बिटवीन यू अ‍ॅन्ड मी

Submitted by बेफ़िकीर on 21 April, 2016 - 13:00

महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचा सावंत पुण्याला आला होता. अल्फा ऑटोकडे कॉन रॉड्स अडकले होते. विषय बरेच होते. अल्फावाल्यांनी हाय प्राईस सेगमेन्टच्या नावाखाली एस्कॉर्ट आणि सिंप्सनच्या वेड्यासारख्या ऑर्डर्स घेतलेल्या होत्या. महिंद्राकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यासारखे अल्फाचे मार्केटिंग डिपार्टमेन्ट वागू लागले होते. महिंद्राच्या तक्रारींनी एस्कलेट व्हायला सुरुवात करूनही आठवडा झालेला होता. अल्फाच्या व्हीपींनी आठ दिवस मागीतले होते. त्यानंतरही माल सप्लाय झालेला नव्हता. व्हीपींच्या पदावरून आलेली कमिटमेन्टही फॉलो केली जात नसेल तर अर्थ काय असा सवाल महिंद्राचे लोक अल्फाच्या ऑफिसर्सना विचारू लागले होते. महिंद्राचे साठ टक्के सोर्सिंग अल्फाकडून होते. इन्व्हेन्टरी संपू लागली होती. अजून तीन दिवसांत कॉन रॉड्स पोचले नाहीत तर असेंब्ली शॉपमध्ये लाल लाईट लागणार होता. फार वरून झापलं गेलं असतं. एक दोघांच्या नोकर्‍या धोक्यात येऊ शकल्या असत्या. मार्केटमध्ये ट्रॅक्टर दिसला नाही तर ऑर्डर्स फटकन् कोणतीही कंपनी उचलते हे पूर्वानुभवाने माहीत होते. इज्जतीचा सवाल होता. बूकिंग ओव्हर होते. गेली सलग चार वर्षे व्यवस्थित पाऊस असल्याने ट्रॅक्टर इन्ड्स्ट्री जोमात होती. दुसरा विषय म्हणजे महिंद्राकडे थकलेली पेमेन्ट्स! सावंतने फक्त कागदावर प्लॅन लिहून आणला होता पेमेंट्सचा. 'आम्ही पेमेंट केले नाही तर सप्लाय थांबवणार आहात का' असे दादागिरीने फोनवरून विचारूनही सावंतला आठ दिवस झालेले होते. तरीही त्याने कागदावर प्लॅनच आणला होता. नाही म्हणायला एक मागचा कुठलातरी तेहतीस हजाराचा चेक तेवढा घेऊन आला होता. चौदा लाखापैकी तेहतीस हजार मिळाले म्हणून अल्फा नाचत सुटेल असे सावंतलाही वाटत नव्हते. पण अल्फावालेही बिझिनेससाठी लाचारच होते. एस्कॉर्ट आणि सिंप्सनचा एक्स्पोर्ट थांबला की महिंद्राचे पाय चेपावे लागणार हे त्यांना माहीत होते. पेमेंटचे कारण खरे असले तरी सप्लाय न होण्याचे ते प्रमुख कारण नव्हते. एम डीं नी एस्कॉर्ट आणि सिंप्सनवर फोकस ठेवायला सांगितला होता.

तास, दोन तास सावंत अल्फाच्या प्लॅन्टमध्ये मालकासारखा फिरला. जाईल तेथे लोक सलामी झोडत होते. शेवटी कस्टमरचा माणूस! प्रत्येक केबीनमध्ये चहा किंवा कॉफीचे कप येऊन आदळत होते. काही काही सेक्रेटरीज उगाच फार ओळख असल्यासारख्या सावंतशी गप्पा मारत होत्या. सावंतची भिरभिरती नजर शोधत होती अप्पाला! अप्पा मार्केटिंगचा डेप्युटी मॅनेजर होता. अप्पाला सगळे अप्पाच म्हणत असत. अप्पा इज होल अ‍ॅन्ड सोल ऑफ अल्फा असे गंमतीने भारतभरात म्हंटले जायचे. खरे तर अप्पा मिडल मॅनेजमेन्टचा एक मोहरा होता. पण प्रचंड अ‍ॅलर्ट, वेल इन्फॉर्म्ड आणि सगळ्यांशी अत्यंत व्यावसायिक पण हसरी रिलेशन्स असलेला! अप्पा नसेल तर काहीच व्हायचे नाही त्यामुळे! अप्पाचा बॉसही 'होय होय, जस्ट अप्पाला येऊदेत, करून घेतो' असे म्हणायचा. अप्पाने पंधरा वर्षे अल्फामध्ये घासून स्वतःची अशी पोझिशन तयार केलेली होती की तो नसला तर काय होईल ह्याचा विचारही करवत नव्हता. मोठमोठ्या बॉसेसना आणि कस्टमर्सकडच्या वरिष्ठांनाही अप्पा आरामात मॅनेज करायचा. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही असे व्हायचे नाही. अप्पाची प्रेझेन्टेशन्स शिकण्यासारखी असायची. पार वेधशाळेच्या वृत्तानुसार पाऊस किती असेल आणि त्याचा ट्रॅक्टर इन्डस्ट्रीवर किती टक्के परिणाम होईल येथपासून ते टाटाचा जे ब्लॉक ह्यावेळी तुफान चालणार वगैरे गोष्टी अप्पा आरामात पटवू शकायचा. तो स्वतःच्या घरी तीन पेपर्स घ्यायचा आणि ते पूर्ण वाचून कंपनीत यायचा. संध्याकाळी टीव्हीवर शेअर्सपासून ते राजकारण, चित्रपट आणि क्रिकेटपर्यंतच्या सगळ्या बातम्या बघायचा. अप्पाकडे सगळ्यांच्या वाढदिवसाच्या तारखा असायच्या. कस्टमरकडच्या प्रमुख लोकांच्या तर मुलाबाळांच्या वाढदिवसाच्याही तारखा असायच्या. अल्फातर्फे ग्रीटिंग कार्ड्स नावाचा प्रकार अप्पानेच सुरू केला होता.

