एका लग्नाची वेगळी गोष्ट

Submitted by विद्या भुतकर on 14 February, 2017 - 23:31

जात्यावर हळद दळली, मुहूर्तमेढ रोवली, बायकांची गाणीही म्हणून झाली. गावातल्याच फोटोग्राफरनं सगळ्या बायकांचा एकेक फोटो काढला. '१०० रुपयाला एक फोटो' म्हटल्यावर शैलाक्कानं तिचा आणि सुनेचा वेगळा फोटो घ्यायचा विचार रद्द केला. आता गाडीत बसून निवांत नाश्ता करायचा या विचारानं ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. सुनेलाही तिने जवळ बसवलं. बाकी मांडव बांधून झाला होता. आता कसं लगीनघर वाटत होतं. पक्याच्या आईला, काकीला, काय करू अन काय नको असं झालेलं. नवरदेवाची आई म्हणून मान असला तरी काम सरता सरत नव्हतं. सगळे आहेर, बस्ता, पाहुणचार यातून कधी सुटतो असं तिला झालं होतं. मनात हजार वेळा तिने देवीला साकडं घातलं होतं,"हे लगीन पार पडू दे, पोराला घेऊन पयलें तुझ्या दारात येऊन तुझी साडी चोळी करतो बघ".

दुपारी ४ ला गाडी निघणार होती मुलीच्या गावात जायला. काकीनं हजारवेळा तरी शिव्या घातल्या होत्या मनात,'मेल्याना कितीदा म्हटलं हिकडं करून द्या लगीन पण नाय. " अण्णाही वैतागले होते, अण्णाही एकेका पोराला कामं सांगून दमले होते. त्यांनी तिला शांत केलं. "जाऊ द्या ओ. किती चीडनार अजून? आता ते लोक आडूनच बसले तर काय करनार? नायतर मग आपल्याला करायला लागला अस्ता खर्च हितला. त्यापेक्षा गाडी घिऊन जायचं आणि गाडी घिऊन पोरीला आणायचं. बास !". काकी जरा शांत झाली. आता दोन दिवसांसाठी अशी हिम्मत सोडून चालणार नव्हती. तिनं पुन्हा एकदा घरात, ओसरीवर, स्वंयपाकघरात फेरी मारली. तिच्या भैनीच्या पोरीने तिला समजावलं,"मावशे बास की आता. परत हितंच यायचं हाय. आणि काय राह्यलं तरी आपन पोराकडंच हाय. असा रुबाब तरी कधी करनार?". तेही बरोबरच होतं म्हणा, मुलाची आई म्हणून रुबाबात राह्यचं सोडून काकीला सामान न्यायची, सगळं ठीक होण्याची काळजी.

तिने घड्याळात पाहिलं, पाच वाजून गेले होते. सगळे पै-पाहुणे दारात जमा झाले. बाहेरगावच्या लोकांना सकाळ सकाळी दणकून जेवण घातलं होतं अण्णांनी. सगळे सुस्तावले होते. गाडी आली तशी सगळे खडबडून हलले. पक्याच्या हातावर काढलेली मेंदी अजून तशीच होती. चार गोळे का होईना काढायलाच पाहिजे होते ना? त्यामुळे बाकी पोरांनीच सामान उचललं. पक्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्स मध्ये बसला तसं काकीनं त्याला अडवलं, म्हटली,"एक मिनिट दम काढ". पक्यानं,"आता काय" म्हणून तोंड वाकडं केलं. ती घाईत घरात गेली, खडेमीठ-चार लाल मिरच्या घेऊन आली, ४-५ उठाबशा काढत, पुटपुटत त्यांचं मीठ काढलं आणि म्हणाली,"आमच्या गाडीत बस. उगा पोरा-सोरांच्या बर्बर मजा मारत बसू नका. आमच्या गाडीत दोन-चार तरणी पोरं पायजेल का नको?". पक्या आता वैतागला होता पण काकी लई दमली होती काम करून, तिला काय बोलणार म्हणून गप बसमध्ये बसला.

