कथुकल्या ११

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 10 June, 2017 - 13:01

१. तुझ्याविना…

निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता.
“सॉरी डियर. आजचा ब्रेकफास्ट तुझ्यासोबत नाही करता येणार, पण संध्याकाळी लवकर येतो हं” तो तिच्या कानाशी पुटपुटला अन कपाळाचं हलकेच चुंबन घेऊन घराबाहेर पडला.

त्यांना इथे येऊन फक्त चार महीने झाले होते. त्याला माहीत होतं की जुनं ठिकाण सोडून नवीन शहरात येणं तिला फारसं आवडलं नव्हतं. पण त्याचाही नाईलाज होता. तिथे सगळ्या जुन्या आठवणी, दुःख त्याला ओरबाडायला धावायचे, काहीही केलं तरी वास्तविकतेचं भान सुटायचं नाही. एका अर्थाने तिला गमवावं लागू नये म्हणूनच तो नवीन ठिकाणी आला होता... तिचं आणि त्याचं स्वतंत्र विश्व बनवायला.
तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही तो करू शकत नव्हता. ती पहिल्यांदा भेटली तो दिवस त्याला नेहमीच लख्ख आठवायचा… नुकत्याच स्वच्छ केलेल्या दिव्याच्या काचेसारखा. आधी तो एकटा एकटा रहायचा. फारसे मित्रही नव्हते त्याला. तो आणि त्याची कला; बस्स एवढंच विश्व. रात्रीसुद्धा तो आर्ट स्टुडिओतच घालवायचा, स्वतः त्याच्या कलाकृतींमधलाच एक बनून जायचा. ती आयुष्यात आली अन तो माणसात आला. सुट्ट्यांमधे ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे, तासनतास बोलत बसायचे. आपल्यालाही समजून घेणारं कुणीतरी सापडेल याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं. तिला तो परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणायचा, अन ती त्याला सर्वोत्तम कलाकार. एकमेकांसोबत अख्खं आयुष्य घालवावं हे लक्षात यायला दोघांना जास्त वेळ लागला नाही.
दोघांनी लग्न केलं, संसार थाटला अन वर्षभरातच…

“गुड मॉर्निंग निखिल.” सानिका मॅडम स्टाफरूममधे डोकावत बोलली.

“गुड मॉर्निंग.” तो विचारतंद्रीतून बाहेर येत म्हणाला.

“नऊ पाच झाले. लेक्चरची वेळ झाली तुझ्या.”

“अरे हो, लक्षातच नाही.”
तो घाईघाईत सामान आवरु लागला.

“आर यू ओके ?”

“हो… नाही म्हणजे थोडा मूड ऑफ आहे आज. उठायला उशीर झाला, म्हणून मग घाईघाईत यावं लागलं. प्रियासोबत ब्रेकफास्ट करायलापण जमलं नाही. ती नाराज झाली असेल.”

“ती का नाराज होईल ? तुला नोकरी आहे आणि सकाळी कॉलेजला जावं लागतं हे माहितीये तिला. आणि होतो एखादवेळी उशीर. आय थिंक यू आर थिंकिंग टू मच.”

“मे बी यू आर राईट.”

ती हसली आणि नाकावर घरंगळणारा चष्मा सावरत निघून गेली.

निखिल अजून तिथेच होता, सानिका जे बोलली त्यावर विचार करत. तिचंही बरोबर होतं. कदाचित तो जास्त काळजी करत होता. पण तिला प्रियाचा स्वभाव माहीत नव्हता. त्याच्याशिवाय तिचं पानही हलायचं नाही. ती पूर्णपणे त्याच्यावर विसंबून होती.
अर्थात नवीन घरी तिच्या आवडीच्या आणि गरजेच्या सगळ्या गोष्टी त्याने आणून ठेवल्या होत्या. भिंतींना तिला आवडतील ते रंग, खिडक्यांवरचे पडदे त्याच्याशी रंगसंगती साधणारे. अभ्यासिकेतल्या एका कोपऱ्यात तिची आवडती पिवळी खुर्ची.
नवीन ठिकाणी जुळवून घ्यायला वेळ जातो हे त्याला मान्य होतं. म्हणूनच तर त्याला तारेवरची कसरत करावी लागायची.

