आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरबार बरोबर. दुसर्‍याचे आठवतोय.

हो, अप्रतिम इडली असायची.>> अजुन असते. Happy

पायोनियर डाईंगच्या बाहेरची बस. ती बहूतेक मेलडी मेकर्सची असावी. अनेक वर्ष होती तिथेच. त्याच्या समोरच एक आंबेकर नावाचा मित्र रहात असे. त्याच्या घरी जायचे मुख्य आकर्षण ही बस. Happy

दरबारचं मलई सँडविच! चौकातलं इराणी रिगल ना?

आहा, जुन्या वाडेश्वरची चव अजूनही आवडते. मुक्ता त्यांचंच हे नव्हतं माहिती.

>>>> एक टीपिकल इराणी पण होते चौकात त्यात. <<<<<
हो, अन १९८०-८५ दरम्यात तिथे गेम्सची मशिन बसवलेली होती. त्यात एक रुपयाची दोन का तिन नाणि टाकुन एक मिनिटाकरता कार रेस खेळता यायची स्क्रिन वर कार पळत असायच्या व खाली एक स्टिअरिंग सारखे व्हिल असायचे असे पुसटसे आठवते. तो गेम हे आकर्षण होते, पण त्याकाळी तिन रुपये एक मिनिटाला फार महाग होते.
शिवाय तिथे अजुनही एक मशिन होते, ज्यात गाण्यांच्या रेकॉर्ड प्लेट्स रचलेल्या असायच्या, असेच पैसे टाकुन आवडत्या गाण्याचा नंबर दाबला, की मशिन बरोबर ती रेकॉर्ड उचलुन लावायचा. Happy फार मोठे अप्रुप होते ते.

कान्द्या, बरोबर रे..... गाण्याच्या ग्रुपची बस होती ती. Happy तू म्हणालास म्हणून पायोनिअर डाईंगचे नावही आठवले.

इराणी वरून मारझोरिन आठवलं.
मारझोरिन ब्रेडच्या कडा काढून सँडविच बनवतात. लहान मुलांना भयंकर आवडणारा प्रकार आहे हा.
मारझोरिन मध्ये हादडून झालं की कयानीचा केक आणि श्रूस्बरी बिस्किटं घ्यायला जायचं. तसेच बुधानी चे वेफर्स, जे तेव्हा इतर कुठे मिळायचे नाहीत आणि कधीतरी महिन्यातून एकदाच एक पाकीट आणले जायचे.
घरी येऊन अगदी अस्सल पुणेकरासारखा कयानी केक चहात बुडवून खायचा.

१९८५-९० मध्ये भांडारकर रोड वरच्या बेकर्स बास्केटचे पण खूप कौतुक होते. तिथे तेव्हा शेंगदाण्याची पेस्ट्री मिळायची (जी आता मिळत नाही) आणि अतिशय ओरिजिनल (भारतीय चवीप्रमाणे बदल न केलेला) असा लेमन टार्ट (हादेखील आता मिळत नाही).

१९८५-९० मध्ये भांडारकर रोड वरच्या बेकर्स बास्केटचे पण खूप कौतुक होते.>>बेकर्स बास्केट ब्लु डायमंड का ताज ग्रुपचे होते ना.

बेकर्स बास्केटचे >रोजचं येणं जाणं असायचं बेकर्स बास्केट...... च्या समोरुन Happy
रोज ५८ नं च्या बस ने बेकर्स बास्केटच्या समोर गुडलक बस स्टॉप ला उतरायचं. गुडलक च्या गल्लीतून ग्राउंडच्या शेजारुन, पोस्ट ऑफिस कडून प्रभात रोडच्या गेटने शाळेत ! येताना परत हाच रस्ता. सायकल येई पर्यंत हेच रुटीन ! कधीतरी वाढदिवसाला बेकर्स बास्केटचाच केक हवा असा हट्ट करुन आणला होता. नंतर अनेक वर्षं वाढदिवसाला तोच केक असायचा.
भांडारकर रस्त्यावरची अजून एक जुनी आठवण म्हणजे कमला नेहरु पार्क ! महिन्यातून ४-५ वेळा तरी जायचोच तिकडे. मनसोक्त हुंदडून झालं की पार्कच्या समोर भेळ खायची . क्वचित कधीतरी रंगोलीत पावभाजी !

