पद्मा आजींच्या गोष्टी १६ : निग्रहाचे पारितोषिक

Submitted by पद्मा आजी on 15 March, 2017 - 01:22

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

मी आज तुम्हाला माझ्या काकांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.

माझे आजोबा, वडिलांचे वडील, गेले तेव्हा त्यांच्या पश्चात माझे वडील धरून सहा भाऊ, दोन बहिणी, आणि आजी होती. माझे वडील सगळ्यात मोठे. त्यामुळे साहजिकच बरीचशी जबाबदारी त्यांच्यावर पडली. माझे वडील तेव्हा वकील होते अमरावती कोर्टात.

त्यांचे मधले भाऊ -- त्यांचे नाव होते नरहरी वासुदेव पाळेकर (ज्यांना आम्ही नरु काका म्हणायचो)

तर नरु काका शिक्षण झाल्यावर वडिलांना म्हणाले, "मला शाळा काढायची आहे."
वडील म्हणाले, "शाळा? अरे बाबा, फार त्रास आहे त्याच्यात. तू हुशार आहेस. दुसरे काहीतरी कर. सरकारी नोकरी हि मिळेल."

पण नरु काकांना शाळाच काढायची होती. त्यांचा कुठला तरी एक मित्र होता गोंदियाचा. त्याच्याशी बोलताना त्यांना समजले होते कि गोंदियाला चांगली शाळा नव्हती म्हणून मुलांना शेजारच्या गावी जाऊन राहावे लागे म्हणून त्यांनी ठरविले होते कि, "गोंदियाला शाळा नाही म्हणून तिथे काढली तर सगळ्यांना फायदा होईल." गोंदिया गाव जवळच होते अमरावती पासून.

वडिल काय बाकी पण बऱ्याच लोकांनी त्यांना प्ररावृत्त करण्याचा प्रयत्न केला. कारण सगळ्यांना माहित होते कि नरु काकांची प्रवृत्ती शासक नव्हती. आणि शाळा काढायची म्हणजे सतराशे साठ कामे.

पण नरु काकांचा निश्चय पक्का होता.
त्यांचा निग्रह बघून वडील म्हणाले, "ठीक आहे. काढ तू शाळा. मी करतो तुला मदत जी पाहिजे ती."

मग नरु काका गेले गोंदियाला. सुरुवातीला शाळेला चालेल अशी जागा हि मिळेना. मग कशीबशी एका वाड्यात मिळाली. दोन खोल्या होत्या. तिथेच एक दुसरा शिक्षक पण सापडला. काही वेळा वडील पण जाऊन काही कामे करीत. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली.

मग नवीन जागा शोध. खर्च वाढला. पण नरु काकांची प्रवृत्ती वेगळी होती त्यामुळे फी काही वेळेवर जमा व्हायची नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा खर्चाला किंवा बाकीच्या शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नसायचे. तेव्हा वडील पैशाचीही मदत करायचे वेळोवेळी.

त्या वेळेची एक मजेदार गोष्ट. सारखा वडिलांना त्रास नको म्हणुन नरु काकांनी एका सावकाराकडून कर्ज घेतले. ते काही वेळेवर फेडले नाही. म्हणून तो सावकार त्याच्या मुलाला पाठवायचा वसुली साठी. तो मुलगा यायचा आणि काकांचा वेळ खायचा. म्हणून त्यांनी काय केले, त्या मुलाला म्हणाले, "तू बसतो आहेस येथे, तर वर्गात येऊन बस, म्हणजे उगाच बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा निदान मी माझे शिकवण्याचे काम तरी चालू ठेवतो. "

मग तो मुलगा बसला वर्गात. एक दिवस, दोन दिवस. काकांनी बघितले आणि त्याला म्हणाले, "तुला आवड दिसते आहे. रोज येत जा."
तो मुलगा पण रोज आला आणि बसायचा वर्गात पाठीमागे.

मग एकदा तो सावकार आला शोधात मुलाच्या. म्हणाला, "कुठे आहे? कुठे टिवल्याबावल्या करतो आहे बघतोच आज."
काकांनी त्याला नेले वर्गात. तर मुलाला तेथे बघून चकित.
म्हणाला, "अहो, तुम्ही काय जादू केली. मी त्याला शाळेत जा जा म्हणून थकलो आणि हा इथे चोरून शाळेत येतो आहे. तुम्ही काहीतरी चांगले करता आहेत."
मग त्या सावकाराने बरीचशी रक्कम कमी केली आणि कर्जाचा दरही कमी केला.

अशा अनेक अडचणीतून काका मार्ग काढत राहिले. पण हळूहळू त्यांनी शाळा चांगली वाढवली.

आणि हे नुसत्या गोंदियाच्या लोकांच्याच नाही तर दिल्लीतल्या हि लोकांच्या लक्षात आले.
म्हणून त्यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या कामासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हातून उत्कृष्ट शिक्षक म्हणून सुवर्णपदक मिळाले.

त्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले होते.
परत आल्यावर ते वडिलांना म्हणाले कि तुझ्या प्रोत्साहनाने हे शक्य झाले.

वडील त्यावर म्हणाले, "हे फळ तुझ्या निग्रहाचे. दुसऱ्या कशाचेही नाही."

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कथा.

तुमच्या कथा छान असतात. रडगाणी नसतात