विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

Submitted by Communiket on 2 July, 2017 - 06:37

जगातल्या जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये कपोल कल्पित कथांची रेलचेल आहे. त्यांच्यात भुताखेताच्या, झाडावरील भुता-खेताच्या, हडळींच्या, हैवानांच्या गोष्टी तर असतातच. अशीच काही भुते आपल्या आजुबाजूला कायम वावरत असतात.

माणूस बसला असला किंवा फिरत असला, जमिनीवर, पाण्यात, हवेत असला, झोपला असला किंवा उतारवरून गडगळत खाली जात असला तरीही त्याला ही पदार्थविज्ञानातली भुते पछाडल्याशिवाय राहत नाहीत. गोष्टीतल्या राक्षसाच्या रक्तातून दुसरा राक्षस निर्माण व्हावा तसे वस्तूने जागा बदलली तर त्यातून विस्थापन (Displacement) हे भूत, विस्थापनातून वेग (Velocity), वेगातून त्वरण (Acceleration), त्वरणातून संवेग (Momentum) आणि त्या संवेगापासून ढकलणाऱ्या बलाचा (Force) शोध लागत जातो. किंबहुना वस्तूचे विस्थापन ज्या दिशेत होते त्या दिशेच्या मागावरच ही भुते टपून बसलेली असतात व सतत वाकुल्या दाखवतात.

यांचेच काही शापित बांधव आहेत. ते अहिल्येच्या शिळेप्रमाणे एकाच जागी असतात, दिशाविरहित असतात. वस्तुमान (Weight), अंतर (Distance) व चाल (Speed) ही ती शापित भावंडे.

विचार करणाऱ्या शास्त्रज्ञांमुळेच या भुतांचे मोजमाप करण्याची सिद्धी आपल्याला प्राप्त झाली. न्यूटन, गलिलिओ, प्लेटो, लिबनिझ व अनेक अज्ञात भारतीय तसेच पाश्चात्य शास्त्रज्ञांमुळेच काही भुतांचा वापर आपण फायद्यासाठी करून घेतला.

या ठिकाणी भूत हा शब्द अंधश्रद्धा म्हणून न वापरता अज्ञातांचा उल्लेख करण्यासाठी वापरला आहे. या भुतांविषयीची माहिती अधिक मनोरंजक पणे मांडून ते विचार अधिक आत्मसात करण्यासाठी कथारूपात लिहिण्याचा हा एक प्रयत्न.

vikramVetal.png

विक्रम वेताळाच्या कथांइतका चांगला साचा अजून कुठला मिळायला. म्हणूनच या कथांचं नाव विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात. भारतीय तत्वज्ञानात व इतर ज्ञानशाखांमध्ये प्रश्नोत्तर पद्धत अगदी श्रीमद्भगवद्गीते पासून चालत आली आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये ती आहे. लिहिता हात सद्गुरुंचाच. प्रेरणा त्यांचीच. त्याबरोबरच अच्युत गोडबोले या अवलियाला ही सलाम. त्यांच्या पुस्तकांच्या वाचनातूनही प्रेरणामिळाली. विक्रम वेताळाच्या बालसाहित्यामध्ये पदार्थविज्ञान घुसवणे तसे अघोरीच आहे. पण हा धोका पत्करूनही जर पदार्थविज्ञान समजावण्यात सुलभता व रंजकता आणू शकलो तर ती मातृभाषेची व या प्रश्नोत्तर पद्धतीची ताकद समजावी. न झाल्यास लेखकाची मर्यादा समजावी.

ही माहिती मी तंत्रज्ञान्यांसाठी लिहित नसून नवीन शिकू पाहणाऱ्यांसाठी लिहित आहे. Physics, Applied Physics, Mechanics हे विषय शिकताना त्यांमधली सौंदर्यस्थळे निसटून गेली कारण तेव्हा 'Marks'वादी विचारसरणीनेच अभ्यास झाला. आता हे विषय 'भोगणाऱ्या'(कर्मभोग या अर्थी) विद्यार्थ्यांना थोडा दिलासा देण्याच्या व त्यांचे कुतुहल थोडे अधिक जागे करण्याचा हा प्रयत्न.

मी या विषयात स्वत:ला तज्ञ मानत नाही. माझे अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण, काही पुस्तकांचे वाचन व विकीपिडिया यांचा आधार मी घेतला आहे. तात्विक/तांत्रिक त्रुटी आढळल्यास सूचित कराव्यात. त्या सुधारून घेण्यात येतील.

कथांची यादी:

विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance)
वस्तुमान व वजन (Mass and Weight)
चाल आणि वेग (Speed and Velocity)
वेग आणि विस्थापन – एकाच नाण्याच्या दोन बाजू (Relation between Velocity and Displacement)
वेगातला बदल – वाढता (त्वरण) वा घटता (मंदन) (Acceleration and Deceleration)
वेगबदल आणि वेग – काळ आलेखाचे चढ-उतार (Measurement of Acceleration)
संवेग (जोर) आणि संवेग अक्षय्यता (Law of conservation of momentum)
धक्का (संवेगातील बदल) आणि बळ (Impulse and Force )
निरीक्षकाची स्थिती – गती चौकट आणि सहनिर्देशक पद्धती (Frame of reference and coordinate system)
वळणे घेणे, वर्तुळ मार्गावर फिरणे = खेचणाऱ्या बलाचा योग्य उपयोग करणे (circular motion and centripetal force)
प्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement )
चक्री सहनिर्देशकांचा उपयोग करून चक्रव्यूह रचणे (Use of Polar Coordinates to measure Circular displacement)
©अनिकेत कवठेकर.

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीताय..लिहीत रहा..एक वेगळाच अनोखा प्रयोग..
अच्युत गोडबोलेंची पुस्तकं भारीयेत..सोप्या भाषेत खुप छान समजावलेलं असतं.. मी गणिती, बोर्डरूम, मुसाफ़िर वाचलेलं आहे. मनात चे काही भाग वाचलेत. अर्थात्, नादवेध, किमयागार, nanoday waiting वर आहेत.

कल्पना छान आहे. विज्ञानाबद्दल मराठीत लिहीत आहात हे त्याहून छान.

एक सुचवावेसे वाटते. ज्याना या संकल्पना माहिती आहेत त्याना एका वेगळ्या कथेच्या साच्यात वाचायला मजा वाटते आहे. पण तुमचा हेतू जर नवीन शिकू पाहणार्‍यांसाठी आहे तर एखादा वयोगट तुम्हाला अभिप्रेत आहे का आणि असेल तर त्या वयोगटातल्या काही वाचकांना हे वाचायला देऊन त्यांचा अभिप्राय घेतला आहे का? तो अभिप्राय जास्त मोलाचा असेल.

हेतू जर नवीन शिकू पाहणार्यांसाठी आहे तर एखादा वयोगट तुम्हाला अभिप्रेत आहे का आणि असेल तर त्या वयोगटातल्या काही वाचकांना हे वाचायला देऊन त्यांचा अभिप्राय घेतला आहे का? तो अभिप्राय जास्त मोलाचा असेल. >>>>
हो अभिप्राय घेऊन त्यानुसार काही बदल सुचले/सुचवले गेले तर ते करावेत...