अप्पाचे एक सूत्र होते. 'मी करत असलेले काम माझे नाही, ते मी पगारासाठी करतो, त्यामुळे त्यात मी व्यावसायिकरीत्याच इन्व्हॉल्व्ह होणार'! हे ते सूत्र! त्यामुळे अप्पाला बोलणी बसायचीच नाहीत. ह्याचे कारण अप्पा नेहमीच एक स्टेप पुढे असायचा. ऑटो सेक्टरच्या प्रॉडक्शन फिगर्स अप्पा रामरक्षेसारख्या म्हणून दाखवायचा. तो कधीही आवाज वाढवायचा नाही. पण अप्पाने सांगितलेले वाक्य ऐकले गेले नाही असे व्हायचे नाही.

'आपल्याला प्रमोट करण्याची चूक मॅनेजमेन्ट कधीही करणार नाही' हे अप्पाला केव्हाच समजलेले होते. प्रमोशन झाले की जबाबदार्‍या बदलणार! मग अप्पाचे काम कोण करणार? त्यामुळे अप्पा कंपनीकडून भरपूर आर्थिक लाभ मिळवून घ्यायचा. परफॉर्मन्स अ‍ॅवॉर्ड, इन्क्रीमेन्ट्स वगैरे! काही सिनियर लोकांपेक्षाही अप्पाला अधिक पैसे मिळायचे आणि त्याबाबत कोणाचीही तक्रार नसायची.

सकाळपासून सावंतने अप्पाला लावलेला सहावा कॉल अप्पाने उचलला.

"कहां हो यार????"

"आलोच आलोच, दुसर्‍या युनिटला जावे लागले"

एरवी मोबाईलची दुसरी रिंग वाजायच्या आत फोन उचलणार्‍या अप्पाने आज फोन उचलायला सहा कॉल का करून घेतले हे सावंतला समजेना!

अप्पा आला. अप्पा आला आणि सगळ्यांनी हुश्श केले. आता हा सावंत अप्पाच्या तावडीत दिला की आपण मोकळे!

अप्पाने सावंतशी हस्तांदोलन करतानाच त्याला माहिती पुरवली.

"रावसाबको फोन करदिया मैने"

सावंत उडला. आपण स्वतः येथे आलेलो असताना आपल्या मुंबईतल्या साहेबाला अप्पाने कशाला फोन करावा? तेही आपले फोन कॉल्स उचलत नसताना?

"कशाला????"

"अहो साहेब कॉन रॉड्स आज नाही होणार, उद्या होणार आहेत. मग तुमच्या स्टे चे काय? राव साहेबांना सांगून टाकले की सावंत साहेबांना कॉन रॉडशिवाय पाठवणार नाही. महिंद्रा म्हणजे आमच्यासाठी सबकुछ! तुम्हाला हॉलिडे इन मध्ये बूक केलंय! वहिनींनाही सांगणार होतो पण म्हंटलं उगाच तुमचे काहीतरी वाद व्हायचे. राव साहेबांनी आदेश दिला आहे की कॉन रॉड घेऊनच तुम्हाला पाठवायचं! राव साहेबांची आज्ञा मोडायची हिम्मत अल्फामधल्या कोणत्याही साहेबात नाही. आता काही आम्ही तुम्हाला सोडत नाही. फायनल तीन स्टेप्स राहिल्या आहेत. दुसर्‍या युनिटला सगळी सेटिंग्ज बदालया लावली. कॉम्पोनन्ट्स लोड झाले असतील आता. तुमच्या नाश्त्याचे काय? आणी हो, स्टोअर मेमोज क्लीअर करूनच वर आलो. उगाच पेमेंट नाही म्हणून सिस्टीम अडकायला नको. तसे आज रात्री दहा वाजता पहिले दोन लॉट्स तयार होतील. पण तुम्ही आल्यावर तुमच्याबरोबर सरोवरचा फिश खायचा नाही तर काय आयुष्यभर कॉन रॉड्स मोजत बसायचे का? उद्या कंपनीची एस्टीम बूक केलीय. त्यातूनच जा. आधी घरी जा, मग गाडी महिंद्राच्या गेटवर जाईल. वजन वाढलेलं दिसतंय साहेब? बरोबरे म्हणा! आमचं गरिबांचं पेमेंट थकवल्यावर वाढणारच. हा हा हा हा! अमृता सहावीत ना आता?"

सावंत मेणाच्या पुतळ्यासारखा बसला होता. बर्‍याच वेळाने म्हणाला....

"अप्पा, हे हॉलिडे इन वगै...."

अप्पाने मधेच तोडले.

"आमच्या वर्मांसाहेबांचे अ‍ॅप्रूव्हल घेतले आहे. अर्थातच बिल आमचे साहेब! चूक कोणाचीय? ज्याची चूक त्याचे बिल! बरं! उद्या दिडशे सेट्स देतो. परवा सहाशे वेगळे पाठवतो. मग मंथली शेड्यूल कंप्लीट करतो. तुमच्याकडे लाल लाईट म्हणजे आमच्याकडे हाय लेव्हल मीटिंग! अरे उपलेंचवार, एस्कॉर्टला सांग सहा दिवस लेट होईल लॉट! का विचारले तर म्हणाव अप्पाशी बोला. मेलच टाक! वुई रिग्रेट टू इन्फॉर्म यू वगैरे! तुझ्या वडिलांचे बरे आहे का? हां! नाहीतर काही लागलं तर सरळ घरी जा! बिझिनेस काय, चालूच असतो. पर्सनल लाईफ महत्त्वाचे! कावळे, दोन कडक चहा सांग. पेपर घ्या सावंतसाहेब! मारुतीचा शेअर बघा! सर, सावंत साहेबांचे सेटिंग करून आलो आहे. महिंद्राचा कोणताही फोन आला तर उद्या त्यांच्याकडे दिडशे सेट्स पोचत आहेत हे आपण सांगू शकतो. थँक यू सर! तुम्ही खाडकन् अ‍ॅप्रूव्हल दिलंत सेटिंग बदलायचं आणि त्या हिरवेचा आवाजच बंद! स्टोअर मेमोचं सिस्टिममधलं अ‍ॅप्रूव्हल फॉर्मली रेग्युलराईझ करून घ्यायचं राहिलं आहे फक्त!"

सावंतने शांतपणे अप्पाच्या डोळ्यांत डोळे मिसळले आणि विचारले....

"मी आज आलो नसतो तर हे सगळं तू केलं असतस?"

"छ्छे! अहो सगळा जमाना देखल्या देवाला दंडवतवाला आहे. माणूस एच ओ ला येऊन थडकला आहे म्हंटले की सूत्रे हालतात"

"मग मला आधीच का यायला सांगितलं नाहीस?"

