लालू बोक्याच्या गोष्टी आणि आमची शाळा

Submitted by सई केसकर on 31 May, 2017 - 01:48

माधुरी पुरंदरे यांची लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके अतिशय वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखी आहेत. लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनादेखील हसवणारी आणि खिळवून ठेवणारी आहेत. साधे सोपे विषय, आणि लेखनाला अनुरूप अशी, किंवा लेखनापेक्षाही काकणभर सरस अशी त्यांनी स्वतः काढलेली चित्र, यामुळे त्यांची पुस्तकं अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा प्रसिद्ध व्हावीत अशी आहेत.

त्यांच्या लेखनशैलीचे दोन महत्वाचे गुण आहेत. पहिला, त्यांच्या लेखनातून "उद्बोधक" असे काहीही प्रत्यक्षपणे सांगितले जात नाही. पण लहान मुलांना त्या पुस्तकांमधून, "दुसऱ्यांनासुद्धा असे प्रश्न पडतात. किंवा असं रडू येतं." असं वाटल्यामुळे मुलं त्या पुस्तकांमध्ये पटकन हरवून जातात. थोडक्यात, लहान मुलांचे भावविश्व समजून त्यांना पडणारे छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या लेखनातून अप्रत्यक्षपणे होतो. दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे माधुरी ताईंचे अगदी छोट्या छोट्या डिटेलपर्यंत केलेले निरीक्षण, आणि त्याची रेखाटने. माधुरीताईंच्या चित्रातल्या "बाई" किंवा "आजी" अशी तरतरीत, साबणासारखी गुळगुळीत कधीही काढलेली नसते. तिचे सुटलेले पोट, थोडेसे ढगळ ब्लाउज, पिनेतून बाहेर आलेले केस हे सगळे अगदी हुबेहूब चितारलेले असते. त्यांच्या "शेजार" शृंखलेतील केतकीच्या शेजारी राहणारी सावित्री ताई तर माझी अतिशय आवडती आहे. दक्षिण भारतीय सावित्रीचे हेल असलेले मराठी तर माधुरी ताईंनी हुबेहूब पकडलेच आहे. पण तिचा बांधा, तिचे केस आणि तिचे वेगवेगळे (मॉडर्न) कपडे घालायची पद्धत बघितली की माधुरी ताईंच्या अभ्यासाचा अंदाज येतो. अशीच हलकीफुलकी पण खूप भावणारी दोन पुस्तके मी नुकतीच घेतली :

१. लालू बोक्याच्या गोष्टी.

निलू आणि पिलू या जुळ्या बहिणी घरी लालू नावाचा बोका आणतात त्याची ही गोष्ट आहे. यात लालू बोक्याचा एकूण आळशीपणा, त्याचा खादाडपणा यावर अतिशय विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच जे मार्जारप्रेमी आहेत, आणि ज्यांनी मांजरे अगदी जवळून पाहिली आहेत अशा मोठ्या माणसांनासुद्धा हे पुस्तक अतिशय आवडेल असे आहे. खरं तर, माझ्या मुलापेक्षा हे पुस्तक मलाच जास्त आवडते कारण यात काही काही गोष्टी इतक्या बारकाईने लिहिल्या आहेत की हसूही आवरत नाही आणि आपल्या आयुष्यातील तमाम मांजरांची आठवणही येते. एका ठिकाणी लालू बोक्याला आई ओरडताना म्हणते, "पूर्वी तुझी मानगूट धरून उचलायला चिमूट पुरायची, आता अख्खी मूठ वापरावी लागते". हे वाक्य ज्यांनी खायला प्यायला घालून बोके धष्ट पुष्ट केलेत त्यांना लगेच लक्षात येईल!
लालू बोक्याचा एक मित्रही आहे: चिचू उंदीर. लालू आणि चिचूची डायलॉगबाजी सुद्धा खूप विनोदी आहे.
लिन्कः http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=506476535391318...

२. आमची शाळा

ज्यांना २-३ वर्षांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक अगदी उपयुक्त आहे. शाळेला जायचं म्हणजे काय, आणि तिथे काय काय असतं, याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे, की मलासुद्धा पुन्हा शाळेला जावंसं वाटायला लागलं. या पुस्तकात पुन्हा माधुरी ताईचं निरीक्षण आणि त्यांचं डिटेलिंग अतिशय भावतं. शाळेत काय काय घडू शकतं यात अगदी शू होण्यापासून ते मारामारीपर्यंत सगळं सुंदर चित्रांमधून दाखवलं आहे. जोडीला अगदी मोजकीच पण मिश्किल वाक्य, जेणेकरून मुलांना आणि वाचून दाखवणाऱ्या मोठ्यांना दोघांना त्याचा आनंद घेता यावा. सुरुवातीला शाळा नको नको म्हणणारे, शेवटी शाळेला सुट्टी आणि आता शाळा नाही म्हणून रडायला लागतात असा हा प्रवास आहे.

