'द गाझी अटॅक' आणि 'इरादा' (Movie Review - 'The Ghazi Attack' and ' Irada')

Submitted by रसप on 18 February, 2017 - 01:56

बऱ्याच दिवसांनी एका दिवसात २ सिनेमे पाहिले ! 'द गाझी अटॅक' आणि 'इरादा'.
दोन्ही सिनेमे मला चांगले वाटले. जमणार असेल, तर तुम्हीसुद्धा दोन्ही पाहा. पुढील लेखांत दोन्ही सिनेमांवर संक्षिप्त लिहिले आहे. वेळ नसल्याने स्वतंत्र लिहिले नाही.

------------------------------------------
new-poster-alert-rana-daggubati-taapsee-pannus-ghazi-attack-1.jpg

'द गाझी अटॅक' आवडला.

१९७१ च्या युद्धापूर्वी पाकिस्तानची एक पाणबुडी बंगालच्या उपसागरात बुडली होती. त्या घटनेसंदर्भात एक थिअरी अशीही आहे ती पाणबुडी 'बुडली' नव्हती, तर भारतीय नौसेनेने तिला 'बुडवलं' होतं. पण दोन्ही बाजूंनी एक मिशन क्लासिफाईड असल्याने कुठलाही सबळ पुरावा देता येत नाही. सिनेमा ह्या छोट्याश्या युद्धावर आधारित आहे. पाकच्या तुलनेने खूप ताकदवान व मोठ्या पाणबुडीचा सामना भारताच्या नौसेनेने कसा केला आणि ह्या छोट्याश्या युद्धात कसा विजय मिळवला, ह्याची रोमहर्षक कथा ह्या सिनेमात आहे.

पात्रांचे आपसांतले बरेचसे संवाद टेक्निकल भाषेत आहेत. हे मुद्दामही केलं असणार. ऑथेन्टिसिटी वाटावी म्हणून. आता, मी कॉमर्स शिकलो असलो, तरी अकौंटन्सीच्या नावानेही बोंबच आहे म्हटल्यावर सबमरीन किंवा एकंदरीतच इंजिनियरिंग विषयक माझं ज्ञान किती महान असावं, हे सांगायची गरज नसावी. त्यामुळे ते सगळं ऐकायला भारी वाटलं. खरं-खोटं, चूक-बरोबर वगैरे काहीच माहित नाही.

सगळ्यांची कामं भारी झालेली आहेत.
के के मेनन तर कमालीच्या ताकदीचा अभिनेता आहेच. ते तो पुन्हा एकदा दाखवून देतो. जोडीला अतुल कुलकर्णीसुद्धा कमाल करतो. बहुतेक दोघांच्या भूमिका समानच लांबीच्या असाव्यात. दोघांनीही जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'राणा दागुबाती' मर्यादित क्षमतेचा अभिनेता आहे. पण तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. तापसी पन्नू बहुतेक सहज म्हणून शूटिंग पाहायला आली असावी. आणि मग ही आलीच आहे तर करून घ्या हिचेही ४-५ सीन म्हणून घुसडलं आहे तिला सिनेमात. अदरवाईज तिचा आहे ह्या सिनेमाचा. स्टोरीचा काही एक संबंध नाही.

अंडरवॉटर कॅमेरा विशेष कमाल करत नाही. खूप स्कोप होता, पण बजेट आड आलं असावं. एरव्ही थरारदृश्यं जबरदस्त चित्रित झाली आहेत.

सिनेमा अगदी नक्की पाहावा, असा आहे. युद्धपट असला, तरी सैनिक काही समोरासमोर येऊन तुंबळ जुंपत नाहीत. स्फोट, गोळीबार, भोसकाभोसकी वगैरे भडकपणाही नाहीय. जे आहे, ते खरोखरीच खूप संयतपणे दाखवलं आहे. त्यामुळे पोरा-बाळांसह पाहू शकता ! (दोन वेळा राष्ट्रगीतही आहे. त्यांना देशप्रेमाचे चांगले धडेही मिळतील. Wink )

रेटिंग - * * *

-------------------------------------
20170213154700!Irada_Movie_Poster.jpg

'इरादा' सुद्धा आवडला.

वैयक्तिक सांगायचं तर 'द गाझी अटॅक' पेक्षा जssरा जास्तच आवडला. एक तर अर्शद वारसी आणि नसीरुद्दीन शाह दोघे स्वतंत्रही खूप आवडतात आणि एकत्र तर जामच आवडतात. त्यांची 'ईश्किया' आणि 'डेढ ईश्किया' मधली 'केमिस्ट्री' सॉलिडच होती. हे दोन अभिनेते 'कॉम्प्लिमेंटिंग' अभिनेते आहेत. म्हणजे, त्यांचा अभिनय दुसऱ्यावर कुरघोडी करणारा नसतो. पण त्याच वेळी, तो दमदारही असतो. म्हणजे, 'जॉली एल एल बी' मध्ये अर्शद वारसीने अप्रतिम काम केलेलं असलं, तरी त्याच सिनेमातलं सौरभ शुक्लाचं अप्रतिम काम झाकायचा प्रयत्न त्याच्या अभिनयातून दिसत नाही. नसीरुद्दीन शाहने तर ही कमाल गेली कित्येक वर्षं केलेलीच आहे. त्यामुळे, मी तर ह्या दोघांसाठीच सिनेमा पाहायला गेलो होतो.

