किस्से आणि निरीक्षणं (भाग ६)....काॅप्या, परिक्षा, पेपर, अन् फाटका खिसा.

Submitted by बग्स बनी on 12 March, 2017 - 18:07

स्वप्न ऐन रंगात असताना दाणदिशी टीरीवर दणका बसला, खडबडून जाग आली. “ए हरामखोर...वाजले बघ किती...पेपर आहे ना आज? पेपरला कोण बाप जाणार आहे का तुझा ?” स्वप्नाचा पार चुराडा झाला होता. सकाळी सकाळी मधुरवाणी कानावर पडली, पेंगतच पप्पांकडे बघू लागलो. “ए ##घाल्या...उठ कि आता...” तसा पुन्हा एकदा खडबडलो. वेळ बघायला घड्याळात पाहिलं, आई शप्पथ...मी पळतच बाथरूम मध्ये शिरलो. पटापट आवरून मम्मी-पप्पांच्या पाया पडून परीक्षेसाठी निघालो. आज उशीर होणार म्हणून, लांब लांब ढेंगा टाकत मान खाली घालून निघालो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे वर्दळ खूप विरळ होती. मागे असलेलं दप्तर खाड्खुड आवाज करत माझ्या चालीवर डुलत होत. रस्त्यात माझ्या सारखे बरेच होते. हुश्श....!!! चला आपल्यासारख कोणी तरी आहे म्हणून मनाला एक वेगळाच आनंद होत होता. वार्षिक परीक्षेचा आणि इयत्ता पाचवीचा आज शेवटचा पेपर होता. इतिहास, भूगोलाचा. त्यामुळं कधी एकदा पेपर देऊन येतोय अस झालं होत. पण त्या आधी परीक्षा होती, मग आता पेपर कसा असेल.? कसा जाईल..? वैगेरे...वैगेरे...या सगळ्या विचारांनी शाळेच्या गेट जवळ पोहोचलो. दिन्या, पद्या आणि किरण्या तिथंच होते. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हटलं...काय रे..?? झाला का अभ्यास...? तसे ते बोलले..”नाही रे...तुझा...??” मी ओठ दुमडून नकारार्थी मान हलवली. थोड्यावेळानं मी विचारलं “ऋष्या नाय आला..?” “नाय अजून कोणच नाय आलं..त्या सगळ्यांचीच वाट बघतोय..” दिन्या म्हणाला. मग आम्ही सगळे बाकीच्यांची वाट बघत उभे राहिलो. तसा पेपरला अजून बराच वेळ बाकी होता. बरीच मुलं अजून यायची बाकी होती. कोण लगबगीनं, घाई-घाईतच शाळेकडे येत होते. कोण आपलं घोळक्याने पुस्तकात तोंड खुपसून, तर कोण उगाचच टंगळ-मंगळ करीत शाळेच्या दिशेने येत होते. काही विद्यार्थी त्यांच्या पालकांसोबत आले होते. त्यांची ती अवस्था बघायला मज्जा येत होती. थोड्यावेळाने नित्या, अवध्या, गीत्या, विशाल, अन् ऋषिकेश....येताना दिसले. राहायला ते एकाच एरियात असल्याने ते एकत्रच येत होते. हळू हळू आम्ही सगळे मित्र जमा झालो. थोड्याफार चौकशी-गप्पा झाल्या. आम्ही अजून शाळेच्या गेटवरच होतो. आत जायची कोणाचीच इच्छा न्हवती. शेवटचा पेपर आणि शेवटचा दिवस. “अरे सुम्या आला नाय अजून...” किरण्या म्हणाला. “तो कॉप्या काढत आसल..”पद्या म्हणाला. अन आम्ही हसून आत निघालो. जवळ जवळ सगळेच आत गेले होते. शाळेचा आवर पूर्णतः मोकळा झाला होता. फक्त आम्ही, आमचा घोळका तेवढे राहिलेलो. आम्ही शाळेच्या पायऱ्या चढत होतो, तितक्यात सुम्या तरमडत आपल्या सायकलीवरून आला. “घ्या,नाव घेतलं अन स्वारी हजर...”गीत्या म्हणाला. सुम्या धडपडतच सायकल लावायला गेल. घाईगडबडीत सायकल लावून ते पळतच आमच्या जवळ आलं. “का रं..?? एवढा उशीर..?? आज पण कॉप्या?? विशल्या म्हणाला. “नाय रे...आज नाय कॉप्या...उठायला उशीर झाला जरा..म्हणून फादरची सायकल घेऊन आलो.” आमच्यामध्ये सुम्या लई वात्रट...पण भन्नाट. उंचीला जरास ठेंगणं..पण, लय भारी माणूस. गेट्च्याआत आल्यावर तिथं असलेले मामा आमच्यावर खेकसले...”ए चला आत...रताळ्यांनो...” आम्ही पटापट पाय आपटत आमचा वर्ग गाठला. नशिबानं आम्ही सगळे एकाच वर्गात होतो परीक्षेला. आम्ही आत शिरलो. प्रत्येकजण आपापल्या बेंचवर जाऊन विसावला. आम्ही सगळे एकमेकांकडे बघत होतो. सुम्या आपलं नेहमीप्रमाणे दप्तर बेंचवर टाकून बाहेर पळालं. वर्गात लईच गोंधळ चाललेला. काही हुशार मुलं-मुली कानात बोट घालून पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीत होते. काही पोरं घोळका करून गप्पा मारत होते. इतक्यात सुम्या पळत आलं...