कंट्रीसाईड फार्म- एक आनंददायी अनुभव

Submitted by वर्षू. on 27 February, 2017 - 06:22

गेले दोन तीन महिने मुंबईतले दिवस खूपच धावपळीत गेले होते. लागोपाठ येणारे पाहुणे, कार्यक्रम, फिरणे, फिरवणे , शॉपिंग, सिनेमे, डिनर्स असं सतत चाललेलं होतं. त्यामुळे शेवटच्या सूटकेसेस हलल्या बरोबर आम्ही दोघं हवा गेलेल्या फुग्यांसारखे हुश्श्य करत बसलो.
कुठेतरी निवांत जागी , दोनच दिवस का होईना पण जावसं वाटत होतं. गोवा ,कोकण चे विचार येत जात होते पण दोन दिवसाकरता इतक्या लांब जायची इच्छा नव्हती.
मग असंच नेटवर लोनली प्लॅनेट मॅगझिन वाचताना अचानक त्यात उल्लेखलेल्या ' कंट्रीसाईड फार्म' या रिझॉर्ट ने लक्ष वेधून घेतले. तेथील सुरेख फोटोज , वर्णन वाचून एकमताने इथे जायचं ठरवलं. या जागेवर पोचायला मुंबई च्या गेट वे पासून लाँच चा केवळ ५० मिनिटांच्या प्रवास करायचा होता. लगेच आधी या फार्म च्या मालकीण अंजना पाटील यांना फोन करून बुकिंग कनफर्म केले. नंतर लाँच चे बुकिंग नेटवरून करून टाकले. सगळं इतकं पटापट झालं कि आम्हाला विश्वास ही बसत नव्हता . आम्ही इतके दिवस ज्या सहलीची आखणी करत होतो ती एकदम एका तासातच पूर्ण झाली होती .
ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता गेट वे ला आलो. तेथून आमची लाँच बरोबर वेळापत्रकानुसार सुटली. ए सी असल्याने उन्हाचा त्रास अजिबात जाणवत नव्हता. अजिबात न हेलकावता शांतपणे समुद्रावर चालणारी ही लाँच मला खूप आवडली. माझी पहिलीच लाँचयात्रा होती म्हणूनही असेल कदाचित !!! थोड्या वेळाने सी गल्स चे थवे च्या थवे लाँच शेजारून, जवळ जवळ तिला चिकटूनच उडू लागले. त्यांना इतक्या जवळून बघताना फारच गम्मत वाटत होती आणी आश्चर्य ही.. पण थोड्याच वेळात समजले कि वरच्या उघड्या डेक वरून इतर प्रवासी त्यांना खाणं ऑफर करत होते. या पक्ष्यांनाही हल्दिराम च्या कुरकुरीत जाड्या शेवेची चटक लागली होती तर !!!
बघता बघता मांडवा जेट्टी वर पोचलो. यापूर्वी मांडवा गावाचा उल्लेख अमिताभ च्या ,' अग्निपथ' या चित्रपटातच फक्त ऐकला होता, ते गाव प्रत्यक्षात ही होतं तर !!! उतरल्याबरोबर अंजना ला फोन करून कळवले. त्यांनी लगेच त्यांची वॅन पाठवली.
मांडवा जेट्टी पासून अवघ्या दोन किलोमीटर वर होतं हे ,' कंट्रीसाईड फार्म ' रस्ताही बर्‍यापैकी होता.
कोळी लोकं आणी भात शेती करणार्‍या शेतकर्‍यांचं हे प्रसन्न गाव. या गावात हा फार्म शांतपणे विसावलेला आहे. गेट मधून आत शिरल्याबरोबर
प्रथमदर्शनातच प्रेमात पडायला लावणारी जागा होती ही. एक एकर जमिनीवर झोकदार , सुबक, नाविन्यपूर्ण आणी आधुनिक दृष्टीकोनातून बांधलेल्या या वास्तू चा साधेपणाही नजरेत भरण्यासारखा होता. नजर जाईल तिथपर्यन्त गारवा देणारी झाडे, दोन्ही बाजूला रंगीत फुलांनी बहरलेले ताटवे, रूम्स पर्यन्त झाडांच्या सावलीतून जाणार्‍या नीटनेटक्या वाटा सर्वच लक्षवेधक होते. उजव्या हाता ला चारही बाजूंनी भिंती नसलेल्या डायनिंग हॉल च्या चौफेर ही बाग फुलवलेली होती. एका लहानश्या कारंज्या तून उडणार्‍या पाण्यात साताठ रंगीत बदकं बागडत होती. पुढचे दोन दिवस ना गाड्यांचे आवाज ना लोकांची वर्दळ , फक्त पाखरांचा किलबिलाट साथीला असणार होता.
स्टाफ पैकी एकाने आम्ही बुक केलेल्या टेंट वजा खोलीत सामान नेऊन ठेवले. दोन फुटी भिंतीवर अतिशय सुंदर तंबू उभारलेला होता. आतली सुबक सजावट, कंटेंपररी केन फर्निचर ने अधिकच खुलून दिसत होती. एका बाजूला टीवी , कपडे ठेवायचे बुटकेसे कपाट , पलंग, कार्पेट, ए सी , लहानसा सोफा, तर खोलीत असलेले स्नानगृह ही सर्व प्रकारच्या आधुनिक सोयींनी सज्ज !!हे सर्व पाहून मन प्रसन्न झाले.
रूम मधे चहा, कॉफी, पाणी इ. ऑन द हाऊस होते.
फेब्रुवारी चा महिना त्यातून वीक डे त्यामुळे इथे आमच्या व्यतिरिक्त अजून फक्त तीनच जोडपी आलेली होती. लौकरच त्यांच्याशी ही दोस्ती जमली. आम्ही सर्वांनी हसत खेळत घरगुती, गरमागरम, ताज्या अश्या कोकण फूड चा आस्वाद घेतला. उत्कृष्ट चव, बेताचे तेल मसाले असलेल्या , जेवणात शाकाहारी आणी मांसाहारी असे दोन्ही प्रकाराचे पदार्थ होते. यापैकी काही पदार्थ अंजना ने स्वतःच शिजवले होते. जेवताना त्या, जातीने आम्हाला आग्रह करत होत्या.
नाश्त्यालाही दोन तीन पदार्थ होते. रात्रीच्या जेवणाचा मेन्यू ही बहारदार होता. जेवण झाल्यावर कोणाला जवळच्या बीचेस वर जायचे असल्यास ऑटोरिक्षा किंवा गाडीची सोय होती. आम्ही तेथून १८ किमी अंतरावर असलेल्या अलिबाग ला जाऊन आलो.पण या जागे ची निरवता तिकडे अनुभवता आली नाही.
इथे मात्र पाऊल टाकल्याबरोबर मनाला शांत शांत वाटले. दुपारची शांत झोप आटपून आम्ही लाँग वॉक ला जायचे ठरवले. बरोबरच्या इतर मंडळींनी तिथेच उपलब्ध असलेल्या बॅडमिंट्न , कॅरम , वॉलीबॉल इ. खेळांना पसंती दिली.
दुसर्‍या दिवशी भरपूर नाश्ता झाल्यावर, परती च्या बोटीला अजून अवकाश असल्याने तिथेच अंजना यांच्याशी दिलखुलास गप्पा केल्या. शिवाय हे रिझॉर्ट त्यांनी कधी , केंव्हा सुरु केले तेही जाणून घ्यायची उत्सुकता होतीच!!
मूळच्या पार्ल्यातल्या अंजना पाटील या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून कमर्शियल आर्टिस्ट ची डिग्री घेतलेल्या. त्यांचा लहानसा स्वतःचा स्टुडियो त्या यशस्वीरित्या चालवत होत्या. पुढे मुलाला मुंबईतच चांगली नोकरी लागल्यावर अंजना यांना त्यांच्यातील क्रिएटिविटी स्वस्थ बसू देईना.
१९८३ साली त्यांनी घेतलेली ही जमीन साल २००० पर्यन्त तशीच पडून होती. २००० मधे अलिबाग कडे पर्यटक थोड्याफार प्रमाणात येऊ लागले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी या जागेचा कायापालट करण्याचा निर्धार केला आणी तो अमलातही आणला. पण याकरता मोठ्या भांडवलाची गरज होती. ते उभारण्याकरता त्यांनी पार्ल्यातील राहते घर विकून टाकले, याशिवाय सुशिक्षित बेकार महिला फंड मधून दहा लाखांचे कर्ज मिळवले. हे सर्व एकट्या ने करताना त्यांच्या आत्मविश्वासाने त्यांची साथ दिली आणी त्यांचं हे स्वप्न नावारुपाला आलं.
हळू हळू करता आता इथे ३५ माणसांची राहण्याची सोय झालीये. त्यांचा इथला सात जणांचा स्टाफ अतिशय विनम्र आणी हसतमुख असून सदैव मदतीला तत्पर असतो. अशी माणसे जोडण्यात आणी ती धरून ठेवण्यात अंजना चा सुस्वभावच कारणीभूत आहे,यात शंकाच नाही.