"कारण केव्हा यायचं ते आमच्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहीत साहेब!"

सावंत खदखदून हसला. म्हणाला....

"स्टेच्या तयारीने मी आलेलो नाही"

"काय सावंत साहेब! अहो एक टूथ ब्रश, एक पेस्ट आणि एक रेझर नाही का देणार हॉलिडे इन? आणि पुण्यात मुंबईसारखी कपड्यांची हालत नाही होत. दिडशे कॉन रॉड सेट्स हातात पडल्यावर तुम्हाला अंगावरच्या वस्त्रानिशी रेड कार्पेट वेलकम मिळणारे तिकडे!"

सावंत पुन्हा हसला.

कॉन रॉड सेट्स दुसर्‍या युनिटमध्ये सेटिंगला लावण्याची क्लृप्ती योजून अप्पाने सावंतची गोची केलेली होती. तिकडे जायला सावंत उत्सुक तर होता पण आता पुन्हा तिकडे जायला अप्पाला वेळ नसेल हे त्याला माहीत होते. तो एकटाच जाऊही शकला असता. पण अप्पासोबत गेल्यानंतर जी हुकुमत प्रस्थापित होते ती एकट्याने जाऊन होईल की नाही ह्याबाबत तो साशंक होता.

खरे तर सावंतचा अप्पावर विश्वासच नव्हता. त्याला वाटायचे की अप्पा नेहमीच बनवतो. पण आत्ता विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

अप्पाचा साहेब खुर्चीत बसून मांडीही हलवत नव्हता. अप्पाचे असिस्टंट अप्पा सांगेल ती कामे त्याक्षणी करत होती. अप्पाचा एकंदर दरारा लक्षात घेता अप्पावर अविश्वास दाखवणे सावंतला परवडण्यासारखे नव्हते. दुसर्‍या युनिटला नेमके काय चालले असेल ह्याबाबत सावंत साशंक होता. पण ते बोलून दाखवण्याची हिम्मत सावंतने जरा कशीबशीच केली.

"एकदा त्या युनिटला व्हिजिट मारून येऊ अप्पा"

"हो चला की? निघायचे का? पण डेक्कनपाशी ट्रॅफीक ब्लॉक आहे. दिड तास लागेल"

"सेटिंग नक्की लावलंय ना?"

अप्पाने डायरेक्ट हिरवेला फोन करून सावंतचे बोलणे करून दिले. हिरवेने सांगितले की तीस जॉब पुढच्या स्टेजला पोचले आहेत.

आता सावंत निवांत झाला. त्याने रावसाहेबांना, म्हणजे त्याच्या साहेबांना फोन केला.

"सर सावंत"

"हां सावंत"

"सर सेटिंग बदलवालिया है मैने! ये लोग कुछ अलगही कररहे थे! मैने जाके अपने कॉन रॉड्स लगवादिये है"

"व्हेरी गुड?"

"लेकिन सर पहला डेढसौ का लॉट कल दोपहरमे मिलेगा"

"कलतक मिलेगा तो ठीक है, उससे ज्यादा लेट नही होनेको होना"

"नही नही सर मै लेके आ रहा हूं खुद! मैने यही चीज इन लोगोंको समझायी के मै अपने हाथोमे कॉन रॉड्स लेके जानेके लिये आया हूं!"

"गुड!"

"सर ये लोग मेरा इधर बूकिंग कियेले है"

"हां तो रुक जाओ ना? कामसे मतलब है"

"जी सर! और सर, छे सौ का लॉट परसो और बादमे मंथली शेड्यूल"

"वो ठीक है लेकिन तुम पहला डेढसौका लॉट कल लेके आओ"

"जी, जी सर"

"प्रोग्रेस अपनी आंखोंसे देखना सावंत! पता चला सुनीसुनी बातोंपे हम डिपेन्ड हो गये और सी आर बनेही नही! "

"जी सर"

"गुड, बाय"

"बाय सर"

सावंत हादरला. रावसाहेबांनी नेमकी शंका बोलून दाखवली होती. सावंतने त्वरीत अप्पाला विचारले.

"मी जाऊ का त्या युनिटला? इथे बसून काय करणार?"

"बाय ऑल मीन्स सर! फक्त तुम्हाला जाण्यात आणि येण्यात दिवस घालवावा लागणार आणि उद्या सकाळी किंवा दुपारी तुम्ही निघून जाणार! एकदा वर्मासाहेबांना भेटून घ्या ना? आलाच आहात तर? आणि साहेब पेमेंट फार ओव्हर ड्यू आहे"

"तुमच्या सिस्टीममध्ये काहीतरी घोळ आहे. आमच्याकडे साडे चार लाख दाखवतंय फक्त"

"अहो साहेब जे दाखवतंय ते तरी द्या ना आधी? रिकोला बसू पुढच्या आठवड्यात. साडे चार लाख देण्याची कमिटमेन्ट वर्मासाहेबांना देता का प्लीज?"

सावंतला महिंद्रामधील सिच्युएशन माहीत होती. थोडासा सटपटत तो म्हणाला....

"कमिटमेन्ट असे नाही, आमची सिस्टीम काय दाखवते ते मी सांगू शकतो"

"साडे चार लाख ना?"

"त्यातले दोन पंचाहत्तर अजून ड्यू व्हायचेत, ओव्हर ड्यू एक पंचाहत्तर"

"मग साहेब नकाच भेटू वर्मा साहेबांना! चुकून हे सांगितल्यामुळे कॉन रॉड्स डिले झाले तर मीच काही करू शकणार नाही"

"अप्पा महिंद्रावर विश्वास नाही का?"

"अहो साहेब तुमच्याच कंपनीने सांगितलेली ई आर एस सिस्टीम लावली आहे आम्ही! त्यात स्टोअर मेमो लॉक होत असली तर आम्ही तुमच्यापुढेच हात पसरणार ना?"

"अ‍ॅप्रूव्हल घेतोयस ना अप्पा?"

"साहेब दिडशे सेट्ससाठी घेतोय. पुढचेही द्यायचे आहेत ना?"

सावंतच्या पायाखालची जमीन सरकली. पुढचा अर्धा तास त्याने मुंबईला फोनाफोनी करून वादळ उठवले. अल्फाचे पेमेंट नक्की कधी करणार ह्याचा एक फॅक्स साहेबाकडून मागवला. त्या फॅक्सवर ऐंशी हजार लिहिलेले होते. अप्पाने तो फॅक्स झेरॉक्स करून घेऊन सरळ फाईलला लावला. सावंतला अर्थ समजला. दिडशे सेट्सच्या पुढे जाणे शक्य नाही.