बाकी बायकांनी, पुरुषांनी जागा पकडल्या, पिशव्या ठेवल्या. शैलाक्कानं पन आपली आणि सुनेची जागा पकडून घेतली. तिला आतल्या बाजूला बसवून ती बाहेरच्या सीटवर बसली. पुन्हा एकदा उठून पिशवी खाली घेऊन चाचपडली, परत ठेवली आणि खाली बसली. सुनेनं नुसतंच बघितलं आणि बाहेर बघायला लागली.

शेजारच्या सीटवरल्या एका बाईनं विचारलं,"काय शैलाक्का, झाला का सासूबाई? काय म्हटला सुनेचं नाव ते?". शैलाक्कानं नाव सांगितलं,"जानवी".

ती बाई बोलली,"अस्स. चांगलं नाव हाय की".

शैलाक्कानं कौतुकानं सांगितलं,"होय, आम्हीच ठेवलंय. मला ती शिरेल मधली लै आवडली हुती बगा. मग म्हणलं, हेच ठेवायचं नाव सुनेचं. "

सून तिकडून थोडंसं हसली, नाईलाजाने. जागेवरून हात जोडून नमस्कार केला. तसं शैलाक्का म्हटली,"असं काय पुडाऱ्यागत हात जोडतेया, वाकून कर.या आपल्या पक्याच्या मावशी हायेत." म्हणून स्वतः उठून बाजूला झाली. तिकडे त्या बाईंनी,"असू दे असू दे" म्हटलं तरी सुनबाई उठल्या, बसमध्येच वाकून नमस्कार केला आणि पुन्हा जागेवर बसल्या.

"पोरगा आला न्हाई ते?" त्या बाईंनी विचारलं.

"हां त्याला जरा काम होतं. मग म्हटलं हिला तरी नेतो. नवी सुनबाई जरा समाजात चार लोकांची ओळख व्हायला पायजे ना? म्हनून घेऊन आलो मग."

त्या बाईंनी मान हलवली.

गाडी भरली, बारकी पोरं उगाच उड्या मारत होती, त्यांना त्यांच्या आयांनी गप्प बसवलं, नारळ फुटला आणि देवीचं नाव घेऊन गाडी निघाली. सगळा मिळून ६ तासांचा रस्ता. पण रस्त्यात जेवण खाणं करून पुढं जायला वेळ होणारच होता. 'पहाटे पहाटे गाडी पोचायलाच पायजे' असा विचार करून काकीने एक सुस्कारा उसासा सोडला. जरा सगळे स्थिर झाल्यावर तिनं एक मोठी पिशवी पक्याला वरून काढायला लावली. त्यातनं एकेक करत बुंदीचे लाडू आणि चिवड्याचं पाकीट तिने मागे पाठवायला सुरुवात केली. शैलाक्काने सुनेला एक देऊन आपलं लगेचच उघडलंही. बकाणा भरत तिने शेजारच्या मावशींशी बोलायला सुरुवात केली. सुनबाईंनी दोन चार घास खाल्ले आणि पाकीट पुढच्या जाळीत ठेवलं. खाऊन हळूहळू करत सगळे पेंगले. दोनेक तासांनी सुनबाईंनी शैलाक्काला हळूच हलवलं,म्हणाली,"आत्याबाई जायचं होतं. " "कुठं?" विचारल्यावर तिने करंगळी दाखवली.

"आता कुटं ? जरा दम काढ." म्हणून शैलाक्काने तिला गप्प बसवलं. ती गप्प बसली, कशीतरी अर्धातास कळ काढून तिने पुन्हा उठवलं, म्हणाली,"लै घाईची लागलीय." कुटं आडोश्याला थांबली तरी चालंल". तिचा चेहरा पाहून शैलाक्का उठली, तिने काकीला उठवून कानात सांगितलं, मग काकींनी पक्याच्या कानात. पक्याने पुढे जाऊन गाडी एका ठिकाणी थांबवली. त्या दोघी उतरल्या तशा अजून दोन चार बायका उतरून आडोशाला जाऊन आल्या. जानवी येईपर्यंत शैलाक्का बाहेर उभ्या राहिल्या. सगळे आत येऊन पुन्हा गाडी सुरु झाली. त्यात अर्धा तास तरी गेला होता. आत येऊन शैलाक्का शेजारच्या मावशीला सांगू लागली,"तुम्हाला म्हनून सांगते. दोन दिवस झाले सारकी ही अशी जायला लागलीया. आता येऊन डॉकटरला दाखवाय पायजे."