अन वर्गात येऊन जोरात ओरडलं...”ये बिरजू आहे आज...” (गणिताच्या सरांचं टोपण नाव...सुम्यानच पाडलं होत.) सगळा वर्ग शांत झाला. एकदम कडक सर आले. बर्याच जनांनी “म्च्याक” करून तोंडं वाकडी केली. सगळे आपापल्या जागेवर बसले होते. वर्गात बिरजूची एन्ट्री झाली. पेपर टेबलावर ठेवत सरांनी आदेश सोडला...चला आपापली दप्तरं पुढे ठेवा. इतका उशीर स्वस्थ असलेला वर्ग आता मुव्हमेंट करू लागला. सगळे आपल्या आपल्या दप्तरातलं सामान काढून बेंचवर ठेवून ते दप्तर पुढे ठेवायला जात होते. सरांनी सगळ्यांना पेपर वाटायला सुरुवात केली. सगळं जिथल्या तिथं झालं होत. सगळ्यांना पेपर वाटून झाले होते. आता सगळे फक्त पेपर चालू व्हायच्या बेल ची वाट बघू लागले.
बेल वाजली पेपर चालू झाला. सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि पेपरवर आक्रमण केले. धडाधड पेपर वाचून झाले. पेपर काहींसाठी सोप्पा होता, काहींसाठी अवघड. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव उमटत होते. कोणी क्षणात लढाई जिंकल्याचा अभिर्वात पेपर वाचत होते, काहींच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. काहींनी तर पेपर लिहायला सुरवात देखील केली होती. आमच्या मित्र मंडळांनी एकमेकांकडे पहिले, आम्ही गालातल्या गालात हसलो आणि पेपर लिहायला सुरुवात केली. विशेष म्हणजे एरव्ही सगळ्यांच्या तोंडाकड पाहणारं सुम्या आज चक्क मन लावून पेपर लिहित होतं. पेपर तसा सोप्पा होता. सगळे पेपर लिहित होते, काही कुजबुजत होते, काही इशारे करून एकमेकांना उत्तरं सांगत होते, मध्ये मध्ये सर देखील आपण उपस्थित आहोत दाखवण्यासाठी ओरडत होते. या रांगेतून त्या रांगेत ते फेऱ्या मारत होते. कधीच जरासा कंटाळा आलाच कि मग थोडावेळ खुर्चीत टेकून पुन्हा राउंड वर. बराच वेळ झाला, पेपर संपायला अवघा पाऊन तास बाकी होता, आमचा जवळ जवळ पेपर होत आला होता. काहींचा तर कधीच झाला होता. अन ते बाकीच्यांना न्याहाळत होते. सर मधेच बोलायचे..”ज्यांचा पेपर झालाय त्यांनी बेंचखाली मान घालून पेपर वाचा..” थोडंस इकडे तिकडे बघून झाल्यावर...माझं लक्ष सुम्याकड गेलं. तो अजून पेपर लिहित होत. आणि नवल म्हणजे त्यानं आज पुरवणी देखील घेतली होती. आता पेपर संपायला अर्धा तास बाकी होता फक्त. इतक्यात आमच्या मुख्याध्यापिका वर्गात शिरल्या. विजेच्या गतीने त्या सुम्याजवळ पोहोचल्या. अक्खा वर्ग आता त्या दोघांकडे बघत होता..टीचरांनी सुम्याचा पेपर हिसकावून चाळून काढला. अन म्हणाल्या..”किती कॉप्या आणल्यात..” सुम्या म्हणाल. नाही टीचर एक पण नाही...”उठ, उभा राहा...” टीचर जरा दरडावतच म्हणाल्या. “अहो नाही टीचर...” तसं सुम्या अशाबाबतीत लय फेमस होता. बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांवरून तो स्टाफ रूम किंवा हेडकेबीन मध्ये असायचा, त्यात तो बराच वात्रट त्यामुळं आणखीनच. अभ्यास सोडला कि इतर प्रत्येक गोष्टीत सुम्या पुढं. त्यामुळे तो सगळ्यांचा लाडका देखील होता. पण म्हणतात ना लाड एकाबाजूला अन काम...तसच काहीस होत. बऱ्याचदा त्याला कॉप्या करतांना, मस्ती करतांना शिक्षकांनी रंगे हाथ पकडलं होत. आज हि टीचरांनी त्याला हेरलं होत. सुम्या गयावया करीत होतं. “अहो, टीचर खरंच नाही माझ्याकडे काही.” टीचरांनी त्याचा बेंच, तगाड, बूट...सगळं चेक केलं. काहीच सापडलं नाही. आता टीचरांनी त्याच्या कपड्यांकडे आपला मोर्चा वळवला. ते त्याचा शर्ट चेक करू लागल्या. भाया, कॉलर, खिसा. सगळं चेक करून झालं अजून तरी काहीच सापडलं न्हवत. वर्ग अजूनही त्यांच्याकडेच पाहत होता. इतक्यात सर ओरडले...”तुमच, बाकीच्यांचं काय..? पेपर लिहा.” सगळ्यांच्या माना पटकन खाली गेल्या. आम्ही अजून चोरून त्यांनाच पाहत होतो. खूप कडक चेकिंग चालू होती. टीचरांनी त्याचा बेल्ट चेक केला, नंतर प्यांट चापचली. काहीतरी हाताला लागलं म्हणून त्यांनी पॅण्टेच्या खिशात हाथ घातला...टीचर हबकल्या, सुम्याही दचकला. अचानक टीचरांनी सुम्याला झोडपायला सुरुवात केली. वर्गाला काहीच समजत न्हवते. सुम्याला लय मारला, बदड बदड बदडला, आणि टीचर निघून गेल्या. आम्हाला कोणालाच काय झालं ते कळेनाच. अक्खा वर्ग सुम्याकडं बघत होता, मुली फिदीफिदी हसत होत्या. वर्गात कुजबुज वाढली. सर पुन्हा ओरडले. पुन्हा सगळ्यांच्या माना खाली गेल्या. सुम्या आपलं गाल चोळत होतं. थोड्याच वेळाने पेपर हि सुटला. पेपर देऊन आम्ही बाहेर आलो. सगळेजण आपापल्या वाटेने निघाले. घोळ्क्याचे-घोळके शाळेतून निघू लागले. आम्ही मित्र मंडळी गोळा झालो. पेपरवर थोडीफार चर्चा झाली. “ये सुम्या कुठाय..?” नित्यानं प्रश्न मांडला. “ते बघ ते बाहेर गेलं..” दिन्या गेटकडे बोट दाखवत म्हणाला. आम्हीही गेटकडे निघालो. “काय वाटतंय.? का मारला असेल सुम्याला..??” विशल्या म्हणाला. “काय माहित आरे.” “अरे ते तर बिचार कधी नव्हे ते आज पेपर लिहत होतं.” मी म्हणालो. “मला तर लय हसाय आलं...” दात काढत किरण्या म्हणाला. चर्चा करत आम्ही गेटच्या बाहेर पोहोचलो. सुम्या त्याच्या फादरची सायकल काढायला गेला होता. आम्ही सुम्याला आवाज देऊन धावत गाठलं. “का रे..? कुठ निघाला..इतक्यात??” आम्ही विचारलं. “फादर ला न सांगता सायकल घेऊन आलोय, आता पर्यंत कालवा केला असेल सायकल चोरीला गेली म्हणून.” सुम्या म्हणाल. “पेपर कसा होता..??” उगाचच विचारायचं म्हणून विचारलं. “भारी होता...पण...” सुम्या बोलता बोलता थांबला. “बरं, ते जाऊ दे....आम्हाला म्हणाला कि कॉप्या नाही केल्या मग टीचरांनी का मारलं...” पुन्हा त्याला प्रश्न केला. सायकल फिरवत त्यान जोरदार टीचर ला शिवी हासडली. अन म्हणाला...”आरं कुठ केली कॉपी तवा...” “मग का मारलं...” पद्यान विचारलं. सुम्या थोडसं ओशाळुन म्हणाल...”आरे, टीचरांनी माझ्या खिशात हाथ घातला कॉप्या आहेत कि नाय बघायला, पण नेमका आज माझ्या पॅण्टेचा खिसा फाटलाय.....विनाकारण लई मारलं”
.
.
.
.आम्ही आधी एकमेकांकडे बघितलं अन खो-खो हसायला लागलो....आता तर हसून लोळायचं बाकी होत...इतक्यात ऋष्या म्हणाला, “आज टीचारांना झोप नाही लागणार”....अस म्हणून आख्या घोळक्यात डुकरी हसू माजलं.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरकत नाही संदीप जी, आवडणं न आवडणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अंबज्ञ जी म्हटल्या प्रमाणे....लेखाचा उद्देश् निखळ हास्य करमणुक आहे. त्याचप्रमाणे, फाटका खिसा इथं पर्यंत लेख संपतो. त्यानंतरचं जे तुम्ही आकलन करता तो प्रत्येकाच्या मनाचा खेळ आहे. इतकंच.... थोडक्यात तात्पर्य काय..? तर "खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बाराना...."
.
बाकी, तुमच्या या प्रतिसादाचं खरंच स्वागत्. जे आहे ते तुम्ही मांडलत.... त्या साठी धन्यवाद....परंतु साॅरी म्हणु नका... Happy

_/\_

Cant stop laughing.... Shaletle divas aathvle... Majja ali

Cant stop laughing.... Shaletle divas aathvle... Majja ali >>>>> उद्देश सफल झाला म्हणायचा......धन्यवाद क्रांतिवीर जी... Happy _/\_

Pages