अखेर विचारांच्या आवर्तातून बाहेर पडून तो लेक्चर घ्यायला निघून गेला.

* * *

लवकर यायचं ठरवूनही संध्याकाळी त्याला उशीरच झाला. प्रिया त्याची वाट बघत सोफ्यावर बसली होती. तिला सॉरी म्हणून तो पटकन फ्रेश व्हायला पळाला.

स्वयंपाक करत असतांना ती त्याच्याजवळच उभी होती. चेहऱ्यावर नेहमीचच हास्य, तेच समाधान. त्याच्या आवडीचा जांभळ्या रंगांची फुलं चितारलेला ड्रेस. चला म्हणजे ही रागावलेली नाहीये तर” त्याला हायसं वाटलं. त्याने तिला दिवसभरात कायकाय केलं ते सांगितलं. नवीन वातावरणात कसं जुळवून घ्यायचं याबद्दल तो थोडावेळ बोलला. ती त्याचा शब्द न शब्द शांततेत ऐकत होती.

स्वयंपाक तयार झाल्यावर तो डायनिंग मधे गेला, खुर्च्यांवर ठेवलेले ब्रश, कलरचे बॉक्स उचलले अन स्टडीत ठेवून दिले. नंतर डायनिंग टेबलवर खाद्यपदार्थ मांडून ठेवले. फिक्कट गुलाबी गाऊनमधली प्रिया एका खुर्चीवर बसली होती. तिने आपले काळेभोर केस पाठीवर मोकळे सोडले होते. त्याने पटापट दोघांच्या प्लेट्समधे पुऱ्या टाकल्या, नक्षीदार बाऊल्समधे श्रीखंड वाढलं… तिला जरा जास्तच.
“चल आता पटापट जेवून घे” म्हणत त्याने जेवायला सुरुवात केली. पण… तिने एकही घास खाल्ला नाही. ती फक्त हसत होती, त्याच्याकडे पाहून… एकटक.

“कसा जमलाय बेत ? आवडला का ?” त्याने बोटं चाटत विचारलं, पण तिने उत्तर दिलं नाही... देऊ शकत नव्हती.

परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणायचा तो तिला… सर्वोत्तम जिवंत शिल्प. पण तिच्यातला प्राण त्या कलाकाराने केव्हाच काढून घेतला. निखिलसमोरची अन घरातल्या प्रत्येक खोलीत असलेली प्रिया ही फक्त त्याची कलाकृती होती… त्याने घडवलेले तिचे हुबेहूब शिल्प.

------------------------------------------------------

२ . बुट्टं भूत

रंगपंचमीचा दिवस होता. मावळेबाई दरवाजा बंद करून घरात लपली होती. गल्लीतल्या बाया कोणत्याही क्षणी रंगवायला येऊ शकत होत्या.

‘ठक ठक ठक’
दरवाजावर थाप पडली तशी ती सावध झाली. काहीही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही असं तिने पक्कं ठरवलं होतं. तिकडे थाप पडतच होती, पडतच होती.
“काकू दरवाजा खोला. मी सिनकर… राजू सिनकर.” बाहेरून एक बारीक, चिरका आवाज आला.
मावळेबाईचा जीव भांड्यात पडला अन तिने दरवाजा उघडला. बाहेर खरोखरच राजू सिनकर उर्फ बुट्टा सिनकर उभा होता. रंगपंचमीच्या एवढ्या धुमश्चक्रीतून येउनही त्याच्या अंगावर रंगाचा एक थेंबही पडला नव्हता ! कदाचित बऱ्याचजणांनी त्याची किव करून सोडून दिलं असेल. बारीक सडपातळ अंगकाठी, लंबे केस, मोठे कल्ले, बसकं नाक अन कटबाज मिशा असलेला राजू सिनकर आरामात सोफ्यावर बसला. मावळेबाईच्या पशाकडे त्याचं काहीतरी काम होतं. पण पशा बाहेर गेलेला असल्याने त्याला वाट पाहणं भाग पडलं. मावळेबाई आत चालली गेली.

