कथा - व्यथा कढीपत्त्याची

Submitted by विद्या भुतकर on 24 April, 2017 - 20:59

मला आमच्या जवळच्या इंडियन स्टोअर मध्ये मिळणारी एका ठराविक ब्रँडची (डाएट) भेळ मिक्स आवडते. डाएट हे फक्त नावाला लिहिलेलं असावं कारण शेव वगैरे भरपूर असते. पण नेहमीच्या चिरमुऱ्यांपेक्षा ते जास्त कुरकुरीत लागतात त्यामुळे मी तेच पाकीट हट्टाने आणते. ते खरेतर फक्त फोडणी टाकलेले चिरमुरे, शेव आणि फरसाणअसतात. घरी आणून त्यात मग कांदा, टोमॅटो, कैरी, गोड चिंचेची चटणी मिक्स करून मस्त भेळ बनते. आठवड्यातून २-३ वेळा तरी एक वाटीभर खाल्ले जाते. परवा असाच खाऊन झाले आणि थोड्या वेळाने बहुदा ओठांवर त्यातला एक कढीपत्त्याच्या कण तसाच राहिला असावा, तो तोंडात आला आणि बराच वेळ कढीपत्त्याची चव रेंगाळत राहिली. Happy किती अगदी इतकासा तो कण पण किती चविष्ट.

तर कढीपत्त्याच्या नावाबद्दल मला एक शंका आहे. आयुष्याची अनेक वर्षे मला असंच वाटत आलं की कढीमध्ये घालतो म्हणून त्याला 'कढीपत्ता' म्हणतात. त्यामुळे शिकागोमध्ये असताना कढीपत्ता मिळाला नाही म्हणून अनेक वेळा मी कढी केली नाही. पण पुढे जेव्हा काही ठिकाणी विना कढीपत्त्याची कधी मी खाल्ली तेव्हा मला जरा धक्काच बसला. Happy अनेक उत्तर-दक्षिण भारतीय लोकांना 'करीपत्ता' म्हणताना ऐकले तेव्हापासून मनात ही शंका निर्माण झाली. 'कढीपत्ता' की 'करीपत्ता'? पण मग 'करी' हे तर इंग्रजी नाव झालं? त्यापेक्षा कढीपत्ता हे जास्त भारतीय वाटतं. असो. कुणाला याचं उत्तर माहित असेल तर जरूर सांगा.

भारतात असताना कधी कढीपत्त्याची किंमत जाणवली नाही जितकी अमेरिकेत. एकतर आईकडे दारातच मोठं झाडं आहे(रोप नाही झाड). अनेकदा तर आई तेल भांड्यात टाकून फोडणीसाठी पानं तोडायची. अर्थात आम्हाला त्यासाठी पळायला लावलं की चिडचिड होणारच आमची. पण दारातच असल्याने कधी त्याची कमतरता वाटली नाही. आणि दुसरे म्हणजे पुण्यात भाज्या आणायला एकतर गेलं तर तिथे भाजीवाल्या मावशी दोन काड्या तशाच देऊन टाकायच्या. त्यामुळे कढीपत्त्याची जुडी कधी विकत घ्यावी लागली नाही. पण इथे मात्र मोजून २-३ काड्या असलेल्या एका प्लास्टिक पिशवीची किंमत १ डॉलर. सढळ हाताने वापरायची सवय असल्याने एका पाकिटात काही होत नाहीच. त्यामुळे कमीत कमी ३ तरी घेऊन यायचीच. कधी मुळातच थोडे खराब असलेली पानं अजून काळी पडून जातात म्हणून मग थोडे दिवस धुवून पुसून पेपरमध्ये गुंडाळून डब्यात घालून फ्रिजमध्येही ठेवत होते. पण इतक्या शिस्तीत काम नियमित केलं तर काय ना? कधीतरी खराब होतातच. तर कधी ऐनवेळी संपली तर अजून चिडचिड.

यावर उपाय म्हणून मग मागच्या ट्रिप मध्ये ताजा छान वासाचा बराच कढीपत्ता धुवून सुकवून तेलात परतून आईंनी डब्यात भरून दिला. तेव्हापासून कधी ऐनवेळी संपला तर निदान सुकलेली २-४ पाने का होईना टाकता येत आहेत. आता तोही संपून जाईल. तर हे असं कढीपत्ता पुराण. आता इतकं काय सोनं लागून गेलंय त्याला असे वाटेल. पण आपल्या काही ठराविक पदार्थांना त्याच्याशिवाय चव नाही. सर्वात पहिले म्हणजे, मस्त भरपूर आले, लसूण आणि कढीपत्ता घातलेली कढी. त्यानंतर नंबर येतो तो वरण किंवा आमटीचा. केवळ हळद, हिंग, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता असला तरी किती चव येते साध्या वरणाला. आमटीचे तर मग विचारून नका. पुरणपोळी सोबतच्या कटाच्या आमटीमध्ये तर भरपूर कढीपत्ता पाहिजेच. आजकाल मी छोले भिजवून उकडून त्यांना केवळ जिरे मोहरी,लाल तिखट, कढीपत्ता, चाट मसाला याची फोडणी देते त्यातही आले लसूण कांदा टोमॅटो यातले काहीही नसते. तरीही स्नॅक किंवा दुपारच्या जेवणात ते सुके छोले खूप छान लागतात, केवळ कढीपत्यामुळे.

