२६ जानेवारी २०१७ गणतंत्र दिन परेड @ राजपथ,दिल्ली भाग 1

Submitted by sariva on 16 March, 2017 - 06:50

शाळेत असताना 15 ऑगस्टपेक्षाही 26 जानेवारीची मी अगदी आतुरतेने वाट बघत असे.कारण प्रभात फेरी बरोबरच यावेळी सुमारे दीड-दोन तासांचा शिस्तबध्द कार्यक्रम आम्ही सादर करत असू व त्याची तयारी २ महिने आधीच उत्साहाने सुरू होई.शाळेच्या उत्कृष्ट बँडपथकाच्या गाण्याच्या तालावर प्रमुख पाहुण्यांसमोर केलेला शिस्तबध्द व तालबध्द मार्च पास्ट,मॅटवरील उड्या,वर्तुळाकार पेटत्या रिंगमधून मारलेल्या उड्या,मल्लखांब,पिरॅमिडस्,लेझीम,देखणी कवायत-त्यात झेंडे,घुंगुरकाठी,डंबेल्स...वगैरे वगैरे.या सर्वाला मिळालेली आमच्या सरांच्या सुंदर धावत्या वर्णनाची जोड...प्रेक्षक अगदी खूष होऊन जात.
शालेय जीवन संपेपर्यंत दूरदर्शनचा फारसा प्रसार झाला नव्हता.पुढे दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात गणतंत्र दिवसाचा देखणा समारंभ घरबसल्या बघता येऊ लागला व आवडूही लागला.कधीतरी तो प्रत्यक्ष बघायला जावा ही इच्छा मनात कुठे तरी मूळ धरू लागली होती.
ती इच्छा पूर्ण व्हायचा योग यावर्षी-2017 मधे अखेर आला.बंगलोरच्या माझ्या धाकट्या मुलाने या वर्षी हा समारंभ प्रत्यक्ष बघण्याचं ठरवलं.मोठा मुलगा दिल्लीतच असतो.मग आम्हीही जाण्याचा बेत आखला. औरंगाबादहून आम्ही दोघे,पुण्याहून धाकटी बहिण व छोटा भाचा,बंगलोर-दिल्लीहून दोन्ही मुले असं 6 जणांनी त्यावेळी एकत्र यायचं दिवाळीनंतर ठरवलं व त्यानुसार लगेच रिझर्वेशन्स केली.26 जाने.च्या कार्यक्रमाची तिकिटे 10 जाने.पासून ऑनलाईनही उपलब्ध होणार होती.पण बहिणीच्या अगदी जवळच्या ओळखीमुळे-जे नेव्हीत उच्चपदस्थ आहेत; आम्हाला व्ही.आय.पी.पासेस मिळाले व आम्ही अगदी खूष झालो.सर्व घटना अगदी अनुकूल घडत होत्या.मग आम्ही अगदी आतुरतेने 26 जाने.ची वाट पाहू लागलो.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा कार्यक्रम दूरदर्शनवर पाहिलाही असेल!पण हा दिमाखदार सोहळा इथल्या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात प्रत्यक्ष पाहण्याची सर कशालाच नाही. मी तिथे जे पाहिले,अनुभवले;ते तुमच्यापर्यंत पोहोचवावे असे मात्र तीव्रतेने वाटले,म्हणून हा लेखनप्रपंच!कॅमेऱ्याला परवानगी नव्हती,त्यामुळे सर्व फोटो मोबाईलनेच काढले आहेत.अर्थातच त्याच्या गुणवत्तेला बऱ्याच मर्यादा आल्या. चार्जिंग करता येणार नव्हते,म्हणून मोबाईलची बॅटरी पुरवून फोटो काढणेही आवश्यक होते.किती क्षण टिपण्यासारखे असणार आहेत;याचाही अंदाज नव्हता.तरीही बहुतांश फोटो मी/आम्ही काढले आहेत.अगदी गरज भासेल तेथेच दूरदर्शनच्या क्लीपमधील screen shots देणार आहे.
तिथे एकापाठोपाठ दृश्ये समोर येत असतात, माहिती एकीकडे सांगितली जाते,पण काय बघू,काय नको असे होऊन जाते व फक्त तेच करू शकतो आपण.पेन वगैरेलाही परवानगी नव्हती. त्यामुळे सर्व डिटेल्स लक्षात राहणे शक्यच नव्हते.
नंतर आठवणींना उजाळा मिळवायला सोपे म्हणून मी फोटो मात्र काढले.कायकाय व कसे हायलाईट करायचे;याचा प्लॅन मात्र एकीकडे त्याच वेळी मनात तयार होत होता.आपण जे पाहिले,ते जास्तीत जास्त इतरांपर्यंत पोहोचवायचेच हे मनात होते.
तुम्हा सर्वांशी हा अनुभव शेअर करावासा वाटला.नुसते फोटो बघताना interest वाटणार नाही; म्हणून तिथे मिळालेली कार्यक्रम पुस्तिका,थोडेसे माझे निरीक्षण व नेटवरचा अधिकृत सरकारी source यांच्या आधारे एकूणच अनुभवाचे संकलन,पूर्ण कार्यक्रमाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन मी केले आहे.
सारिवा (मानसी पटवर्धन)
आभार:
1 सरकारी माहितीपुस्तिका
2 दूरदर्शन राष्ट्रीय प्रसारण
३ आमचे होस्ट
औरंगाबादहून निघतानाच एअरपोर्टवरची नेहमीपेक्षा अत्यंत कडक असलेली सुरक्षा व्यवस्था 26 जाने.आल्याची जाणीव करून देत होती.अर्थात ही सिक्युरिटी आवश्यकच होती. दिल्ली विमानतळावरही प्रशिक्षित श्वानाने दर्शन देऊन वातावरणनिर्मिती केली होती.

