अमेरिकन भाज्या, फळं आणि मी

Submitted by दीपा जोशी on 27 May, 2017 - 03:05

अमेरिकन भाज्या, फळं आणि मी (बदलून, फोटोंसहित.)

romanesko broccoli 4.jpgरोमनेस्को ब्रोकोली

अमेरिकेत वॉलमार्ट, क्रोगर सारख्या ठिकाणी हे sss ढीगभर खाण्या-पिण्याच्या, कपड्याच्या, दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक असणाऱ्या (आणि नसणाऱ्याही! ) वस्तुंनी सगळे कप्पे कसे नटलेले असतात. नुसती चक्कर मारायची म्हटली सगळ्या विभागात, तरी कितीतरी नवलाई नजरेला पडते. बरेच जण त्यामुळे, जरा वेळ मिळाला, की ’शॉपिंग’ करायला (म्हणजे असाच वेळ घालवायला ) या दुकानांमध्ये फेरफटका मारतात.

मला सुद्धा तिथे जायला आवडते, पण ते तिथल्या भाज्या आणि फळांच्या विभागात.
जांभळा कोबी आणि फ्लॉवर मी पहिल्यांदा तिथे पाहिले. त्याशिवाय ‘स्क्वाश’ प्रकारातल्या भाज्याही मी तिथे पहिल्यांदा पाहिल्या. तिथे भाज्या आणि फळांच्या भल्यामोठ्या दालनात फ्रीझ मध्ये असते तेवढी किंवा जास्तच थंड हवा कायम असते. थंड थंड कप्प्यांमध्ये लाल, पिवळ्या, जांभळ्या, हिरव्या अश्या विविध- रंगी भाज्या आणि फळे खचाखच भरलेल्या असतात. त्या सुंदर सुंदर, ताज्या टवटवीत भाज्या, फळांची बऱ्याचदा आपल्याला नावेही माहित नसतात. चवीची तर गोष्टच सोडा!

प्रत्येक वेळी वॉलमार्ट आणि करोगर मध्ये गेलो की आपण न खाल्लेल्या अनोळखी भाज्या आणायचा मी सपाटाच लावला. नवीन काहीतरी पाककृती करुन बघायच्या ‘ट्रायल अँड एरर’ प्रकारात नवीन नवीन भाज्या आणि फळे आणत असे ते माझ्या पाककलेच्या भरवश्यावर. brocoli.jpgत्यामुळे हिरव्या रंगाची आणि साधारण फ्लॉवरच्या तुऱ्यांसारखी दिसणारी ब्रोकोली, (जांभळ्या रंगात सुध्दा उपलब्ध होती) नुसती लोण्यावर परतून किंवा सलाड मध्ये कच्चीच खाल्ली जात असली तरी आम्ही बेधडकपणे गोडे तेलाच्या फोडणीवर थोडी वाफवून आणि तिखट, मीठ ,धन्या - जिऱ्याची पूड वापरून भारतीय चवीनेच खाल्ली!
green-broccoflower.jpg
एखाद्या बहारदार शिल्पासारखी दिसणारी, गोल गोल हिरव्या टोप्यांच्या चक्राकार नक्षी सारखी असणारी, पोपटी रंगाची ‘रोमनेस्को ब्रोकोली’ बघून ती भाजी असेल याच्यावर विश्वासच बसला नाही. नंतर परत ती दिसली नाही आणि आणायची राहूनच गेली. तसाच ‘ब्रोको-फ्लॉवर’ नावाचा हिरवा असणारा फ्लॉवर चा गड्डा होता. अगदी आपल्या पांढऱ्या-मोतिया रंगाच्या कॉलीफ्लॉवर सारखाच. पण तोही चवीची साशंकता वाटल्याने आणायचा राहून गेला.