लिन्कः http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5398142588935102317?BookNa...

विविध देशांतील (साधारण) सहा वर्षांच्या मुलांचे जग कित्येक ताकदीच्या लेखकांनी आणि चित्रकारांनी रंगवलेले आहे. त्यात अमेरिकेतील बिल वॉटरसन (कॅल्विन अँड हॉब्स) रशियातील व्हिक्तर द्रागुन्स्की (डेनिसच्या गोष्टी) फ्रान्समधील सॉम्पी-गॉसिनी (निकोलाच्या गोष्टी) असे (माझ्या वाचनात आलेले) लेखक आहेत. हे सगळे आणि माधुरी ताई एकाच ताकदीचे मला वाटतात. इतकी सुंदर पुस्तकं, तीदेखील इतक्या कमी किमतीत आणि कुठलाही अवाजवी गवगवा न करता उपलब्ध आहेत हेच माझ्यासारख्या पालकांचं नशीब आहे.

माझ्या दोन वर्षांच्या मुलाला अजून वाचता येत नाही. पण त्याच्याकडे असलेल्या सगळ्या पुस्तकांमधून तो नेहमी माधुरी ताईंचीच पुस्तकं उचलतो. एकशे सदतिसावा पाय आणि (राधाच्या घरातले) साखर नाना या त्याच्या सगळ्यात आवडत्या गोष्टी आहेत. आणि नुसती चित्रं पाहून तो आता स्वतः सगळी गोष्ट सांगू शकतो. यातच त्या चित्रांमध्ये किती मेहनत आणि अभ्यास दडला आहे याची पावती आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाक्य न वाक्य पटलं
ज्योत्स्ना प्रकाशन व माधुरी पुरंदरे ही जोडगोळी म्हणजे खरोखरच आनंदाचा ठेवा आहे.
मलाही आवडतात त्यांची सगळीच पुस्तके

अगदी पटलं. ही आमच्याकडची पण लाडकी पुस्तकं आहेत. आणि लेकीइतकीच मला पण आवडतात.

आमच्या घराजवळच्या टेकडीच्या पायथ्याशी गाड्या लावून लोक टेकडीवर जातात. या गाड्यांवर एक पांढरा - लाल बोकोबा मस्त पसरलेला असतो. कुणी हात लावला तर एकदा "काय कटकट आहे!" म्हणून "म्यांव!" करायचं आणि परत झोपायचं असा त्याचा दिनक्रम असतो. माधुरीआज्जीच्या पुस्तकातला लालू तो हाच याविषयी आमची दोघींची खात्री आहे! Happy

वा! सुंदर पुस्तकं आहेत दोन्हीही! मला अजिबात महितीच नव्हतं या जोडगोळी बद्दल!
आमची शाळाची झलक पाहून तर ठरवलंच, मागवणारच ही पुस्तकं.

@ हर्पेन गौरी: धन्यवाद!
>>>काय कटकट आहे!" म्हणून "म्यांव!" करायचं आणि परत झोपायचं असा त्याचा दिनक्रम असतो. +१११

लालू बोका वाचून मला माझ्या आई बाबांकडचा "ओजस" आठवतो. तो लहान असताना माझ्याकडे आला होता तेव्हा तो खूप तरतरीत आणि फिट होता. आज्ञाधारकसुद्धा होता म्हणून त्याचं नाव आम्ही "ओजस" ठेवलं (कारण ओजस या नावातच आज्ञाधारकपणा आहे). नंतर ओजस खूपच फुगला. आणि सारखा बाहेरच्या बोक्यांचा मार खाऊन येऊ लागला. आणि प्रचंड आळशीसुद्धा झाला. आता त्याला मानगूट धरून उचलता येत नाही, अगदी मूठ वापरली तरी, इतका तो जाडोबा झालाय.

@मानव
ज्योत्सनाची तर सगळी चांगली आहेतच.

प्रथम बुक्सनी काहींचे इंग्रजीमध्ये भाषांतरही केले आहे (हे भाषांतर मी केले आहे)
त्यात एकशेसदतिसावा पाय आणि बाबांच्या मिशा ही पुस्तकं आहेत.
ज्योत्सनासाठी सख्खे शेजारी आणि पाचवी गल्ली मी इंग्रजीत अनुवादित केले आहे.

