तीन शतशब्दकथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 14 March, 2017 - 08:09

१. शुभ्रक्रांती

“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.”

“शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.

मध्यरात्रीच्या सुमारास थकलाभागला जॉन घरी आला. हॉटेलमधून आणलेलं जेवण त्याने ताटात वाढलं. शुभ्रक्रांती ध्वजांच्या ढिगाऱ्यांतून मार्ग काढत तो अडगळीच्या खोलीत आला. अंधुक उजेडात अंगाचं मुटकुळं करून ती बसलेली होती. त्याने तिचा थरथरणारा हात हातात घेतला,

“घाबरू नकोस, मी तुला काहीच होऊ देणार नाही.”
अन ती गोरीपान तरूणी खुदकन हसली.

------------------------------------------------------------

२. प्राणीसंग्रहालय

“तो कशाचा पिंजरा आहे?” पाहुण्यांनी एका लोखंडी पिंजऱ्याकडे बोट दाखवत विचारलं.

“ती तर आमच्या प्राणिसंग्रहालयाची शान आहे. चला दाखवतो.”

सगळेजण पिंजऱ्याजवळ गेले.

“गेल्यावर्षीचं युद्ध जिंकल्यावर आम्ही तिथून या माकडांना पकडून आणलं होतं. फारच दुर्मिळ प्राणी आहे हा.”

“अरे वा! जवळ जाऊन बघतो.”

पाहुणे पिंजऱ्याजवळ गेले तळहातावर चणे घेऊन हात पुढे केला. लगेचच एका प्राण्याने त्यांचा हात आत ओढला. सगळेजण पुढे धावले अन पाहुण्यांची कशीबशी सुटका करून घेतली. पण ओरखड्यांमुळे हातांवर जखमा झाल्याच.

पाहुणे भयंकर चिडले.
“मॅनेजर कुठेय? चांगली अद्दल घडवतो या माकडांना.”

“नक्कीच. पण आधी आपण डॉक्टरकडे जाऊ.”

जाताजाता पाहुण्यांनी आपल्या सहा डोळ्यांनी बघितलं. पिंजऱ्याच्या पाटीवर लिहलेलं होतं-

‘मनुष्यप्राणी, पृथ्वी.’

-----------------------------------------------------------
३. डॅमेज पीस

गणेशोत्सवानिमित्त सगळी दुकानं सजली होती. सुबक, सुंदर, चकचकीत मूर्तींनी इंचनइंच व्यापला होता. लोक आनंदाने अन भक्तिभावाने बाप्पांच्या मूर्ती खरेदी करत होते.

त्या परिपूर्ण मूर्तींपासून जरा बाजूला सोंड तुटलेली एक मूर्ती ठेवलेली होती. दुकानभर भिरभिरणाऱ्या नजरा त्या मुर्तीवर पडण्याअगोदर सोंडेवर पडायच्या अन लगेचच दुसरीकडे वळायच्या.
बऱ्याच वेळाने –

“ही मूर्ती कितीला दिलीत?”

“साहेब, ती नका घेऊ. डॅमेज पीस आहे तो.”

“मला हीच हवीये. किंमत सांगा.”

“तशी शंभर रुपये आहे पण ही डॅमेज असल्यामुळे पन्नासच द्या.”

ग्राहकाने शंभरची नोट काढून दुकानदाराच्या हातावर ठेवली.
“शंभरच घ्या. पन्नास परत देऊ नका.”

दुकानदार ती मूर्ती घेऊन लंगडत चालणाऱ्या धडधाकट डोक्याच्या ग्राहकाकडे बराचवेळ भारावलेल्या नजरेने बघत राहिला.
-----------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks everybody Happy

तिसरी कथा पेट शॉप, लंगडे कुत्र्याचे पिल्लू, आणि त्याला विकत घेणारा अपंग मुलगा अशा सेटिंग मध्ये वाचली आहे.

तिसरी आवडली. तिचे शीर्षक मराठीत असते तर अधिक आवडले असते.
इनामदारांच्या प्रतिसादांशी सहमत.

शीर्षक मराठीत असते तर अधिक आवडले असते.
>> मूर्तीविक्रेत्यांना तुटफूट झालेल्या मुर्त्यांना डॅमेज पीस असं म्हणताना ऐकलं आहे ( त्यांच्या नेहमीच्या वापरातील शब्द आहे हा ) म्हणून तो वापरला

अ‍ॅस्ट्रोनाट विनय,
तुम्हाला संपर्कातून एक ईमेल पाठवलं आहे. कृपया वाचून रिप्लाय करावा ही विनंती.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

इनामदार यांचा आटापिटा नक्की कश्यासाठी आहे ते कळले नाही.

विनय यांनी शतशब्दकथा लिहिल्याने मराठीतले किंवा मायबोलीवरचे सर्व उत्तमोत्तम लेखक आपला जॉनर सोडून एकदम लघुकथा किंवा शतशब्दकथा लिहायला घेतील अशी भिती त्यांना वाटू लागली आहे का? कि मराठीत काही नवीन प्रकार येऊच नये असे वाटते आहे? (खरे तर शतशब्दकथा हा प्रकार याआधीच मराठीत आलेला आहे.) एखाद्या कवीवर तुम्ही 'चारोळी लिहू नका, मुक्तछंद लिहू नका, हायकु लिहू नका' अशी सक्ती कराल का? कराल तर का कराल? एखाद्याने कोणत्या प्रकारे व्यक्त व्हायचे हे तुम्ही का सांगायचे?