तसं पाहिलं तर बुट्ट्या सिनकरला कुठेच किंमत नव्हती. तो जर एखाद्या तान्ह्या पोरासमोर गेला तर तेपण फिदीफिदी हसायला लागेल. मावळेबाईंनी त्याला साधं पाणीपण विचारलं नाही अन त्यालापण पर्वा नव्हती. तो सोफ्यावर मस्तपैकी रेलून बसला होता.

तेवढ्यात दरवाजा पुन्हा वाजला. मावळेबाई दरवाजा उघडू नये म्हणून पळत बाहेर आली. पण सिनकर त्याआधीच उठला होता. मावळेबाई त्याला रोखणार तेवढ्यात त्याने पुढे झेप घेऊन दरवाजा उघडलासुद्धा ! बाहेर विविधरंगी बायका हातांत रंग घेऊन दरवाजाआड लपल्या होत्या. दरवाजा उघडताच सिनकरला कुणीच दिसलं नाही. अंदाज घ्यायला तो दरवाजाबाहेर गेला अन तेवढ्यात मावळेबाईने दरवाजा धाडकन लावून घेतला. सिनकर शिकारी कुत्रींच्या जाळ्यात आयताच अडकला. लगेच आजुबाजुला लपलेल्या बाया बाहेर आल्या. त्यांना वाटलं समोर मावळेबाई असेल पण अजब प्रकारचा प्राणी बघताच त्या जागीच थबकल्या. पण… आता कुणीही सिनकरची गय करणार नव्हतं. त्याची गाठ गांधीनगरातल्या खतरनाक बायांशी पडली होती. ज्या बायांनी स्वतःच्या नवऱ्याला कधी सोडलं नव्हतं त्या एका चिरगुट माणसाला कसकाय सोडू शकतील.

“चलो, वो बकरी नही तो ये बकरा सही.”
“आक्रमण S”
सगळ्या बाया तुटून पडल्या. आजुबाजुला आपल्यापेक्षा हितभर, हातभर उंच बाया पाहून सिनकरची टिचभर छाती दडपून गेली. सगळ्यांनी मिळून त्याचं शर्ट अन बनियेन टराटर फाडून टाकलं. नंतर एकीनं त्याच्या छाताडावर धाड S धाड S बुक्क्या मारल्या अन सर्वाँगाला रंग फासला. तो बिचारा “ओ ताई, ओ बाई” करत सगळ्यांच्या पाया पडू लागला. पण दया यायला त्याकाही माणूस नव्हत्या.

नंतर एकीने त्याचे इवलेसे हात पकडले, दुसरीने थरथरणारे पाय पकडले अन उचलबांगडी करत गटाराजवळ आणलं. त्या दोघी दातओठ खात होत्या अन हा S हा S हा S करत राक्षसी हसत होत्या. त्यांच्याकडे पाहून सिनकरला पुतना राक्षसीची आठवण झाली. तो कृष्णाचा धावा करू लागला. द्वापरयुगातल्या द्रोपतीचं वस्त्रहरण कृष्णाने वाचवलं होतं पण कलयुगातल्या सिनकरचं इज्जतहरण वाचवायला तोसुद्धा असमर्थ होता.

चारपाच जणींनी मिळून त्याला गरगर फिरवलं अन धाडदिशी गटारात फेकलं. पुन्हा उचलून पुन्हा डुंबवलं. दोनचार वेळा असं केल्यावर बायांचं समाधान झालं अन त्या दुसरा बकरा शोधण्यासाठी परत फिरल्या.

हसण्या-खिदळण्याचा आवाज हळूहळू कमी होत होता अन सिनकर रेंगाळलेल्या पावलांनी घराकडे परतत होता. ‘बुट्टं भूत’ बुट्टं भूत’ म्हणत मागं लागलेल्या पोरांचंपण त्याला भान नव्हतं.