दिल्ली विमानतळावरील गणतंत्र दिनाचे स्वागत करणारे देखावे लक्षवेधक होते.

दिल्ली विमानतळावर गणतंत्र दिवसाचे स्वागत

रस्त्यांवरही सजावट दिसत होती

डिफेन्स कॉलनीतील परिचितांकडेच आम्ही उतरलो.दुसऱ्या दिवशी किती वाजता,कसे निघायचे वगैरे प्लॅनिंग रात्रीच केले होते.मन अतिउत्साहित होते.कार्यक्रमस्थळी काय काय चालणार नाही (prohibited items)याची फोटोयादी जाहिरात स्वरूपात सर्व वृत्तपत्रांत होतीच,शिवाय रस्त्यांवरही त्याचे बॅनर्स लावलेले होते.पर्स,हँडबॅग,खाण्याचे पदार्थ,पाणी/इतर द्रव पदार्थ,कोणत्याही धारदार वस्तू,एवढंच नाही तर पेन व कॅमेरा यांना सुध्दा परवानगी नव्हती.आता चांगले फोटो काढता येणार नाहीत या विचाराने मन जरा खट्टू झाले.पण सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायला मिळणार आहे हे भाग्य काय कमी आहे,असाही विचार मनात आला.यादीत मोबाईलचा उल्लेख नव्हता,त्यामुळे प्रत्येकाने मोबाईल बरोबर घेण्याचे ठरविलेजर त्यालाही परवानगी मिळाली नाही;तर ड्रायव्हरबरोबर सर्वांचे मोबाईल परत पाठवायचे ठरले.

ठरविल्याप्रमाणे पहाटे लवकर उठून सगळे आवरले,थोडेफार खाल्ले व कार्यक्रमाला जाण्यासाठी सज्ज झालो.विविध मेडल्सने शोभून दिसणाऱ्या कडक युनिफॉर्ममधे तयार झालेल्या आमच्या host ना पाहून घरापासूनच छान वातारणनिर्मिती झाली होती!बाहेर येऊन पाहतो,तर आदल्या रात्री पाऊस येऊन गेल्याच्या खुणा,धुके व काहीसे ढगाळ वातावरण!रात्रीच्या पावसाचा आम्हाला पत्ताच नव्हता लागला!सुस्नात रस्ते व वृक्षराजीही जणू गणतंत्रदिनाच्या स्वागताला सज्ज झाली होती!प्रसन्न,सुखद वातावरणात आम्ही निघालो.व्ही.आय.पी.पास असल्यामुळे आम्ही गाडीतून थेट कार्यक्रम स्थळापर्यंत जाऊ शकलो.पण वाटेत थंडीची पर्वा न करता खूप दूरदुरून उत्साहात राजपथाकडे निघालेले आबालवृध्द नागरिकांचे लोंढेच्या लोंढे दिसत होते.काहींनी तर छोट्या मुलांना खांद्यावरही घेतले होते.अगदी भारून टाकणारे वातावरण होते.सगळीकडे सुरक्षा रक्षकांची सुरक्षेसाठीची अत्यंत कडक अंमलबजावणी चालू हाेती. रात्रभर ते कार्यरत असावेत.जागोजागी त्यांना चहा-बिस्किटे पुरवत होते.
आमचीही 3 ठिकाणी सुरक्षा पडताळणी झाली.मोबाईलला परवानगी मिळाली,पण तो मोबाईलच आहे ना,हे पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तो ऑन-ऑफ करून दाखवावा लागत होता.
पासवर 9-15 पर्यंत यावे,असे लिहिले असले,तरी 8 पर्यंत सगळ्या जागा भरतात,म्हणून आम्ही सकाळी 6 च्या सुमारासच घरून निघालो.सिक्यूरिटीचे सर्व सोपस्कार आटोपून 7-30च्या सुमारास स्थानापन्न झालो.चांगले दिसावे व फोटो काढता यावेत म्हणून अगदी समोर बसण्यापेक्षा जरा उंचावर बसलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान, खरं तर या मिरवणुकीबद्दल फारसे काही माहीतहि नव्हते. खूप वर्षांपूर्वी डिसेंबर मधे दिल्लीत होतो, तर तेव्हापासूनच तयारी चालू होती आणि सुरक्षा अत्यंत कडक होती, त्यामुळे थोडं परकेपण जाणवले होते.
या लेखामुळे मात्र अगदी जवळून ओळख होणार आहे.

मस्त आहे हे , तुमची लेखनशैली सुद्धा आवडली, राग मानणार नसाल तर एक सल्ला देतो, गणतंत्र दिवस लिहिलेत ते 'प्रजासत्ताक दिवस' करा, आपल्या मराठीत प्रजासत्ताक दिवस/दिन म्हणतात, मराठीत वाचताना ते जवळचे वाटते असा एक आपला समज अन वैयक्तिक अनुभव आहे. Happy