बटाट्यांचे प्रकार तर नुसते बघतच राहावेत.
peruvian jambhale potato.jpgred waxy potato.jpg

गोल, इवलुसे ‘बेबी पोटॅटो’, लालसर रंगाचे अक्षरश: गोल रताळीच आहेत की काय असे वाटणारे पण सालाला चमक असणारे ‘रेड वॅक्सि ‘ बटाटे, चिरल्यावर आत पिवळसर रंग असणारे ‘स्टार्ची’ बटाटे तर जांभळे ‘पेरुव्हीअन’. सालाला गुलाबी लाल आणि चिरल्यावर आत पिवळे असणारे ‘रोझ गोल्ड. कोणाला सूप मध्ये वापरायचं, नाही तर कोणी बेक करायला एकदम फिट, तर कोणी ‘फ्रेंच फ्राईज’ साठी उत्तम अश्या त्यांच्या तऱ्हा. आम्ही ‘बेबी पोटॅटो’ आणि त्यांचे आई -बाबा म्हणजे नेहमीचे पण मोठ्ठे मोठ्ठे मिळणारे बटाटे आणून पाहिले. दोन्ही प्रकार चवीला एकदम बढिया. मला वाटतं, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी बटाटा तारून नेईलच नेईल .

कोथिंबिरीची जाडी बहीण म्हणजे पार्सले ! कोथीम्बिरीला पर्याय म्हणून आणली खरी, पण ती जाड पाने कोथिंबिरीसारखी ‘बाssssरीक चिरून’ भाजी आमटीवर टाकली तरी काहीच्या काहीच वाटली चवीला. आ"पल्या नाजूक कोथिंबिरीची काही चव नाही आली.
parsley-2 .jpgcellary.jpgcelery sticks .jpg
एके ठिकाणी जाड जाड दांडे विकायला होते. ते म्हणे सेलरीचे दांडे चक्क विकायला! ‘हाय फायबर’ आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणून सॅलड मध्ये वगैरे वापरायचे. ‘सुपरफुड’ म्हणून कवतिकाचे असलेले ते महागडे देठोबा बघून मला एकीकडे वाटलं, ’हं ! काहीही डोक्यावर घेतात हे लोक. आपल्याकडे भारतात नेहमीच्याच उपयोगात असणाऱ्या कित्तीतरी पदार्थांमधून फायबर आणि बाकी मौल्यवान गोष्टी मिळतात.’ आणि डोळ्यासमोर उन्हाळा सोडला, तर एरवी मुबलक मिळणारी आणि तशी बऱ्यापैकी स्वस्तातलीच म्हणायची अशी कोथिंबीर आणि तिचे फेकून दिले जाणारे देठ आले. आता माञ कोथिंबीरीचे कोवळे आणि जून देठही वरचा पापुद्रा जरा सोलून, देठ बारीक चिरून आवर्जून मी चटणीत, सूपमध्ये, भाजीत आणि आमटीत टाकते.

गाजरं माञ रंगीबेरंगी,... काळपट - जांभळी, पांढरी, केशरी, अशी आणि चांगली गोडसर लागायची.

carrts types.jpgbaby carrots.jpg.

प्लॅस्टिकच्या पॅक मध्ये एकसारखी दिसणारी छोटी- छोटी ‘बेबी कॅरेट्स’ असतात. खरं तर, ‘बेबी कॅरेट्स’ म्हणजे कोवळी गाजरं. पण अगदी बोटभर लांबीचा आणि एकसारख्या जाडीचा गाजराचा हा प्रकार म्हणजे, ‘बेबी कट कॅरेट्स’ आहे बाजारात नाकारलेला माल, वेगळी क्लृप्ती लढवून कसा लोकप्रिय केला गेला याचं उत्तम उदाहरण आहे. ऐंशी च्या शतकात सुपर मार्केट मध्ये विकली जाणारी गाजरं, एका ठराविक सरळ आकाराची, लांबीची, आणि रंगाची अपेक्षित असायची. अशी नसणारी किंवा वाकडी असणारी गाजरं एकतर गुरांना खायला घातली जायची किंवा सरळ फेकून दिली जायची. कॅलिफोर्निया राज्यातला ‘माईक युरोसेक’ नावाचा एक शेतकरी. त्याच्या शेतातली, दिवसाला चारशे टन निघणारी गाजरं थोडी वेडीवाकडी, फाटे फुटलेली आणि किंचित खराब आहेत या कारणास्तव नाकारली जायची. नाराज झालेल्या माइकनं मग एक शक्कल लढवली. गाजराचा सरळ भाग वापरायचा, तर त्यांना छोट्या आकारात कापायला पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं गाजरांची साल बटाट्याची साल काढायच्या यंत्राने पातळ सोलली. गाजराचा सरळ भागांचे, शेंगा कापायच्या यंत्राच्या साहाय्यानं दोन इंचाचे एकसारखे तुकडे केले. क्लोरीनयुक्त पाण्याने धुऊन त्या तुकड्यांच्या दोनही टोकांना गोल आकार देऊन ‘बेबी कॅरेट्स’ म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत छानपैकी पॅक करून विकायला आणले. आणि त्यामुळे खरोखर एक इतिहासच घडला. येता जाता काहीतरी चरायची सवय असलेल्या अमेरिकनांना, बोटभर लांबीची ही बाळ-गाजरं भारीच आवडली. पटकन खाता येण्यासारखी असल्याने ती लोकप्रिय झाली.