असा आमचा हा दोन दिवसाचा आल्हादकारक स्टे आम्हाला ध्यानीमनी ही नसताना मिळाला आणी काहीतरी खजिनाच सापडल्याचा आनंद झाला.. म्हणून तर हा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावासा वाटला..
ही आहे अल्बम ची लिंक..

https://goo.gl/photos/orRw4QxwXKUksa3s8

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षु, अगं आम्हाला कोणालाच दिसत नाहीत फोटोज. माहिती मस्त दिली आहेस. आता फोटोज पहाण्याची उत्सुकता आहे.

फोटो डेस्कटॉपवरही दिसत नाही आहेत. वर फक्त मानुषी यांनाच फोटो दिसले आहेत, मला वाटते ते तुम्ही सार्वजनिक पाहण्यासाठी केलेले नाही आहेत आणि ज्याना अ‍ॅक्सेस दिला आहे त्यानाच दिसत आहेत.

वर्षू...
अजुनही तीच गत आहे...मला नाही दिसताहे फोटो Sad

@वर्षू.
प्रश्न मायबोलीवर सार्वजनिक करण्याचा नाही. जिथे तुम्ही ते फोटो साठवले आहेत (बहुधा गुगल) तिथे ते सार्वजनिक केलेले नाहित. ते थेट लिंकवर जाऊन पाहायचा प्रयत्न केला तर गुगल आधी तिथे लॉगीन करा म्हणते आणि लॉगीन केल्यावर अ‍ॅस्क्सेस नाही असे म्हणते आहे. आधी तिथे ते सार्वजनिक केले पाहिजेत.

Pages