गाना न आया, बजाना न आया

Submitted by फारएण्ड on 17 February, 2017 - 20:55

एक थोर गायक म्हणून गेलेला आहे, 'गाना न आया, बजाना न आया, दिलबर को अपना बनाना न आया'. आमची हे असले संशोधन करणारी टीम यातील तिन्ही गोष्टींशी अगदी परिचित आहेच. या संशोधनात वेळ जात असल्यानेच आम्हाला या गोष्टी जमलेल्या नाहीत. मात्र आमचे टीकाकार याच्या बरोब्बर उलटे आहे असा आरोप करतात.

तर पूर्वीच्या ऋषीमुनींनी जशी जीवनाची कोडी सोडवली, तशी आमची टीम चित्रपटातील कोडी सोडवणे हे आपले ध्येय समजते. या टीम ला दिल समजले, इश्क समजले, बरेच काही नियम समजले, पण ही गाणी मात्र काय खाउन लिहीली गेली आहेत ते अजिबात कळत नाही. तर आमच्या टीम ने काही गाणी "सोडवायचा" प्रयत्न केला पण कोणालाही ते जमले नाही. सुरूवातीला बरे होते. लोक काय सांगायचे ते सरळसोट सांगून टाकत. कोणाला झोपवायचे असेल तर 'सो जा राजकुमारी सो जा', 'आजा री आ निंदिया...' वगैरे. या गाण्यांचे पुढे 'दो नैना एक कहानी, थोडासा बादल, थोडासा पानी' वगैरे अॅब्स्ट्रॅक्टीकरण झाले व लोक गाणी ऐकताना गुंगून जाण्यापेक्षा ती न झेपल्याने झोपू लागले. तरी उपमा कंट्रोल मधे होत्या तोपर्यंत ठीक होते. म्हणजे 'जैसे बरसे कोई बदरिया ऐसे अखियाँ बरसे' मधे ही केवळ उपमा आहे, शब्दश: घ्यायची नाही - म्हणजे डोळ्यातून अश्रू स्प्रे मारल्यासारखे खाली पडत नाहीत याची कल्पना आली. तरी पाणी वरून खाली पडते यापेक्षा या दोन्हीत काय साम्य आहे हा प्रश्न राहिलाच. पण तरी ठीक होते.

मात्र नंतर या उपमासृष्टीत अचाट गोष्टी येउ लागल्या. त्या उपमा, अलंकार कोणालाच कळेनात. शेवटी कंटाळून यावर रिसर्च करणारे लोक सोडून जाउ लागले. त्यामुळे 'अच्छा दोस्त' नावाच्या चिरविरही व्यक्तीच्या कहाणीप्रमाणेच हा ग्रंथ अपूर्ण राहणार अशी भीती वाटू लागली. मात्र तेवढ्यात आम्हाला लक्षात आले की या रिसर्च करणार्‍यांनी ही गाणी सोडवायचा प्रयत्न करताना काही नोट्स काढल्या होत्या. त्या वाचून हे किती मोठे आव्हान होते ते वाचकांच्या लक्षात यावे म्हणून त्याच येथे एकत्रित करून सादर करत आहोत. पुढील रिसर्च कोणाला करायचा असेल तर जरूर याचा फायदा होईल. नाहीतरी विज्ञानातील अनेक शोध आधीच्या शोधांवर आधारितच असतात.

१. "फूल बने है घूंगरू, घुंगरू बन गये फूल..."

म्हणजे नक्की काय? समजा यात सुरूवातीला m घंगरू असतील व n फुले असतील. तर त्यावर हे गाणे गायल्याने काय होईल याच्या बर्‍याच शक्यता निर्माण होतात. जीआरई वगैरे परिक्षांना हे गाणे लावता येइल अशी शिफारस आमची टीम येथे करत आहे.

तर (m घुंगरे + n फुले) + (हे गाणे) =

अ. n घुंगरू व m फुले: कारण अदलाबदल एकदमच झाली
ब. (m + n) फुले. कारण पहिल्यांदा फुले घुंगरांमधे बदलली व नंतर ती सगळी घुंगरे पुन्हा फुले झाली.
क. (m + n) घुंगरे. कारण फूल बने है घुंगरू, घुंगरू बन गये फूल हे कवितेचे नियम लावले तर एकच वाक्य दोन रूपांत म्हंटले आहे त्यामुळे गणितदृष्ट्या ते वेगळे धरता येणार नाही.

त्यामुळे या गाण्यात ऋषी कपूरने डफलीवर टिचकी वाजवल्यानंतर सृष्टीची अवस्था नक्की काय होती याबद्दल बरेच संदेह आहेत.

