मुक्ती

Submitted by sobati on 29 June, 2017 - 10:28

श्री गणेशाय नमः

मुक्ती

नाशकातला एक टुमदार वाडा, इथेच अण्णा जोशी गेली अनेक वर्षे राहत आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करून दोन्ही मुलांची म्हणजे संजय आणि वृंदाची शिक्षणं त्यांनी पुर्ण केली, वृंदाच्यावेळेस त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. तरीही मुलांना आणि आता तर मुलांच्या मुलांना देखील अण्णांनी खुप छान संस्कार दिलेत. निवृत्तीनंतर अण्णा नाशकात पौरोहीत्य करतात. तसं त्यांच्या पेन्शनवर त्यांचं भागतं पण त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला हा वारसा म्हणून ऐच्छीक दक्षिणेवर ते हे कार्य मनापासून करतात. त्याचमुळे “पंडित अण्णा” असे त्यांचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. शिक्षणं पुर्ण करून संजय अमेरिकेत गेला, तिथे एका मोठ्ठ्या कंपनीत तो खूप मोठ्ठ्या हुद्यावर आहे. वृंदासुद्धा लग्न करून अमेरिकेतच स्थायिक झालीये. अण्णा कधी अमेरिकेत तर कधी भारतात असे जाऊन येऊन असतात. एकदा अण्णा अमेरिकेत असताना संजयने त्यांना यावर्षी गणपती अमेरिकेतच बसवावा असे सुचवले आणि पौरोहित्याची नाही तर किमान त्यांच्या पश्चात गणपतीची प्रथा तरी पुढे चालू राहील असा विचार करून अण्णांनी त्याला हसतमुखाने संमत्ती दिली. आठवड्या भरात गणपतींचे आगमन होणार होते. पण तिकडे प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजी मिळत नसल्याने अण्णांनी स्वतःच गणपतीची पुजा संजय आणि वृंदाच्या घरी सांगावी असे ठरले. अण्णा गणपतीची पुजा सांगणार हि बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग संजय आणि वृंदाच्या ओळखीतल्या इतरही काही जणांनी अण्णांना पुजा सांगण्याची गळच घातली. अण्णांना कोणाचेच मन मोडवेना आणि म्हणुन तब्बल १० पुजा अण्णांनी स्वीकारल्या आणि त्या यथासांग पुर्णही केल्या. सगळे जण अण्णांच्या पुजा सांगण्याच्या पद्धतीवर खुपच खुश होते. अण्णांनी स्वेच्छेने दिलेली दक्षिणा स्वीकारली आणि हिशोब केला तर ते तब्बल १००० डॉलर्स इतके होते. संजयने हे अण्णांना सांगितले तेव्हा अण्णांचा विश्वासच बसे ना. ही रक्कम अण्णांच्या नावे बँकेत ठेवावे असे ठरले आणि दुसर्याच दिवशी त्याची अंमलबजावणी देखील झाली. गणपतीच्या उत्तर पुजेच्या वेळी ६५० डॉलर्स त्यांना मिळाले. गणपती गेल्या नंतर पितृपक्षात अण्णांना श्राद्धविधीसाठी देखील बऱ्याच लोकांनी आमंत्रण दिले. अण्णांचे एकुण मजेत चालले होते तिकडे अमेरिकेत.

असेच एकदा संध्याकाळी घरात शांतपणे बसलेले असताना संजयचा मित्र प्रथमेश देसाई तिथे आला. प्रथमेश तिथे sound recording studio च्या व्यवसायात होता. त्याने अण्णांना नमस्कार केला आणि ख्याली खुशाली विचारली. प्रथमेश म्हणाला "कसे आहात अण्णा ? पौरोहित्य कसे काय चालू आहे ?" अण्णा म्हणाले "अरे प्रथमेश शरीर साथ देतय तोवर करायचं रे... त्यानंतर हे सगळं थांबवावे लागेल" प्रथमेश म्हणाला "अण्णा असं काय म्हणताय, अहो आमच्या मुलांची लग्न देखील तुम्हीच लावणार आहात" दोघेही मनापासून हसले. इतक्यात प्रथमेशला काहीतरी सुचले आणि तो अण्णांना म्हणाला "अण्णा तुम्हाला पुजांसाठी बरेच लोकं बोलावतात, मग त्या सगळ्या लोकांकडे जायला जमतं तुम्हाला ?" अण्णा म्हणाले "अरे या California भागात आणि वृंदाच्या घराच्या आसपास मी जाऊ शकतो, आताशा अती प्रवास झेपत नाही मला." प्रथमेश म्हणाला "अण्णा अहो मग इतरांची गैरसोय होत असेल ना ?" अण्णा "कळतं रे मला पण नाईलाज आहे. देवाच्या कार्याला नाही म्हणायचं नसतं हे माझ्या वडिलांचे संस्कार, पण तब्येतीपुढे हात टेकावे लागतात" प्रथमेश "अण्णा मग तुमच्या पौरोहित्याची जर आपण ध्वनिफीत तयार केली तर ? म्हणजे जिथे तुम्ही पोहोचू शकत नाही त्या लोकांना सुद्धा फायदा मिळू शकेल, आपण इथल्या महाराष्ट्र मंडळ, मराठी उद्योजक मंडळ अशा बर्याच संस्थान मधुन त्याची प्रसिद्धी करू" अण्णा "अरे पण मला कुठलं ते ध्वनी मुद्रण वगैरे जमणार ?" प्रथमेश " आहो अण्णा तुमचा आवाज अगदी खडखडीत आहे... आणि तांत्रिक बाबी सांभाळायला मी आणि माझा studio आहेच ना !" हा विचार अण्णांना पटला आणि त्यांनी त्याला संमत्ती सुद्धा दिली. महिन्या भराच्या मेहेनतीनंतर CDs च्या स्वरूपात अण्णांच्या तोंडून सांगितल्या गेलेल्या पुजा बाजारात आल्या. या CDs ना अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला आणि पहिली आवृत्ती हातोहात खपली, त्यानंतर दुसरी मग तिसरी. Royalty च्या स्वरूपात अण्णांना चांगले पैसे सुद्धा मिळत गेले.

