावणारं वाचायला मिळणार याची खात्री असते.

बिपीन चंद्र हर

- He is Omniscient तो सर्व जाणतो, त्याला सगळं कळत असतं ही विचारसरणी कठीण परिस्थितीत सुद्धा दुष्कृत्यापासून परावृत्त करते हा कन्सेप्ट
- भविष्य कथनामुळे धनलाभाची आशा
- ती विचित्र अनपेक्षित प्रकारे पूर्ण होणं
- आणि त्यानंतरचं realization की पैसा समाधान आणू शकत नाही

हा या कथेचा गाभा आहे. तो जर कळला नसेल तर तीसुद्धा खेदाचीच गोष्ट आहे .

च्रप्स, ऋन्मेऽऽष  धन्यवाद
पाथ फाईंडर , अक्षय दुधाळ, अदिती , आबासाहेब, जाई, मयुरी आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे .

Pages