घाशीराम कोतवाल

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 June, 2017 - 09:51

'घाशीराम कोतवाल' या नाटकाची माहिती नसलेला मराठी प्रेक्षक विरळाच, पण अनेकजणांना ते रंगभूमीवर पाहण्याचा योग आला नसेल. तो योग आता जुळून आला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ग्रँड रॅपिड्स अधिवेशनात नॉर्थ कॅरोलाईनाची 'तौर्य' ही संस्था हे नाटक सादर करणार आहे. त्यानिमित्ताने मायबोली टीमने या नाटकाचे निर्माते आणि ’तौर्य’चे संस्थापक माधव मांजरेकर आणि नाटकाचे दिग्दर्शक डॉ.आनंद लागू यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

Ghashiram Kotwal Flyer.jpg

डॉ. लागू, तुमच्या आयुष्यात नाटक कसं आलं, याबद्दल सुरुवातीला सांगाल का?

आनंद लागू - मी आनंद लागू. मी मुळचा पुण्याचा आहे. मी अमेरिकेला येण्यापूर्वी बत्तीस वर्षं एकाच गावात, म्हणजे पुण्यात आणि एकाच घरात राहत होतो. पुण्याला मी नूतन मराठी विद्यालय (नू.म. वि) या शाळेमध्ये होतो. शाळेत असतानाच मी नाटकामध्ये काम करायला लागलो. त्यावेळेला आमचे एक नाटकाचे सर होते, यशवंत गोडबोले. मी सातवी-आठवीत होतो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, तू नाटकात काम करशील का? घरी नाटकाचं वातावरण वडिलांमुळे (डॉ. श्रीराम लागू) असल्यामुळे नाटकं बघितलेली होती आणि नाटकात काम करायची तशी आवड होती. परंतु स्वतः आपण पुढे जाऊन काही करायचयं वगैरे असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. तेव्हा पुण्यामध्ये ’रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धे’चं फार मोठं प्रस्थ असायचं. वेगवेगळ्या भाषांमध्ये नाट्यवाचन करायचं. पण ते तासाभरात वाचलं पाहिजे आणि पाचंच लोक हवीत. त्यामुळे कधीकधी एकाच व्यक्तीला दोन पात्रांचे संवाद वाचावे लागत. आमची शाळा फक्त मुलांची होती. त्यामुळे स्त्री-पार्ट करायलासुद्धा मुलंच असत. त्यामुळे वाचिक अभिनय ज्याला आपण म्हणतो, तो सरांकडून आम्हांला खूपच शिकायला मिळाला. स्पष्ट कसं बोलायचं, अर्थवाही कसं बोलायचं, हे आम्ही शिकलो. पण फक्त नाट्यवाचनच असल्यानं बाकी हावभाव वगैरे यांना काही संधी नव्हती. त्यावेळी मला बरीच बक्षिसं मिळाली मराठी आणि हिंदी नाटकांसाठी. आता मला आश्चर्य वाटतं, पण तेव्हा आम्ही सगळी बाळ कोल्हटकरांची नाटकं २-३ वर्षं करत होतो. ’वाहतो ही दुर्वांची जुडी’ वगैरे शुद्ध कौटुंबिक जिहाळ्याची नाटकं. आता कदाचित लोकांना ती आठवतही नसतील, परंतु त्यावेळी ती प्रचंड लोकप्रिय होती.