२. ".. उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते"

हा खुलासा सुमारे साडेचार मिनीटं आणि तीन कडवी चालतो. आता 'हम कुछ नहीं कहते' म्हणून जर एवढी मोठी गजल म्हंटली जात असेल तर ही व्यक्ती बडबडी असेल तर काय होईल!

३. "दुख मेरा दुल्हा है, बिरहा है डोली,
आँसू की साडी है, आहोंकी चोली..."

या वाक्यातील उपमा ज्या दिशेने चालल्या आहेत ते पाहता पुढच्या काही वाक्यांना नक्कीच सेन्सॉर ने उडवले असेल.

४. " देख के तेरा रूप सलौना, चाँद भी सर को झुकाता है..."

Hey Moon! How is it going?
Not much. Just reflecting!
Why the sad face then?
Oh this guy on earth is saying that there is some girl who looks better than how I look to him from there. I am sad at their brilliance.

५. "ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी..."

अरे माझ्या खगोलजीनियस मित्रा, जेव्हा तुला रात सुहानी दिसते व समोर चंद्र दिसतो तेव्हा तेथे लख्ख उन पडलेले असते. हे म्हणजे अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला ख्रिसमस ला 'लेट इट स्नो लेट इट स्नो..." गाणे ऐकवण्यासारखे आहे..

६. "..जब भी झरनों से मैने सुनी रागिनी, मै ये समझा तुम्हारी ही पायल बजी"
https://www.youtube.com/watch?v=YDkBL3lYgKc&t=1m13s
उपमेला उपमा. मुळात झरनों से रागिनी हीच उपमा आहे. ती जेव्हा ऐकली तेव्हा काहीतरी दुसरे वाजल्यासारखे वाटले. म्ह्णजे मी झर्‍याचा आवाज ऐकला (मूळ आवाजः पाणी), तेव्हा मला नेहमी जे ऐकल्यासारखे वाटते (पाणी->रागिणी), तेव्हा मला तुझी पायल वाजल्यासारखे वाटले (पाणी->रागिणी->पायल)

७. "जिन्हे इस जहाँ ने भुला दिया, मेरा नाम उन मे ही जोड दो,
मुझे तुमसे कुछ भी ना चाहिये, मुझे मेरे हाल पे छोड दो"

महापालिका विस्मृतीत गेलेले कवी विभाग-२. रजिस्टरः ११/मविगेक/२०१५
लेखनिकः "अं.... काय नाव लिहायचं?"

८. "कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा...
...
उनसे कहना जब से गये तुम मै तो अधूरी लगती हूँ..
...
यहाँ का मौसम बडा हसीं है फिरभी..."

कबूतर म्हणेल हे सगळं चिठ्ठीतच का नाही लिहीलं? उगाच आणखी मला काम. बातम्या झाल्या, मौसम का हाल झाला, आता त्यात " ब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है..." घाला म्हणजे स्कोरबिर ही सांगून पूर्ण बातमीपत्रच तयार होईल.

९. चाँद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर
वो बेचारा दूर से देखें, करे न कोई शोर

कायच्या काय. चकोर गप्प बसला म्हणे. तो ओरडला असता तर चंद्राला ते कळणारच होते!

१०. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, नवतरूणी काश्मिरी
https://www.youtube.com/watch?v=sGD6IXRZnk0&t=43s

हे गाणे गाजल्याच्या नोंदी सापडतात. पण आश्चर्य म्हणजे या गाण्यात तो तिची तारीफ करत आहे असे समीक्षक लोकांना वाटलेले दिसते. म्हणजे कोणाला हे गाणे कळालेच नसावे.

चिनार: चिंचेचे झाड
काश्मिरी नवतरूणी: तू

यातून वरच्या दोन्हींत जेवढा फरक आहे तेवढा खालच्या दोन्हीत आहे असेच सुचवायचे असावे. तसेच भारतात व्हर्च्युअल रिअॅलिटी खूप आधीपासून होती हे हे गाणे सिद्ध करते, ती ही टेलिपॅथिक. तिने गॉगल घातल्यावर याला काश्मीर दिसते.

११.
"हम तुम, एक कमरे मे बंद हो, और चाबी खो जाय"

यातील कमरेमे बंद होण्याच्या फॅण्टसीमुळे यातील लॉजिकल गोची पुढे येत नाही. जर दोघे खोलीच्या आत असतील तर आतून कुलूप कशाला लावायची गरज आहे? केवळ कडी लावून काम होणार नाही का? याउलट जर कुलूप दुसर्‍याच कोणीतरी बाहेरून लावले असेल तर किल्ली हरवली काय किंवा सापडली काय काहीच फरक पडणार नाही. पण एकूणच फार ब्राइट नसावेत हे. घनघोर अंधेरा फक्त "आगे" असतो, किंवा दोघांपैकी कोणाला खावे हे वाघ यांचे ऐकणार असे समज हेच दाखवतात.

