मराठी भाषा दिन २०१७ - लहान मुलांसाठी घोषणा (मुदत ६ मार्चपर्यंत वाढवली आहे)

Submitted by संयोजक on 21 February, 2017 - 03:09

त्या सुंदर मायबोलीवरती, फुलराणी ती खेळत होती...

मंडळी, मराठी भाषा दिनानिमित्त मोठ्यांकरिता उपक्रम अगोदरच जाहीर झाले आहेत. पण या उत्सवात मुलांचाही सहभाग असावा असा मायबोलीचा कटाक्ष असतो. तर आता जाहीर करत आहोत मुलांकरिता उपक्रमः

चिव चिव चिमणी
वयोगट (२ ते ६)
मायबोलीकरांनी आपल्या मुलांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायची आहेत. गाणी कुठली हवीत यावर बंधन नाही फक्त ते मराठी असलं पाहिजे आणि त्या वयाला साजेसे असावे.

यो ... लोगो!
वयोगट ( ७ ते १५)
आजचे युग हे संगणकाचे आणि जाहीरातीचे आहे. या दोन्ही क्षेत्रात ओळखले जाण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे लोगो. मराठी म्हटले की काय आठवते याबद्दलच्या त्यांचा कल्पना वापरून त्यांनी मराठी भाषा दिनाचा लोगो तयार करायचा आहे. मुलांनी लोगो कागदावर काढून पालकांनी त्याचा फोटो पाठवावा किंवा संगणकावर लोगो बनवून त्याची इमेज फाइल पाठवावी.

एक होता राजा...
वयोगट ( ७ ते १५)
आम्ही खाली काही कथांच्या रुपरेषा दिल्या आहेत. त्या वापरून मुलांनी कथा लिहायची आहे. कथा फुलवताना मुलांनी त्यांच्या कल्पना वापरायच्या आहेत आणि शेवटही त्यांच्याच कल्पनेनेच करायचा आहे.
परदेशातील मुलांसाठी अथवा ज्या मुलांना मराठी लिखाण जमणार नसेल त्यांनी खालील विषयांमधील एक विषय निवडून स्वतः कथा तयार करून मराठीत सांगावी, त्याची क्लिप पाठवावी.

कथाबीजे:

१. सिंडरुडी
एक राजकन्या असते - सिंडरेला तिचे नाव.
वुडी बिचारा एकटा बसलेला असतो, त्याला खेळायला कोणीच नसते.
परी सिंडरेलाला सांगते की टोपलीतले एकच खेळणे निवडता येईल. सिंडरेला वुडी निवडते पण तिच्या हातून एक वाघही टोपलीच्या बाहेर पडतो.

२. मंगळबुक
शेरखानचा मुलगा बाघा आता मोठा झालाय. मोगलीवर त्याचा राग आहेच आणि त्याला आगीपासून स्वतःचे संरक्षण करायची कला माहित झाली आहे.
मोगलीकडे आता एकच मार्ग उरलाय. तो म्हणजे मंगळावरील लांडग्यांकडून अ‍ॅटम बाण घेऊन यायचा. त्यात धोका आहेच पण जंगलात राहून वाघाचा सामना करायचा दुसरा पर्याय नाही.
बगीरा त्याला इस्रोच्या आवारापर्यंत सोडतो

३. सामना
पृथ्वीवर परग्रहवासियांकडून हल्ला होतो.
त्यांचा सामना करण्यासाठी जेरी, मिकी माऊस, छोटा भीम एक यान तयार करतात.
कृष्ण त्यांचा यानचालक होण्याचे मान्य करतो.

नियमः
१. ह्या स्पर्धा नाहीत खेळ आहेत.
२. हे उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलांसाठीच आहेत.
३. पालकांनी स्वता:च्या आयडीने मुलांच्या गाणी, लोगो, कथा पाठवायच्या आहेत.
४. एक मुलगा / मुलगी त्याच्या वयोगटानुसार एक किंवा एकापेक्षा जास्त उपक्रमात भाग घेऊ शकतो.
५. चिव चिव चिमणी अणि एक होता राजा या उपक्रमाकरता व्हिडीओ क्लिप्स पाठवायच्या आहेत. ज्यांना व्हिडीओ क्लिप्स शक्य नाहीत त्यांनी ऑडीओ क्लिप्स पाठवल्या तरी चालेल.
६. गाणी, लोगो आणि कथा sanyojak@maayboli.com या इमेल पत्त्यावर पाठवाव्या. आम्ही त्या इथे प्रकाशीत करू.
७. चिव चिव चिमणीत आपला मुलगा/मुलगी भाग घेणार असेल तर तो/ती कुठले गाणे म्हणणार आहे हे कृपया मायबोलीकरांनी संयोजकांना आधी इ-मेलद्वारे कळवावे. म्हणजे प्रताधिकाराशी संबंधीत काही समस्या असतील तर त्या सोडवता येतील.
८. प्रवेशीका २७ फेब्रुवारी ते ४ मार्च (11 pm IST) पर्यंत पाठवाव्या.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिव चिव चिमणीत आपला मुलगा/मुलगी भाग घेणार असेल तर तो/ती कुठले गाणे म्हणणार आहे हे कृपया मायबोलीकरांनी संयोजकांना आधी इ-मेलद्वारे कळवावे. म्हणजे प्रताधिकाराशी संबंधीत काही समस्या असतील तर त्या सोडवता येतील.

पालकांनी स्वता:च्या आयडीने मुलांच्या गाणी, लोगो, कथा पाठवायच्या आहेत>>> २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यानच पाठवायच्या आहेत ना ?

संयोजक, ईमेल केली आहे. प्रताधिकाराबद्दल संबंधितांकडून खातरजमा केलेली आहे. कृपया ईमेलमधली लिंक उघडतेय का बघणार का?

धन्यवाद आशूडी .थोड्याच वेळात तुमच्याशी याबाबत संपर्क साधू.

मेधा, बदल केला आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद Happy