दुसरे महत्वाचे पदार्थ म्हणजे भडंग आणि चिवडा. खरपूस भाजलेला कुरकुरीत कढीपत्ता त्यात हवाच. तोही भरपूर. प्रत्येक घासासोबत त्याचा बारीक तुकडा तरी तोंडात आला पाहिजे. पोहे, उपीट, फोडणीची पोळी, फोडणीचा भात यातही आलाच. बटाट्याची भाजी, दहीभात यासर्वांत बाकीच्या सामग्रीसोबत आपलेही वेगळेपण तो जाणवून देतोच. शेंगदाण्याच्या चटणीमध्येही छान लागतो. टिपिकल महाराष्ट्रीय पदार्थांत कढीपत्ता घालायचे हे तर ठरेलेलंच असायचं. पुढे अनेक लोकांशी ओळखी झाल्या तसे अजून तो आवडू लागला. खांडवी किंवा ढोकळ्यावर असलेल्या फोडणीमधून त्याची चव अजूनच खुलते असं वाटतं.

अनेक दक्षिण भारतीय मॆत्रिणीमुळे नवीन पदार्थ शिकले. इडली-डोसा सोबत खोबऱ्याच्या चटणीवर घालायच्या फोडणी मधला कढीपत्ता, पुढे जाऊन टोमॅटो आणि शेंगदाणे असलेली चटणीही बनवू लागले. त्यात कढीपत्ता बारीक होऊन जातो त्यामुळे पूर्ण चटणीलाच त्याची चव असते. लेमन राईस, पुलिहोरा, बिसीबेळे, चटणी पावडर, पोंगल अशा अनेक पदार्थांची ओळख झाली आणि त्यातला कढीपत्ता आवडू लागला. सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे मांसाहारी जेवणात. आमच्याकडे घरी कधीही अंडाकरी किंवा चिकनमध्ये कढिपत्ता मी खाल्ला नव्हता आणि कधी घालणारही नाही. पण एका मित्राकडे नारळाचे दूध, हिरव्या मिरच्या, भरपूर काळे मिरी आणि कढीपत्ता घातलेली अंडाकरी खाल्ली एकदा. आणि ती इतकी आवडली की बासच. तेंव्हपासून मीही तशी थोडी कमी तिखट करी बनवते. त्यातही कढीपत्ता हवाच. वर उत्तरेकडे मात्र पनीर, बटर चिकन किंवा छोले वा दाल माखनी मध्ये तो दिसला नाही आणि मीही कधी घालणार नाही.

तर असा अनेकवेळा वापरला जाणारा कढीपत्ता रोजच्या स्वयंपाकाचा मुख्य घटक. मी पुण्यात असताना एक रोपटं लावलं होतं आणि ते थोडं वाढलंही होतं. त्याची काही पानं खुडल्यानंतर मात्र त्याची तितकीशी वाढ झाली नाही. बॉस्टनला येताना ते सोडून यावं लागलं. Sad इथे काही ती रोपं लावणं थंडीमुळे जमत नाही. पण तरीही जो काही विकत आणेन अगदी सोन्यासारखा त्याचा पुरवून वापर करते. Happy आज पोस्ट लिहितानाही काही पदार्थांची नावं आठवून तोंडाला पाणी सुटलं. Happy पोस्ट लिहून झाल्यावर पुनः एक वाटी भेळ मिक्स घेऊन बसले. Happy रात्री हे भरीत आणि कढी बनवली. मुलीने जेवण झाल्यावर येऊन मिठी मारली. म्हणाली,"जेवण तिखट होतं पण मस्त होतं." एकूण काय कढीपत्याने आजचा दिवस सार्थकी लागला. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

IMG_0469.JPGIMG_0471.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा तेलावर अगदी किंचित परतुन घट्ट झाकणाच्या / बाटलीत डब्यात भरुन फ्रीझ मधे ठेवायची , लागेल तशी वापरायची. रंग, वास्,चव कायम रहाते, सावलीत वाळवलेल्या पानांचा वास जातो . विकत आणलेला कढीपत्ता / करीपत्ता कितीही काळजीपूर्वक ठेवला तरी खराब होतो . पण या कृतीने ठेवल्यास पुढच्या इंग्रो . वारी पर्यंत छान टिकतो..