१२. "हमने सनम को खत लिखा, खत मे लिखा,
ऐ दिलरूबा, दिल की गली, शहर-ए-वफा..."

हे पत्र नक्कीच मिळाले नसणार. पत्ता नीट लिहीत नाहीत आणि उगाच पोष्टाला दोष. वरचा दिल की गली वगैरे पत्ता जरी खरा मानला तरी तो पत्राच्या वर लिहायचा असतो, पत्राच्या आत नाही.

१३. तुझको नजरे ढूँढ रही है, मुखडा तो दिखलाजा हो मुखडा तो दिखलाजा
रस्ते पर है आस लगाये आनेवाले आजा...

वाट पाहात आहे ते ठीक आहे, पण रस्त्यावर कशाला बसायला पाहिजे. त्यात मुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर ताबडतोब दोन बकर्‍या तिच्याजवळ येत असल्याने हे गाणे नक्की कोणाला उद्देशून आहे याबद्दलही शंका आहेत.

१४. हाय ये फूलसा चेहरा, ये घनेरी जुल्फे
मेरे शेरों से भी तुम मुझको हसीं लगती हो
https://www.youtube.com/watch?v=yQOIDLOYg1Y&t=1m15s

सर्कशीतील रिंगमास्टर च्या सत्कारसभेत पत्नीला उद्देशून केलेली तारीफ.

15. दूरातल्या दिव्यांचे, मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे, आभाळ सांडलेले

या लेले ला काय काय अचाट गोष्टी करायला सांगत आहेत या गाण्यात! मणिहार काय मांड, आभाळ काय सांड, काहीही.
पण एकूणच या लेले लोकांबद्दल फार आकस दिसतो. स्वतःच्या बाहुपाशांत कोणी 'लेले' असून सुद्धा एकटेच फिरत असल्याच्या तक्रारीही सापडल्या आहेत

“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट आहे. Lol

या लेले ला काय काय अचाट गोष्टी करायला सांगत आहेत या गाण्यात! मणिहार काय मांड, आभाळ काय सांड, काहीही.
पण एकूणच या लेले लोकांबद्दल फार आकस दिसतो. स्वतःच्या बाहुपाशांत कोणी 'लेले' असून सुद्धा एकटेच फिरत असल्याच्या तक्रारीही सापडल्या आहेत

“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”>> हे अचाट आहे. Rofl

Lol मस्त. मजा आली.

Hey Moon! How is it going?
Not much. Just reflecting! - हा ब्रिलियंट आहे!

आणि 'लेले' Lol

'लेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेरे... चल बेटा सेल्फी लेले रे' हे उगाच आठवलं लेल्यांवरून!

फारेण्ड, Rofl

-------------------------------
जेव्हा तुला रात सुहानी दिसते व समोर चंद्र दिसतो तेव्हा तेथे लख्ख उन पडलेले असते. <<< मी त्या मित्राचा नातेवाईक वगैरे नाही पण तरीही, हेही काय?

चिनार: चिंचेचे झाड
काश्मिरी नवतरूणी: तू
<<<< इथे ज्या क्षणी पहिल्यांदा चिंचेचे झाड गाण्यात ऐकले होते त्या क्षणापासून त्या गाण्यातल्या गायकाच्या आवाजात बारीक थरथर आहे असा जो भास होतो तो आजवर.

मस्त लेख. फार एंड तुम्ही यूट्यूब चॅनेल चालू करा. क्रिकेट व बॉलिवूड वर. मस्त चालेल. युअर प्रतिभा नीड्स अ लार्जर ऑडिअन्स.

मस्त लेख फारएण्ड
बर्‍याच दिवसांनी काहीतरी दर्जा असलेलं लेखन वाचायला मिळालं.

फारेण्ड,

कोई हसीनाचे रूठणे आणि 'टेसन से गाडी जब छूट जाती है तो, एक दो तीन हो जाती है' याच्या विवरणावर तुमच्या टीमने काही काम चालू केलेले, काही कच्चे मसूदे वगैरे आढळले का?

व्वा!!! फारएण्डा च्या रिसर्च ला श्रद्धा तैं चा प्रतिसाद म्हणजे सोने पे सुहागा. हा रिसर्च रीतसर आयएसबीएन नंबर वगैरे घेऊन पब्लिश करावा असं फा महाराजांकडे विनम्र निवेदन आहे.

मला तर त्या 'लेले' सारखच 'शर्मा' चा पण हेवा वाटतो. पहा ना, 'सुहाग रात है, घुंघट उठा रहा हू मै' आणी हे सगळं चालू असताना, 'सिमट रही है तू 'शर्मा' के अपनी बाहोंमे'.