आपल्याबद्दल असं लोकांशी बोललेलं जानवीला अजिबात आवडलं नाही. ती मान फिरवून बाहेर बघत बसली. तासाभरात गाडी पुन्हा थांबवायची वेळ आली. आता मात्र जानवीचा चेहरा रडवेला झाला होता. तिला पाहून पुन्हा गाडी थांबवली. एका तरण्या पोरीनं म्हटलंही,"मी जाते सोबत", तर शैलाक्काने काही ऐकलं नाही. स्वतःच तिच्यासोबत जाऊन आली. दोघी आत आल्यावर गाडी सुरु झाली. आत बाहेर जाताना, सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत हे पाहून दोघीना अजूनच अवघडल्यासारखं झालं होतं. अजूनच आता सगळे जागे झाले होते आणि भूकही लागली होती. .पुढे पोरांनीच थोडं बघून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबल्यावर सगळ्यांसाठी एकेक थाळी सांगून पक्याने मेंदीचे हात धुतले. आणि जेवायला बसला.

तिकडे सगळ्या बायकांनी टेबल जोडून आपला घोळका बनवला. सगळ्या गप्पा मारत जेवल्या. कुणी आपल्या पोरांना खायला घातलं. कुणाला उलटी झाली म्हणून काहीच खाल्लं नाही. जानवीलाही जेवण काही जाईना. उगाचच चिवडून तिने रोटीचे चार घास खाल्ले आणि गप्प बसली. आता मात्र शैलाक्काला पोरीची काळजी वाटायला लागली. घरी गेल्यावर तिची दृष्ट काढायचं तिने मनोमन ठरवलंही. आता सगळ्यांचं जेवण झाल्यावर सगळे पुन्हा एकदा बाथरूमची फेरी मारून आले. आत गेलेल्या जानवीची वाट बघणाऱ्या शैलाक्काला चैन पडेना. शेजारीच असलेल्या काकीशी ती बोलायला लागली. आपल्यामुळे उशीर होतोय हे तिला कळत होतं. काकीला म्हणाली," आता महिनाभरच झाला लग्नाला. म्हटलं जरा सगळ्यांशी ओळख पाळख हुईल पोरीची. पण उगाच आनलं असं वाटाय लागलंय. काय खाईना, पिईना. आनी सारकी जायला लागलीय. काय कळंना."

काकींला स्वतःच्या टेन्शनमध्ये हिच्याकडे लक्ष लागत नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,"हां आल्यावर डॉकटरला दाखवा. नायतर तिकडे गेल्यावर त्याच गावात जमलं तर जाऊन या. बघू कुणी भेटलं तर."

शैलाक्काने मान हलवली.

पुन्हा विचार करत काकी म्हणाली,"दिवस तर गेलं नसतील?"

अरेच्चा हा विचार तिने केलाच नव्हता. आता तिला सगळी चिन्हं दिसायला लागली आणि शैलाक्का खूष झाली. पोरगी बाहेर आल्यावर दोघी गाडीत बसल्या आणि गाडी सुरु झाली. तरण्या पोरांनी गाण्यांच्या भेंड्या सुरु केल्या आणि मागे बसून बायकांनी गप्पा. या दोघी सासू-सुना फक्त ऐकत होत्या. मधेच जानवीने हळूच गाणं सांगितलं,"हमें तुमसे प्यार कितना.." तिच्या बारीक आवाजाकडे लक्ष जाणं अवघडंच होतं. शेजारच्या मावशीने आग्रहाने तिला गाणं म्हणायला लावलं. तेव्हढं गाणं सांगून ती पुन्हा बाहेर बघू लागली. मध्ये एकदा जानवीने सासूला उठवलंच. यावेळी मात्र तिने पुढच्या पोराला पण सोबत घेतलं. रात्रीच्या अंधारात दोघी कुठे एकट्या जाणार म्हणून. यावेळी तिने पोरीला बाहेरच्या बाजूला बसवलं आणि झोपी गेली.