एकदा रसरसलेली, टवटवीत दिसणारी हिरवी सफरचंद आणली. एक फोड चाखली तर तोंड आंबट आंबट झालं अगदी. green apple 3 .jpg
आपल्याकडच्या गोड, लाल ‘सिमला से आये वाले सेब’ खायला चटावलेली जीभ हिरवी सफरचंद खायला काही तयार होईना! आता ती संपवायची तरी कशी? शेवटी मिक्सरमध्ये बारीक करून, साखर आणि पाणी घालून सरबत करून ती संपवली! नंतर मात्र कायम लाल रंगाचीच सफरचंद आणत गेलो, आणि ती निघालीही गोड, रसाळ. तशीच गोष्ट डाळिंबाची. दिसायला लाल असणारी डाळिंब चवीला अगदीच आंबट आणि कडक दाणे असणारी. तीही अशीच सरबत करून संपवली.

पिच ची लाल लाल, सुंदर वासाची फळं फाssssर आवडली.

Peach-Fruit 3.jpg

एकदा थोडी आंबट निघाल्यावर त्याच्या फोडी केल्या आणि त्यावर साखर घालून मुरवत ठेवल्या एक -दोन दिवस. नंतरचे एक दोन दिवस, साखर-आंब्याच्या धर्तीवर बनलेल्या ‘साखर- पीच’ ने सगळ्यांच्या नाष्ट्या-जेवणाला मधाळ गोडी आणली.

मोठमोठी लाल, काळी द्राक्षे, पिवळे धमक गोल्डन हनी - ड्यू - मेलन, लाल क्रॅनबेरीज, आणि पिवळ्या रास्पबेरीज, यांनी रंगीबेरंगी झालेले, सजलेले टेबल बघूनच भूक लागायची! पहिल्यांदा जेव्हा गोल्डन हनी - ड्यू - मेलन खरेदी केलं तेव्हा ते कसं निवडायचं हे माहित नसल्यानं साधारण पिवळे धम्मक झालेले छोट्या कलिंगडाएवढे फळ घेतलं.golden honey dew melon.jpg
पण पुढे आठवडा झाला तरी त्याचं पिकायचं काही लक्षण दिसेना. म्हणजे- खरबूज पिकल्यावर कसा विशिष्ठ गोड वास येऊ लागतो -तसा मेलॉन पिकल्यावरही येतो, असं गुगलवर वाचलेलं. परत गुगल - शोध घेतला. त्यामध्ये असं मेलॉन पिकवण्यासाठी ब्राउन कागदात गुंडाळून सफरचंद किंवा केळ्याच्या जोडीनं उजेडापासून दूर ठेवायला सांगितलेलं. सफरचंदातून निघणाऱ्या ‘इथिलिन’ वायू मुळे फळ पिकण्याची क्रीया सुरु होते. शेवटी, मोठ्या राईस कूकरमधे खाली चार पाच कागद, त्यावर ते गोल्डन हनी - ड्यू - मेलन आणि एक सफरचंद; त्यावर जाड जाड ब्राउन पेपर- अशी जणू ‘अढी’ घातली. मग दोन दिवसांनी बऱ्यापैकी गोड घमघमाट यायला लागल्यावर ते कापलं तर खरंच अगदी मधासारखं गोड मेलन होतं ते. नंतर एकदा आव्हाकाडो सुध्दा असंच पिकवलं .