बेकर्स बास्केट !!आख्ख्या सात रुपयाना एक पेस्ट्री मिळायची अन ब्लॅक फॉरेस्ट ९ ला. (१९९२-९३ )
खूपच चैन केली वाटायच एक पेस्ट्री खाल्ल्यावर. Happy
गोखले इन्स्टिट्युट च्या बाहेर ची प्रियदर्शिनी टपरी हे नेहेमीच चहा , खाण्याच ठिकाण होतं. १ रुपाया कटींग चहा! आयुष्यात पहिला चहा मी तिथे आर्किटेक्चर दुसर्‍या वर्षाला प्यायला.

बेकर्स बास्केट ब्लु डायमंड का ताज ग्रुपचे होते ना.>> आधी होते आता राजेंद्र केळशीकर ओनर आहे अजून एक हिंदी भाषिक होता डायरेक्टर. ती कंपनी आम्ही incorporate केली होती. Happy त्याचा भटारखाना को. पार्क रोड वर होता. तिथे आत गेलच की घमघमाट यायचा. केळशीकर एकदम शांत धीर गंभीर व्यक्तिमत्व. तिथेच आमचा अजून एक क्लायंट होता, ओशो कम्युन Happy आत जाताना एवढी कसून तपासणी करायचे आणि ईतक्या सूचना द्यायचे. ईकडे तिकडे फिरायचे नाही, आत गेल्यावर डाव्या हाताला ऑफिस आहे तडक तिथेच जायचे, काम झाल की तिथून डायरेक्ट गेट वर यायचे ई. ई. को. पार्क पुण्याचा भाग वाटायचेच नाही.
ईथेच नाला पार्क आहे. नितांत सुंदर आणि शांत.

>>>बेकर्स बास्केट ब्लु डायमंड का ताज ग्रुपचे होते ना.>> आधी होते आता राजेंद्र केळशीकर ओनर आहे अजून एक हिंदी भाषिक होता डायरेक्टर. ती कंपनी आम्ही incorporate केली होती.

लंपन तुम्ही त्या केळशीकरांना विचारा ना की तो लेमन टार्ट आणि बटरस्कॉच (शेंगदाणे वाली) पेस्ट्री का बंद केली. आणि पुन्हा चालू करायला सांगा प्लिज.
मी ती आठवण आल्यापासून लेमन टार्टच्या रेसिपी वाचतिये. फारच मस्त असायचा तो.

टिळक रोडवरचं सईने उल्लेख केलेलं मुक्ता हॉटेल मला आठवतंय. तिथे संपुर्ण हॉटेल मध्ये पांढर्‍या प्लेन टाईल्स होत्या वरपर्यंत. त्यामुळे तिथे खायला गेलं की बाथरूमात गेल्यासारखं वाटायचं Proud

स्मरणरंजन ! या सर्व सुंदर आठवणी वाचते आहे.
एक मुंबईकर लहान मुलगी म्हणून आईवडिलांबरोबर पुण्याला अनेकदा येणं झालं सुटीत.
यातला एक दीर्घ मुक्काम कबीरबाग वसतीगृहात मुठा नदीच्या काठी होता.. एक शांत मंदिर, शेजारी पिकली फळं गाळणारं उंबराचं झाड व इतर गर्द हिरवाई ,पलिकडे रोडावलेला नदीचा प्रवाह. हिरवे नावाच्याच कुटुंबियांकडे सुरुवातीचा मुक्काम व अधूनमधून भेटी हे आठवतं . त्यांना दोन समवयस्क मुलं होती, पुणेरी स्मार्ट , त्यांची ‘अचानक भयानक ‘नावाची टीम होती.आमच्या मुठा नदीला मूठभरच पाणी असं ती ठसक्यात सांगायची .माझ्याबरोबर माझा भाऊ .खूप हुंदडणं ! पण खरं जायचं कारण वेगळंच होतं. गाचि ( गाडगीळ चिपळूणकर ) रेडिओज या नावाने व्यवसाय करणाऱ्या दोन इंजिनीअर्सना म्हणे हीलिंग इफेक्ट असलेल्या रेडिओलहरी सापडल्या होत्या. त्याची कमीअधिक तीव्रतेची शॉक ट्रीटमेंट माझ्या पायावर सुटीचा महिनाभर घेणे ! ( काही विशेष परिणाम नाहीच.)कुठेही काही नवीन उपचार कळले की तिकडे मला घेऊन धावणाऱ्या पालकांची नेहमीची दगदग, मग माझे नेहमीचे सर्जन डॉ. चौबळ यांची याबद्दल टीका ऐकून घेणे.
इतर दोन चार फेऱ्या सुटीतलं पर्यटन म्हणून ( किती माफक अपेक्षा आणि केवढा मोठा आनंद असायचा ) .. त्यातली एक युनिव्हर्सिटीजवळ माझ्या मैत्रिणीचे वडील श्री दुसाने यांची मुख्य ओव्हरसिअर म्हणून बदली झाली होती तिच्याकडे. मस्त दगडी व्हिक्टोरियन बंगला, युनिव्हर्सिटीचं दाट जंगल अवतीभवती. मैत्रिणीबरोबर पुन्हा तोच आवडता कार्यक्रम.तिच्या माझ्या भावाला बरोबर घेऊन खूप हुंदडणं !
नंतर तरुणपणी माझं लग्न होईपर्यंत मैत्रीण अंजली वैशंपायनकडे दर जानेवारीत माझी एक फेरी कोथरूडला ठरलेली .या मोसमात अंजू आणि माधव- दोघेही बँकर्स , पण पालीच्या गणेशोत्सवात नाटक बसवण्याच्या खटपटीत असत. ( अजूनही जमेल तसे असतात !). रात्रौ तालमींना जातायेताना पुण्याच्या बोचऱ्या थंडीवाऱ्यात माझं चादरीत गुंडाळलेलं गाठोडं माधवच्या मागे आणि दुसऱ्या स्कूटरवर अंजली!
खूप काही आठवतं आहे पण त्याहून अधिक विस्मरणात गेलंय . ठिकाणं , रस्त्यांची नावं अनेक खाऊ-जागांची नावं आता इथलं वाचून आठवताहेत. – जनसेवा दुग्धालय पूनमने लिहिलेलं वाचून एकदम आठवलं .आवडतं शहर होतं पुणं, घाटातले प्रवास सुंदर...नंतरच्या आयुष्यात मात्र अनेक वर्षात पुण्याला वेळ काढून असं यायला जमलं नाही.. सासवड साहित्य संमेलनात अंजलीकडेच एक धावती भेट झाली तितकीच..