त्याशिवाय आमच्या शाळेत पहिल्या सहामाहीमध्येही नाट्यवाचन आणि मग दुसर्‍या सहामाहीमध्ये एकांकिका स्पर्धा असायच्या. स्पर्धेचे आयोजक कोण होते, हे आता मी विसरलो. या स्पर्धाही मराठी, हिंदी, संस्कृत अशा भाषांमध्ये असयाच्या. त्यावेळी एक संस्कृत एकांकिकांची स्पर्धा असायची, त्यात मला आठवीत असताना रौप्यपदक मिळालं. त्यामुळे ’आपल्याला नाटकात बरंच काम करता येतं’, असं एकूण वाटायला लागलं. मग शाळेतून बाहेर पडल्यावर कॉलेजमध्ये अर्थात उनाडक्या करायला आणि जास्त मोकळेपणी वागायला वेळ होता. भालबा केळकर, म्हणजे पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनचे संस्थापक आणि अध्यक्ष, ते तेव्हा फर्गसनमध्ये केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते आणि नाट्यविभागाचे फॅकल्टी मेंबर होते. त्यांची आणि वडिलांची अर्थातच फार ओळख असल्यामुळे त्यांनीही मला विचारलं, तू करशील का नाटकात काम? त्यामुळे तिथेही नाटकात काम करणं सुरू झालं. मग तिथून मी बी. जे मेडिकल कॉलेजला गेलो. त्यावेळेला गॅदरिंगचं एक नाटक असायचं. नंतर पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा... ती अशीच एक अनेक वर्षं सतत चालू असलेली आणि खूप प्रतिष्ठेची स्पर्धा. पुरुषोत्तममध्ये मी काही एकांकिका केल्या. आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटक बसवायचं असायचं. एक अशोक जोशी या नावाचे फार अप्रतिम नाटक बसवणारे दिग्दर्शक होते. त्यांनी 'झोपी गेलेला जागा झाला' हे नाटक बसवलं होतं. शाळेत असताना सगळी बाळ कोल्हटकरांची नाटकं, इथे आल्यानंतर फार्सिकल नाटक अशी वेगवेगळी नाटकं करायचा अनुभव मिळाला. पण सगळ्यांत मला फायदा झाला तो त्याच्यानंतर.

IMG_1600.JPG

आम्ही काही हौशी मंडळींनी एकत्र येऊन 'ड्रॉपर्स नाट्य संस्था' स्थापन केली होती. त्यावेळी मुंबईत सत्यदेव दुबे थिएटर युनिट अनेक वर्षं चालवत होते, त्यांना पुण्यात येऊन नाटक करायचं होतं. ते म्हणाले, आपण 'तुघलक' करूया. ’आविष्कार’ या नाट्यसंस्थेनं, म्हणजे अरविंद देशपांड्यांनी जो प्रयोग केला होता तो फार भव्यदिव्य होता. त्यामधे अरुण सरनाईक यांनी 'तुघलक'ची भूमिका केली होती. पण ते सबंध प्रॉडक्शन इतकं खर्चिक होतं, ते आम्ही कसं काय करणार? सत्यदेव दुबे आणि गिरीश कर्नाड यांची चांगली मैत्री होती. ’तुघलक’मध्ये तुघलकाचे आणि त्याचा जो काऊंटर पॉइन्ट आहे, त्या बदमाशाचे प्रवेश आलटूनपालटून आहेत. गिरीश कर्नाड यांच्याशी बोलून दुब्यांनी बराचसा भाग पुन्हा लिहून घेतला. कर्नाडांनी आमच्या प्रयोगासाठी सूत्रधाराचं एक पात्र निर्माण केलं. या नाटकात जवळजवळ पंधरा-सतरा कलाकार होते. एवढ्या लोकांना गोळा करून दुबे तेव्हा वर्षभर पुण्याला दर आठवड्याला येऊन आमचं नाट्यशिक्षणाचं शिबिर घेत होते. त्यांचाही भर खुपसा वाचिक अभिनयावर होताच. तुमची भाषा स्वच्छ असली तरच तुम्हांला पुढे जाता येईल. आधी लोकांना तुम्ही काय म्हणताय ते ऐकू आलं पाहिजे. भरत नाट्य मंदिरात सगळे प्रयोग तुम्हांला मायक्रोफोनशिवाय करता आले पाहिजेत. ’बालगंधर्व’सारख्या थिएटरमध्येसुद्धा तुम्हांला मायक्रोफोनशिवाय प्रयोग करता आले पाहिजेत. तुमचा आवाज तयार झाला पाहिजे. अशी त्यांनी आमच्याकडून जवळजवळ वर्षभर तयारी करून घेतली. नंतर आम्ही सुमारे पंचवीस प्रयोग त्यावेळी केले.

मग मी इकडे अमेरिकेत आल्यानंतर बरीच वर्षं नाटकाशी संबंधित असं मी काहीच करत नव्हतो. २००० साली मी इथे डुरहममध्ये आलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा वर्षा-दोन वर्षांतून एखादं नाटक करायची संधी मिळायला लागली. डॉ. विजया बापट यांनी ’रसिक रंगमंच’मार्फत, मी इथे आलो त्याच्याआधी एक-दोन वर्षं, नाटकं करायला सुरूवात केली होती. मी त्यांत सहभागी व्हायला लागलो. नाटकंही बसवली त्यांच्याबरोबर. आणि आता हे नाटक करतोय माधवच्या पुढाकारने. मुख्य म्हणजे निर्माता म्हणून त्याने तीस-पस्तीसजणांना एकत्र आणून, टिकवून धरून हे नाटक उभं केलं.