-------------------------------------------------------

३. शापित यक्ष :

Crawling in my skin
These wounds they will not heal
Fear is how I fall
Confusing what is real

मनजित & कंपनी चा Crazy IIT’ns बँड गर्जत आहे. Linkin Park ने अजरामर केलेले शब्द, फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश असणारा बेबंध इव्हेंट, Hard Rock चे ते मनाच्या ड्रम्सला झंकारुन टाकणारे बीट्स, मॅक आणि निखिलच्या गिटार्सची अद्वितीय जुगलबंदी, नजर ठरणार नाही असे झगमग झगमग करणारे लाइट्स. पण उजेड फक्त स्टेजवर, हॉल मात्र पुर्ण अंधारात डुंबलेला. थिरकताहेत सगळे बसल्याजागी, कुणी शांत पडलंय, कुणी नाचतय तर काही जोड्या जगाला विसरून स्वतःतच मशगूल. वेळेची तमा कुणालाही नाही. कदाचित मध्यरात्र व्हायची असेल, कदाचित उलटूनही गेली असेल. एक अंधारा कोपरा मात्र या सर्वांपासुन, नव्हे अख्ख्या जगापासूनच वेगळा.

There's something inside me
that pulls beneath the surface
Consuming, confusing

मनजित गातोय, त्या तिघांच्या कानांमधून झिरपतोय… नसेतून टोचल्या जाणाऱ्या पांढऱ्या विषासारखा. जोडीला नाकातोंडांतून बाहेर पडणाऱ्या स्ट्रॉंग धुरासोबत मिसळत आहे आभासी थ्रीलचा कैफ. अंधारात मला दिसत नाही काहीच, पण जाणवतंय सगळं पुसटसं. तो एकजण कलंडला मान मोडलेल्या बाहुलीसारखा. थोडावेळ तरंगणार आता तो वेगळ्याच विश्वात. त्याच्या हातातली बॉटल लगेचच दुसऱ्याने ओढून घेतलेली. रिकामी असणार बहुतेक नाहीतर फेकून का दिली असती.

गिटार आता मंदगुढ वाजत आहे, गायक डोळे मिटून संथस्वरात गुणगुणतोय. गुणगुणणं आता खर्जातल्या आर्त स्वरात बदललय… दोन्ही हात त्याने प्रेक्षकाच्या दिशेने उंचावलेत. इशारा ओळखून त्या कोपऱ्यातले दोनजण धावत आले स्टेजजवळ. त्यांच्या जोडीला माणसात असलेले तिघे धावत गेलेले. पाचहीजण स्टेजच्या खाली उभे… काहींचे केस कमरेपर्यंत वाढलेले, काहींच्या दंडांवर tattoos… त्यांना आलेलं बघताच ड्रम्स जोरात कडाडू लागले, लाइट्स वेडावले. मनजित चार पावलं समोर आला, चेहऱ्यावर आलेले केस एका हिसड्यात मानेमागे ढकलले अन विद्रोहाचा आक्रोश करणारी त्याच्या किंकाळीने थरकापून टाकलं सर्वांना. समोर उभे असलेले पाचही सहयोगी स्टेजवर दोन्ही हात टेकवून भन्नाट साथ देताहेत विद्युतसंगीताला. त्यांच्या माना फिरताहेत, केस उडत आहेत अणू अन रेणू जल्लोष करतोय त्यांचा अन हॉलमधल्या प्रत्येकाचा.

अन तेवढ्यात मागचा दरवाजा उघडला गेला. उजेड आत आला नाही म्हणून कळालं फक्त काहीजणांना. मागच्या रांगेत बसलेला एकजण धावत गेला स्टेजजवळ अन कानांत ओरडला त्या दोघांच्या…” भागों मादरचोदो, व्हाईट पुलिस आई है l”

कानांत शिसं ओतल्यासारखे ते शब्द ऐकून पळत सुटले ते दोघं. अँटीड्रग्सवाले दोघं धावताहेत त्यांच्यामागे, सराईत शिकाऱ्यांसारखे. नशेतून नुकतीच सावरत असलेली ती मात्र सहजपणे सापडली त्यांना. पण हाती लागण्याच्या आधीच तिच्या अंगात कुठून कशी अचानक शक्ती अवतरली अन आधीच उघडून ठेवलेल्या एका दाराला धडक मारून झेप घेतली तिने बाहेरच्या कॉरीडोरमध्ये… धावत सुटली वेड्यासारखी. पण दोनच मिनिटात घेरली गेली.