बराच वेळाने पोरांचा उत्साह सरला. काकीने सगळयांना 'उद्या कामं हायेत मुकाट्याने झोपा' म्हणून गप्प बसवलं. लाईट बंद झाले. हळहळू करत सगळी गाडी शांत झाली. रात्रीच्या गुडूप अंधारात कधीतरी सगळ्यांची गाढ झोप लागलेली असताना त्या पोरीने पुन्हा सासूला हलवलं. आता मात्र शैलाक्काला झोप आवरत नव्हती. जानवींने समोरच्या पोराला उठवलं. तिने हळूच सासूला सांगितलं,"आत्याबाई हे दोघं आहेत झोपा तुम्ही." तिनेही पडत्या फळाची आज्ञा म्हणून एकदा फक्त उभ्या राहिलेल्या पोरांकडे पाहिलं आणि 'बरं' म्हणून झोपून गेली. ड्रायवर लाईट लावणार इतक्यात पक्याने त्याला थांबवले,"'इतक्या रात्री लाईट नगू लावूस' म्हणून. गाडी थांबली, अंधारात चाचपडतच ती, ते पोरगं आणि पक्या उतरले. दहा मिनिटाने तिघे आत आले आणि 'चल रे' म्हणून पोराने सांगितल्यावर गाडी सुरु झाली.

पुढचे तीन तास मात्र शैलाक्काची झकास झोप झाली. गाडी मुलीच्या गावात येऊन पोचली होती. गाडी थांबल्या थांबल्या अचानक धाडकन तीन पोरं उठून दार उघडून पळत सुटली. पेंगलेल्या वऱ्हाडाला काय झालं ते नक्की कळलं नाही. ड्रायवर एकदम ओरडला,"चोर चोर" म्हणून. सगळे एकदम दचकून जागे झाले. शैलाक्काला तर काही कळत नव्हतं. तिने शेजारी पाहिलं तर पोरगी शेजारी नव्हती. पटकन पिशवी वरून काढली आणि पाहिलं तर पोरींचे सगळे सोन्याचे दागिने गायब होते. तिने तिथेच हंबरडा फोडला,"कुठं गेली रे माझी पोर? चोरांनी धरलं का काय तिला? सगळे दागिने बी गेले की रं."
तिचा आवाज ऐकून सगळे आपापल्या पिशव्या बघत असताना एकदम काकी ओरडली," आरं देवा. हा काय घात झाला रं?". तिच्या हातात एक कागद होता. अण्णांनी तो कागद हातात घेऊन वाचला,"अवो अक्का तुमची सून आमच्या पोराबर पळालीया. "
"अन्ना काय पन बोलू नका" म्हणून शैलाक्का ओरडली.
अण्णा पुढे बोलले,"म्हनं त्यांचं प्रेम होतं अधिपासुन. तिच्यावर शंका आली म्हून बापानं घाईनं लग्न केलं आनी तुम्ही माझं पैशापायी, म्हनं. आमी लग्न करणार हाय. आमाला शोधू नका असं लिहलय बघा तुम्हीच. "
काकीला तर चक्करच आली होती आणि शैलाक्का आपली रिकामी पिशवी हातात घेऊन उध्वस्त बसली होती.
आता त्यांना शोधणार तरी कुठे आणि कसं हे कुणालाच कळत नव्हतं. ड्रॉयव्हरलाही नक्की कुठे गाडी थांबवली ते आठवत नव्हतं आणि हे असं होऊच कसं शकतं यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नव्हता.