अवांतरः विनय चांगले लिहितात म्हणून त्यांच्याकडून इतक्या अपेक्षा असाव्यात. अन्यथा माबोवर रोमन मराठीत लिहिणारे, व्याकरणाचा बोर्‍या उडवणारे, क्रमशः लिहून वर्षानुवर्षे कथा अपूर्ण ठेवणारे, लिहिताना बेसिक परीच्छेद सुद्धा न पाडणारे, शंभर शब्दाचा जीव असलेल्या कथेत बादलीभर पाणी ओतून सहस्त्रशब्दाची करणारे असे अनेक लेखक आहेत. परंतु त्यांच्या कथेवर कोणी असे चॅलेंज करणारे आणि तुम्ही चूकताय हे सांगणारे कोणी पाहिले नाहीत अजून मी.

विनय तुम्ही लिहित राहा. मला तुमच्या तिन्ही कथा खूप आवडल्या. पण समहाऊ मला तिन्हींचा शेवट आधीच प्रेडिक्ट करता आल्याने जरा मजा कमी आली.

ही भविष्यातली काल्पनिक कथा आहे.
जगाच्या पाठीवर कुठेतरी वांशिक हमले सुरू होतात. यावेळी मात्र कृष्णवर्णिय वरचढ ठरतात.

अर्थात दोन्ही बाजूंचे बरेच लोक मारले जातात पण त्यातल्या त्यात गोरे लोक जास्त, इतके की एका विशिष्ट भूभागातून त्यांचा संपुर्ण विनाश होतो.
जॉन हा कृष्णवर्णिय आहे. त्याच्या मनातही गोऱ्यांबद्दल प्रचंड राग असणार म्हणूनच त्याने युद्धात मोठी भुमिका बजावली. पण असं असूनही त्याने स्वतःच्या घरात एका गोऱ्या तरूणीला लपवलंय, तो तिच्यावर प्रेम करतो.

मनुष्यस्वभाव विरोधाभासांनी भरलेला आहे आणि प्रेम वेडं असतं असं म्हणतात.
पुढे कदाचित जॉन पकडला जाईल, दोघे पळून जातील किंवा प्रेमामुळे जॉनचं विचारपरिवर्तन होईल आणि तो वांशिक भेद मिटवायला मदत करेल. पण एक मात्र नक्की, जिथे प्रेम आहे तिथे आशा जिवंत आहे.

विनय तिन्ही गोष्टी फारच छान, थोडक्या शब्दात फार विचार करायला लावणार्‍या. खास करून शेवट.

तुमचा १२:४० चा प्रतिसाद पण मस्तच आहे.
>>मनुष्यस्वभाव विरोधाभासांनी भरलेला आहे आणि प्रेम वेडं असतं असं म्हणतात.
पुढे कदाचित जॉन पकडला जाईल, दोघे पळून जातील किंवा प्रेमामुळे जॉनचं विचारपरिवर्तन होईल आणि तो वांशिक भेद मिटवायला मदत करेल. पण एक मात्र नक्की, जिथे प्रेम आहे तिथे आशा जिवंत आहे. >> या ओळी फारच भावल्या.

Happy

जाताजाता पाहुण्यांनी आपल्या सहा डोळ्यांनी बघितलं. पिंजऱ्याच्या पाटीवर लिहलेलं होतं-
‘मनुष्यप्राणी, पृथ्वी.’........

lay bhari ..... awadali ...

कथा आवडल्या. फक्त एक,सुबक, सुंदर, चकचकीत मुर्त्यांनी इंचनइंच व्यापला होता>>एक मूर्ती, अनेक मूर्ती. मूर्तीचे अनेकवचन मूर्ती च होते.

धन्यवाद ट्युलिपजी,

मुर्त्या ऐवजी मुर्ती अशी सुधारणा केली आहे Happy

मस्त..
वाचताना मला हेमिन्ग्वे यांच्या 6 word novel (for sale:baby shoes that never worn) याची आठवण झाली.
अर्थात इथे १०० शब्द वापरले आहेत. मला सांगावस वाटते की हा एक गद्य प्रकार आहे. दर वेळी शब्द संख्या मोजणे नसुन ,कमी शब्दांमधे गहन अर्थ मांडणे हा त्या मागचा मुख्य उद्देश असतो. सध्या इंग्रजी मधे या प्रकारचे लिखाणा करीता स्वतंत्र पेज पण बनवले आहेत. (eg: terribly tiny tales)
आणि या लेखात विनय यांनी त्यांचा आशय वाचकांपर्यन्त नीट पोहचवला आहे. तुमचे अभिनंदन की वेगळा प्रकार तुम्ही यशस्वीपणे हाताळलात.

baby shoes that never worn

Buy १ get १ free, thanksgiving deal मिळाली- selling second pair असा पण असू शकते ना?

तिन्ही कथा आवडल्या.... पियुंशी सहमत.... साहित्यप्रकारांना देश, भाषा कींवा वेळेची खुळचट बंधने नसावित त्याने साहित्याची हानिच होते, अस माझ वैयक्तिक मत आहे....

Pages