आता डोळ्यासमोर दिसत होते हॉलिडे इन कॅन्सल होणे! रात्रीची दारू आणि फिश कॅन्सल होणे! सावंतला अचानक आठवले की तो प्रोक्युअरमेन्टचा सिनियर मॅनेजर आहे. सळसळत्या उत्साहात तो अप्पाला म्हणाला....

"एम ओ एम करू चल! एक महिन्याच्या आत रिको करून सगळी पेमेंट्स क्लीअर करणार"

"उत्तम! हे आमचे लेटरहेड! तुम्ही लिहायचे, मी सही करायची"

सावंतने बरेच काही लिहिले. तो व्यक्तीशः किंवा त्याची कंपनी कश्यात सापडणार नाही ह्याची काळजी घेत त्याने एक मोठा मजकूर खरडला. अप्पाने तो वाचला आणि बिनदिक्कत सही करून साहेबाच्या टेबलवर ठेवला. साहेबाने सांगितले की हा कागद घेऊन वर्मासाहेबांना भेटू नका. ते स्ट्राँगर कमिटमेन्ट मागतील. सावंत निष्प्रभ ठरला.

तोवर लंच टाईम झाला. महत्त्वाचा कस्टमर असेल तर मेसमध्ये व्हीपींसाठी असलेल्या टेबलवर जेवायला घेऊन बसता येत असे. अप्पाने सावंतला तेथे जेवण दिले. खुद्द अप्पा आहे म्हंटल्यावर मेसच्या स्टाफनेही भरभरून सर्व्हीस दिली. सावंत मेन्यू पाहून खुळावलेला होता. तीन भाज्या, दोन कोशिंबिरी, पुलाव आणि डेझर्ट!

"आमच्याकडे असले जेवण नसते. अर्थात, स्टाफही दसपट आहे म्हणा"

अप्पाने हसून मान डोलावली.

जेवणानंतर अप्पा शॉपमध्ये गायब झाला. दुसर्‍या युनिटला जायचे कसे असे सावंत सगळ्यांना विचारू लागला. प्रत्येकाने हेच सांगितले.

"डेक्कनपाशी ट्रॅफीक ब्लॉक असेल. वैताग येतो"

शेवटी सावंतने हिय्या करून कसातरी हिरवेला फोन लावला. हिरवे म्हणाला पॉवर नाही आहे. सहा तासांनी येईल. लगेच काम सुरू होईल. दुसर्‍या युनिटला जनरेटर का वापरत नाहीत असे वैतागून विचारत सावंतने फोन ठेवला. मग त्याने अप्पाला कॉल केला. अप्पा म्हणाला अर्ध्या तासात येतो.

हा अर्धा तास सावंतने वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यात घालवला. अल्फामधील आणि स्वतःच्या वर्तुळातीलही! तो मुंबईला कोणालाही फोन लावत होता आणि मिनिटोमिनिटे बोलत होता. तब्बल तासाभराने अप्पा आला आणि अप्पा टेबलवर बसायच्या आत चहाचे कपही आपटले गेले टेबलवर!

सावंतला आता काहीच क्लॅरिटी नव्हती.

सावंतच्या देहबोलीत चुळबुळ स्पष्ट दिसत होती. अप्पा त्याची कामे तुफान वेगात करत होता. अख्ख्या ऑफिसमध्ये अप्पाची बडबड ऐकू येत होती.

सावंतचाही फोकस बदलला अप्पच्या कामाची शैली बघताना! त्याला जाणवले की तो स्वतः इतका अ‍ॅलर्ट नाही. त्याचे असिस्टन्ट्सही नाहीत आणि साहेबही नाहीत. आता सावंत फक्त मनोरंजनासाठी अप्पाचे निरिक्षण करत राहिला.

साडे पाच वाजले! चौथा आणि शेवटचा ऑफिशिअल चहा आला.

अप्पाने एक सिगारेटचे पाकीट काढून सावंतसमोर धरले.

"इथे चालते?"

"ऑफकोर्स"

सावंतने झुरके घ्यायला सुरुवात केली. सावंतच्या झुरक्यांमधून तकलादू बेदरकारीचा धूर आढ्याकडे जात होता. अप्पाच्या झुरक्यांमधून 'व्यक्तिमत्त्वात चुकूनमाकून डोकावणारी अव्यावसायिकता' टेबलाच्या खाली जाऊन लुप्त होत होती.

"हिरवेको फोन करो यार"

सावंतने डेस्परेटली हे वाक्य उच्चारले. अप्पाने क्षनाचाही विलंब न करता हिरवेला कॉल लावून पहिलाच प्रश्न विचारला.

"आली साहेब पॉवर?"

"...."

"लागले ना? हां! काहीही करून एक दिडशे जॉब्ज द्या साहेब सकाळी!"

"...."

"किती?"

"...."

"ठीक्के ठीक्के चार वाजता द्या. थँक यू साहेब"

अप्पाने फोन ठेवला आणि सावंतकडे बघत म्हणाला....

"उद्या चार वाजता मिळतायत?"

"क्का?"

"ए व्ही एक्स चं टूलिंग लॅबमध्ये गेलंय"

"होईल ना?"

"साहेब कॉन रॉड्स तुमच्या हातात ठेवून उद्या घरी जाणार"

सावंत आत्तापर्यंत पूर्ण हतबल झालेला होता. वैतागून म्हणाला....

"अच्छा शाम का क्या है?"

"मै आ रहा हूं ना?"

"मग मी आता जाऊ का?"

"कुठे?"

"हॉटेलवर?"

"हो जा की? अरे गावंडे, ते पार्सल दे, साहेब निघालेत"

गावंडे नामक माणसाने काहीतरी आणून टेबलवर ठेवले.

"हे काय आहे बाबा?"

"अरे काही नाही साहेब, वहिनी आणि मुलीसाठी"

"काय आहे काय पण?"

"पुण्यातले लोक काय देणार साहेब? बाकरवडी, सुरळीची वडी आणि पुरणपोळी"

"च्यायला अप्पा तुम्ही मटेरिअल सोडून सगळे देता"

अख्खे ऑफीस हसले.

