हेही हवंय... तेही हवंय...

Submitted by मुग्धमानसी on 21 June, 2017 - 01:33

हेही हवंय... तेही हवंय...
जगणं म्हणजे स्साली नुस्ती श्वास घ्यायची सवय!
तरी येडं धावतंय म्हणतंय... हेही हवंय... तेही हवंय...
मिळत नाही... मिळत नाही... तगमग तगमग काहिली!
दोन मायेच्या शब्दांची वीज दूssssssर कडाडत राहिली....
होना? म्हणून रडतोस ना?
हाय हाय करत फिरतोस ना?
पाऊस झेलण्याइतकं वेड्या वीज झेलणं सोप्प नाही
ओल्या गात्री जळतानाही... धूर झाकणं सोप्प नाही!
नसतानाचं झुरणं बरं...
असतानाचं ओझं राजा... जड आहे! हलकं नाही!
हवंय ना? हे घे तर. तुझ्यासाठीचं प्रेम घे...
दारात उभं आहे तुझ्या.... हसून त्याला आत घे...
आता का?
प्रीत स्वीकारायची आहे.... रित पाळायचीही आहे?
कुणी येणं सुद्धा हवंय... दार बंद सुद्धा हवंय....
हेही हवंय... तेही हवंय...
मोकळं मोकळं व्हायचंय तुला..... सुटून जायचंय सार्‍यातून...
पायाखालचे दोर का मग ठेवलेत असे घट्ट दाबून?
तुझ्यापाशी अडकलेले मोकळे कर... मोकळा हो...
किंवा मग नाती-रिती भोग मुकाट... पांगळा हो...
इतकं सोपं असतं का रे?
सारं भोगून रितं होणं... असंच असणं हेच खरं!
वाट चालल्याशिवाय सारा प्रवास कसा संपेल बरं?
रस्ता त्यागायचाही आहे... गाव गाठायचेही आहे?
वाट सरणंही हवंय... डोळा दिसणंही हवंय... मोह टळणंही हवंय...
हेही हवंय... तेही हवंय...
छे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली!

सांगायचं तर आहे.....तरीही थोडं थांबायचं आहे..
होकार तर आहेच.....खट्याळ नकारही आहे..
पण कविता केवळ सुंदर आहे...