“तिमोहाजी, भागीये मत. हम आपको कुछ नही करनेवाले, Please surrender yourself.”

“Go & Fuck Yourselves…” ती जोरात किंचाळली.

“Please…”

ती गप्प, खाली मान घातलेली, भावनावेगाने थरथरतेय.

अँटीड्रग्स स्क्वॅडमधली एक बाई तिच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतेय. हे लक्षात येताच तिने गर्र्कन मान वर केली अन जबडा पुर्णपणे उघडला. जिभेखालचं ब्लेड पाहून तिच्या दिशेने वळणारी पावलं घाबरुन मागे सरकली.

“ज़बान काट दूँगी पास आयी तो… You bitch.”

“Ok Ok.”

“Get your fucking asses out of here.”

“ओके, हम जायेंगे लेकिन पहले आप पत्ती निकाल लीजिये.”

पण तिने काही ऐकलं नाही. बराचवेळ वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितल्यावर एकदाचं तिने ते ब्लेड तोंडातून बाहेर काढलं. अन त्याचक्षणी तिमोहाला पकडायला दोघीनी झडप घातली. तिने त्यांना दूर ढकलायचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही, तिने जोरजोरात आरडाओरडा केला पण पकड सैल झाली नाही.

कदाचित तिच्या मुठी मोकळ्या होत्या.
सपक S न वार केला तिने धारदार ब्लेडचा. रक्ताची चिळकांडी उडाली. जखमी बाई विव्हळत कोसळली जमिनीवर. अजून दोघांनी समोर येऊन तिमोहाच्या हातातलं ब्लेड हिसकावुन घेतलं. तिला ओढत, घासत नेलं जातंय. अवतार बघवला जात नाहीये तिचा. लालभडक तारवटलेले डोळे, चेहऱ्यावर चिकटलेले अस्ताव्यस्त केस, तोंडातून टपकणारी लाळ अन गुरासारखं ओरडत असलेली ती.

IIT JEE च्या परीक्षेत भारतात तिसरी आलेली ही मुलगी.

“सर एक लडका भाग गया, दुसरें को झपट्टा मारके पकड़ा, लेकिन सालेने छलाँग मार दी.” एकाने धावत येऊन सांगितलं.

उडी मारल्यामुळे पायाचं fracture झालेला हा जोगिंदर. CBSE मधे पंजाबमधून दुसरा आलेला.

रेव्ह पार्टीत वाहवत गेलेले कार्तिक, सोनीका अन दक्षिणा.

प्रोग्रामिंग मधला आम्हा सर्वांचा आदर्श मिश्रा… ज्याला अख्खं सायबर खातं शिकारी कुत्र्यासारखं शोधतय.

शिक्षणाच्या स्वर्गात दिमाखात प्रवेश मिळवलेले हे यक्ष. त्यांचे चेहरे नजरेसमोर फिरताहेत. मन रडतय, डोळे पाणावलेत.

Against my will I stand beside
my own reflection
It's haunting how I can't seem...
This lack of self-control
I fear is never ending
Controlling. I can't seem...

--------------------------------------------------------
सत्यानुभव, ( मूळ नावे बदललेली.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर कथुकल्या ... खिळवून ठेवणाऱ्या !!

'तुझ्याविना---' मध्ये एक गोष्ट किंचित खटकली. सुरुवातीला 'लांबसडक सोनेरी केस' असं वर्णन आहे, मात्र शेवटी 'तिने आपले काळेभोर केस पाठीवर मोकळे सोडले होते', असं शब्दचित्र रंगवलं आहे.
ती नजरचूक आहे की प्रयोजन आहे?