एक दिवस अण्णांना अचानक गरगरल्या सारखे झाले आणि ते तोल जाऊन पडले, संजय घरातच होता तो त्यांना घेऊन लगेच Hospital मधे गेला तिथे ECG काढल्यावर लगेचच Angiography करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. Angiography केल्यावर २ मोठे blockages असल्याचे निदर्शनास आले. एक ६०% आणि दुसरा ८२%. डॉक्टरांनी Angioplasty करण्याचे सुचवले. संजयने लगेच त्याला होकार दिला, पण अण्णा म्हणाले भारतात सुद्धा चांगली वैद्यकीय सुविधा आता उपलब्ध आहे आणि आता मला जे उपचार करायचे ते भारतात जाऊनच. संजय, वृंदाने त्यांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण अण्णा मानायला तयार नव्हते. अखेरीस त्यांना भारतात पाठवण्याचे नक्की झाले, त्यांचे स्वास्थ्य सुधारे पर्यंत काही महिने वृंदा त्यांच्या बरोबर येऊन भारतात राहणार असेही ठरले. भारतात परतल्यावर अण्णांवर उपचार सुरु झाले. त्यांची Angioplasty यशस्वी झाली, मग काही दिवसांच्या विश्रांती नंतर ते हिंडू फिरू लागले. वृंदा अजून त्यांच्या बरोबरच होती. एक दिवस सकाळी वृंदा किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना देवघरात काहीतरी पडल्याचा तिला आवाज आला, आणि जाऊन बघते तर अण्णा जमिनीवर पडले होते. तिने शेजारच्या चौधरींच्या अवीला हाक मारली. अवी लगेच आला आणि अण्णांना गाडीतुन hospital मध्ये घेऊन गेला. तिथल्या डॉक्टरांनी चेक करून सांगितले कि अण्णा गेले. दुःखाची लाट पसरली. संजय सगळ्या कुटुंबासमवेत दुसऱ्याच दिवशी आला. पंडित अण्णांना अखेरचा निरोप द्यायला जवळ जवळ अख्ख नाशिक जमलं होतं. अण्णांची दिवस कार्य संपवुन वृंदा आणि संजय सगळे परत अमेरिकेला निघून गेले.

आता अण्णांना जाऊन जवळ जवळ वर्ष झालं होतं. एक दिवस वृंदाचा संजयला फोन आला, ती म्हणाली "दादा अरे अण्णांना जाऊन आता वर्ष होईल ना रे" संजय म्हणाला "हो गं, अगदी काल पर्यंत अण्णा या घरात होते असंच वाटतंय, मुलं तर अजुनही त्यांना विसरली नाहीयेत, त्यांनी शिकवकलेले शुभंकरोती, भिमरुपी, अथर्वशीर्ष सगळे नित्य नेमाने आणि आवडीने म्हणतात." वृंदा "दादा तिथीप्रमाणे २ दिवसांवर श्राद्ध आलाय रे" संजय "हो कालच सायलीने आठवण करून दिली" वृंदा "दादा अरे २ दिवसात जमेल सगळं ?" संजय "पुजा सामुग्री तर सगळी आहे, मी आज एका गुरुजींशी पण बोलतोय, तु येतेस का तेवढीच सायलीला मदतही होईल". वृंदा "हो मी उद्याच पोचते मग परवा कार्य झालं की येईन परत" संजय "हो चालेल". वृंदा आली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या गुरुजींची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना जमणार नसल्याचा निरोप आला. परत एकदा गुरुजींचा शोध सुरु झाला. पण एकही गुरुजी उपलब्ध होऊ शकले नाहीत. शेवटी "यथा बुद्धी यथा शक्ती" अशी पुजा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पुजेची मांडामांड झाली आणि सगळे अण्णांचे स्मरण करू लागले. एवढ्यात संजयच्या धाकट्या मुलाने एक CD त्याच्या player मध्ये play केली आणि अण्णा स्वतःच श्राद्ध विधी सांगते झाले. अण्णांचा आवाज कानावर पडताच संजय आणि वृंदाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. पुजा पुर्ण झाल्यावर संजय वृंदाला एवढेच म्हणाला "आज अण्णांनी स्वतःच स्वतःला मुक्ती मिळवून दिली" आणि हातांच्या ओंजळीत चेहेरा लपवून ते दोघेही खुप रडले. हे सगळे अण्णा तसबिरीतून हसतमुखाने बघत होते.

लेखक
आनंद रामकृष्ण विश्वामित्रे, डोंबिवली

Group content visibility: 
Use group defaults

कथा लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. त्याला तुम्हि दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद. कथेतील पात्रे काल्पनिक आहेत आणि त्यान्चा वास्तवाशी असलेला सम्बन्ध हा केवळ एक योगायोग समजावा. कथेत काही त्रुति असल्यास जरुर कळवा
पुन्हा एकदा सगळ्यान्चे मनापासुन धन्यवाद.