मुक्ता मधे कॉफी फार छान मिळे , पण प्रेफरन्स बादशाहीच्या चहालाच असे. आम्ही एस पी कॉलेज मधे असताना (१९७८-८०) रोज बादशाहीत चहा घ्यायला जायचो ; रिसेस मधे. एकदा तिथे साक्षात रामदास कामत भेटले होते. मी लगेच त्यान्ची स्वाक्शरी घेतली होती. अजुन आहे माझ्या कडे.
पुण्यातल्या बहुतेक जुन्या वाड्यात विहिरी होत्या / आहेत. पेशवे काळात पुण्यात कात्रज बन्धारा बान्धला गेला आणी त्याचे पाणी जमिनीखालून दगडी बोगद्यातून हौदान्मधे खेळवले गेले आहे जसे कि सदशिव हौद , बदामी हौद , फडके हौद वगैरे ... त्या खेळत्या पाण्या मुळे सर्व विहिरीना १२ महिने पाणी असते. पानशेत धरण फुटले तेव्हा या पाण्यानेच पुण्याला तारले होते. तज्ञानी सान्गितले होते कि हे पाणी पुण्याला फारतर ५-६ महिने पुरेल पण ते त्या काळात कधीच सम्पले नाही अशी आठवण आई सान्गते.

मार्झ ओ रीन मधे अजुनही जायला आवडते.
तिथेच पुढे कॅफे नाझ होते जिथले सामोसे फार फेमस होते , ते कुणाला आठवतात का ?

शिंदे आळीमधे केळीच्या वखारी होत्या ना (वखारीच म्हणतात ना) माझ्या आठवणी प्रमाणे मंडई मागच्या बुरुड आळीतून शिंदे आळीकडे जाताना होत्या त्या वखारी.
हिरवी कच्ची केळी म्हणजे त्याचे घडच्या घड चढवले उतरवले जायचे ट्रकच्या ट्रक भरभरून.

तिथेच पुढे कॅफे नाझ होते जिथले सामोसे फार फेमस होते , ते कुणाला आठवतात का ? >>> हो खिमा समोसे. भारी असायचे. नंतर दोन भावांनी दोन वेगळी वेगळी दुकानं काढली बहुतेक नाझ आणि महानाझ. त्यातलं एक बंद पडून तिथे बरिस्ता झालं होतं. आता काय आहे माहित नाही. कॅफे नाझ, मार्झोरीन, बुधानी, कयानी, दोराबजी हे कॅंप भागातील आयकॉनिक दुकानं / कॅफेज होते

