मोकळे केस

Submitted by मोहना on 11 July, 2017 - 22:56

"बाबा" बागेत खेळणारी माझी चिमुरडी धावत धावत माझ्या दिशेने येत होती. मी पाहत राहिलो तिच्या केसांकडे. कापलेल्या कुरळ्या केसांचं टोपरं इतकं गोड दिसत होतं. मला येऊन घट्ट बिलगली. तिला जवळ घेत मी पापा घेतला तसं तिने माझ्या गालांवर ओठ टेकले.
"काय रे पिल्ला?" लेकीच्या केसातून माझे हात मायेने हात फिरले.
"बाबा, मला तू आवडतोस."
"हो? का गं?"
"आवडतोस." लेक आणखी बिलगली. मी तिच्या लाडिक स्वरात रमून गेलो. ती पुन्हा खेळायला गेली. आणि मनात काही बाही विचार घोळायला लागले. मिटलेल्या डोळ्यांसमोर ’ती’ उभी राहिली.

गिरगावच्या आमच्या इमारतीत दाराबाहेर उभं राहिलं की पलिकडच्या इमारतीत अगदी समोरच्या घरात राहणारी ’ती’. तिच्या घरातला पलंग खिडकीला लागून होता. जेव्हा पाहावं तेव्हा पाठमोरीच बसलेली दिसायची. काय करत असायची दिवसभर त्या पलंगावर बसून कोण जाणे. पण नजरेला पडायचे ते तिचे मोकळे सोडलेले काळेभोर लांबसडक केस. अधूनमधून ती त्याचा आंबाडा बांधायची. पण थोड्याच वेळात ते सुटायचे. किती वेळा मी कठड्याला टेकून कधीतरी तिचा चेहरा दिसेल म्हणून वाट पाहिली ते मलाच ठाऊक. खूपदा वाटायचं रस्ता ओलांडला की तिची इमारत. हाकेच्या अंतरावर. जावं खाली धाडधाड पायर्‍या उतरुन आणि शिरावं तिच्या इमारतीत, मग घरात. निदान त्या मोकळ्या केसामागचा चेहरा एकदा तरी दिसावा. कधीतरी माझी बहिण येऊन उभी राहायची बाजूला.
"शिट्टी मार ना. मग बघेल ती वळून मागे." बहिणीला माझी प्रतिक्षा एव्हाना समजली होती.
"वा, काय डोकं चाललंय. खालच्या गोंधळात माझी शिट्टी तिच्यापर्यंत पोचेल तरी का?"
"हे बरं आहे तुझं. मदत करायला गेले तर अक्कल काढतोस माझी." आम्हाला वाद घालायला कारण काही लागायचं नाहीच. त्या वादात कधीतरी लक्षात यायचं ’ती’ तिथून उठून गेली. बहीण पुटपुटायची.
"आईला दाखव रे ती मुलगी एकदा."
"का? मी काय प्रेमाबिमात नाही पडलेलो हा तिच्या. चेहरासुद्धा नाही पाहिलेला अजून."
"केस पाहतोस ना?"
"ते तर तू पण बघतेस. आवडतात की नाही तुलाही ते मोकळे केस पाहायला?"
"भावड्या, म्हणूनच म्हणतेय आईला दाखवूया ती मुलगी एकदा." मी तिची अक्कल पुन्हा काढायच्या आधीच ती घाईघाईने म्हणाली.
"मला अजिबात मोकळे केस सोडायला देत नाही आई म्हणून म्हणतेय. एकदा त्या मुलीला बघच म्हणावं. सतत केस मोकळे." आमचं हे बोलणं आईच्या कानावर अर्थात पडलेलं असायचं. ती आतूनच ओरडायची.
"सोडा केस मोकळे आणि फिरा इकडे - तिकडे. केस मिळाला कशात की माझ्यावर डाफरु नका. सांगून ठेवतेय आधीच."

त्या मुलीचे ते मोकळे केसच कायम लक्षात राहिले. चेहरा कधीच दिसला नाही. पण अगदी तसेच लांब केस असलेली बायको मात्र मिळाली मला. पहिल्यांदा तिच्या केसांवर गजरा माळला तो आनंद काही औरच. गावी गेलेलो त्यावेळेस. रमत गमत संध्याकाळच्या वेळेला गडनदीच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. खूप वेळ. पुलावरुन जाणार्‍या गाड्यांचा आवाज हळूहळू अस्फुट होत गेला, कठड्यावर हाताची कोपरं टेकून कितीतरी वेळ आम्ही संथ वाहणार्‍या नदीवर दृष्टी खिळवून बसलो होतो. नजर टाकू तिथे निसर्ग. डावीकडे लक्ष गेलं की झाडीत दडलेल्या उभ्या देवाचं पुसट दर्शन, पलिकडून आर्यादुर्गेच्या देवळाचा डोकावणारा घुमट. भान विसरुन न्याहाळत होतो आम्ही दोघंही सारं. इतक्यात घंटा वाजली म्हणून मान वळवून पाहिलं. सायकलवरुन गजरे घेऊन चालला होता चिंद्या. सुंरगीच्या फुलांचा वास मन अगदी मोहवून टाकत होता. दोन - तीन होते त्याच्याकडे. उत्साहाने त्याने एक बायकोच्या हातात ठेवला. तो निघून गेल्या गेल्या संधिप्रकाशात माळला मी तिच्या केसांवर. त्या सुवासाने वेड लावलं. रात्री तिने गजरा काढल्यावर मोकळ्या केसांमधून दरवळलेला सुरंगीचा गंध अजूनही माझ्या आजूबाजूला दरवळतोय.

कधीतरी माझ्या बायकोने तिचे ते लांबलचक केस आधुनिक दिसणं अनुभवावं म्हणून छोटे करुन टाकले. आता ते नेहमीकरताच मोकळे असतात, तसंही आता आजूबाजूला मोकळे केसच दिसतात म्हणा. म्हटलं तर मोकळे केस सर्वत्र सारखेच पण स्थळ, वेळ, जागा आणि मोकळे केस सोडलेली व्यक्ती त्या केसांमध्ये अडकलेल्या माणसाचं भावविश्व किती बदलून टाकते. मोकळ्या केसांकडे पहाण्याची दृष्टी, स्पर्श किती वेगवेगळा असतो नाही? विचारांच्या नादात होतो तितक्यात माझी चिमुरडी पुन्हा येऊन बिलगली. सवयीने तिच्या कुरळ्या, आखूड पण मोकळ्या केसातून हात फिरवायला लागलो आणि भटकून आलेलं मन एकदम जाग्यावर आलं.
"छान दिसतायत तुझे मोकळे केस." मी कौतुकाने म्हटलं. लेकीने मान डोलवली आणि मैत्रीणींच्या दिशेने खेळायला ती धावत सुटली.

(सुदर्शनच्या साहित्यिक गटासाठी लिहिलेला छोटासा लेख)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिता तुम्ही.. आवडते वाचायला..

ईतर मुलांचे/पुरुषांचे माहीत नाही, पण मलाही मुलींचे मोकळे लांबसडक.. अगदी आजकाल ते स्ट्रेटनिंग करतात तसेही केस फार आवडतात.

पुरुषांनी थोडीफार दाढी ठेवावी, बायकांनी लांबसडक केस ठेवावेत... अगदीच शोभत नसतील, किंवा काही कारणास्तव शक्य नसेल तरच निसर्गाने बहाल केलेल्या या सौंदर्यस्थळांमध्ये छेडछाड करावी Happy

छान!