ब्रुसेल्स स्प्राऊट म्हणजे छोट्या वांग्यांएवढे छोटे छोटे कोबीचे गड्डे.brussels sprout.jpg अख्ख्या गड्ड्यांची, कोबीच्याच धर्तीवर, पण फार न शिजवता केलेली त्यांची भाजी चांगली जमायला लागली. तिथे पालेभाजी म्हणून बीटाच्या पानांनाही सन्मान दिलेला आहे. भारतात आमच्या इथे आठवड्याच्या बाजारात ताज्या ताज्या बीटाची पाने अक्षरश: मुरगाळून तोडून बीटरूट पासून वेगळी करून फेकून देतात भाजीवाले. आपल्याला पाहिजे तर ढीगभर फुकट देतात. अमेरिकेत मात्र बिट घेताना पानांचेही पैसे मोजलेले असल्याने ती पाने तोडून व्यवस्थित जपून फ्रीझ मध्ये ठेवायची, आणि पालक सारखी भिजवलेली मूग डाळ घालून पालेभाजी करायची. हे करताना भारतातला तो पानांचा ढीग डोळ्यासमोर यायचा आणि ‘आपल्याकडे भाजी-पाल्याची किती मुबलकता आहे ’ असं क्षणभर वाटून जायचं.
खूप प्रमाणात दिसत असलेले लाल गोल मुळे -उग्र आणि जून असल्यासारखे वाटायचे.

पालेभाज्या आपल्या इतक्या प्रकारच्या मिळत नसल्याने चुकल्याचुकल्यासारखे वाटत होतं.

kale .jpg

तिथे ‘केल’ नावाच्या, मुळ्याच्या पानांसारख्या दिसणाऱ्या आणि खूप ‘पौष्टिक’ वगैरे विशेषणांनी गौरवलेल्या पालेभाजीचा प्रयोग, घरचे नको-नको म्हणत असताना करायला गेले आणि सपशेल फसला तो प्रयोग! भाजीची कडवट चव कशाने झाकावी आणि कशी संपवावी ती भाजी हेच कळेना.

लेट्युसचे मात्र किती किती प्रकार उपलब्ध होते! कोबीच्या गड्ड्यासारखे दिसणारे कुरकुरीत पानांचे ‘आईसबर्ग‘ लेट्युस,ice berg lettuce.jpg झालरीसारखी पोपटी नाजूक पाने असणारे ’ग्रीन लीफ लेट्युस‘ तर हीच झालरीसारखी पाने टोकाला काही वेळा माठाच्या पानासारखी लाल असतात- ते ‘रेड लीफ लेट्युस’, red lettuce.jpgbutter-lettuce-for-juicing.png नुसते पाहताच राहावेत वेगवेगळे प्रकार! कुरकुरीत कोवळी पानं असल्यानं सलाड साठी लेट्युस कायम ‘अगदी आवश्यक’ गटात असायचं.

हुबेहूब काकडी सारखी दिसणारी, चकचकीत पिवळ्या किंवा काळसर हिरव्या रंगाची झुकिनी कधी उभे पट्टे असणारी तर कधी बिनपट्ट्याची असायची. zukini.jpgझुकिनी आणि काकडी यातला फरकच सुरुवातीला मला कळायचा नाही. कारण, आपल्याकडच्या काळसर हिरव्या काकडी सारखी झुकीनी दिसे. खर तर दोन्ही प्रकार एकाच ‘कुकुर्बिटेसी’ वर्गातले. नंतर नंतर हातात घेतल्यावर झुकिनी कमी मऊ आणि थोडी कोरडी आहे असं वाटायला लागलं. कापल्यावर काकडी जास्त थंड, पाण्याचा जास्त अंश असणारी आणि कुरकुरीत आहे असं लक्षात आलं. काकडी अशी आपण कच्ची खातो, तशी झुकिनी कच्ची खाण्याचा फारसा प्रघात नाही. काकडीला ‘फळ’ म्हणून मान आहे. पण झुकिनी ‘भाजी’ समजली जाते. काचऱ्या करून परतल्यावर, झुकिनी चवीला चांगली लागते असंही लक्षात आलं.

