माझी मऊ मऊ आई

Submitted by वर्षू. on 30 September, 2009 - 02:48

भर दुपारी मला स्वप्न पडत होतं.. मी जोरजोरात रडू पाहात होते,पण घशातून स्वर बाहेर पडत नव्हता.ओरडून बोलत होते..मी आईला म्हणत होते.. मला न भेटता कशी निघून गेलीस तू? माझ्यासाठी का नाही थांबलीस गं?? पण हुंदक्यांमधे शब्द ऐकू येत नव्हते.खूप विचित्र घुसमटल्यासारखं वाटत होतं. इतक्यात फोन घणघणला. मला दचकून जाग आली. स्वप्नात इतकं रडले होते,बोलत होते पण डोळे मात्र कोरडेच होते फक्त खूप दमल्यासारखे वाटत होते.
पलीकडून ताई म्हणत होती,'आई नाहीये!!".. मी अं?अं ? करत चार वेळा तोच प्रश्न विचारला. बधिर झालेल्या डोक्यात उत्तर शिरत नव्हते.
खूप दिवसांपासून आई आजारी होती. तिचा आनंदी ,उत्साही आवाज हळू हळू क्षीण होत होता. मी दररोज ३,४ वेळा फोन करत होते. कधी जागी असायची तर कधी झोपलेली..कधी २ वाक्यं बोलून तिला दम लागायचा.मला बेचैन बेचैन वाटत होतं..वाटे आताच्याआता उडून तिला भेटायला जावे.पण विसाच्या अडचणीमुळे माझा पासपोर्ट अडकला होता.आईच्या आठवणी येऊन मनाची घालमेल होत होती.तिच्याच बद्दल विचार करता करता सोफ्यावरच गाढ झोप लागून गेली आणी ते स्वप्न पडले..आणी हे मी काय ऐकतेय??.. आत्ताच तर मी २ दिवसात निघणार होते..यंदा दिवाळी मी आईच्या सोबतच साजरी करायचे ठरवले होते आणी तसं मी तिला खूप आधीपासून सांगूनही टाकलं होतं..मग ती का बरं नाही थांबली माझ्यासाठी?? का अशी न भेटता निघून गेली?? मी शेंडेफळ असल्यामुळे मी सर्वात लाडकी होते ना तिची!!!..मग.. अश्रूंचे धबधबे अविरत कोसळत राहिले, आठवणींच्या धुक्यात मन हरवून गेले... कसंबसं मनाची समजूत काढायला सुरू केली.. आता आईला आपल्या जवळ यायला कोणत्याही पासपोर्ट्,विसाची गरज नाही.. तिला वाटेल तेन्व्हा ती माझ्याजवळ येऊन राहील, माझ्याशी बोलेल..
बालपणापासून ते आत्तापर्यन्तची आई आठवली.. तिचा स्पर्श्,तिची नजर ,तिचे हात,तिच्या साड्या,तिने केलेल्या पोळ्या सर्वच कसं मऊ मऊ होतं. आम्ही लहानपणी कितीही खोड्या केल्या,तिला त्रास दिला तरी तिने कधीच हात उगारला नाही..
आत्ताच्याआत्ता ताईला सांगते, आईच्या मऊ मऊ साड्यांची माझ्यासाठी एक दुलई बनवून घे.बास!!! ती पांघरली कि माझ्यापासून तिचा मऊ मऊ स्पर्श कद्धी दूर जाणार नाही...
आमच्या लहानपणी आमचे आजोबा कधी कधी उदासवाणे होऊन गुणगुणत ,'स्वामी तिन्ही जगाचा,आईविना भिकारी!!".. आत्ता त्याचा अर्थ कळला...

गुलमोहर: 

Everytime God can not be everywhere for everyone. So HE created Mother.

छान लिहिलयस.

मी दहावीत असताना खूप लिहून लिहून हात दुखायचा तेव्हा आईला म्हणायचे "हात जरा दाबून दे. तुझा हात अगदी लोण्यासारखा मऊ आहे."
मध्यंतरी खांद्याच्या हाडाला दुखापत झाली होती तेव्हापण पन किलर घेण्यापेक्षा आईने हात दाबून दिला की मला बरं वाटायचं. Happy

अजून पण मी घरी गेले की आईला सांगते की हात दाबून दे (दुखत नसताना सुद्धा)

वर्षू,
माझेच डोळे पाणावलेत. काय लिहू? काय बोलू?
सगळे आपल्याला सांगतात. शोक आवरा. धीरानं घ्या.
मी सांगतो, ' मनमोकळं रडा. काही काळ कुणाशी बोलू नका.'
आईच्या आठवणींत काही क्षण घालवा. बस इतकंच.

तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. प्लीज हे मी कोणाच्या ही भावनांना एक्स्प्लॉयेट करण्यासाठी नाही लिहिले..इकडे आपल्या भाषेत बोलता येत नाही म्हणून आत साठलेली तडफड माबो वर मोकळी केली. माझ्या नवर्याने त्याचे आईवडिल गेल्या वर्षी एकदमच गमावले..त्यामुळे त्याच्यासमोर अशा गोष्टी बोलून त्याच्या मनाला अजून कष्ट द्यावेसे वाटत नव्हते.
आजपर्यन्त मी फक्त आनंददायक गोष्टी मित्रमैत्रीणी बरोबर शेअर केल्या..पण आता माझं मन इकडे मोकळं केल्यावर कळलं कि मित्रमैत्रीणी समोर मन मोकळं करून ही मनाला बरं वाटतं. विचारांना वेगळी पॉझिटिव्ह दिशा देता येते.

>>'स्वामी तिन्ही जगाचा,आईविना भिकारी!!".. आत्ता त्याचा अर्थ कळला...<<
तो खराखुरा कळतो तेव्हा इतक्या तीव्रतेने कळतो.. तुम्हाला कोसळवून टाकतो.