आणि वर्तुळ पुरे झाले !

Submitted by sneha1 on 26 April, 2017 - 23:07

म्हटलं तर ही खूप काही मोठी गोष्ट नाही, माझ्यासाठी असली तरी बाकीच्यांसाठी नाही. तरी उगीच शेअर कराविशी वाटली, म्हणून.

माझे लहानपण नागपूर मधे गेले. घराच्या चारी बाजूंना मोठे अंगण, आणि भरपूर झाडे. आई आणि बाबा, दोघांनाही झाडांचा शौक. त्यामुळे चारी बाजूच्या कुंपणाला सिताफळाची झाडे लावलेली. मागे दोन पेरूची झाडे, ज्याच्यावर चढून पेरू खात शाळेचा अभ्यास व्हायचा. अंजिराचे झाड, ज्याच्या बाजूला पाणी रांजणात भरून ठेवले असायचे आणि मोलकरीण धुणे भांडे करायची. त्या पाण्यावरही ते झाड भरपूर फळे द्यायचे. एक पपईचे झाड, आणि एक चांगले उंच तुतीचे , ज्याला सैतुत पण म्हणतात त्याचे झाड. त्याला पण भरपूर फळे यायची. कच्ची हिरवी, मग लाल आणि पिकली की काळसर. मस्त गोड लागायची ती पिकलेली फळे. आणि ती पिकलेली फळे दाबली की त्याच्यामधून गडद लाल रस गळायचा. तो कुठेतरी हाता पायाला लावून आईला दाखवायचे, की बघ मला लागले. आमचीच आई ती, ती कधी फसली नाही Happy ह्या झाडावर मी आणि माझी बहीण चढायचो आणि भरपूर फळे खायचो. बाकी चाफ्याची, तगरीची आणि बटमोगर्‍याची पण झाडे होती.

बालपण संपले, शिक्षण झाले, नोकरी लागली, मग लग्न झाले. काही काळातच गोडुल्या लेकीला घेऊन आम्ही दोघं अमेरिकेत आलो. आयटी वाल्याची असते तशी नवर्‍याची नोकरी होती, आणि त्याच्या बदल्या होत गेल्या तसे आम्ही नवी नवी ठिकाणे बघत गेलो. जेव्हा लेकीचे शिक्षण नीट सुरू झाले, तसे एका ठिकाणी स्थायिक व्हायचे ठरवून टेक्सास मधे आलो, आणि घर घेतले.
घर घेतले तसे नवर्‍याचे बागकामाचे प्रेम उफाळून आले.गुलाब , मोगरा ही झाडे, त्यांच्याबरोबर गणेश वेल, गोकर्ण पण..इथल्या हवेत प्राजक्त आणि गुलमोहर वगैरे लागत नाही म्हणून नाही तर ती पण लावली असती. आपलं लहानपण ज्या झाडांबरोबर गेलं ती झाडं पुन्हा अनुभवायला मिळाली की खरंच छान वाटतं. अधेमधे चाफ्याची, सैतुताची आणि अनेक झाडे आठवायची, पण काय काय लावणार शेवटी असे व्हायचे.

एका उन्हाळ्यात बहिणीकडे कान्सास ला गेलो होतो तेव्हा तिच्या अंगणातली काही छोटी रोपे घेऊन आलो. हे नवर्‍याचे काम. हेतु असा, की तिथल्या बर्फामधे जी झाडे राहतील ती आपल्या हिवाळ्यात टिकतीलच. त्यात मेपलची रोपे होती, आणि अजून दोन होती ती कशाची माहिती नसतानाही त्याने आणली, छान दिसतात म्हणून. इथे आणून लावली.ती माहिती नसलेली झाडे भराभर वाढू लागली . मग फेसबुक वर चौकशी केल्यावर लोकांनी सांगितले की ही मलबेरी. अरेच्या, म्हणजे सैतुतच की! माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि दोन अडीच वर्षातच ती झाडे आठ नऊ फुटी झाली. एका झाडाला फळे पण धरली, पण काही दिवसातच कळले की ती फक्त फुले आहेत, ज्यांचे पुढे काही झाले नाही. ते नर झाड होते, ज्याला फळे धरत नाहीत. मूड बिघडलाच, मग दुसर्‍या झाडाकडून फारशी अपेक्षा न ठेवायचे ठरवले. मात्र ह्या वेळी निराशा पदरी पडली नाही. त्याला फळे धरली, आणि ती फळेच निघाली. मी कच्ची असतानाच खाणे सुरू केले, नवरा तर म्हणायचा की पिकलेली कशी लागतात कळणारच नाही, पिकायला शिल्लक तर राहिली पाहिजेत ना! काही दिवसात फळे पिकली, आणि एक पिकलेले फळ लेकीला खायला घातले. तिने खाऊन बघितले आणि ते आवडल्याचे जाहिर केले. मी लहानपणी जी फळे आनंदाने खायचे, ती फळे लेकीला आवडीने खाताना पाहिले , आणि माझ्यासाठी एक वर्तुळ पुरे झाले!

1.jpg2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users