तसच त्या चंद्राच्या म्हातार्या विधवा आईला वगैरे गुंडांच्या अड्ड्यावर बांधून ठेवून त्याच्याकडून बंदुकीच्या धाकावर कबुलीजवाब घेणारं गाणं, 'मैने पुछा चांद से के देखा है कहीं, मेरे यार सा हसीं, चांद ने कहा, चांदनी की कसम (ईथे मला 'मै गीता पे हाथ रख के कसम खाता हू ची आठवण होते) नही, नही, नही' (त्रिवार कबूली).

मस्त!
भरपूर हसलो!
फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेलेLol

एक नंबर!!!
<<“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”>> यावर उपाय फार दिवसांनी मिळाला आणि ते लेले नसून 'फडके नाम तेरा फडके' असा खुलासा आला आहे.

कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा...
...
उनसे कहना जब से गये तुम मै तो अधूरी लगती हूँ..
...
यहाँ का मौसम बडा हसीं है फिरभी..."
कबूतर म्हणेल हे सगळं चिठ्ठीतच का नाही लिहीलं? उगाच आणखी मला काम.
<<<<<<
यावर मी माझे बारकेसे संशोधन पेश-ए-खिदमत करू इच्छिते. कबुतराच्या सवालाचा जवाब देण्यासाठी आपल्याला चित्रपटाची जातकुळी लक्षात घ्यावी लागेल. आता हा एक संस्कारयुक्त बडजात्यापट. त्यात ज्याच्याशी अजून लग्न झालेले नाही आणि प्रेम जमलेले दोन्हीकडच्या पालकांना माहीत नाही, अशा व्यक्तीला चिठ्ठीत रोमँटिक वाक्ये लिहायची म्हणजे महापाप. कबुतराने कृष्ण वा इतर कुठल्या देवाकडून सिग्नल मिळाल्यामुळे (पहा: हआहैको. सलमानच्या नावे लिहलेली चिठ्ठी मोहनीशदादाच्या हाती कुत्रा नेऊन देतो) चिठ्ठी रीमा लागूच्या हातात दिली म्हणजे? किंवा अजून वाईट म्हणजे मोहनीशदादाच्याच हाती दिली म्हणजे? (तो त्याचे जाहीर वाचन करून 'पहा पहा म्हटलं नव्हतं मी? एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते.' म्हटला असता. असो.) संकट टाळायला चिठ्ठीत केवळ 'आज गवळ्याकडून एक लिटर दूध कमी घेतले. नाश्त्याला पुरीभाजी केली होती. ' वगैरे बिनमहत्त्वाचे डिटेल लिहून बाकीचा खाजगी निरोप तोंडी सांगितला आहे.

दुसरे म्हणजे या एवढ्या डीप भावना पत्रात मांडल्या तर कबुतराला पायाला बांधलेले पत्र पेलवेल का? हे डिटेल्स नसलेली चिठ्ठीसुद्धा कबुतराला इतकी जड होते की ते उडत जाण्याऐवजी कारमध्ये बसून जाते. वरील सर्व इमोशन्स इंक्लुडेड असलेले पत्र जर बिचाऱ्याने पायाला बांधून वाहून नेले असते तर त्याला ताबडतोब सलाईन लावावे लागले असते.

असो.

मला वाटायच मीच इत्का विचार कर्तेय का काय? लई चिडचिड होते लिरिक्स ऐकुन. सध्या सगळ्यात जास्त डोक्यात जाणार्या गाण्यात हे दोन आहेतः
जलते दिये , प्रेम रतन धन पायो मधलए.

"सुनते हैं जब प्यार हो तो दिए जल उठते हैं तन में,
मन में और नयन में दिए जल उठते हैं
आजा पिया आजा, आजा पिया आजा हो
आजा पिया आजा,
तेरे ही तेरे लिए जलते दिए
बेपानी तेरे साए में साए में
जिंदगानी बिताई तेरे साए में साए में

कभी कभी, कभी कभी ऐसे दीयों से
लग ही जाती आग भी
धुले धुले अंचलों पे
लग ही जाते दाग भी हैं
वीरानों में बदलते देखे मन के बाग़ भी".

फायर दिपार्ट्मेन्ट्च बोलाव्ले पाहिजे इतकी आग आहे या गाण्यात. च्या मारी.

आणि काबिल मधले, 'मै तेरे काबिल हू या तेरे काबिल नही'? किती मिडियॉकर असाव याला काही लिमिट्च नाही. असो. लेख वाचून भरुन आल्यामुळे तावातावाने लिहिलय. Happy माफ करा.

Pages