कांदे घ्यायला गेलो- तर त्यात तीन प्रकार दिसले. दोन्ही हातांच्या ओंजळीत मावतील असे मोठमोठे कांदे म्हणजे ‘अनियन’. हा नुसताच ‘ढब्या’ असायचा. म्हणजे कांद्याचा वास आणि चव यात एक उग्रपणा असतो तो जवळजवळ नाहीच! दुसरा प्रकार ‘शॅलॉट’. हे म्हणजे आपल्याकडचे छोटे लाल कांदे.

shallot_0.jpg .

आणि तिसरा प्रकार ‘लीक’. म्हणजे कांदा पातीच्या जुडीत पातीसहित अगदी छोटे नुकतेच लागलेले कांदे असतात तसे. पात अर्धी कापून ठेवलेले.

leek oniun.jpg

हे आम्ही मोठे ‘अनियन’ किंवा ‘शेलॉट’ आणत असू. एक मोठा कांदा कापला, की कितीही वापरला तरी अर्धाच वापरण्यासाठी पुरायचा. उरलेला अर्धा दुसऱ्या दिवसासाठी झिप-लॉक-बॅगेत घालून फ्रीझ मध्ये ठेऊन द्यायला लागे.
तिकडे लसूण सुध्दा मोठमोठे गड्डे असणारे, आणि कमी तिखट वास/चव असणारे असायचे.

अमेरिकेतलं ‘भाजी आणि फळं -पुराण’ ‘स्क्वाश’ या प्रकाराबद्दल लिहिल्याशिवाय पूर्णच होणार नाही.
काकडी ज्या वनस्पती- कुळात येते त्या ‘कुकुर्बिटेसी’ कुळात स्क्वाश, पम्पकिन आणि गोर्ड प्रकार येतात. ह्या सगळ्या फळभाज्या वेलीवर लागतात.
मला अगदी कोवळा पोपटी रंगाचा ‘ओपो-स्क्वाश’ म्हणजे दुधी भोपळा, ‘टिंडा-स्क्वाश’ म्हणजे टिंडे हे मिळाले आणि अगदी गावाकडची भाजी मिळाल्याचा आनंद झाला. पपई असं समजून घेतलेलं, हिरव्यागार पपईसारखी दिसणारी, पण कडक असणारी गोष्ट पपई नसून ‘अकॉर्न’ नावाचं स्क्वाश आहे हे समजल्यावर थोडा हिरमोड झाला! acorn squash .jpg

‘बटर-नट’ स्क्वाश म्हणजे वर उभा निमुळता आणि खाली एकदम गोल असणारा लाल भोपळ्यासारखा प्रकार. लाल भोपळ्याच्या भाजी सारखी त्याची भाजी, सूप चवीला उत्तम झालं.

butternut squash.jpg

एकदा ‘चायोटे‘ स्क्वाश (काही जण याला गोर्ड प्रकारात धरतात) मिळालं.
Chayote squash .jpg

हिरवट -पोपटी मोठ्या लांबट पेरूसारखं दिसल्यानं घ्यायचा मोह आवरला नाही. पण त्याचं नेमकं काय करावं म्हणून जरा गुगल केलं तर तेलगू, तामिळ लोकात ‘चोऊ-चोऊ’ नावानं मुग-डाळ / नारळ वापरून भाजी करतात -अथवा सांबारात वापरतात म्हटल्यावर मग माञ मन लावून नारळ कोथिंबीर घालून झक्कास भाजी केली!

एकदा ‘लुफ्फा ’ स्क्वाश नाव दिसलं. आकार, रंग ओळखीचा वाटल्यानं घरी आणलं. चिरून पाहिलं तर ते होतं आपलं घोसावळं. एकदा छान नारिंगी रंगाचा लाल भोपळा म्हणजे ‘पंपकीन-स्क्वाश’ आणला. आपल्याकडे धारदार सुरीने चांगला चिरता येतो भोपळा. पण हा चिरता चिरता घाम फुटला मला -इतकं कडक बाहेरचं साल. फोडी करणं निव्वळ अशक्य होतं. मग घरातल्या मंडळींनी तो अर्धा कापून ओव्हन मध्ये ठेवला. काही वेळाने त्याचा गर चांगला मऊ झाला. मग चमच्यानं तो गर काढून फ़्रिज मध्ये ठेवला, आणि कधी सूप, कधी भाजी असं करून तो संपवला.