त्या खुन्या मुरलीधराच्या वाड्यात खरे आडनावाचे वैद्य रहात. ते कावीळ स्पेशलिस्ट असावेत. कोणालाही कावीळ झाल्याची शंका आली की सुर्यास्ताच्या आत त्यांच्याकडे घेऊन जायचे. मग ते समोरच्या जिन्याच्या पायरीवर उभं करून सूर्यप्रकाशात डोळे बघायचे आणी काविळीचं निदान झालं की दुसर्या दिवशी त्यांच्याकडे दोन डबे घेऊन जायला लागायचं. एका डब्यात हिरव्या रंगाच्या पाल्याचं एक औषध (जे घशाखाली उतरायचं नाही) एका वेळी सगळं घ्यायचं आणी दुसर्या डब्यात गायीचं दूध. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत काहीही खायचं नाही. मग ४ वाजता ताजा भात आणी गायीचं दूध. उरलेल्या दिवसात भूक लागली तर तेच गायीचं दूध.

ह्या एका आठवणीमुळे, खुन्या मुरलीधराजवळ रहात असूनही, कावीळ न होता (तो वाडा सुद्धा बाहेरून पिवळ्याच रंगाचा होता) त्या वाड्यात जाता येतं असं कधी वाटलच नाही. Happy

मी त्या दुधाचे किस्से ऐकले होते आणि लहानपणी दूध अजिब्बत आवडत नसे. त्यामुळे कावीळ झाल्यावर मी लगोलग खरे वैद्यांकडे जाणार नाही हे जाहीर केलं. माझा 'दृढनिश्चयी' स्वभाव माहित असल्याने सुदैवाने कुणी मला समजावायच्या फंदात पडले नाही. Proud

अजूनही वाडेश्वर म्हणलं की बाजीराव रोडचंच अध्याहृत असतं आमच्या घरी. Happy पुण्यात आलो की आम्ही एकदा तरी चक्कर मारतोच इडलीसाठी तिथे.
त्यामानाने केळकर संग्रहालयापासच्या बापट उपहारगृहातले पदार्थ सो सो असतात त्यामुळे तिथे जाणे क्वचित होते.

आणि भातुकली तु बा शिवाय नाही हेच खरे.

"मी त्या दुधाचे किस्से ऐकले होते " -गायीचं दुध ईतकं बेचव असतं आणी ते एक दिवसाचं डाएट ईतकं जालीम होतं की 'आवडीच्या गोष्टी हव्या तेव्हा न मिळू देणारी व्यक्ती म्हणजे आई' व्याख्येला अनुसरूनच गायीला गोमाता म्हणत असावेत असं वाटायचं.

फेरफटका, तोच वाडा! त्यांची पुढची पिढी ते करते का माहीत नाही. पण तो काविळीवरचा उपाय अगदी जवळच्या नातेवाईकांना मुंबईवरून खास त्याकरता पुण्याला आणून केला होता आणि एकदम लागू पडला होता. वरती वर्णन केले आहे तसेच होते साधारण.

एका डब्यात हिरव्या रंगाच्या पाल्याचं एक औषध (जे घशाखाली उतरायचं नाही) एका वेळी सगळं घ्यायचं आणी दुसर्या डब्यात गायीचं दूध. >>> हे माहित आहे मला. माझ्या एका मैत्रिणीने ते औषध घेतले होते. तो हिरव्या रंगाचा पाला म्हणजे बहुतेक एरंडाची पाने आणि गायीचे धारोष्ण दूध!!

"वरती वर्णन केले आहे तसेच होते साधारण." - साधारण नाही रे. तंतोतंत तसच होतं (ह्यातली वेदना समजावून घे) Wink

त्या रस्त्याला पॅरलल जो रस्ता होता, तिथे अ. वि. गृह (नंतरचं पुणे विद्यार्थी गृह) च्या मागच्या बाजूला एक चहा, पोहे वगैरे मिळणारी टपरी होती. तिथे 'रविवारी बंद' ही पाटी आठवते. चहा, पोहे, क्रीमरोल ई. पदार्थ विकणारं दुकान रविवारी बंद ठेवणं म्हणजे अगदीच बिझनेस मॉडेल-101 होतं.

पुढची पिढी औषधं देते माहित आहे, पेशंटला गायीचं दूध पुरवते का माहित नाही Proud जोक्स अपार्ट, खरे वैद्यांचा मुलगा वैद्य आहे पण तो संस्कृतज्ञ पण आहे आणि करिअर संस्कृतच्या अभ्यासातच करतो आहे.