सावंताअ चेव आला. आपण डायलॉग टाकले की पलीकडच्या डिपार्टमेन्टच्या चिकण्या बायकापण हसतात हे त्याला आत्ताच समजले. आता तो काय बोलायचे ते ठरवू लागला. घरच्या तक्रारींवरचा उपाय त्याच्या हातात होताच. बाकरवडी, सुरळीची वडी आणि पुरणपोळ्या! 'मी काय आहे' हे घरच्यांना छातीठोकपणे सांगणे सावंतला जमणार होते. त्यामुळे हॉटेलवर जाऊन काय दिवे लावायचे असा विचार करत तो थोडा वेळ तिथेच बसला.

सहा वाजता अप्पाच उठला. पॅकिंग करत म्हणाला....

"व्हॉट आय सजेस्ट, आता हॉलिडे इन ला जाऊन पुन्हा सरोवरला येण्यापेक्षा आपण आत्ताच जाऊ! साडे नऊ दहापर्यंत दोघेही मोकळे! मग तुम्ही जाऊन आराम करा! कंपनीचीच एस्टीम बूक केली आहे तुम्हाला सोडण्यासाठी! क्काय?"

सावंतने एकुण विचार केला आणि म्हणाला....

"अ‍ॅज यू से बॉस"

दोघे निघाले. अप्पाची टू व्हीलर अल्फाच्या पार्किंगमध्ये विरहाचे उसासे सोडत राहिली. पांढर्‍या शुभ्र एस्टीममधून अप्पा आणि सावंत थेट सरोवरला आले.

पहिला पेग!

सावंतने संवाद सुरू केला........

"सेटिंग लगगया क्या?"

"हो हो लागलं, मगाशीच मेसेज आलाय"

"अ‍ॅक्च्युअली ह्यावेळी फारच डिले झाला"

"अहो पंधराशेचा लॉट आम्ही इन्टरनली रिजेक्ट केला"

सावंतच्या चेहर्‍यावर महिंद्राचे सळसळते रक्त क्षणभर चमकले.

"का????"

"तीन मायक्रॉनचे लिमिट आले आहे ना आता"

"हां हां हां हां! ओह! ओके ओके! मग आता त्या लॉटचे काय? रिप्लेसमेन्टला विकणार का?"

"नाही नाही! रिजेक्ट ते रिजेक्ट! अल्फामधून फॉल्टी काहीच बाहेर पडत नाही"

"काही बाहेरच पडत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे"

"हा हा हा हा! काय साहेब! पहिल्यांदा तर प्रॉब्लेम झाला"

"अप्पा तुला सांगतो, ह्यावेळी नोकर्‍याच गेल्या असत्या, माहित्ये?"

"का?"

"अरे प्रॉडक्शन २५% ने वाढले आहे मित्रा"

"फिश फ्राय सांगू का?"

"हं!"

"एक फिश फ्राय"

"प्रॉडक्शन आहे ना? सॉलिड वाढले आहे"

"पण तुमच्याकडे पेमेंट्सचा नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे साहेब? ए दोन पापड आण! ....ओके मसाला आण"

"काहीच प्रॉब्लेम नाहीये! तुमच्याच हुंड्या अडकतायत"

"हुंडी कॅन्सल केली तर?"

"मग काय? मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. साठ दिवसाचे तीस दिवसात"

"पण मग बँक जबाबदार नाही"

"आत्ता कुठे तुम्ही रिटायर करताय?"

"संबंध आहेत साहेब महिंद्राशी"

"बाकी सगळ्यांचे होते की? त्रिनितीचेही होते"

त्रिनिती म्हणजे अल्फाचा काँपीटिटर! अप्पा ही जागा सोडणार नव्हता.

"त्रिनिती बिगर हुंडी आहे?"

"ऑफ कोर्स"

"अडकत नाही?"

"एकदाही नाही"

"कसे अडकेल पेमेंट?"

"का?"

"शेअर जास्त आहे ना?"

"ह्यॅ! अल्फाकडून साठ टक्के घेतो"

"अरे हरी चटनी देना हरी चटनी! साहेब त्रिनितीकडून चाळीस टक्के घेत असतात तर लाईन बंद व्हायची वेळच आली नसती"

"सांगितले ना प्रॉडक्शन वाढले आहे"

"पण एक्झॅक्टली पेमेंट कुठे अडकले आहे?"

"अरे बाबा अडकले नाहीच आहे! तुमच्या हुंड्यांमध्ये काहीतरी गोची आहे"

"अहो सर तुमचाच फॉर्मॅट आहे, सिंडिकेट बँकेचा"

"आय डोन्ट नो, उद्या बघतो"

"प्लीज"

"उद्या देणार ना बाबा कॉन रॉड?"

"फुल्ल दिडशे सेट्स"

"नाहीतर नोकरी घालवशील"

"हा हा हा हा! रावसाहेब काय म्हणतायत?"

"ते काय म्हणणार? आता सिनियर झालेत आणखीन"

"अर्रे? प्रमोशन?"

"हं"

"कार्ड पाठवायला पाहिजे वर्मासहेबांकडून"

"बाय द वे अप्पा आम्हाल फक्त अल्फाकडूनच कार्ड्स येतात"

"ते काय विशेष नाही. तुम्ही तुमच्या स्पीडने घ्या हं साहेब"

"मी फार घेत नाही"

"का हो?"

"आता चाळिशी उलटली बाबा! "

"मी चव्वेचाळीस"

"मी एक्केचाळीस"

"ए अरे हरी चटनी दे ना यार"

"त्याला म्हणाव फॅन जरा इकडे कर! तुमच्याइथेही उकडायला लागलं यार"

"मुंबईची माणसं आलीयत ना? हा हा"

"हा हा"

"ए, ए मित्रा, तो फॅन जरा इकडे कर ना?"

"वर्मासाहेब काय म्हणाले?"

"नाही दाखवला साहेब तुमचा कागद"

"का????"

"अहो साहेब एवढी रिकव्हरी असताना त्यांना एकदम काँक्रीट कमिटमेन्ट लागते"

"मग मी काय फालतू कमिटमेन्ट लिहिलीय का?"

" छे छे, त्यांना आकडा दिसला की ते खुष"

"आकडा आहे की मग?"

"अहो त्या लेव्हलला हे कोण सांगणार की बिले अडकली आहेत?"

"हा हा! साहेबाशी बोलताना सगळ्यांची फाटतेच"

"तुमचे साहेब मवाळ आहेत"

"घंटा! एकदा उभा राहा समोर!"