कढीपत्ता हे झालं मराठी नाव. पण इंग्लिशमध्ये 'करी लिव्हज' म्हणजे साऊथ इंडियन लोकं करीपत्ता म्हणत असावेत.

आमच्या अकोला भागात कढीपत्त्याला गोडलिंब म्हणतात..>> यवतमाळात पन.. खरतर विदर्भातच कढीपत्त्याला गोडलिंबाची पाने असे संबोधतात. Happy

हां, आणि त्याला 'गोडलिंब' म्हणायचे कारण मी आईला लहानपणी विचारलेले, कारण एक तर त्याला लिंबं वगैरे काही येत नाही, दुसरं ते गोड नाही. आई म्हणाली केवळ कडूलिंबाच्या विरुद्ध म्हणून गोडलिंब. दोन्ही झाडांची पाने ची थोडीफार सारखी दिसतात.

आमची आई कढिलिंब म्हणायची. पुण्यात कढीपत्ता म्हणतात.
पण कढीलिंबं हेच नाव फार जवळचं वाटतं.
मला ही लागतोच खास करून लसूण मिरची घालून तुरीच्या डाळिचं फोडणीचं वरण केलं तर त्यात हवाच.
सुदैवाने माझ्याकडे झाड आहे, शक्यतो विकत आणत नाही, घरी जितका आहे तो पुरतो Happy

दारातला कढीपत्ता आणि फोडणी सुरू केल्यावर आईने पानं आणायला पळवणं अगदीच रिलेट झालं.

कढीपत्त्याची पानं सावलीत सुकवून डब्यात ठेवली तरी छान टिकतात.

पण कढी पत्ता सर्वच गोष्टींत नाही आवडत. विशेषतः मेस च्या जेवणात..प्रत्येक भाजीत- दोडका, बटाटा, वांगं,उसळी- प्रत्येकच भाजीत कढी पत्ता टाकतात.... त्याने अगदी नकोसा वाटतो!

मला पण कढीपत्ता आवडतोच.. आणि पदार्थात असेल तर तो मी काढून टाकत नाही, अगदी चावून चावून खातो.
यावेळी येताना नलिनी ने श्रीरमपूरहून आणलेला कढीपत्ता आणला होता.. अजून पुर(व्)तोय.

विद्या तुम्हाला इतका कढीपत्ता आवडतो म्हणून सांगते. तुम्ही इथेही झाड लावू शकता. हिवाळ्यात घरात ठेवा. मॉर्निंग रूम असेल तर उत्तम नाहीतर कुठेतरी खिडकीजवळ झाडाची कुंडी ठेवा. ऊन मिळत राहील. उन्हाळ्यात बाहेरही ठेवता येईल. झाड फार मोठ मात्र होऊ द्यायचं नाही. खूप रोपसुद्धा निघतात. माझ्याकडे ८ वर्षांपासून आहे झाड. काळजी घ्यावी लागेल. स्प्रिंग आणि फॉल मध्ये बरेचदा झाड आत बाहेर करावं लागत temparature changes मुळे. नर्सरीत मिळेल झाड. मोगरा पण मिळतो. लावूनच टाका आता

कढीलिंब. लोकं पावसाळ्यात मोठ्या झाडाखाली आलेली रोपं काढून न्यायचे लावायला आमच्या घरातून.

विद्याताई, जवस-अळशी-अळीव, वरणफळ-चकोल्या, आमटी-फोडणीचं वरण, चिमटा-गावी, ह्यावर पण मटेरियल आहे बघा.

Thank you all for the comments. Happy दुसर्या धाग्यावर डाएट आणि IF ची चर्चा चालू असल्याने खाण्या च्या पोस्टवर कमेन्ट द्यायची राहिली. Happy
रोपटे लावायला कष्त्त आहेत. या हिवाळ्यात तुळस जगली नाहि. त्यामुळे शक्यता कमी आहे. :०
असो. तेलावर परतून सुअकवून ठेवलेला कधीतरी वापरते. सध्यातरी तोच एक पर्यात आहे.

माझ्या आईकडे दारात कडीपत्याचे झाड आहे. त्याची चव आणि गंध खूप छान आहे. तेल तापत ठेवल्यावर कडीपत्ता आणायला पळवणे आमच्याकडेही होते.

निष्ठावान कार्यकता म्हणजे काय?

कडीपत्ता

कुठलाही पदार्थ बनवताना पहीला फोडणीत घातला जातो आणी .......

पदार्थ खाताना पहीला काढून बाहेर फेकला जातो !