पण माझी भाषांतरे मूळ लेखनाच्या जवळपासही पोचत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांची मजा मराठीतच जास्त आहे.

सध्या लेकीला यश ची सगळी पुस्तकं आणली आहेत...इंग्रजीत अनुवादित केलेली.
तिला काहीतरी सरावासाठी वाचायला द्यायचं होतं पण काय ते सुचत नव्हतं.आणि अशातच अचानक मला ही पुस्तकं सापडली. त्यातली भाषा अगदी घरातली वाटली म्हणुन आणली आणि लेकीला खुप आवडली ती पुस्तकं.
परवा तिची मैत्रीण घरी आली तेव्हा यश च्या "पाहुणी" म्हणजेच आमच्याकडचं "guest" पुस्तकाचं नाट्यारुपांतर करायचा हुकुम झाला.
माझी लेक यश, मी आई/निकिताई, तिचे बाबा टीचर आणि तिची मैतीण मुक्ता झाली होती...
मला खुप मस्त वाटतं माझ्या लेकीनं स्वतःहुन पुस्तक वाचताना...

यश च्या "कंटाळा" (bored) पुस्तकातल्या सारखं आम्ही बेडशीट बदलताना पांघरुणांचा डोंगर करतो.
आणि त्यातलच त्याचं शेवटचं वाक्य
"I will not wash ur clothes everyday" लेकीला भयंकर आवडतं.त्या चित्रातली आणि वाक्यातली गम्मत मी न सांगताच तिला कळली हा माझा सगळ्यात मोठा आनंद होता.

प्रथम बुक्सनी काहींचे इंग्रजीमध्ये भाषांतरही केले आहे (हे भाषांतर मी केले आहे)
त्यात एकशेसदतिसावा पाय आणि बाबांच्या मिशा ही पुस्तकं आहेत.
ज्योत्सनासाठी सख्खे शेजारी आणि पाचवी गल्ली मी इंग्रजीत अनुवादित केले आहे. >>

हे पण आणते आता मी...
कधीकधी मला वाटतं की मराठी आणी ईंग्रजी दोन्ही पुस्तकं आणावीत एकदमच Happy
कारण मराठीत वाचायला फार गोड आहेत ही पुस्तकं.

सई, छान ओळख.
आमची शाळा मागवतेय.
१२-१३ वर्षासाठी काही आहे का माधुरी पुरंदरेंचं किंवा आणि इतर कुणाचं. सोप्या मराठीतलं.

ज्योत्स्ना प्रकाशनची इतर अनेक पुस्तकही मुलांना आवडतील अशी आहेत. माझ्या मुलीला आवड्लेली काही: नीना आणि मांजर, छोटा पक्षी, इचा-पूचा, अनोळखी मित्र.
प्रत्येक भारतवारीत ज्योत्स्ना प्रकाशनला भेट ठरलेली असते. सुंदर चित्र, छपाई आणि मुलांना आवडतील अश्या गोष्टी ह्यामुळे परदेशातल्या मुलांच्या पुस्तकांच्या तोडीची वाटतात त्यांची पुस्तक.

पुन्हा माधुरी आज्जी.. मागेही कधीतरी आपणच यांच्या पुस्तकाण्ची ओळख दिलेली का? की त्या सई वेगळ्या आपण वेगळ्या?
बाकी मायबोलीमुळेच कळलेय या पुस्तकांबद्दल.. माझी स्वताची वाचनाची आवड केव्हाच ईतिहासजमा झालीय, पण माझ्या पोरांना लहानपणापासूनच वाचनाची आवड लागावी आणि ते देखील मराठी वाचनाची लागावी असे मनापासून वाटते.. या माधुरी आज्जी नक्की मदत करतील असे एकण्दरीत पुस्तके न वाचताही वाटू लागलेय. खरे तर उत्सुकतेने आताच घ्यावीशी वाटत आहेत, पण ती वेळ येईपर्यंत उत्सुकता तशीच राहू देतो Happy

सई केसकर,
चांगल्या पुस्तकांची चांगली ओळख दिलीत!

आमची शाळा, पाचवी गल्ली आणि अ‍ॅस्ट्रॉनॉट विनयने ज्याबद्दल लिहिलंय ते ही आगळी कहाणी अशी तीन पुस्तकं बूकगंगावरुन आज मिळाली आहेत.