तोंडल्यांची परतून भाजी

Submitted by योकु on 25 May, 2017 - 04:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- अर्धा किलो फार जून नाही आणि फार कोवळीही नाही अशी तोंडली
- दीड टेबलस्पून धणा-जीरा पावडर
- अर्धा टीस्पून आमचूर पावडर
- पाव टीस्पून हळद
- पाऊण टीस्पून लाल तिखट
- मोठ्या दोन चिमटीभरून कसूरी मेथी
- २-३ टेबलस्पून तेल
- चवीपुरतं मीठ
- चिमूटभर मोहोरी आणि चिमूटभर जिरं, हिंग
- आवडत असेल तर चव म्हणून चिमूटभर साखर

क्रमवार पाककृती: 

- तोंडली स्वच्छ धूवून, शेंडा बुडखा काढून; एकाच्या ४ लांब फोडी किंवा चकत्या कराव्या
- तेल तापवून त्यात मोहोरी, जिरं आणि हिंग घालून खमंग फोडणी करावी
- यात हळद आणि बाकी सगळे मसाले (कसूरी मेथी आणि मीठ सोडून) घालून मसाले थोडे तेलात परतले की तोंडली घालावी
- झाकण देऊन एक वाफ आणावी
- भाजीमध्ये आता मीठ आणि कसूरी मेथी घालावी आणि झाकण न ठेवता भाजी छान खरपूस होईपर्यंत परतून शिजवावी
- तेल, मसाल्यामध्ये मस्त फ्राय झालेली चटपटीत तोंडली तयार आहे
- गरम गरम भाजी आणि फुलके किंवा साधं वरण भात फार टेस्टी लागतं

वाढणी/प्रमाण: 
थोडी मसालेदार आहे ही भाजी त्यामुळे जरा प्रमाणातच
अधिक टिपा: 

- या भाजीला काही जास्तीचं व्यंजन न घातल्यानी ही शिजून कमी होते
- मसाले तेलात घातल्यावर कोरडे दिसायला नको. पाणी अजिबात वापरायचं नाहीये
- आमचूर + चाट मसाला असं किंवा फक्त चाट मसाला घालूनही ही भाजी चवदार होते. चाट मसाला वापरणार असलात तर त्या प्रमाणात तिखट आणि मीठ कमी करावं
- बाकी कुठलेही लाड करायचे नाहीत कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, ओलं/सुकं खोबरं काहीही नाही. गरम मसालाही नाही.

माहितीचा स्रोत: 
बायडी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु मी तर पातळ गोल चकत्या कापून तेलाची फोडणी करून मोहरी हिंग हळदीवर परतते. आणि झाकण न ठेवता काचर्‍या कुरकुरित करते, नंतर तिखट, मीठ आणि साखर घालून फक्त सारखी करायची. कुर्कुरित होते Happy

माझी पद्धत पन दक्षी सारखीच. मी झाकन ठेवून आधी शिजवून व कुरकुरीत करून घेते व मग मीठ तिखट व गोडा मसाला किंचित घालते. एकदा परतले की झाले. आमच्या अहोंची खास आव्ड ती त्यामुळे य वर्श क्ष वेळा केली आहे. दही भात व तळलेल्या पापडाबरोबर लै भारी बेत. कसूरी मेथी चे प्रयोजन कळलेले नाही.

बाकी कुठलेही लाड करायचे नाहीत कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, ओलं/सुकं खोबरं काहीही नाही. गरम मसालाही नाही. >>>>>>>> तेंडलीचे तुम्ही केलेत तेच खुप लाड आहेत. Happy
र पातळ गोल चकत्या कापून तेलाची फोडणी करून मोहरी हिंग हळदीवर परतते. आणि झाकण न ठेवता काचर्‍या कुरकुरित करते, नंतर तिखट, मीठ आणि साखर घालून फक्त सारखी करायची. कुर्कुरित होते >>>> +१
बस एवढेच लाड पुरेत तेंडलीचे

>> य वर्श क्ष वेळा केली आहे.
Lol (अल्जेब्रैक प्रॉब्लेम वाचते आहे असं वाटलं)

आमच्याकडेही दक्षिणा म्हणते तशी सोपी पद्धत. मा झ्याकडे रोजच्या स्वैपाकात भाज्या नुसत्या परतून शिजवून कुरकुरीत करण्याचा पेशन्स नाही त्यामुळे होत नाही सहसा.

तोंडल्याची अंगची चव मात्र मला भारी आवडते.

अय, ही कृती बायडीनं केलेल्या भाजीचीए. वर हे सांगीतलय की अशीच करतात. सबब जशी कृती आहे दिलेली तशी करा येकदातरी...

इन्टरेस्टिंग.
लाड करायचे नसल्यामुळे लगेच ट्राय करणार! Proud Happy

करणार करणार. अशीच करणार. योकू तू चिडू नको बरं. Happy
मी कुठे वाचलेली कृती फॉलो करणार असेन तर प्रत्येकवेळी त्या त्या साईट वर जाऊन इमाने इतबारे कॉपी पेस्ट (म्हणजे पेस्ट करायला सांगितली असेल तर पेस्ट :p ) करतो.
या भाजीत भ.र.पू.र. नारळ आवडतो पण तो अजिबात घालणार नाही. Proud

मस्तच, वेगळा प्रकार.

आमच्याकडे नुसती फोडणीला टाकून फक्त तिखट मीठ घालून खरपुस करतात अगदी. भारी लागते तीपण.

आज केली सक्काळी सक्काळी. तों डली चांगली पाहिजेत कोवळी. हैद्राबादेत मेली जाड निब्बर तोंडली असायची. पावकिलोतली अर्धी लाल भडक. मग मला हटकून पुणे सोडल्याचा पस्चात्ताप व्हायचा. अनेक वेळा वाटीभर दहिभात. सुरती कोलम किंवा सोना मसूरी तांदळाचा. आणि वर ही भाजी असे डब्यात नेलेले आहे. सोबत एखाद दोन उडीद वडे. एकदम तृप्त बघा. कसूरी मेथी नाही घरात. आणून मग करून बघीन.

मस्त क्रुती ! अशी पण करुन बघणार, लहानपणी मला तोन्डली खुप आवडायची क्रिस्पी कुरकुरित नुसती तेलावरची भाजी डब्यात असली की ती नुसती खायची आणी तेल लागलेली पोळी रोल करुन खायची.