काही वेळा अशा गमतीजमती झाल्या तरी कॅनडाचे लालबुंद टोमॅटो, कॉस्टो -रिकोची छोटी छोटी केळी अशा जगाच्या कानाकोपऱयातून तेथे उपलब्ध झालेल्या भाज्या-फळांनी मजा आणली हे माञ खरं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहले आहे. अमेरिकन भाजी मार्केट ची टुर झाल्यासारखे वाटले.
बेबी कॅरेट बद्दल दिलेली नवीन माहिती मिळाली.

बेबी कॅरट्सबद्दलची माहिती नवीनच.
पर्सनली मला ती गाजरं खाण्यापेक्षा नेहमीची लांब गाजरं तुकडे करुन खाणं बरं वाटतं कारण त्याला चव असते. बेबी कॅरट्स अगदीच बेचव, बुळबुळीत असतात.

जेंव्हा इथे आंबा येण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती (१९७०) तेंव्हा अननस व पीच यांचे रस कमी अधिक प्रमाणात एकत्र करून जवळ जवळ आंबरसासारखी चव लागते असे मानून आम्ही "आंबरस" प्यायचो. पुढे हळू हळू आंबरसाचे डबे दिसू लागले. मग शंभर मैल दूर असलेल्या दुकानात जाऊन ते डबे आणायचे! वय लहान, अक्कल कमी, गॅस २९ सेंट गॅलन, नि आंबरस खाण्याची इच्छा असे सर्व जुळून आल्यावर अनेकदा हे धंदे केले!
भारतीय दुकानांची संख्या वाढेस्तवर आम्हाला इकडच्या जीवनाची, खाण्यापिण्याची चटक लागल्यावर आंब्याची आठवण येईनाशी झाली.

अधून मधून कोबीची भाजी, वांग्याची भाजी, फ्लॉवरची भाजी असे घरी होऊ लागले, पण भारतात गेल्यावर तिथल्या भाज्या खाऊन लक्षात आले की तिथल्या अन्नाला जी चव आहे ति इथल्या भाज्यांना नाही. तिथल्या फुलांची विविधता, सुवास इथे फार कमी.

हिरव सफरचंद ग्रॅनी स्मिथ असणार. ते चवीला इतकं गोड नसते पण त्याच्या गराचा पोत चांगला असतो आणि आंबटसर चव चांगली लागते म्हणून बेकिंग मध्ये वापरतात . कॉबलर मस्त लागते त्याचे Happy
स्पघेटी स्क्वाश खाल्ला का कधी? भाजला (रोस्ट) की त्याचा रेशेदार गर स्पघेटी सारखा होतो.

सुंदर लेख.
अमेरिकेत कितीही सुबत्ता असली तरी भारतातली फळं भाज्यांची रेलचेल आणि चविष्टपणा वेगळाच. सुजलाम सुफलाम का म्हणतात ते बाहेर राहून कळतं.
पण अमेरिकेत जास्त फळं , भाज्या खाल्ल्या जातात हेही खरंय, सहज उपलब्ध असणं, प्री पॅकेज्ड आणि व्हरायटी भरपूर.

मस्त लिहीलय .

एकदा माझा उपास होता, म्हणून मी काकडी घेतली , खिचडी आणि काकडीची कोशिंबीर करू या म्हणून . कापायला घेतली तर प्रकरण काही तरी वेगळंच वाटलं म्हणून पॅकिंग वरच नाव बघितलं तर त्याचा उच्चार ही करता येईना . मग गुगल बाबाला शरण गेले . नाव छापलं आणि सर्च केल तर ते कॉरजेट निघालं . वर्णन वाचून आपल्या दुधीच्या जवळपास जाणार वाटलं . उपासाला नाही खाल्ल ते पण दुसऱ्या दिवशी त्याची कांदा, लसूण, टोमॅटो, गरम मसाला अस घालून अस्सल भारतीय भाजी केली . आवडली पण आणि दिवस साजरा झाला पण .

होतात अशा एकेक गमती परदेशात .

मस्त! प्लीज असेच अमेरिकन धान्यांबद्दल पण लिहा. तांदळाचे प्रकार, इतर सिरीयल्स व पल्सेस, मसाले....... Happy

सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद!