वा, छानच माहिती सांगितली. फारच इंटरेस्टिंग होती. माधव, तुमच्याबद्द्ल थोडक्यात सांगा. आणि हे नाटक कसं निवडलं?

माधव मांजरेकर - मी अमेरिकेत आलो १९९५ साली. आलो ते मॉन्टानामध्ये. मी तिथे पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि नंतर ९६ साली पीएच.डी.साठी मॅडिसन, विस्कोन्सीन इथे आलो. मॅडिसनमध्ये तीन वर्षं, आणि मग पुढे इथे नॉर्थ कॅरोलायनामध्ये २००५ सालापासून आहे. मूळचा मी मुंबईचा. आर. एम. भट हायस्कूल ही माझी शाळा. पुढचं शिक्षण रुईया कॉओलेजमध्ये झालं. अभियांत्रिकीची पदवी मी पुण्यातून मिळवली. नंतर बंगळुरूच्या आयआयएससीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ९४-९५मध्ये मी बंगळुरूला होतो. तिथे जाईपर्यंत मी खूप वाचायचो. पण नाटक, चित्रपट या गोष्टी वाट्याला आल्या नाहीत. मी आनंदला नेहमी गमतीनं म्हणतो की, आम्ही अभ्यास खूप केला, पण त्या वयामध्ये म्हणा किंवा एका मध्यमवर्गातल्या कुटुंबातून आल्यामुळे म्हणा, नाटक-सिनेमा या दिशेने आम्ही कधी गेलोच नाही. बंगळुरूला असताना मी ज्या विभागात होतो, त्याचं नाव - सेंटर फॉर इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऍण्ड टेक्नॉलॉजी. इथे डिझाईनच्या विद्यार्थ्यांना डिझाईन एलिमेन्ट्स्‌ शिकवायचे. मला असं वाटतं की, कलाचा ओढा तिथे निर्माण झाला. कलेकडे बघण्याची एक दृष्टी तिथे निर्माण झाली.

01 Taurya Repertoire.jpg

बंगळुरूला असताना मी एक माईम बघितलं होतं, हे मला आठवतय. भयंकर भारावलो होतो मी. आता मला आठवतही नाही की कोणी केलं होतं माईम ते, पण सुंदर सादर केलं होतं. तिथे मग एक संस्कृत संघ होता, तिथे जॉईन झालो. एक छोटुशी नाटुकली वगैरे केली. संगीताची आवड तिथेच मला लागली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची आवड ही बंगळुरूची देणगी आहे. मग लग्न झालं. पत्नी माझी कथ्थक विशारद आहे. त्यामुळे नृत्याबद्दल थोडसं औत्स्युक्य आणि त्याची आवड थोडीशी. पुढे मॅडिसनमध्ये असताना एखादं नाटक करायचं, एखादी नाटुकली, एखादी दीर्घांकिका करायची, असं करत थोडंफार मला नाटकाचं आकर्षण निर्माण झालं.

’घाशीराम कोतवाल’ हे नाटक करावसं का वाटलं?

माधव मांजरेकर - आंनदने म्हटल्याप्रमाणे मी जेव्हा रालेहमध्ये आलो, तेव्हा 'रसिक' रंगमंच' नावाची संस्था डॉ. विजया बापट चालवत होत्या. त्या संस्थेतच आंनद वगैरे नाटकं दिग्दर्शित करत होते. नंतर आणखी एक प्रकार त्यांनी सुरू केला होता, तो म्हणजे नाटकं वाचणं. दर रविवारी नाटकाविषयी ज्यांना उत्सुकता आहे, ओढ आहे, आवड आहे अशी मंडळी नाटकं वाचायचे. तेंडुलकर गेले त्याच्यानंतर, मला वाटतं, आमची मीटिंग होती. त्या मीटिंगला आंनदनं 'घाशीराम कोतवाल' वाचलं होतं. सांगून कदाचित खरं वाटणार नाही की, तोपर्यंत मला 'घाशीराम कोतवाल' हे नाटक माहीत नव्हतं. 'घाशीराम कोतवाल' कोणी लिहिलंय, ते कशाबद्दल आहे, त्या नाटकाचा इतिहास काय आहे, याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. आनंदनं माझी ओळख ’घाशीराम’शी करून दिली. त्यावेळी झालं असं की. एरवी आम्ही चौघंपाचजण मिळून नाटक वाचायचो. आनंदनं त्या दिवशी ’घाशीराम’ एकट्यानं वाचलं. एका विलक्षण मग्नतेत त्यानं ते नाटक वाचलं. मी ते नाटक ऐकून पूर्णपणे हादरलो. नंतर माझी भूणभूण सुरू झाली की आपण के नाटक करूया.

