प्पाउस आला

Submitted by निशिकांत on 29 June, 2017 - 01:14

( पुण्यात ४/५ दिवसापासून पाऊस सुरू आहे; त्या निमित्ताने. )

धरेस हिरवा शालू देण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

ओला उत्सव सुरू जाहला, तन मन भिजले
रोमांचाने गवताचे पाते थरथरले
मनामनातिल प्रीत फुलवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

तरुणाईच्या मनी जागली प्रीत नव्याने
धुंद होउनी ओठी येती नवे तराने
मल्हाराचा सूर छेडण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खळखळणार्‍या ओढ्यांनाही प्यास लागली
मिठीत घ्यावे सरितेने ही आस जागली
भिजलेल्यांना पुन्हा भिजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खूप दिसानी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरती
हास्य पाहिले सचैल जेंव्हा भिजली धरती
नवी उभारी मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

रंग उडोनी चारी भिंती भकास माझ्या
रागरंगही वस्तीमधला उदास माझ्या
नवीन स्वप्ने मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

निशिकांत देशपांडे. मोक्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओला उत्सव सुरू जाहला, तन मन भिजले
रोमांचाने गवताचे पाते थरथरले
..

ओला उत्सव सुरू जाहला
येथे भिजले, थरथरले यांच्याशी कुठला यमक शब्द जुळतो का बघून वरील ओळीत बदल करता आला तर आणखी सुंदर वाटेल. Happy