माझ्या मित्राचा किस्सा जबरी आहे याबद्दल. गुरूवार पेठेत राहणारा बोहरी समाजातील तो - म्हणजे सपे दुनियेशी एकदम अपरिचित. पवई ला आयआयटी मधे परीक्षा जवळ आली असताना त्याला कावीळ झाली. तेथे रेसिडेन्शियल डॉ असतो का माहीत नाही पण कोणत्यातरी तेथील डॉ ने त्याला सांगितले की हे वर्ष विसर, परीक्षेपर्यंत तू बरा होणार नाहीस. मग हा पुण्यात आला. त्याला कोणीतरी खर्‍यांबद्दल सांगितले. त्याने ट्रीटमेण्ट चे जे वर्णन केले ते महाधमाल होते - (औषधाच्या विविध इफेक्ट्स बद्दल Happy ). पण तो अपेक्षेपेक्षा बराच लौकर बरा झाला आणि परत गेला. पुन्हा त्या मूळच्या डॉ ला जाउन भेटला तर तो उडालाच.

त्याचा आणखी एक अवांतर किस्सा - बी टेक झाल्यावर टाटा मधे नोकरी करतो म्हंटल्यावर त्यांच्या समाजाच्या धर्मगुरूंकडे त्याला घेउन गेले. त्याने व इतर ज्येष्ठ लोकांनी त्याला समजावायचा प्रयत्न केला की तुला पाहिजे तेवढे कर्ज देतो पण धंदा कर. नोकरी करू नको.

त्यादृष्टीनेही या वयाच्या मुलांच्या बाबतीत सपे मधे जी चर्चा झाली असती त्याच्या उलट होते हे Happy

जुन्या पुण्यातही इंग्रजी शब्द वापरायचा फार सोस होता. मुंबईला हमखास बाँबे म्हणायचे ते पुण्यातच. खुद्द मुंबईत रहाणारे मराठी लोक मुंबई म्हणायचे पण पुण्यात त्यांना "बाँबेला रहातोस का? " असेच.
अर्धवट मराठी अर्धवट इंग्रजी अशी नावे पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. पेरुगेट, स्वारगेट, म्हसोबा गेट, फूलगेट इ.
सिटी पोस्ट हे पण एक अजब नाव. खुद्द त्या पोस्टात जायचा प्रसंग कमी पण एक भौगोलिक खूण म्हणूनच तो प्रकार वापरला आहे.

डेक्कन जिमखाना तर धेडगुजरीपणाची कमाल आहे! संस्कृत, उर्दू, इंग्रजी, ग्रीक आणि फारसी अशा अनेक भाषातील शब्द जोडून ते नाव बनवले आहे. आणि ते शेकडो वर्षे वापरात आहे.
लकडी पूल हे पण एक अजब नाव. अस्सल मराठी भागात असूनही लकडी का म्हणायचे? लाकडी का नाही? एटी फीट रोड हा इंग्रजी शब्द मी पुण्यातच ऐकला आहे. जंगली महाराज किंवा अलकाच्या समोरचा तो रस्ता (शास्त्री मार्ग?) त्यालाही ते वापरले आहे.

पोहण्याच्या तलावाला टँक म्हणणारे पुणे हे भूतलावरील बहुधा एकमेव शहर असावे! टिळक टँक, शाहू टँक वगैरे. हा शब्द कुठून आला आणि त्याचा पोहण्याचा तलाव असा अर्थ का झाला माहित नाही. अमेरिकेत टँक म्हटले की लोकांना रणगाडा आठवतो!

अस्सल मराठी वातावरण असणार्या कॉलेजांची नावे इंग्रजीत. एस पी, बी एम सी सी, फर्ग्युसन, एम ई एस. , सीओ ईपी, युनिवर्सिटी आणि त्यामानाने कॉस्मो असणारे मात्र वाडिया!

मराठीचा जाज्वल्य अभिमान बाळगणारे पुणे असे इंग्रजीबद्दलही कौतुक राखून होते.

हो मुंबई ला बॉम्बे म्हणजे हा एक कूल फॅक्टर असल्याचे लक्षात आहे.

लकडीपूल आत्ता जो आहे तेथे पूर्वी लाकडी पूल होता असे वाचले आहे. त्याकाळच्या फारसी वगैरे भाषांचा प्रभाव पाहता ते साहजिक वाटते.

इतर शहरांत पोहण्याच्या तलावाला टँक म्हणत नाहीत का?

पुण्यात लकाकि, केप्र ई. "मराठी" शॉर्ट फॉर्म ही वापरत Happy

Pages