आनंद लागू - आत्ता आम्हांला अधिवेशनात हे नाटक करावसं वाटलं त्याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात अमेरिकन राजकारणात जे काही प्रकार चालू होते, त्यांत आणि ह्या नाटकामध्ये साम्य आहे. एका साम्राज्याच्या अंतकाली घडणार्‍या घटना आणि त्यातून एका ‍र्‍हासाचा प्रारंभ कसा होतो, हे सांगणारं हे नाटक आहे. ज्याला ’शेवटाची सुरुवात’ म्हणतात, त्या प्रकारची एक काळी सावली सर्वत्र पसरलेली, ती जाणवायला लागली. त्यातून असं वाटल की, हे नाटक अजुनही फार महत्त्वाचं आहे, कालातीत आहे त्यादृष्टीने. पहिल्यांदा जेव्हा या नाटकाचे प्रयोग झाले, त्यावेळी या नाटकावर टीका झाली, वाद झाले. पण नंतर अनेक संस्थांनी या नाटकाचे प्रयोग केले.

माझा ओढा पहिल्यापासून नाटकातल्या शाब्दिक आशयाकडे अधिक आहे. फॉर्मपेक्षाही मला त्यातला आशय जास्त महत्त्वाचा वाटतो. परंतु या नाटकामध्ये फॉर्म व आशय ह्यांचं इतकं बेमालूम मिश्रण आहे की त्यातला आशय कुठे संपतो आणि फॉर्म कुठे चालू होतो, ते सांगणं अवघड आहे. असं म्हणतात की, खरी चांगली कविता जी असते, तिच्यामध्ये या दोन गोष्टी वेगळ्या करताच येत नाहीत. तसं या नाटकाच्या बाबतीत आहे. ’उध्वस्त धर्मशाळा’च्या बाबतीतही असंच म्हणता येईल.

नाटककार म्हणून तेंडुलकरांची जी उत्तुंग प्रगल्भता आहे, ती या नाटकात दिसते. डॉ. जब्बार पटेलांनी त्यावेळी दिग्दर्शन केलं होतं आणि कृष्णदेव मुळगुंद आणि भास्कर चंदावरकर यांनी नृत्य आणि संगीत यांची बाजू सांभाळली होती. त्यातून हे अद्भुत रसायन तयार झालं होतं. मला एकतर संगीतातलं फारच कमी कळतं , नाचातलं त्याहून कमी कळतं. त्यामुळे त्याबाबतीत काही नवीन करण्याचा माझा काही प्रयत्न नव्हता. माझी तशी पात्रताही नाही. परंतु मला नाटकातल्या आशयात जाणवलेला जो ’डार्कनेस’ आहे, काळं सावट येण्याची जी भावना आहे, ते मला अधोरेखित करायचं होतं. माधवची जी नाट्यवाचन ऐकून परिस्थिती झाली, तशी प्रेक्षकांची नाटक पाहून व्हावी, असं मला वाटतं. केवळ एक सुस्वरूप प्रयोग पाहिला, उत्तम गाणी ऐकली, असं न वाटता ’अरे बापरे! हे असं होऊ शकतं? हे भयाण आहे!’ असं त्यांना वाटायला हवं. आत्ता आम्ही जे दोनतीन प्रयोग केले, त्या प्रयोगांच्या शेवटी एकदम सन्नाटा होता. मग लोक भानावर आले आणि टाळ्यांचा कडकडात झाला.

अरे वा! आपल्याला अधिवेशनात तेच पाहायचं आहे.