तिकडे पक्या आणि जानवी, नाही नाही, मेघा केंव्हाच दूर निघून गेले होते. अनेक प्रयत्नांनी का होईना ते एकमेकांना कायमचे भेटले होते.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा... आवादली.. एक्दम अनप्रेदिक्टबाल शेवट..
आता प्रतिक्रीय येतील पुब्लिक चे.. मला अदिच अंदज आला होता... मी ओळ्खलं होता एंड, मी प्रेदिक्ट केलं होतं म्हणणारे येतील comments Happy

१) दुपारी ४ ला गाडी निघणार होती मुलीच्या गावात जायला. २) सगळा मिळून ६ तासांचा रस्ता. ३)'पहाटे पहाटे गाडी पोचायलाच पायजे' असा विचार करून काकीने एक सुस्कारा उसासा सोडला. >>>>>>>>>>> Uhohवरील अनुमानावरुन असे वाटतय की, वेळेच ताळमेळ चुकलाय....!!! जर आपण असे समजलो की, गाडी ४ ऐवजी संध्याकाळी ६ ला जरी सुटली तरी रात्री १२ ला पोहोचेल...!!! पहाटे पहाटे कशी पोचनार....?? जर तुम्ही संध्याकाळच्या वेळे ऐवजी रात्री १०-११ ची जरी वेळ दिली असती, तर वेळेचा घोळ झाला नसता....!!! बाकी कथा एकदम 'भन्नाट' होती....!!!

Abdul
1. तिने घड्याळात पाहिलं, पाच वाजून गेले होते. सगळे पै-पाहुणे दारात जमा झाले.
2. सगळा मिळून ६ तासांचा रस्ता. पण रस्त्यात जेवण खाणं करून पुढं जायला वेळ होणारच होता. 'पहाटे पहाटे गाडी पोचायलाच पायजे' असा विचार करून काकीने एक सुस्कारा उसासा सोडला.
>> निघायला उशिर, पुढे जेवण हे सर्व धरुन हा विचार केला होता.
असो.
ही कथा लिहून २ दिवस होऊन गेले होते. पोस्ट करावी का नको असे वाटत होते. नवरा तर नकोच म्हणाला. Happy पण मायबोलीवर नेह्मी प्रामाणिक प्रतिसाद मी पाहिले आहेत. जसा वरचा अब्दुल यान्चा आणि इथे येनार्या वेगळ्या कथाना मिळणारा प्रतिसादही. म्हणून हिम्मत केली.

तुमचे कमेन्ट वाचून आवडली याचा आनन्द झाला. धन्यवाद. Happy
विनिता>> माझ्या अनेक कथा वाचून लोकानी मला विचारले आहे की माझि आहे का? खरी आहे का? पण यावर असा प्रश्न येईल असे वाटले नव्हते. ही मी तरी घडलेली पाहिली नाहिये. पण मी लोकाना प्रेमात अनेक वेड्या गोष्टी करताना पाहिले आहे. सो अशी होऊ शकते यात शन्का नाही. Happy

विद्या.

छान.
पोस्ट करावी का नको असे वाटत होते << का? बाकी घरगुती डेली अ‍ॅक्टिव्हीटी डायरी पेक्षा कितीतरी चांगली आहे.

छान आहे गोष्ट. बरेच झाले पोस्ट केलीत ते. च्रप्स म्हणतात त्याप्रमाणे शेवट अन्प्रेडिक्टेबलच होता. यापुढे कथा पोस्ट करावी की नाही असा विचार नका करू; बिंधास्त कथा टाकत जा. आम्ही सगळ्यांच्या सगळ्या कथा वाचत असतो, आणि जमल्यास comment ही करत असतो.
मुळात तुमचे 'मायबोली'वर जितके लेखन आहे, ते सगळे आम्ही वाचले आहे. आणि ते खरोखरच अप्रतिम आहे. त्यापैकी काही धाग्यांवर आमच्या comments असतीलही (ब-याच धाग्यांवर नसतील कारण आम्ही 'मायबोली'वर नवीनच आहोत.)
क्षमा करा... इतकी बकबक केली आहे इथे आम्ही. उद्देश एकच की आपल्याला एखादी कथा फारशी चांगली वाटली नाही तरीही ती इतरांना आवडू शकते. So, keep posting. God bless you...
बाकी कथा एकदम भन्नाट...!✌

पोस्ट करावी का नको असे वाटत होते << का? बाकी घरगुती डेली अ‍ॅक्टिव्हीटी डायरी पेक्षा कितीतरी चांगली आहे.>> कुणाच्या? नीट कळले नाही.
असो.
हिन्दुकुश, धन्यवाद इत्क्या छान कमेन्ट्बद्दल Happy