हिरवं चिकन

Submitted by धनि on 17 June, 2016 - 09:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन ब्रेस्ट बोनलेस १
कांदा १ मध्यम
कोथिंबीर मुठभर
पुदीना मुठभर
हिरव्या मिरच्या ३ - ४ (किती तिखट हवे आहे त्यानुसार)
लसूण १ लहान पाकळी
काजू मुठभर
तेल
मीठ
जिरे
तमालपत्र २
दालचिनी १ कांडी
वेलदोडे २
लिंबाचा रस
कसूरी मेथी

क्रमवार पाककृती: 

तर पहा काय झालं ना, फार्मर्स मार्केट परत सुरू झालं. एके दिवशी हे मस्त पुदीन्याची जुडी मिळाली. मग घरी आणून तिची चटणी करून ठेवली. मस्त झाली होती अगदी. २ दिवस आवडीने तोंडी लावायला खाल्ली. मग ती तरी टिकणार किती ना. बाहेर मिळणार्‍या चटणीत ते व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिव घालतात. घरच्या चटणीत असे काहीच नव्हते. मग त्या चटणीचा सदुपयोग कसा करावा असा विचार करत असताना हे चिकन सुचले.

तर पुदीना धुवून आणि निवडून घेतले. देठं टाकून दिली. चटणीत ती चांगली लागत नाहीत. (कोथिंबीरीची देठं मात्र उपयोगी ठरतात. त्यांना खुप सुंदर वास असतो त्यामुळे त्यांचा वापर करा)
एक दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतले.
लसूण पाकळी सोलून घेतली.
आता हे सगळे चविनुसार मिठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
अशी तयार झाली एक नंबर चटणी. कंटाळा आला असेल तर हीच चटणी थोडा लिंबू रस घालून पोळीबरोबर खा आणि चिकन उद्या करू असं म्हणा Happy

तर आमच्याकडे चटणी तयार होती. ती चटणी एका भांड्यात घेतली. त्यात लिंबाचा रस टाकला. मग त्यात चिकनचे तुकडे टाकून आर्धा तास मॅरिनेशन करता ठेवले. तेवढ्या वेळात सी आय डी चा आर्धा एपिसोड उरला होता तो पाहून घेतला. चक्क हाताने दरवाजा उघडणारा दया दिसला आणि सुडोमी झालं Wink बरं आपलं चिकन तिकडे फ्रिज मध्ये आहे नाही का.

ते मॅरिनेशन सुरू असताना, सी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला.
त्याच्या बरोबर कोथिंबीर पण थोडी कापली. देठं लक्षात आहेत ना !
मिरची पण घेतली.
मग तेल गरम केलं आणि त्यात थोडे जीरे टाकले. ते परतले की मग कांदा टाकला.
खुप लाल नाही करायचा. थोडा शिजल्या सारखं झालं की काजू टाकले.
कजू आणि कांदा परतला की त्याच्यावर मिरची आणि कोथिंबीर थोडी परतल्यासारखे केले.
हे सगळे परतलेले जिन्नस मिक्सर मध्ये पाणी घालून मस्त वाटून घेतले.
आता पॅन मध्ये परत थोडे तेल गरम केले आणि त्यावर खडा मसाला टाकला. (तमालपत्र, दालचिनी आणि वेलची)
त्याचा वास दरवळल्यावर वाटण टाकले आणि एक उकळी आणली.
मग त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकले.
वरून थोडी कसूरी मेथी टाकली.
शेवटी एक उकळी आल्यावर मीठ आणि चिमूटभर साखर टाकली.
सगळे १२ - १५ मिनीटे शिजू दिले. बोनलेस चिकनचे तुकडे किती मोठे आहेत त्यावर तुमचा वेळ अवलंबून असेल. पण खुप जास्ती शिजवू नका नाही तर चिकन कडक व्हायला लागते.