आनंद लागू - या नाटकाच्या आशयात, तेंडुलकरांच्या शब्दांत जी ताकद आहे, ती तुम्हांला भारून टाकते. या नाटकाची गंमत अशी की, ते तुम्हांला खिळवून ठेवतं. या नाटकात आपलं पारंपरिक जे काही आहे, म्हणजे नृत्य, गणपतीची वंदना, ते आहे, पण प्रत्येकामागे एक तेंडुलकरी बाज आहे. काहीतरी एक वेगळं ते तुमच्यापुढे मांडू बघतायेत, आणि ते मांडण्यासाठी कुठेही भाषणबाजी नाही. कुठेही ’हे बघा हं, मी काय म्हणतोय’ वगैरे नाही. ’घाशीराम’मध्ये एक पात्र आहे, इंग्रजाचं. तो इंग्रज फक्त दोनतीनदा रंगमंचावर येतो. तो एखादा शब्द बोलत असेल. पण त्यांनी यातून जे सूचित केलं आहे, ते आत्ताच्या वातावरणासही लागू आहे. म्हणजे कुठेतरी पुतिनची सावली आहे, जी जाणवते आहे. तेंडुलकरांनी जेव्हा हे नाटक लिहिलं, तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की असं काही होणार आहे. अमेरिकेत हे नाटक होईल, हे त्यांच्या कल्पनेतही नसेल. पण ’जे न देखे रवी, ते देखे कवी’ असं असल्यानं तेंडुलकरांच्या प्रतिभेला आजच्या काळातल्या घडामोडी दिसल्या आहेत. तेंडुलकरांचा राजकीय अभ्यास जोरदार होता. त्यांनी पत्रकार म्हणुन लिखाणाला सुरूवात केली असल्यामुळे, फार आतून आणि खोलवर विचारही केला होता या सगळ्या गोष्टींचा.

IMG_1633.JPG

मला एक महत्त्वाचा उल्लेख ह्या नाटकाच्या बाबतीत करायचाय, तो म्हणजे, यातलं जे संगीत आणि नृत्य आहे, संगीताच्या ज्या मूळ चाली आहेत, त्या भास्कर चंदावरकरांच्या आहेत आणि आम्ही त्या आम्ही बर्‍याचशा तशाच वापरतोय. नृत्यदिग्दर्शन सौ. शिल्पा मांजरेकर यांनी केलं आहे. आमच्या सुदैवाने इथे आम्हांला हे सगळे अतिशय चांगलं गाणारे लोक मिळाले. त्यातले दोघंतिघं आत्ता इथे एम.एस. करायला आलेले विद्यार्थी आहेत. पण गायन आणि वादन यांतली तयारी अप्रतिम आहे त्यांची. तसचं मला उल्लेख केला पाहिजे आमच्या ज्या स्त्री कलाकार आहेत त्यांचा. या नाटकात स्त्री-व्यक्तिरेखांना सगळी मिळून चारपाच वाक्यं आहेत. बायका बोलतच नाहीत या नाटकात. त्यांतली एक जी आहे, ती नायकीण आहे. दुसरी ललितागौरी, म्हणजे घाशीरामची मुलगी. या भूमिका करायला अवघड आहेत. पण आमच्या कलाकरांनी जीव ओतून काम केलं आहे. त्यांच्यामुले आम्हांला हे नाटक व्यवस्थितपणे उभं करता आलं आहे.

IMG_1606.JPG

मी खरं म्हणजे याच मुद्द्याकडे आत्ता येणार होतो. या नाटकात कलाकारांची संख्या खूप आहे. मुख्य पात्रं जरी मोजकी असली, तरी एकंदर जो सगळा ब्रह्मवृंद आहे, ते बघता आव्हानं नेमकी काय होती?