साधना
--<<<सोबत फोटोही टाका असतील तर>.>> माझीही तशीच कल्पना होती आधी… पण खूप फोटो होतील, त्यामुळे लेखनातली मजा जाईल का म्हणून नाही टाकले फोटो. पण रोमनेस्को ब्रोकोली चा एक फोटो सुरुवातीलाच नवीन घातलाय.

नंद्या ४३--<<<जेंव्हा इथे आंबा येण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती (१९७०) तेंव्हा अननस व पीच यांचे रस कमी अधिक प्रमाणात एकत्र करून जवळ जवळ आंबरसासारखी चव लागते असे मानून आम्ही "आंबरस" प्यायचो. पुढे हळू हळू आंबरसाचे डबे दिसू लागले. मग शंभर मैल दूर असलेल्या दुकानात जाऊन ते डबे आणायचे! वय लहान, अक्कल कमी, गॅस २९ सेंट गॅलन, नि आंबरस खाण्याची इच्छा असे सर्व जुळून आल्यावर अनेकदा हे धंदे केले!>>> तुमची अमरसाची आठवण मस्तच.

सनव -<<<अमेरिकेत कितीही सुबत्ता असली तरी भारतातली फळं भाज्यांची रेलचेल आणि चविष्टपणा वेगळाच. सुजलाम सुफलाम का म्हणतात ते बाहेर राहून कळतं.
पण अमेरिकेत जास्त फळं , भाज्या खाल्ल्या जातात हेही खरंय, सहज उपलब्ध असणं, प्री पॅकेज्ड आणि व्हरायटी भरपूर.>>> १०० टक्के खरं आहे.

मनीमोहोर -- <<<,एकदा माझा उपास होता, म्हणून मी काकडी घेतली , खिचडी आणि काकडीची कोशिंबीर करू या म्हणून . कापायला घेतली तर प्रकरण काही तरी वेगळंच वाटलं म्हणून पॅकिंग वरच नाव बघितलं तर त्याचा उच्चार ही करता येईना . मग गुगल बाबाला शरण गेले . नाव छापलं आणि सर्च केल तर ते कॉरजेट निघालं . वर्णन वाचून आपल्या दुधीच्या जवळपास जाणार वाटलं . उपासाला नाही खाल्ल ते पण दुसऱ्या दिवशी त्याची कांदा, लसूण, टोमॅटो, गरम मसाला अस घालून अस्सल भारतीय भाजी केली . आवडली पण आणि दिवस साजरा झाला पण .>>> आपल्याला चालेल की नाही हे पाहायला परदेशात खरंच असा खूप शोध घ्यायला लागतो.
पण तुम्ही आणलंत ते कोरजेट (courgette) म्हणजे झुकीनीच होती बरं का. काकडीच्या जातकुळीची असल्याने उपासाला चालली असती का? ( ‘झुकीनो’ (इटालियन…. म्हणजे अगदी छोटे स्क्वाश) - पासून इटालियन शब्द झाला झुकीनी . तर कोरजेट फ्रेंच भाषे मध्ये म्हणतात.( gourd पासून झालं ) ब्रिटिश लोकही ‘कोरजेट’ म्हणतात , आणि ते अमेरिकेत आलं की ‘झुकीनी’ बनतं !

आंबट गोड --<<<असेच अमेरिकन धान्यांबद्दल पण लिहा. तांदळाचे प्रकार, इतर सिरीयल्स व पल्सेस, मसाले.......>>> कल्पना छान आहे. मी प्रयत्न करीन.

सीमंतिनी -- <<<हिरव सफरचंद ग्रॅनी स्मिथ असणार. ते चवीला इतकं गोड नसते पण त्याच्या गराचा पोत चांगला असतो आणि आंबटसर चव चांगली लागते म्हणून बेकिंग मध्ये वापरतात . कॉबलर मस्त लागते त्याचे
स्पघेटी स्क्वाश खाल्ला का कधी? भाजला (रोस्ट) की त्याचा रेशेदार गर स्पघेटी सारखा होतो.>>>
दोन्हीही करून बघायला पाहिजे!

