ऑफर?? नको रे बाबा!!!

Submitted by सुबोध अनंत मेस्त्री on 13 May, 2017 - 04:02

media-20160906 (1).jpg

====================================================================
नमस्कार,

गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी.

=====================================================================

"Incoming Call
Dada"

असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष केलं पण आज माझ्या एका पोलीस मित्राने मला पाठवला म्हणून म्हटलं कन्फर्म करावं". मी IT मध्ये बरीच वर्षे असल्याने आणि जीवनरंग माध्यमातून आमचे खूप चांगले संबंध असल्याने आम्ही त्या त्या क्षेत्रातले प्रश्न एकमेकांना बिनधास्त कॉल करून विचारतो. हा प्रश्न टेक्नॉलॉजी संबंधी असल्याने त्यांनी मला कॉल केला होता. मी सविस्तर त्यांना या गोष्टी कशा फसव्या असतात हे समजावून सांगितलं. "तू या गोष्टीवर आर्टिकल लिहिणे खूप गरजेचं आहे कारण लोकांपर्यंत अशी माहिती पोहचत नाही" अशी कल्पना त्यानी मला सुचवली. या गोष्टीची गरज मला ही वाटत होती.

गेल्या काही वर्षात व्हाट्सअप ने बऱ्याच लोकांच्या मनावर राज्य केल आहे कारण या अगोदर जर कुणाशी बोलायचं असेल तर कॉल शिवाय पर्याय नव्हता किंवा मग एस. एम. एस. पाठवायचो. कॉलमध्ये आपण समोरच्याशी बोलतो पण एस. एम. एस. मध्ये समोरच्याशी लाईव्ह बोलण्याचा फील नव्हता आणि या दोन्ही गोष्टींना पैसे तर खर्च होत होते. माणूस असे खिशातले दहा रुपये सहज खर्च करेल पण मोबाईल बॅलन्स मधला एक रुपया गेला तरी त्याला कसंतरीच होत. हे सगळं काही हुशार व्यक्तींनी हेरलं आणि व्हाट्सअप्प सारखं मेसेजिंग आप्लिकेशन बनवलं. आता व्हाट्सअप्प ला इंटरनेट लागत आणि त्यासाठीही पैसे लागतात. यासाठीच आता लोक फ्री वायफाय झोन शोधत असतात. व्हाट्सअप्पचा अतिवापराचा फायदा आता काही फ्रॉड व्यक्ती घ्यायला लागल्या आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे हा अमेझॉनचा मेसेज आहे.

जेव्हा सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5 फक्त रुपयात 999 मिळतोय अशी न्युज आपण वाचतो तेव्हा सहाजिकच आपल लक्ष तिकडे ओढलं जात. मग आपण लगेच त्या लिंक वर क्लीक करतो आणि अगदी अमेझॉन सारख्या दिसणाऱ्या वेबसाईटवर आपल्याला नेलं जात. सगळ्या गोष्टींची हुबेहूब कॉपी असल्याने आपण लगेच त्या गोष्टींची शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाही. सरळ आपण तिथे आपली माहिती टाकून मोकळे होतो आणि त्या लिंक्स दुसर्यांना फॉरवर्ड करून टाकतो. मुळात या मेसेजेसचा हेतू काय असतो व त्यात धोके कोणते हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

1. आजच्या काळात लोकांची माहिती (उदा. नाव, मोबाइल नंबर, घरचा पत्ता, इमेल) बऱ्याच कंपन्यांना मार्केटिंग साठी महत्वाची असते. अशा लिंक्समधून तुमच्याकडून अशी माहिती घेतली जाते आणि काहीतरी मिळणार अशा अपेक्षेने आपण सुद्धा ही माहिती चुकीची टाकत नाही. त्यातून ही माहिती मार्केटिंग साठी किंवा चुकीच्या गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते.

2. माहिती टाकल्यानंतर तुम्हाला एका पेजवर नेलं जात जिथे तुम्हाला हि लिंक व्हाट्सअप किंवा फेसबूकवर शेअर
करण्यासाठी मागणी केली जाते. आपण तेही करतो. आपण तर फसलेलो असतोच पण आपण अजून आपल्या मित्रांनाही ते करण्यास भाग पाडतो. अशा प्रकारे हि माहिती लाखो लोकांपर्यंत लगेच पोहचते आणि हेच या लोकांना पाहिजे असत.

media-20160906 (1).jpg

3. बऱ्याच वेळेला अशा लिंक्समधून तुमच्या मोबाईलमध्ये अँप डाउनलोडसाठी विचारलं जात आणि हे अँप्लिकेशन्स आपल्या मोबाईलमध्ये गुप्तहेराच काम करत. ते तुमच्या मोबाईल मधून तुमची महत्वाची माहिती चोरून नेऊ शकत जस की तुमचे कॉन्ट्सक्टस. आज मोबाईलचा वापर ऑनलाइन शॉपिंग किंवा बँकिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. अशी सीक्रेट माहिती सुद्धा हे अँप्लिकेशन्स सुद्धा तुमच्याकडून घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागू शकतो.

media-20160906.jpg

जर अशा प्रकारचे मेसेजेस तुमच्या मोबाईल मध्ये आले तर तुम्ही फॉरवर्ड न करण ही आपल्या सामाजिक जबाबदारीपैकी एक आहे. या अशा न्युज फेक आहेत हे ओळखण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, त्यातल्या काही आपण बघू.

1. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलत तर ही लिंक http://amazon-sale.in किंवा http://amazon-festivaloffer.in वैगेरे अशा असतात. कोणतीही मोठी कम्पनी जेव्हा ऑफर काढते तेव्हा ते स्वतःची लिंक (उदा. amazon.in) सोडून दुसऱ्या लिंक्स कशाला वापरेल? या लिंक्स तात्पुरत्या 4-5 दिवसांसाठी तयार केलेल्या असतात. तेवढ्या काळानंतर त्या आपोआप बंद होतात. तुम्ही हेच तुमच्या व्हाट्सअप्प वरचे मेसेजेस काही दिवसंपूर्वीचे पाहू शकता. त्या लिंक्स आता ओपन होणार नाहीत.

2. या लिंक्स सहसा http:// अशा सुरु होतात. ज्या सहसा सुरक्षित नसतात. कोणत्याही मोठ्या शॉपिंग वेबसाईट किंवा बँकेच्या वेबसाईट या https:// अशा सुरु होतात. हा (s) खूप महत्त्वाचा असतो कारण या फक्त एका (s) मुळे तुमचे व्यवहार सुरक्षितरित्या होत असतात.

3. अशा फेक लिंक्सवर सहसा वेळ दिलेला असतो जस की, पुढच्या 1 तास 40 मिनिट मध्ये ही ऑफर संपणार आहे. असा टाईम सहसा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वर पण असतो पण तो घडाळ्यातल्या टाईमर सारखा सतत कमी होत असतो. तुम्ही अशा लिंक्सवर केव्हाही क्लीक केलंत तरी तुम्हाला तो टाईम नेहमी सारखाच दिसणार

या प्रकाराला सहसा फिशिंग अटॅक असं सुद्धा म्हटलं जातं. जस माशाला गळ टाकून बऱ्याचशा माशांमधून एक तरी मासा गळाला लागतो तसंच असे मेसेज बऱ्याच लोकांपर्यंत पोहचल्यानंतर कुणी ना कुणी याला बळी पडतच आणि यासाठीच आपण आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना या गोष्टीसाठी जागरूक करणं महत्वाचं आहे.

====================================================================
जीवनरंग संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल नेहमी काही ना काही नवीन गोष्टीबद्दल माहिती दिली जाते. एखादया गोष्टीने कुणाचा फायदा होत नसेल तर नुकसान होण्यापासून बचाव व्हावा अशी अपेक्षा असते. या पोस्टमधून नक्कीच काही ना काही तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे.

====================================================================

- सुबोध अनंत मेस्त्री
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656
http://sahajsaral.blogspot.in/2016/09/fakeoffers.html

#sahajsaral

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सुबोध या माहितीबद्दल. Happy

जीवनरंग संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल नेहमी काही ना काही नवीन गोष्टीबद्दल माहिती दिली जाते. एखादया गोष्टीने कुणाचा फायदा होत नसेल तर नुकसान होण्यापासून बचाव व्हावा अशी अपेक्षा असते. या पोस्टमधून नक्कीच काही ना काही तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे.>>>>>मस्तच Happy

याबद्दल बरेचसे माहित होते/आहे, अर्थात तरीही ही उपयुक्त माहिती, इथे फोटोद्वारा उदाहरणांसहित दिल्याबद्दल धन्यवाद.
या जगात "काहीही म्हणजे काहीही फुकट (वा स्वस्तातही) मिळत नाही" हा संस्कार विसरला गेला, की अशा गळांना फशी पडायला होतेच होते.
अन ज्या वेगात मोबाईल तंत्रज्ञान वापरण्याचे लोण देशात पसरले, तितक्या वेगात, त्या तंत्रज्ञानाला वापरण्याच्या साजेशी प्रशिक्षणाची सोय झालीच नाही.
शिवाय, गेल्या शतकात जसे "छापिल ते ते सत्य" असे मानण्याचा कल होता , अगदी तशाच स्वरुपात , व्हॉट्सअ‍ॅप किंवा नेटवरुन आपल्या स्क्रिनवर जेजे उमटते ते ते सत्य मानणारे भोळसटांची संख्याही कमी नाही.
याच मुळे, वरील लेखाची अत्यावश्यकता होती/आहे.

हा लेख तुमच्या नावसहित आमच्या आई बाबा काका काकु नातेवाईक ग्रुप वर शेअर करण्याची परवानगी मागते आहे.
मला लिंकही देता येईल पण लिंक मोबाईल वर उघडून वाचण्याचे कष्ट ते लोक घेणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे.

माहितीपूर्ण उपयुक्त लेख आहे.

माझी एक सुचवणी आहे की हा लेख संक्षिप्त स्वरुपात लोक जागृतीसाठी व्हॉट्सप गृपवर फॉरवर्डसाठी बनवून द्या, म्हणजे बरं प्डेल.

खूप चांगली माहिती . तशी ही मी कुठे माझी माहिती देण्याबाबत आणि मेसेज नुसतेच फॉरवर्ड करण्या बाबत फारशी उत्सुक नसतेच पण आता तर नाहीच देणार .
या मागे एवढं काही दडलं असेल हे मात्र नव्हतं माहीत.
लिंबू म्हणतात तसाच मी ही करते विचार .. या जगात काही म्हणजे काही फुकट मिळत नसत . श्वास घेण्या साठी सुद्धा फुफ्फुसं हलवावी लागतातच . ( स्मित )

फार छान लेख.
असे मेसेजेस फेक असतात हे माहित होतं पण इतके डिटेल माहीत नव्हते.
फोटो सह, डिटेल आणि उपयुक्त माहिती साठी धन्यवाद.

हा मेसेज तुम्ही नक्कीच कुणालाही शेअर करू शकता. लोकांपर्यंत माहिती पोहचणे हा एकमेव उद्देश आहे. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. Happy

फार छान लेख.
असे मेसेजेस फेक असतात हे माहित होतं पण इतके डिटेल माहीत नव्हते.
फोटो सह, डिटेल आणि उपयुक्त माहिती साठी धन्यवाद.>>>>> +१००