पद्मा आजींच्या गोष्टी १५ : श्रद्धेचे बळ

Submitted by पद्मा आजी on 26 February, 2017 - 00:30

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

सर्वांच्या अभिप्रायां बद्दल धन्यवाद. तुमच्या अभिप्रायांमुळे मला प्रोत्साहन मिळते व नवीन गोष्टी आठवतात. म्हणून प्रतिसाद देण्याची विनंती.

मी तुम्हाला आज माझ्या बहिणीच्या सासऱ्यांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.

एकदा काय झाले, मी गेले होते माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरी म्हणजे - नागपूरला. धंतोली परिसरात राहायची ती.

दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही सगळे बसलो होतो खोलीमध्ये. सगळ्या खिडक्या आणि दरवाजांवर वाळ्याचे पडदे लावले होते. नागपूरच्या उन्हाळ्याचे दिवस होते तेव्हा. दुपारी अगदी वाळ्याचे पडदे लावून त्यावर पाणी फवारल्या शिवाय बसता पण नाही यायचे.

तेव्हा कशास्तव गोष्टी निघाल्या आणि माझ्या बहिणीच्या सासूंनी गोष्टी सांगायला सुरवात केली. त्यातलीच हि एक.
त्यांनी सांगितले कि काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचे सासरे आजारी पडले होते. कुठल्याच उपचारांचा फायदा होत नव्हता. हा वैद्य - तो वैद्य झाला पण काही नाही.
त्या म्हणाल्या, "मला तर काय करावे समजेना. बघता बघता तब्येत बिघडत गेली. आमच्या कडे दत्ताचे प्रतिष्ठान होते. ते कशेबशे करून दत्ताची पूजा करायचे मात्र. पण अगदीच जुजबी. त्याचे त्यांना फार वाईट वाटे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ऍलोपॅथिक सगळे डॉक्टर करून झाले. पण काही उपयोग नाही. कोणी म्हणे कि हा होम करा तसेही करून झाले. पण जशेच्या तसेच. जेवणखाण पण बंद झाले होते."

"बापरे. मग?" बहिणीने विचारले.

"अगदी आज जातात कि उद्या अशी परिस्थिती झाली. आम्ही सगळे घाबरलेलो. पण त्यांना मात्र दत्ताच्या पूजेत खंड पडतोय याचीच चिंता. मग एक दिवस काय झाले, सकाळी सकाळी मला आणि प्रभाकर ला (म्हणजे बहिणीच्या मिस्टरांना ) बोलाविले व म्हणाले, "मला काल दृष्टान्त झाला. दत्तात्रया ने मला नरसोबा वाडीला बोलाविले आहे."

आम्ही म्हटले, "कसे काय शक्य आहे? औषधे बंद पडतील. डॉक्टर कसा मिळेल तिकडे?"

तर म्हणाले, "मला घेऊनच चला. दृष्टान्त खोटा ठरणार नाही. आणि मारायचे असेल तर तिकडेच मरेन."

झाले. त्यांनी काही ऐकलं नाही. म्हणून शेवटी आम्ही घेऊन गेलो नरसोबा वाडीला. तेव्हा काही हॉटेलं नव्हती. म्हणून एका ब्राह्मणांच्या वाड्यात उतरलो. वाड्यात एक दत्ताची मूर्ती होती. तिची पूजा करायचे झोपल्या झोपल्या. औषधे तर घेणे बंद होतेच. फक्त दत्ताचा अंगारा लावायचे. सुरुवातीला म्हणायचे खाट नेवून ठेवा मंदिरापाशी. मग आम्ही न्यायचो पण.

एक आठवडा गेला. दोन गेले.

मग हळूहळू थोडे जेवण वाढले. मग तिसऱ्या आठवड्या नंतर उठून बसू लागले. काही डॉक्टर नाही कि औषध नाही. तीन महिन्यानंतर चक्क उभे राहू लागले आणि पूजा करू लागले. तरी आजून एक महिना काढला तिथे. म्हटले पूर्ण बरे व्हा मगच जावु. अशे चार-पाच महिने काढले तिथे. पण झाले बरे पूर्ण. औषध नाही कि डॉक्टर नाही. नुसत्या अंगाऱ्यावर.

श्रद्धे चे बळ. बाकी काही नाही. असे म्हणत त्यांनीं दत्ताला नमस्कार केला आणि गोष्ट संपविली.

पण गोष्ट तिथेच नाही थांबत. माझ्या त्याच बहिणीचा मुलगा आत्ताच आला होता माझ्याकडे. तो चालला होता नरसोबा वाडीला. म्हणून मी पण गेली त्याच्या बरोबर.

तिथे गेल्यावर आम्ही गेलो होतो त्या वाड्यात -- जिथे माझ्या बहिणीचे सासरे राहिले होते. तिथे ती दत्ताची मूर्ती आहे उभी अजून. त्याने त्या मूर्तीला अभिषेक केला व म्हणाला, "आजोबांना फायदा झाला. म्हणून वडिलांनी सांगितले आहे नरसोबाला गेल्यावर या मूर्तीला अभिषेक करायचाच."

बघा, जुने लोक गेले पण त्यांच्या प्रथा अजूनही टिकून आहेत.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या गोष्टी सांगतांना आज्जीच शेजारी बसून गोष्ट सांगते आहे असं वाटतं. इथल्या अनेक आज्जी हरवलेल्या नातवंडांच्या वतीने खूप घट्ट मिठी.

छान वाटते तुमच्या गोष्टी वाचतांना... अगदी आजीच जवळ घेऊन गोष्ट सांगते आहे असे वाटते.
अर्थातच ही गोष्टसुद्धा आवडलीच. Happy

तुमच्या गोष्टी सांगतांना आज्जीच शेजारी बसून गोष्ट सांगते आहे असं वाटतं. इथल्या अनेक आज्जी हरवलेल्या नातवंडांच्या वतीने खूप घट्ट मिठी.>>> +1

आज्जी, तुमच्या सगळ्याच गोष्टी छान असतात, फक्त प्रतिसाद देतोच असे नाही.
त्यामुळे तुम्ही गोष्टी सांगत रहा, नातवंडं आहेतच कोंडाळे करुन गोष्टी ऐकायला तयार.

छान

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्||
फेथ हीलिंग या धाग्याशी काही समांतर व काही अवांतर.
पद्मा आजी हे बी वाचा!