"का?"

"पार आई माई"

"रावसाहेब?"

"मग?? तू डायरेक्ट बोललास आज त्यांच्याशी तेही ऐकावे लागणार आहे मला"

"छे छे! ते आवश्यकच होतं"

"अरे पण मला सांगायचं ना आधी? माझे फोन तू घेतच नाहीयेस आणि तिकडे बसून राव्साहेबांना फोन लावतोयस"

"मी तुम्हालाच सेफ केलं"

"ते आता उद्या कळेल, सेफ केलं का काय केलं"

"फिश फ्राय, घ्या साहेब"

"कांदिवलीला रॉजर फिश आहे ना? तिकडे ये एकदा! असलं फिश असतं"

"अरे सुनो, पेग डालो यार"

दुसरा पेगः

"ठीक है फिश"

"आवडला ना?"

" हां ठीक आहे. तू चेक कर बाबा त्या हिरवेबरोबर! तो रात्री काहीतरी तिसरंच बोलेल नाहीतर"

"हा काय आत्ताच मेसेज आला. दिडशेचा लॉट सेकंड स्टेजला आला आहे"

"गुड"

"पेमेंट स्मूथ असती ना साहेब, मी अक्षरशः चढलो असतो. स्वतः घेऊन आलो असतो सेट्स"

"अबे हा बल्लाळ बेकार माणूस आहे अकाऊंट्सचा"

"एक्झॅक्टली तेच म्हणायचे आहे मला"

"महिंद्रा सीधी कंपनी नाही अप्पा, वाटते तितकी"

"असे काही नाही"

"थांब बायकोला फोन लावतो. चढल्यानंतरचा आवाज तिला लगेच कळतो"

"हाहा"

"हां हॅलो, मला राहावं लागतंय"

"...."

"अर्जन्सी आहे, उद्या येतोय, लाईनला प्रॉब्लेम आहे, बबडी झोपतीय का?"

"...."

"नाही नाही जेवतोच्चे!"

"...."

"फिश!"

",,,,"

"ड्रिंक्स वगैरे नाही ग बये! इथे फुर्सत कोणालाय?"

"...."

"अन् ते तुला काय हवं होतं, बाकरवडी, पुरणपोळी वगैरे, तेवढं घेऊन ठेवलंय"

"...."

"अप्पा आहे बरोबर! माझ्यासाठी गाडी आहे अल्फाची"

"...."

"चार वाजेपर्यंत निघेन"

"...."

"अप्पा म्हणजे अल्फाचा मॅनेजर"

"...."

"हॉलिडे इन, फाईव्ह स्टार"

"...."

"ओके, गुड नाईट"

सावंतने फोन ठेवला.

"काय म्हणतायत वहिनी?"

"अप्पा कोण! म्हंटलं अप्पा म्हणजे दैवत आहे आमचं"

"हा हा हा हा"

"पण अप्पा, तुझ्यामाझ्यात बोलतो, एस्कॉर्ट्स आणि सिंप्सनला तुम्ही सप्लाय वाढवला आहे ना?"

"सर वीस टक्के कपॅसिटी इअरमार्क्ड आहे महिंद्रासाठी, ती तशीच आहे, तुमचेच प्रॉडक्शन वाढले आहे, आम्हाला काही नोटच नाही त्याची"

"भडव्यांनो बेसिक लेव्हलच अतर सप्लाय करा आधी व्यवस्थित? तू असा बोलतोयस जसे काही वाढीव प्रॉडक्शनचेच कॉन रॉड्स फक्त राहिलेयत"

"नाही नाही, म्हणजे सहज म्हणालो"

"सिंप्सनला वाढवलाय ना सप्लाय?"

"आमची कपॅसिटी पण वाढली ना साहेब?"

"अरे मग ती आमच्यासाठी वापरा ना?"

"मग वापरतोच आहे की? पहिला हक्क तुमचाच आहे"

"आणि आता तीन टक्के रिडक्शन हवे आहे, प्राईसमध्ये"

"साहेब शक्य नाही."

"का?"

"अहो अख्खे कॉस्टिंग दिले आहे प्रभाकरला"

"त्या प्रभाकरला अक्कल नाही, माझ्याशी बोल"

"नाही शक्य साहेब"

"किती देऊ शकशील?"

"साहेब राईझ हवा आहे, स्टील वाढलंय"

"कोणाला शिकवतो? कोणाला शिकवतो? अप्पा, मला सावंत म्हणतात"

तिसरा पेगः

"सावंतचा फोन गेला ना? एक्के अ‍ॅन्सिलरी ढवळून निघते. क्काय?"

"येस सर"

"महिंद्राची लाईन बंद झाली ना? देशोधडीला लागतील अ‍ॅन्सिलरीज"

"नाही नाही अशी कशी लाईन बंद होईल?"

"च्च च्च! सांगतोय! आता तू मला न भेटताच सेटिंग बदललं! बदललं का नाही?"

"साहेब तुम्ही एच ओ ला येऊन बसला आहात म्हंटल्यावर नाश्ता कसाबसा केला"

"हे बघ! चढवू नको! क्काय? चढवायचं नाही सावंतला! सावंत आधीच वर असतो"

"मान्य आहे साहेब, पण मी खरंच सकाळी घाईघाईत निघालो"

"इट इज ब्लडी यूअर ड्युटी अप्पा? हाऊ कॅन यू सिट रिलॅक्स्ड व्हेन महिंद्रा इज डायिंग फॉर .... दॅट.... ब्लडी कॉन रॉड्स?"

"साहेब आम्हाला वाटले की तुम्ही आम्हाला घाबरवताय, खरे तर तुमच्याकडे स्टॉक आहे"

"स्टॉक असतोच अप्पा! स्टॉकशिवाय कोणती ऑटो कंपनी चालेल? पुढचे तीन महिने चालवीन मी असेंब्ली"

"तेच, त्यामुळे आम्हाला वाट...."

"च्च च्च! तुमच्यावर प्रेशर असायलच हवे. साले तुमचे डायरेक्टर्स खुर्च्या उबवतायत, आमच्या लाईनचे काय? ईच ऑफ अवर अ‍ॅन्सिलरी अर्न्स मिनिमम ट्वेन्टी फाईव्ह परसेंट ऑफ बिझिनेस फ्रॉम महिंद्रा! काही काही तर हंड्रेड परसेन्ट"

"अ‍ॅबसोल्यूटली"

"आणि तुमचा वर्मा मला भेटत नाही. हू इज ही?"