माधव मांजरेकर - तुम्ही म्हणालात तसं, या नाटकात खूप व्यक्तिरेखा आहेत. शिवाय नाटकात गाणी आहेत, नृत्य आहे. संवाद आहेत. त्यामुळे हे जमू शकणारे कलाकार मिळणं, त्यांनी तालमींना येणं, हे जमवणं जरा अवघड होतं. पण आपल्याला नक्की नाटकातून काय हवं आहे, हे दिग्दर्शकाला, म्हणजे आनंदला पक्कं माहीत होतं. त्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या तरी नंतर काम सोपं झालं. नाटक बसवताना आम्ही सुरुवातीला संगीताचा तालमी सुरू केल्या. गाणी बसवायला सुरुवात केली. गाणी बसत आल्यावर संवादांवर काम सुरू झालं. एरवी नाटक बसवताना आपण आधी संवाद पक्के करून घेतो. पहिल्या अनेक तालमी या वाचनाच्या असतात. इथे मात्र अगोदर नांदी, मग ठुमरी, नंतर लावणी अशा क्रमाने आम्ही तालमी केल्या. मग ती बसवता बसवता संवाद बसवायला सुरुवात केली. नंतर नृत्य. आनंदने हे सगळे तुकडे एकत्र जुळवून आणले.

IMG_1609.JPG

हे काम खरंच आव्हानात्मक आहे. पण यापलीकडे काही आव्हानं समोर होती का? या नाटकात मोजकंच नेपथ्य आहे, ही एक जमेची बाजू आहे. पण प्रयोग सुविहित होण्यासाठी काय खबरदारी घ्यावी लागली?

माधव मांजरेकर - नेपथ्य कमी आहे, हे खरं आहे. पण हे नेपथ्य महत्त्वाचं आहे. या नाटकात प्रकाशयोजनाही महत्त्वाची आहे. रंगमंचावर अनेक स्थळं, म्हणजे बावन्नखणीपासून ते नानावाड्यापर्यंत अनेक स्थळं केवळ प्रकाशयोजनेतून दाखवायची असतात. त्यामुळे प्रकाशयोजना सांभाळणारे वासुदेव घरापुरे, प्रवीण कदम आणि अर्थातच दिग्दर्शक आनंद, यांचं हे कसब आहे. पठडीतल्या नाटकांसारखं नेपथ्य इथे नाही. केवळ रायझर्स आहेत आणि दोन खांब. पात्रांच्या हालचाली आणि प्रकाशयोजना यांची सारी करामत आहे.

फेसबूकवर मी काही फोटो पाहिले. नाटकातली वेशभूषा फार सुरेख आहे.

आनंद लागू - आम्ही नाटकासाठी लागणारे सगळे कपडे भारतातून मागवले होते. यात सौ. मांजरेकरांचा मोठा सहभाग होता. त्यांचा जो नृत्यवर्ग आहे, त्या वर्गाचा दरवर्षी एक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमांसाठी लागणारे कपडे मुंबईहून मागवले जातात. त्यामुळे या नाटकासाठी लागणारी वेशभूषा भारतातून आणणं सोपं गेलं. तसंच तालमीसाठी जी जागा होती, ती माधव आणि शिल्पा यांच्या डान्स-स्टुडिओची होती. ही उत्तम जागा आम्हांला तालमीसाठी वापरायला मिळाली. नाहीतर दरवेळी २५-३० लोकांनी तालमीसाठी कोणाच्या घरी जमणं, हे कठीण आहे. अशा गोष्टी जुळून आल्या म्हणूनच आम्हांला हे नाटक इथे करता आलं. या सगळ्यामागे माधव आणि शिल्पा, तसंच सुबोध आणि गौरी जोशी हे दांपत्य यांचीही मेहनत आहे.

IMG_1622.JPG


या नाटकाचा विषयच तसा तो थोडा अंगावर येणारा आहे. त्यामुळे तुम्ही वाचकांना अजून काय सांगू इच्छिता?

आनंद लागू - मी वाचकांना सांगेन की नाटक एंजॉय करायला या. आणि एंजॉय करताना तुम्हांला जर त्यातून आणखी काही नवीन मिळालं तर उत्तमच. आम्हांला अशी खात्री वाटते की, काही बाकी अपेक्षा न ठेवता जो माणूस येईल, त्यालाही हे नाटक अतिशय आवडेल. मी आधी म्हटलं तसं, तेंडुलकरांचं लिखाण, डॉ. पटेलांच दिग्दर्शन, भास्कर चंदावरकरांचं संगीत यांचा मिलाफ असा काही झालेला आहे की त्यातली रंजकता कमी न होता ते एका उत्कृष्ट कलाकृतीच्या पातळीवर पोहोचतं, हे या नाटकाचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

****

शब्दांकन-साहाय्य - बिल्वा, chaitralee

****
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults