पण तो मुसलमान नव्हता..

Submitted by सई केसकर on 6 March, 2017 - 11:53

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.

या अशा लॉजिकचा ज्यांच्या जवळच्यांचा जीव गेला आहे अशाना काहीच उपयोग नसतो. बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी ओबामा सरकारने बरेच लॉबिंग केले होते. ओबामा सरकारच्या काळात सँडी हुक (कनेटिकट) मध्ये असेच अमानुष हत्याकांड घडले होते, आणि तिथे तर १० वर्षांखालील मुलांवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. तेव्हा बाराक ओबामांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. कोणालाही हलवून टाकेल असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे बंदूक वापरायचा परवाना मिळवणे कठीण केले पाहिजे इथपर्यंत तरी चर्चा झाली होती.

पण असे प्रसंग घडतात आणि विसरले जातात. भारतीयांविरुद्ध असे चुकून हेट क्राईम्स ९/११ नंतर देखील झाले होते. यात शीख लोकांचे नाहक बळी गेले. पण मुस्लिम समजून चुकून मारले गेले असले तरी असा द्वेष करणाऱ्या माणसाच्या हातात बंदूक द्यावी, आणि ती बाळगणे हा त्याचा मूलभूत हक्क असावा हा मोठा विरोधाभास आहे.

अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे. कारण भौगोलिक ज्ञानाच बघायचे असेल तर सामान्य भारतीय माणसापुढे एक फ्रेंच आणि एक अमेरिकन उभा केला तर त्या दोघांनाही गोरे नाहीतर फिरंगी हे एकच विशेषण लागू होते. आपल्या पैकी किती लोकांना सुन्नी, शिया, बोहरी, बहाई, सुफी अशा सगळ्या प्रकारच्या मुस्लिम पंथांची माहिती असते? किती जणांना ज्युईश लोकांचे अंतर्गत पंथ, जसे की हेसिडिक आणि झियोनिस्ट यातला फरक समजतो? कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन, मेथाडिस्ट, मॉर्मन असे ख्रिश्चन धर्माचे विभाग माहिती असतात?

एवढेच काय, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात. तसेच मणिपूर, मिझोराम, आसाममधून येणाऱ्यांना नेपाळी नाहीतर चिनी करून टाकतात. फरक एवढाच की ज्या लोकांना यांचा "त्यांच्या राज्यातील नोकऱ्या" चोरल्याबद्दल राग येतो, त्यांच्या हातात भारतीय सरकारनी कायदेशीर बंदुकी दिलेल्या नसतात.

आणि याही पुढे जाऊन, जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना या घटना घाबरवून टाकतात आणि अस्थिर करतात कारण गोळ्या झाडायची आधी कुणी त्यांचा पासपोर्ट बघायला किंवा धर्म विचारायला येत नाही. त्यांची पहिली ओळख म्हणजे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि मध्य पूर्वेतील लोकांशी साधर्म्य असणारा त्यांचा रंग.

ट्रम्पच्या आधीचे ओबामा सरकारदेखील इमिग्रेशनबद्दल अतिशय कडक होते. ९/११ नंतर अमेरिकेने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी "व्हिसा मँटिस" हा सिक्युरिटी चेक सुरु केला होता. "स्टेम"(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक शास्त्रद्यांना या पॉलिसीचे फटके बसले आहेत. पण सुरक्षेसाठी काही निष्पाप लोकांचे थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर पण आतंकवादी अमेरिकेत येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू होता. असे असतानादेखील ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले.

पण उघडपणे मुस्लिमांविरुद्ध आणि परदेशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांबद्दल इतक्या त्वेषाने बोलणारा ट्रम्प हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे. जरी "हिंदूंवर" त्यांची मेहेरनजर असली, तरी अशी धर्मीक असहिष्णुता, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील फरक बघून दाखवली जाणार नाही हे ही एक सत्य आहे. ब्रेक्झिटच्या मतदानाच्यावेळी सुद्धा भारतीय लोकांनी इतर (मुस्लिम) लोकांचे ब्रिटनमध्ये स्थलांतर थांबवायच्या बाजूने मतदान केले होते. तसेच अमेरिकेतील श्रीमंत भारतीयांनी ट्रम्पसाठी प्रचार आणि मतदान केले. पण जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण करून एखादा नेता निवडून येतो, तेव्हा त्यांनी मतदानाच्या काळात टाकलेली एक ठिणगी पुढे कधी आणि किती अक्राळविक्राळ रूप धारण करेल याचा अंदाज त्या नेत्यालादेखील नसतो.

जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या जमातीविरुद्ध केलेल्या नकारात्मक प्रचाराचे पडसाद सगळ्यांवरच पडण्याची भीती आहे. आणि म्हणून निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे. प्रचारातही आणि सोशल मीडियावरही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे.>>>

चांगली ऐडिया आहे.
यासाठी पुण्यात बसून आपण कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो?

सई खूप सारे विषय एकत्र आल्याने लेख विस्कळीत वाटला.
बाकी, गन कन्ट्रोल विषयी आपल्या जन्मात काही चांगलं होईल ही वेडी आशा आहे. असे अनेकानेक सर्वत्र नक्की किती गुन्हे घडले की लोकांना त्यातल गम्भिर्य समजणार आहे देव जाणे.
बाकी (२) , हेट क्राईम मुस्लिम धर्माविरोधी नाही तर बाहेरुन आलेला आणि जॉब्स घेणार्याबद्दल आहे असं मला वाटतं.
बाकी (३) चोरलेल्या नोकर्‍यासाठी बंदुका दिल्या नसणे चांगलं आहेच, पण ख्ळ फ्ट्याक आणि मारामार्‍या आपण ही करतोच की.

लोकांच्या मनात एखाद्या समूहाविषयी भीती निर्माण करून आपण त्यांचे तारणहार आहोत असे भासवून सत्ता गाजवण्याची नीती खूप जुनी आहे. दुर्दैवाने तीच अजूनही यशस्वी होत आहे आणि तिचे भयाण परिमाण लिबिया, सिरीया, अफगाणिस्तान इत्यादी देशांमधून दिसत असूनही प्रगत/प्रगतशील देशातील जनता अजूनही या नीतीला बळी पडत आहे. तुमच्या लेखात लिहिल्याप्रमाणे सामान्य जनता फार अभ्यासू नसते. ज्यांच्या विषयी जनतेच्या मनात भीती निर्माण केली गेली आहे त्यांची एक ढोबळ प्रतिमा जनसामान्यांच्या मनात असते. म्हणूनच तसे साधर्म्य जरी दिसले तरी तिरस्कार निर्माण होतो. मग हिंदुना मुस्लीम समजले जाते, भारतीयांना मध्य-पूर्वेतील समजले जाते आणि निरपराधांच्या नृशंस हत्या होतात. पण असे गैरसमज न होता जरी हत्या झाली तरी तिचे समर्थन होऊ शकत नाही. मुठभर विकृतींमुळे अनेक निरपराधांचे जीव टांगणीला लागतात.

जिथे जनसामान्यांत एखाद्या समूहाविषयी भीती निर्माण झाली आहे वा केली गेली आहे अशा समाजाचे प्रबोधन करण्या ऐवजी त्यांच्या झुंडी बनवून त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याची भांडवलदार आणि धर्मांध यांची कुटील नीती भारतात यशस्वी झाली तशी ती अमेरिकेतही झाली. आणि हे संपूर्ण जगासाठी धक्कादायक होते. याचे खूप गंभीर परिणाम या दोन्ही देशांतील सर्सामान्य नागरिकांना येणाऱ्या भविष्यकाळात भोगावे लागतील.

शस्त्रास्त्रांच्या कारखानदारांना बाजारपेठ मिळावी आणि स्थानिक सत्ता खिळखिळी होऊन देश काबीज करता यावेत या दुहेरी उदेशाने अमेरिकेने ऐशीच्या दशकात मध्य-पूर्वेत शस्त्रास्त्रांचे अमाप वाटप केले. धर्माच्या अधीन झालेले मागास विचारांचे तिथले नागरिक ती शस्त्रे घेऊन एकमेकांच्या उरावर बसले. तिकडे चीन ने पण हीच चाल खेळून कंबोडिया आणि कोरिया देशांची वाट लावली. कंबोडियात तर लक्षावधी निष्पाप बळी गेले. अतिशय क्रूरपणे नागरिक मारले गेले. लहान मुले सुद्धा! तिरस्कारावर आधारित राजकारणाचा शेवट भयाण आणि भयाणच असतो.

भारतात मानवता वाद दाखवणाऱ्या व धर्मांध शक्तींविरोधात प्रबोधन करणाऱ्या महात्म्याचे वर्षानुवर्षे पद्धतशीर हनन करण्यात धर्मिक शक्ती दुर्दैवाने यशस्वी झाल्या आहेत. एक पायरी पार पाडली आहे. पुढच्या पायऱ्या टप्प्या टप्याने राबवून इंडियाचा लिबिया सिरीया करण्यात या शक्ती यशस्वी होऊ नयेत म्हणजे नशीब.

लोकशाहीचे मास्क परिधान करून भांडवलदार आणि धर्मांध खेळी खेळत आहेत. जनसामान्यांना भलतीच भीती आणि शत्रू आहे असे भासवून चकवा देत आहेत. येणाऱ्या काळात जगासमोर हे खूप मोठे सामाजिक आव्हान असणार आहे.

छानच मुद्दे मांडले आहेत..खरतर मुद्दे कमी आणि चिंता किंवा मनातील विस्कळीत विचार वाटताहेत पण विचार करण्यासारख्या गोष्टी आहे..

हेट क्राईम मुस्लिम धर्माविरोधी नाही तर बाहेरुन आलेला आणि जॉब्स घेणार्याबद्दल आहे असं मला वाटतं.

सहमत.

इनामदारानी जे लिहिले आहे त्याला अनुमोदन. १०० %

हेट क्राईम मुस्लिम धर्माविरोधी नाही तर बाहेरुन आलेला आणि जॉब्स घेणार्याबद्दल आहे असं मला वाटतं.
पण ते बाहेरून येऊन जॉब घेणे (वा मिळणे) हे कायदेशीर असते, इथल्याच कंपनीने जॉब दिला तर तो जॉब मिळतो, हिसकावून घेता नाही.

ज्या दोन मुलांना मारले कॅन्सासमधे ते काही बेकायदा आलेले नव्हते नि त्यांना नोकरी देणार्‍यांची खात्री होती की त्यांना कंपनी फायद्यात चालवायची तर असेच लोक घेतले पाहिजेत की जे कामात तरबेज पण कमी पगारवाले आहेत.

कारण उघड आहे, पैसे वाचले तर त्या कंपन्यांच्या शेअरहोल्डर लोकांचा फायदा. ते महत्वाचे, ते जास्त आहेत, नोकर काय कुठेहि मिळतात - चीन, भारत.
हिंमत असेल तर त्यांना नोकरी देणार्‍यांना विचारा की काहो तुम्ही परकीयांना का नोकर्‍या दिल्या?
ती हिंमत नाही. भित्रूड, द्वेष्टे लोक - मुळात अक्कल अत्यंत कमी! म्हणून तर अगदी थर्ड वर्ल्डमधले लोक इथे येऊन पैसे कमावतात नि हे जातात वेल्फेअर वर नाहीतर बंदुकी घेऊन खुना खुनी करत.
आज याला नाही तर उद्या कुणाला तो गे म्हणून, काळा म्हणून काहीहि कारणाने मारतील. ज्यू लोकांविरुद्ध सुरु झालेच आहे. काहीहि फरक नाही आयसिस नि हे लोक यांच्यात, यांना आवरले नाही तर हे इथे आयसिस सारखे वातावरण करतील.

मुळात ट्रंप जे बोलतो, ट्वीट करतो त्यात असे काही स्पष्ट नसते, अगदी बुशसारक्या डुब्यालाहि कळले की मुस्लिम धर्म वेगळा नि अतिरेकी वेगळे, ट्रंपला तेव्हढी अक्कल नाही. बरळतो नुसता. मागून अमितव सारखे लोक त्याचे स्पष्टीकरण करतात, पण ते इथे. त्या द्वेष्ट्या लोकांना कोण समजवणार? ते अमितवलाच मारतील. मग त्याला जरा उशीरा अक्कल येईल की काय असावे यापेक्षा काय खरे आहे ते महत्वाचे.

स्वतःला हुषार समजणार्‍या लोकांना हे का कळत नाही की अमेरिकेत कुणी शास्त्र विज्ञान शिकत नाहीयेत म्हणून बाहेरच्या देशातून लोक आणावे लागतात. माझ्या माहितीतली, माझ्या मित्रांची फार थोडी मुले डॉक्टर वा कॉम्प्युटरमधे आहेत, बहुतेक सर्व वकील, अर्थव्यवहार, इ. विषयात शिकलेले. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित मधे उच्च शिक्षण घेतलेले फार थोडे - हे ज्ञानाला सर्वात जास्त महत्व देणारे महाराष्ट्रीय, गोर्‍यांचे तर विचारूच नका - हाय स्कूल पास झाले की लगेच ऑटो मेकॅनिक, घरदुरुस्ती असले धंदे, त्यात वाईट काही नाही, पण मग बाहेरून आलेल्यांचा द्वेष का? ट्रंपसारखे लोक स्पष्ट का लिहीत नाहीत. ओबामा च्या वेळी हे एव्हढे का झाले नाही? कारण त्याला अक्कल होती, बोलता येत होते!

Lol ओ इम्प्लसिव्ह नंद्या४३, आपण मला ट्रंप समर्थक म्हणून हिणविल्याबद्दल तुमच्या विरुद्ध 'अब्रूनुस्कानी' साठी गोरा अमेरिकन वकील शोधू का फिजिक्स, केमिस्ट्री, गणितामध्ये उच्च शिक्षण घेतलेला हुशार (बॉडी शॉप वर्किंग) महाराष्ट्रीय?
जरा वाचा. विचार करा आणि मग लिहा की! काय त्या ट्रंपची कॉपी करताय हे असं लिहून!

९/११ नंतर जे शीख मारले गेले ते मुस्लिम समजूनच. आणि आत्ताच्या कॅन्सस शूटिंगमध्ये देखील मारेकऱ्याला श्रीनिवास मध्यपूर्वी आहे असे वाटले होते.
ट्रम्पचा कॅम्पेन इमिग्रेशन विरुद्ध जितका होता तितकाच तो मुस्लिम विरोधी होता. सत्तेवर आल्यावर पहिले पाऊल त्याचा मुस्लिम ट्रॅव्हल बॅन होता. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा प्रभाव आहे असे मला वाटते. कारण ट्रॅव्हल बॅन नंतर मेक्सिकन किंवा चायनीज (जे दुसऱ्या वर्णांचे इमिग्रंटस आहेत) विरोधी हल्ले झाल्याचे वाचण्यात आले नाही.

इमिग्रेशन कसेही असो, लीगल किंवा इलिगल, त्याला तिथल्या व्यक्तींचा पाठिंबा कसा आहे हे त्यावेळची परिस्थिती ठरवते. मुंबईसारख्या शहरातदेखील "बाहेरून" आलेल्या लोकांविरुद्ध निवडणूका लढवल्या जातात. पण असे करताना सामान्य नागरिकांमधले फ्रस्स्ट्रेशन राजकारणी टॅप करत असतात. जगभरातच ही राईट विंगची लाट आली आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींचा द्वेष ही एक नैसर्गिक भावना आहे. पण तिचा असा उद्रेक सामान्य कष्ट करणाऱ्या लोकांवर इतक्या सहजतेने होतो हे खेदजनक आहे.

राईट विंगची लाट येण्यासाठी जागतिकीकरण कारणीभूत आहे. जेव्हा आपले जग खुले होते तेव्हा साहजिकच त्याचेही काही वाईट परिणाम असतात. जागतिकीकरणामुळे एका ठिकाणची मंदीची लाट आता जगभर पसरू शकते. त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प आल्याचे पडसाद बेंगलोरमध्ये पण पडू शकतात. ट्रम्प बोलायला कितीही मंद वाटत असला, तरी अमेरिकन लोकांचा हा संताप त्याने आधीपासून ओळखला होता. आणि दुर्दैवाने त्याला लोकांनी निवडून दिले. हिलरीच्या विरोधात उभा राहिलेला बर्नी सँडर्स हे आजच्या काळातले हेच प्रॉब्लेम ओळखणारा नेता आहे. आजही त्याचे विचार आवर्जून ऐकण्यासारखे असतात. समाजातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे नेत्यासाठी सगळ्यात अवघड असते. कारण तसे केल्याने कमी वेळात खूप प्रगती होत नाही (किंवा तसे दाखवता येत नाही). आणि सगळ्यांना घेऊन बरोबर जाण्यात काहीच सनसनी नाही!

ऑस्ट्रेलियामध्ये जॉन हॉवर्डच्या नेतृत्वाखाली गन लॉज कडक करण्यात आले. तेव्हापासून तिथले मास शुटिंग्स झपाट्याने कमी झाले. पण अमेरिकेतील गन लॉबी निवडणुकांचा खर्च देत असल्यामुळे कुणालाच त्यांचा कडाडून विरोध करता येत नाही!

मला स्वतःला एक बॉर्डरमॅन म्हणुन एक शिपाई म्हणून भारताचा लिबिया सीरिया होईल असे अजिबात वाटत नाही.. असो.

http://www.slate.com/blogs/the_slatest/2017/03/06/white_u_s_men_should_b...

स्लेट या मासिकात नुकताच विनोदी हेतूने आलेला हा लेख.

अमेरिकेत घडलेले अलीकडच्या काळातील २२ टेरर अटॅक हे श्वेतवर्णीय व्हाईट सुप्रीमसिस्ट विचारसरणीच्या पुरुषांनी घडवून आणले आहेत.
सगळे गोळीबार केल्यामुळे झाले आहेत.

@ संजीव

असे २-३ लेख मी वाचले आहेत. हादेखील वाचला होता.

लेखात म्हणल्याप्रमाणे, भारतीय इमिग्रंट अमेरिकेसाठी खूप महत्वाचा आहे. गूगल आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ भारतीय आहेत. आणि आता तर कित्येक अमेरिकन्स सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. स्वदेशी आणि परदेशी हा मुद्दा गैरलागू आहे कारण हे सगळे लोक लागली अमेरिकेत गेलेले असतात. अशा प्रकारचे ध्रुवीकरण करून इमिग्रेशन करून आलेल्यांचाच नाही तर अमेरिकन नागरिकांचादेखील जीव टांगणीला लागतो आहे.

https://www.youtube.com/watch?v=w5CMxdEtkyA

शशी थरूर यांचा जागतिकीकरण आणि राष्ट्रवाद यावरचे हे हार्वर्ड मधले भाषण ऐकण्यासारखे आहे.

सई, ट्रंप आल्यावर एशियन लोकांवर हल्ले झाले नाहीत हे विधान फारसे बरोबर नाही. जीवघेणे हल्ले झाले नसतील पण त्यांना वंशद्वेषाचा सामना करावा लागला होता. माझी एक चायनीज वंशाची अमेरिकन मैत्रीण आहे तिने ह्या संदर्भात अनेक पोस्ट्स/बातम्या फेसबुकवर शेअर केल्या होत्या म्हणून मला माहीती. Asians are outsiders too!

गन क्राईमबद्दल लिहायचे आहे की धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल लिहायचे आहे ते समजले नाही.

दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत तरीही खूप वेगळे आहेत. गन क्राईम हे केवळ धार्मिक ध्रुवीकरणामुळे होतात असे नाही. कित्येक वेळा मानसिक संतुलन ढासळलेल्या लोकांकडून अंदाधुंद गोळीबार झाला आहे. रोड रेजमध्ये सुद्धा अनेक लोकांचे जीव जातात. अमेरिकेमध्ये फारच गन लॉबी फार स्ट्राँग आहे आणि बंदुका बाळगणे बेकायदेशीर ठरणे (किंवा बंदुकीचा परवाना मिळणे कठिण होणे) जवळजवळ अशक्य आहे.

धार्मिक ध्रुवीकरण आणि त्यामधून येणारा वर्णद्वेष हा खूपच निराळा विषय आहे. आणि हा वर्णद्वेष केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरातच पसरत आहे. प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेते ह्याचेच भांडवल करतात आणि हा वर्णद्वेष वाढवत ठेवतात. त्यातच त्यांचा फायदा असतो. खूप काही लिहायचे आहे पण येथेच थांबते.

@ लिंबू
खरंच की! कशा काय उडवल्या? मी नाही उडवल्या.
@सुमुक्ता
दोन्ही बद्दल लिहायचे आहे. वर्णद्वेष सगळीकडेच आहे हे अगदीच मान्य आहे. पण अमेरिकेत होणाऱ्या या अशा प्रकारच्या हिंसेचे वेगवेगळ्या वेगळी वेगवेगळे लोक बळी पडतात. जसे मध्यंतरी फ्लोरिडामध्ये एका गे बार मध्ये असाच गोळीबार झाला. आपल्या मतांशी असहमत असलेला कुठल्या माणसाचे कधी डोके फिरेल आणि तो कुठे असेल ही अनिश्चितता जास्ती भीतीदायक आहे. आणि ध्रुवीकरण करून राजकारण्यांना (सगळीकडेच) हवं ते मिळतं (किंवा मिळत नाही). पण प्रचारादरम्यान पुन्हा पुन्हा उपस्थित केलेले मुद्दे नंतर कसं रूप धारण करतील हे सांगता येत नाही.

मुळातच, जेव्हा एखाद्या माणसाला कोणत्याही प्रकारची सत्ता मिळते - बंदूक, खुर्ची, काही केसेस मध्ये लग्न - तर त्याचबरोबर moderation, monitoring करायला काही तरी व्यवस्था असलीच पाहिजे. अन्यथा अनर्थ होतो. किती साधी गोष्ट.
पण हा अमेरिकाखंड इतका मोठा आहे की पूर्ण monitoring नीट करणं आधीच कठीण (असा माझा अंदाज आहे). त्यात आणखी वेड्यासारखे गन चे परवाने सहज मिळण्याची सोय. आधीच मर्कट तशात मद्य प्याला अशातली गत झालीये त्यांची.

सोन्याबापू, सहमत. आपल्या देशात काहीतरी स्पेशल नक्कीच आहे, ज्यामुळे इतके बेकार राजकारणी मिळून सुद्धा आपण अजूनही एक देश म्हणून टिकून आहोत आणि प्रगती सुद्धा करत आहोत.

चांगलं मांडलंय सई. अश्या बातम्या ऐकुन वाचुन वाईट वाटते खरंच.

कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात.>>>>>निर्लज्जपणे??????? असं का लिहिलंय?

आपल्या मतांशी असहमत असलेला कुठल्या माणसाचे कधी डोके फिरेल आणि तो कुठे असेल ही अनिश्चितता जास्ती भीतीदायक आहे. >>> हे खरेच आहे. मतांशी/रंगाशी/धर्माशी/जातीशी/शिक्षणाशी/नोकरीशी........यादी वाढतेच आहे.

काय मंडळी कसं वाटतंय आता....? आता भारतीयांवर हल्ले व्हायला लागल्यावर वाटू लागलीच ना काळजी?

परस्परसौहार्द्राचे, प्रेमाचे, सामंजस्याचे, सहिष्णुतेचे वातावरण असावे ह्याची अपेक्षा ठेवणार्‍यांच्या खिल्ली उडवायचे फॅड आले होते गेल्या तीनेक वर्षात...

पण प्रचारादरम्यान पुन्हा पुन्हा उपस्थित केलेले मुद्दे नंतर कसं रूप धारण करतील हे सांगता येत नाही.
अगदी खरे. कारण अशिक्षित, अविचारी लोक अनेक असतात, ते वर लिहिणार्‍या लोकांसारखे विचार करत नाहीत तर मी जसा "इम्प्लसिव्ह"
(म्हणजे काय माहित नाही, पण बहुधा इम्पल्सिव्ह असावे) आहे तसे असतात. सुदैवाने मला भारतीय संस्कृतीचे बाळकडू आहे, मी म्हातारा झाल्यावर थोडा शांत झालो आहे नि मुख्य म्हणजे माझ्या हातात बंदूक नाही. कीबोर्ड वापरून काय खून होतील तेव्हढेच.
Asians are outsiders too!
अशी नक्कीच इथल्या लोकांची समजूत आहे याचा अनुभव गेली ४५ वर्षे घेतो आहे.

ज्यामुळे इतके बेकार राजकारणी मिळून सुद्धा आपण अजूनही एक देश म्हणून टिकून आहोत आणि प्रगती सुद्धा करत आहोत.>> आक्शेपार्ह विधान.
आपले राजकारन्णी इतके बेकार असते तर एव्हाना आपला पाकिस्तान (failed state )झाला असता. visionary leaders होते म्हणुन इथवर पोहचलो आहोत.

लेख छान आहे.
ह्याच लेखाशी साम्य असणारे अनेक लेख brexit नंतर वाचाय्ला मिळत आहेत. दुर्दैवाने त्यान्चा receiving audience/reader फार मर्यादीत आहे.

>>>> आपल्या देशात काहीतरी स्पेशल नक्कीच आहे, ज्यामुळे इतके बेकार राजकारणी मिळून सुद्धा आपण अजूनही एक देश म्हणून टिकून आहोत आणि प्रगती सुद्धा करत आहोत. <<<<<
ते स्पेशल म्हणजे, आसेतु हिमालय, या देशात "देव देश अन हिंदू धर्मापायी" एकच श्रद्धा भाव अजुनही टिकुन आहे, असे माझे मत. अन नेमकी हीच ताकद तोडण्याकरता एन्जीओजचे सहाय्य घेऊन बुद्धिभेद करीत, सायन्सच्या अन विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धांना/श्रद्धाविषयांना तडे जातील असे बघण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न जागोजागी होत आहेत, मायबोली देखिल त्यास वर्ज्य नाही.
इतकेच काय, तर येथिल लोक लोकशाहीला मानतात, तर "लोकशाही" वरुन विश्वास उडावा अशी विधाने पेरण्याचे कामही जागोजागी होत रहाते, मायबोली/मिडिया/वृत्तपत्रे त्यासही वर्ज्य नाहीत.

ते स्पेशल म्हणजे, आसेतु हिमालय, या देशात "देव देश अन हिंदू धर्मापायी" एकच श्रद्धा भाव अजुनही टिकुन आहे, असे माझे मत. अन नेमकी हीच ताकद तोडण्याकरता >>असे प्रयत्न गेली ९० वर्षे होत आहे. तरी त्यास यश आले नाही. हे भारतीय लोकांचे यश आहे. असे मी मानतो.

नानाकळा अनुमोदन

Pages