"तो सगळा इगो असतो हो साहेब"

"इगो? डज ही अ‍ॅफोर्ड टू पझेस इट अ‍ॅट ऑल?"

"जाऊदेत!"

"च्यायला तिसरा सप्लायर उभा केला तर गुडघ्यावर येतील"

"तीन महिन्यांचा स्टॉक आहे तुमच्याकडे?"

"अरे रिजेक्टेड लॉट्स सॅग्रिगेशनला काढले तर चार महिने चालेल लाईन, तुमच्यावर उभे राहतो काय आम्ही?"

"पण ट्रॅक्टर सेगमेन्टमध्ये फिगर्स डाऊन झाल्या साहेब"

"न्यू हॉलंडमुळे रे! हे सिंप्सन आणि एस्कॉर्ट्स आमचे काय घंटा वाकडे करणारेत? तुम्ही करा सप्लाय त्यांना"

"हार्डली!"

"अप्पा, मला येडा समजू नको तू! तू आज बदललेले सेटिंग एस्कॉर्ट्सचे होते ना?"

"एच एम टी"

"एच एम टी काय व्हॉल्यूम्स देतात?"

"तुमच्या पाच टक्के"

"आणि तुम्ही त्यांना सप्लाय करता"

"सर प्राईस बघा ना"

"प्राईसची बातच करायची नाही"

"सर स्टील, ओव्हरहेड्स...."

"फक्त तुम्हालाच आहेत का ह्या गोष्टी? बाकीचे दारावर उभे आहेत"

"फोन वाजतोय सर"

"च्यायला आता हिला काय झालं? आत्ता तर बोललो! हॅलो????"

"...."

"हॅलो बेटा, मी जरा कामात आहे, तू झोपली नाहीस का?"

"...."

"ओक्के बेटा"

"...."

"गुड नाईट"

"काय झाले?"

"पोरगी म्हणतीय काहीतरी आणा येताना"

"घेतलंय म्हणून सांगायचं ना?"

"अबे खाजवायला वेळ नाही झाला, काय घेतलंय सांगू?"

"गाडीच्या डिकीत ठेवलंय साहेब"

"अप्पा, धिस इज टू मच"

"इट इज अवर कंपनीज स्टँडर्ड गिफ्ट सर"

"काय आहे ते?"

"सम गूड टॉय"

"आय डोन्ट लाईक धिस"

"साहेब व्यावसायिकच नाती ठेवायची का आयुष्यभर?"

"तसे नाही यार"

"मग?"

"छान होतं फिश"

"रीपीट करायचे?"

"दुसरं काहीतरी घेऊ यार"

"ए, हॅलो, हॅलो बॉस, स्नॅक्स मे क्या है? नॉन व्हेज? .... ठीक है बंजारा कबाब देना"

"बोनलेस सांग"

"बंजारा कबाब बोनलेसच येतात"

चौथा पेगः

"मी निघतानाच रावला सांगितले होते"

"रावसाहेबांना?"

"हं"

"काय?"

"म्हंटलं जाणार ते कॉन रॉड्स घेऊनच येणार"

"देणार म्हणजे देणार"

"तू नाही दिलेस तर वर्मा देईल च्यायला"

"हा हा"

"नाही खरं सांगतो अप्पा, आपल्याला डिलिव्हरी टाईमली नसली ना तर सप्लायर उडवतो आपण"

"त्रिनितीची कशी असते डिलिव्हरी?"

"तेच नाटक झालं ना? बिटवीन यू अ‍ॅन्ड मी! त्रिनितीने घात केला. असला भोसडलाय जाऊन"

"पण स्टॉक आहे ना?"

"अरे हो, पण टेन्शन असतेच ना?"

"आम्हाला ऐंशी टक्के केलेत तर तुम्हाला हा प्रॉब्लेमच येणार नाही"

"प्राईस मार खाते तुमची"

"किती डिफरन्स आहे?"

"सहा टक्के"

"मग वरचा वीस टक्के लॉट सहा टक्के कमी करून देतो ना?"

"अरे तेवढे केलेस तरी मी अल्फाचा झेंडा दारात लावेन भडव्या"

"केले म्हणून समजा"

"डन"

"क्वॉलिटी कशी आहे त्यांची?"

"झिरो रिजेक्शन"

"आणि आमचे?"

"तुमचेही झिरोच आहे"

"मग काय तर?"

"जहां सावंत है वहा फालतुगिरी होही नही सकती"

"हा हा हा हा"

"एक मेसेज पाठव मला"

"काय?"

"अ‍ॅडिशनल वीस टक्क्यांसाठी सहा टक्के रिडक्शन म्हणून"

"ओक्के, पण मेसेजला काय व्हॅलिडिटी?"

"तू पाठव रे??"

"हं!!!! .... पाठवला"

"ओक्के"

"होईल का काम?"

"होईल का? .... होईल का?.... यू आर इन्सल्टिंग सावंत"

"नाही नाही तसे नाही साहेब"

"कमिटमेन्ट पाठवू? पाठवू आत्ता कमिटमेन्ट?"

"जस्ट एक अ‍ॅकनॉलेजमेन्ट दिलीत तर साहेबांना दाखवू शकेन"

"अरे घे हा मेसेज आणि नाचव त्या वर्मापुढे"

"हे हे"

"वुई कन्फर्म अनादर ट्वेन्टी परसेन्ट शेअर टू अल्फा अ‍ॅट सिक्स परसेन्ट रिडक्शन इन प्राईस.... झाले?"