प्रिया मेलेली आहे. निखिलने तिच्या जिवंत वाटाव्यात अशा मुर्त्या ( शिल्प ) बनवल्यात, त्यांनाच तो जिवंत मानून चाललाय.
प्रत्येक खोलीत प्रियाची एक मूर्ती आहे, वेगवेगळ्या पोजमधली, निरनिराळ्या पोशाखातली अन वेगवेगळ्या रंगांच्या केसांची.

हा अर्थ येत नाहीये का समोर

तीनही आवडल्यात पण दुसरी मे बी कळली नाही.
प्रिया काही बोलत नव्हती त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे कळलेले.
शेवटची कथा मन विषण्ण करणारी आहे << ++१

हा अर्थ येत नाहीये का समोर

ग्रेट !! तसं वाटलं होतं. पण खात्री करायची होती. म्हणूनच नजरचूक की प्रयोजन असं विचारलं

हा अर्थ येत नाहीये का समोर

ग्रेट !! तसं वाटलं होतं. पण खात्री करायची होती. म्हणूनच नजरचूक की प्रयोजन असं विचारलं

पहिली प्रेडीकटेबल वाटली।
दुसरी नाही समजली अथवा नाही आवडली।
तिसरी मात्र कुठेतरी खोल विचार करायला लावणारी वाटली।
पण यावेळी नेहमीच टच आणि शेवटचा इम्पॅक्टहरवलेला वाटला उदा. मीच देव आहे हे वाक्य शेवटी येणारी कथा।।

३. बद्दल:
निकोटीनची किमया रस्त्यावरचे विडीचे थोटुक उचलून फुंकणारा भिकारी काय किंवा प्रगत देशाचा महागड्या सिगार फुंकणारा राष्ट्रपती काय, सारखीच असते.

हे साध्या निकोटीन बद्दल.

बाकी जे याहून भयानक ड्रग्ज कथेत अपेक्षीत आहेत तिथे, आय आय टी, जे इ इ , सीबीएसइ किस झाड की पत्ती?

ड्रग्जच्या नादी काही जण लागले, असे कळल्यावर जेवढे वाईट वाटते, तेवढेच वाईट वाटले.

नशेच्या नांदी कुणीही लागणं वाईटच आहे. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तो वैश्विक मुद्दा झाला.
माझा विषय वाट चुकलेल्या हुशार विद्यार्थ्यांबद्दल आहे.

एकेकाळी जे फक्त अभ्यासावर focused होते, ज्यांच्यासमोर उज्ज्वल भविष्य हात जोडून उभं आहे, त्यांचं आयुष्य अशा पद्धतीने बरबाद होणे ही शोकांतिकाच आहे. ते वाट चुकलेल्या शापित यक्षासारखेच आहेत.

हे फक्त ड्रग्सच्या बाबतीतच नाहीये, तर इतरही गोष्टी आहेत. उदा : Hacking असेल किंवा Sex Scandal मध्ये अडकलेल्या मुली...

मागच्या रविवारी कॉलेजात गेलो होतो, तेव्हा गप्पांमध्ये जुन्या कडूगोड आठवणींना उजाळा मिळाला. त्यातली ही एक आठवण, सुचेल तशी लिहलेली.

या कथेत शेवटी जाणीवपूर्वक वेगळा impact द्यावासा वाटला नाही. ते ओढूनताणून केल्यासारखं झालं असतं.

आवडल्या कथा
पहिली जास्त.. कारण मला प्रेमाच्या गोष्टी नेहमीच आतवर भिडतात

तीनही आवडल्या.
पहिली प्रेडीक्टेबल. दुसरी मस्त मजेशीर
तिसरी भीषण वास्तव. जास्तच भिडली.

दुसरीत suspense असा काही नाही. आमच्या गल्लीतल्या बायकांचे प्रताप आहेत एकेक Lol
७० % खरं आणि ३० % अतिशयोक्ती आहे.