चिकन तयार होत असताना मस्त जिरा पराठे भाजले. ते भाजून लगेच ताटात आणि चिकन व पराठे पोटात Wink

करून पहा आणि आवडलं तर सांगा !

green_Chicken_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांकरता
अधिक टिपा: 

१) हिरवं चिकन ही पाककृती आहे तिचा हिरवं कुंकू या चित्रपटाशी काहीही संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
२) सगळे जिन्नस अंदाजे आहेत, तुम्हाला आवडेल तशा प्रमाणात घ्यावेत Wink
३) ही चिकनची पाककृती आहे पण हीच कृती वापरून हिरवं पनीर, हिरवा बटाटा करता येईल. (बटाट्याकरता तो थोडा उकडून आणि परतून घेतला तर जास्ती चांगला लागेल )

माहितीचा स्रोत: 
असेच आपले स्वयंपाकघरातले प्रयोग
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सह दिसतय.. वाह..
येऊन गेली आधी पन पण फटू बघितल्याबगर पाकृत इंटरेस्टच नै येत राव..
रेस्पी अन फटू..दोनीबी खत्तम..

पुदीना खाउन तोंडाला वास येत नाही का रे ? <<< कोणाचे काय तर कोणाचे काय? >>> हायला आणि मी इथे समजत होतो की तोंडाला वास येऊ नये म्हणून लोक मिंट (पुदीना) खातात Lol

कंटाळा आला असेल तर हीच चटणी थोडा लिंबू रस घालून पोळीबरोबर खा आणि चिकन उद्या करू असं म्हणा >>>>:हहगलो:
मस्त हिरव चिकन

चटणीचा सदुपयोग करायला चिकन सुचले???!!!! ब्रेड काय सगळे मेले काय तुमच्या इथले??
(नाय म्हणजे नालेसाठी घोडा म्हण तू पार किरकोळीतच काढलीस!)

धनिया चिकन Lol

भारी दिसतय. लग्नानंतर एका महिन्यात रेसिपी करुन लिहायची वेळ आली. अरेरे!! Proud

छान.

मस्त आहे हे . जाम टेम्प्टींन्ग दिसतय .

अवांतर ,
आज मेट्रो मध्ये बाजूला बसलेला माणूस (बहुतेक)पेपरमिंट चघळत होता .
१० मि. प्रवासात जाम डोक उठलं

श्रीचा प्रतिसादातला प्रश्न आठवला मला Happy .

धनि , काल केलेलं बर्का हिरवं चिकनं . मस्त झालेलं .
आवर्जून सांगतेय इथे Happy . फोटु चिकन सुहाना मध्ये टाकलाय , तु पाहिलासच .

पुदीना अंमळ जास्तच पडला . चिकन शिजताना ,आमचे धनी कौतिकाने पातेल्यात डोकावले तर त्यांच्या नाकाला झिण्झिण्या आल्या .
पण खाल्लं त्यानी मुकाट्याने . पुढच्या वेळी पुदीना जरा बेताने टाक . फारच चव लागतेय म्हणाले Happy .

स्वस्ति Lol तुझं लोकेशन काय आहे मला माहिती नाही. पण भारतात असशील तर तिकडे पुदीन्याचा वास जास्त स्ट्राँग असतो त्यामुळे या प्रमाणात पुदीना जास्त झाला असं वाटलं असण्याची शक्यता आहे.

रमड , मी मुंबईत आहे. प्रमाण वगैरे असं नाही . वाटीभर पुदीना पेस्ट होती . सगळी नाही वापरली , अंदाजाने लावली . पण ती जास्त झाली . ईतर कशाचीच चव लागत नव्हती.
पुढच्यावेळी थोडं दही पण घालाव का ? कन्सिस्टंसी चांगली येईल असं वाटतयं .

पुदीना भरपुर पसरलाय बॅकयार्डात. भेळ आणि वेज सॅन्डविच बणवुन कंटाळा आलाय. एकदा बिर्याणीत टाकलेला.
हे नक्की करुन बघणार.

Pages