"आला"

"आता नाचव त्या भडव्यापुढे! त्याला इगो आहे म्हणे! सावंतला भेटत नाही. उद्या मीच घुसणार आहे त्याच्या केबीनमध्ये"

"साहेब, पेग संपलाय"

"एक लहान लहान घेऊ"

"नाही साहेब, तुम्ही भेटत नाही एक तर! त्यात आज शेअर वाढवून दिलेला आहेत. नंतर निवांत झोपणार आहात. लार्जच घेऊ"

"अप्पा, तुझ्याबरोबर बसले की साले भान राहत नाही. हा कोणाचा फोन? आयच्ची! रावसाहेब? हॅलो? स्सर! स्सर गुड इव्हिनिंग! सर देअर इज अ गूड न्यूज! आय हॅव टेकन प्राईस इडक्शन फ्रॉम अल्फा फॉर द नेक्ष्ट ट्वेन्टी परसेन्ट शेअर! अं? येस येस! येस सर! आय अ‍ॅम कॅरिंग द कॉन रॉड्स टूमॉरो! येस सर! आय अ‍ॅम विथ अप्पा ओन्ली! येस सर! थँक यू सर! गुड नाईट सर! च्यायला! रावसाहेबाचा फोन? झोप येत नाही का? किती वाजले रे? पावणे अकरा? चल च्यायला हा पेग पिऊन निघू"

"शुअर सर"

पाचवा पेगः

"कचरा बिझिनेस आहे भ्येंच्योद! स्साली लाईन कशानेही थांबते! नांव प्रोक्युअरमेन्टचे! लाल दिवा काय वर्षातून एकदा नाय लागत अप्पा! रोज दोनदा लागतो. आत्ता लाईन थांबली आहे. का माहितीय? बेअरिंग्ज नाहीत म्हणून! चढा सावंतवर! मी नाय आता फोन घेणार! बंदच करतो फोन! च्यायला? लाईफ आहे का काय आहे? ती तुमची कोण रे ती सुवर्णा का कोण ती? ती मला विचारते मिसेस कशी आहे. मनात म्हंटले च्यायला तुला काय घेणे का देणे? तुझ्यासारखी नाही आहे हा प्रॉब्लेम आहे. हा हा हा हा! काय अप्पा! शेवटी माणसाला काय पाहिजे? चार घटका मजा करता आली की बाकी ऑल ओक्के! है की नाही? तिला पाठवा तुम्ही पेमेंट फॉलो अपला! अर्ध्या तासात पेमेंट्स क्लीअर! दे ट्टाळी! ख्यॅ ख्यॅ! आता खायला काय मागवू नको हां? कोण? रावसाहेब? गेल्या जी च्या जी मध्ये! तो काय घंटा वाकडे करणार ह्या वेळी? लाईन बंद पडली तर पडली. स्साली सर्व्हिस किती झाली माझी तिथे! कोण केस नाय वाकडा करू शकत सावंतचा! सावंतचे नांव ऐकले ना? की पब्लिक कामाला लागतंय अप्पा!"

"सर हिरवे साहेबांचा मेसेज आलाय"

"कोणाचा? हां हां! हिरवे! क्काय म्हणे?"

"काहीतरी अ‍ॅक्सिडेन्ट झालाय म्हणे! जॉबला फायनल स्टेज उद्या मिळेल."

"हां ठीक आहे ना मग! उद्याऐवजी परवा तर पोचतील ना?"

"दोनशे टक्के"

"चल मग, मी जातो हॉटेलवर"

"सर एक सांगू का?"

"काय?"

"एस्टीममध्ये मुलीची गिफ्ट आहे. ही एस्टीम सकाळी सोलापूरला चालली आहे. तुमच्यासाठी उद्या दुसरी एस्टीम बूक केली होती. काहीतरी गोंधळ नको व्हायला"

"म्हणजे?.... काय म्हणतो काय तू?"

"तुम्ही थेट घरीच क अनाही जात ह्या एस्टीममधून?"

"आणि?"

"आणि निवांत झोपा! पाठोपाठ कॉन रॉड्स येतीलच"

खरे तर सावंतचेही काम झालेलेच होते. प्यायलेल्या अवस्थेत हॉलिडे इन ला राहून तो काहीच दिवे लावू शकणार नव्हता. त्याने प्रस्ताव मान्य केला.

अप्पाने हिरवेला मेसेज केला. एच एम टी चे जॉब्ज कंप्लीट करा. स्वतःच्या साहेबाला आणि वर्मासाहेबांना मेसेज केला. शेअर ऑफ बिझिनेस वाढण्यासाठी अ‍ॅडिशनल शेअरला फक्त सहा टक्के रिडक्शन द्यावे लागेल आणि सेटिंग बदललेले नाही. सगळ्यांच्या अ‍ॅकनॉलेजमेन्ट्स आल्या.

आधीच ठरल्याप्रमाणे एस्टीमचा ड्रायव्हर सावंतला मुंबईला घेऊन निघाला.

आणि अप्पाला एक मेसेज आला.

"येताय ना?"

अप्पाने उत्तर दिले.

"कसाबसा काम संपवून धडपडून तुला भेटायला येतोय डिअर, फक्त आल्यावर मनापासून जवळ घे म्हणजे झाले"

==============

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफ़िकीर तुमची लेखनशैली मस्त आहे...मी मायबोली वर गेल्या एक वर्षापासुन कथा वचतेय..पण हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे.
पुलेशु...

काय पण गुंडाळलाय..
जितकं वाचतेय..ऐकतेय..पाहातेय.. "मद्यं कुलविनाशकं" हे अगदी बिंबतंय मनावर.

या जानरामधे तुमचं लिखाण वाचायला आवडतं मला >> मला पण!

मस्त लिहीलंय. प्रत्येक पेगमागे बदलत जाणारं "डील " फार छान वर्णन केलं आहे.

या संदर्भातच, एक घडलेला किस्सा सांगते.खूप वर्षं झाली या घटनेला. मैत्रिणीचा नवरा पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंपोर्ट - एक्सपोर्ट किंवा तत्सम एका विभागाचा डिरेक्टर झाला. तो संपूर्ण शाकाहारी आणि अल्कोहोलला स्पर्शही न करणारा असा होता. त्याचा बॉस त्याला म्हणाला, "काही खात नाहीस की पीत नाहीस, तू काय बिझीनेस आणणार?" त्यावर हा फक्त "बघू" एवढंच म्हणाला.

नंतर त्यानी एका वर्षात (आणि पुढील काही वर्षे सातत्यानी) कंपनीला रेकॉर्ड बिझीनेस मिळवून दिला. केवळ कंपनीनीच नाही तर चेंबर ऑफ कॉमर्सनेही त्याचा मोठा गौरव केला.

जबरी! मस्त जमली आहे.

प्रत्येक पेगमागे बदलत जाणारं "डील " फार छान वर्णन केलं आहे. >>> यस!

हे कसं काय माझ्या नजरेतून सुटलं कोण जाणे. मस्त आहे नेहमीप्रमाणे.
सावंतला मस्त गुंडाळले आप्पाने. Happy
मुख्य म्हणजे ते वर्णन आणि ते संवाद, प्रसंग डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे करतात.