ग्रॅनी स्मीथ सफरचंदांची गम्मत माझ्या बरोबर पण झालेली आहे Lol मग उरलेली सफरचंदे त्यांचा पाय करून संपवली. माझी सगळ्यांत आवडती सफरचंदे म्हणजे हनिक्रिस्प - ही युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा ने बनवलेली झाडे आहेत. त्यांची सफरचंदे अगदी रसाळ असतात.

मला तरी लीक ला कांदा म्हणणे बरोबर वाटत नाही. कांदे आणि शॅलट्स कांद्यांसारखेच लागतात. लीक ची चव मात्र वेगळी लागते.

तुम्हाला कधी मिळाली तर कॉटन कँडी ग्रेप्स खाऊन बघा. ही वर्षातून एक दोन आठवडेच मिळतात. आणि अगदी बुढ्ढी के बाल सारखी चव आणि गोडवा असणारी द्राक्षं असतात.

’हं ! काहीही डोक्यावर घेतात हे लोक. आपल्याकडे भारतात नेहमीच्याच उपयोगात असणाऱ्या कित्तीतरी पदार्थांमधून फायबर आणि बाकी मौल्यवान गोष्टी मिळतात. << इथल्या लोकांना भारतात पाठवायला पाहीजे. Lol बायदवे, celery मधे निगेटिव्ह कॅलरीज असतात.
वॉलमार्ट/क्रोगर मधे काय भाज्या मिळतात माहीत नाही पण तुम्ही जवळ असेल तर फार्मरस मार्केट ट्राय करा. वेगवेगळ्या आकाराचे/रंगाचे फ्लावर, कोबी, बटाटे, कांदे, टमाटे, भोपळे, मिरच्या, .... बघुनच डोळे आणि मन त्रुप्त होतात Happy
केल मधे बेबी केल घेतलत तर मे बी मेथी ईतक कडु लागेल. नक्की ट्राय करा. मी मोस्ट्ली कॉस्टको मधुन मिक्स ग्रीन(केल्+पालक +अजुन १/२ भाज्या) घेते, आणि पालकचा एक व सॅलडचा एक डब्बा. आठवडा भर रोज पालेभाजी आणि सॅलड खाता येते.
फळांमधे चिकु, सिताफळ, पेरु जांभळ मिस होतात पण त्याची जागा blue berries, persimmon, grapefruit, avacadoes ने भरुन काढली आहे. तिकडे कधीतरीच मिळणारी straw berries, black berries, cherries ईथे प्रचंड प्रमाणात मिळतात आणि खाल्ली जातात. melons, papaya, pomegranate, pine apples पण रसाळ आणि गोड मिळतात.

मी इथे सिडनीत केल ची भाजी नेहेमी करते. कडू नाही लागली कधी. भाजी स्वच्छ धुवुन, बारीक चिरून, त्यात चिर लेला कांदा -लसूण, टोमॅटो घालून मस्त भाजी होते. कधी कधी बदल म्हणून त्यात बटाट्याचे काप किंवा वांग्याच्या फोडी घालूनही करते. कशीही केली तरी पोळी/ भाकरी
दोन्हीबरोबर छान लागते.

छान लिहिलय....
अमेरिकेत असलेल्यांकरता फारच उपयुक्त Happy
आमच्या साठी नाविन्य... !

एक्दम सोपी
अर्धा अव्हाकाडोचा गर, २ चम्चे साखर, एक चिमुट वेल्ची पुड आणि दुध ब्लेन्डर मधे घालुन फिरवायच , मस्त लागत. अव्हाकोडो बटरी असल्याने थिकनेस येतोच

केल नेहमी रॉ सॅलड्स च्या रुपातच आवडतं मला.. संध्याकाळी खायचं असेल तर सकाळीच थोडं ऑलिव ऑईल, मीठ, मिरपूड आणी लिंबाचा रस चोळून ठेवून देते. खायच्या एक तासपूर्वी केल, श्रेडेड पानकोबी आणी गाजर, पार्सले , रेडअनिअन च्या पातळ स्लाईसेस , पाईन नट्स किंवा सनफ्लॉवर सीड्स ,सर्व एकत्र करून घेते,
लिंबाच्या रसाऐवजी अ‍ॅपल सिडर विनिगर ही वापरते कधी कधी.

Pages