सिनेमा जबरदस्त गंडला आहे पब्लिसिटीमध्ये. बजेट आड येत असावं. पण विकीपिडीया, फेसबुक वगैरेवर पेज सिनेमाचं पेज बनवायला काय खर्च येतो असा ? सिनेमाचं विकी पेज आत्ता दिसतंय, पण ट्रेलर रिलीज झाला तेव्हा तर कुठेही त्याचा साधा उल्लेखही नव्हता. म्हणजे अर्शदच्या विकी पेजवरही 'इरादा'चा उल्लेख नव्हता. इतकी झोपाळू पब्लिसिटी टीम असल्यावर सिनेमाचं जे होणार, तेच होण्यात आहे. पहिल्या दिवशीच्या शोचीच अशी अवस्था होती की अख्ख्या थिएटरमध्ये आम्हा दोघांशिवाय अजून फक्त दोनच जण होते. टोटल ४.
असो.
सिनेमा जमीन व भूजल प्रदूषणासंबंधीतल्या एका मोठ्या स्कॅमवर आहे. कथानक भटिंडात घडतं. अर्शद एक इंव्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे तर नसीर एक व्हिक्टिम, जो बदला घेतो.
शरद केळकर आणि दिव्या दत्ता नकारात्मक भूमिकांत. केळकर मोठा कारखानदार/ उद्योजक तर दिव्या दत्ता मुख्यमंत्री.

पटकथेत काही बाबी खटकतात. जसं की, दिव्या दत्ताचं मुख्यमंत्री असणं. माझ्या मते, ती एमएलए किंवा कॅबिनेट मंत्री वगैरे दाखवायला हवी होती. पण असो. दुसरी बाब अशी की वेळ मिळाला की सिनेमातली बहुतेक पात्र प्यायलाच बसतात. दुसरा काही पासटाईमच नसावा की काय ! Lol

सिनेमातले संवाद साधे-साधे असले तरी खूप इंटरेस्टिंग आहेत.

'रुमाना मोल्ली' नावाच्या एका अभिनेत्रीने नसीरच्या मुलीचा रोल केला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स ! छोटा रोल आहे पण एका प्रसंगात तर तिने अक्षरश: कमालच केली आहे. तिला अजून काही आव्हानात्मक भूमिका भविष्यात नक्कीच मिळायला हव्या.
दिव्या दत्ता माझी एक आवडती अभिनेत्री आहे. तिला जरा मोठ्या लांबीची भूमिका मिळाली आहे, ह्याचा खूप आनंद झाला. तिचं काम मस्त आहे, ही काही सांगायची गोष्ट नाहीच. It goes without saying !
शरद केळकर आणि राजेश शर्माही स्वत:ची कामं ताकदीने करतात.
सागारिका घाटगेसुद्धा आहे. ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसते आणि नेहमीप्रमाणेच सदैव अपचन झाल्यासारखं वाकडं, रडवेलं तोंड घेऊन वावरते. तरीही सुसह्य नक्कीच आहे.

एकंदरीत 'इरादा' हा सगळ्याच्या सगळ्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने नटलेला एक चांगला सिनेमा आहे. एक चांगला सिनेमा केवळ बिनडोक आणि झोपाळू पब्लिसिटी टीममुळे वाया जाणार आहे, ह्याचं मात्र खूप दु:ख वाटतंय.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/02/movie-review-ghazi-attack-and-ira...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान, थिएटरला नाही पण योग आला तर घरी तरी आता दोन्ही बघितले जातील. दोन्ही पिक्चरमध्ये कलाकार चांगले आहेत.

दोन्ही बघण्यासारखे आहेत.. अशा सिनेमाना फायनान्सर का मिळत नाहीत ? किती दिवस आणि जून्या खोडांसाठीच पैसे लावले जाणार आहेत.
आयुशमान खुराना, पुलकित सम्राट, विद्युत झामवाल सारखे कितीतरी समर्थ अभिनेते मागे पडले आहेत.

दिनेशदा,
फायनान्सर अगदीच मिळत नाहीत, अश्यातला भाग नसावा. पण जे फायनान्स मिळतं, त्याचाही अधिक चांगल्या प्रकारे विनियोग केला जायला हवा.

व्यवसाय आहे हा. यहापे जो बिकता है वही टिकता है. जे लोकप्रिय कलाकार आहेत ते बहुतांश लोकांना आवडतात म्हणून टिकून आहेत. त्यांच्यात काहीतरी असे असणारच जे लोकांना आवडते. त्यामुळे त्यांना कमी लेखण्यात अर्थ नाही.
खरे तर अश्या मोठ्या कलाकारांनी अधूनमधून चांगले विषयावरचे चित्रपट केले पाहिजेत आणि ते विषय लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. जसे आमीरचा तारे जमीनपर किंवा शाहरूखचा स्वदेश. बरेच चांगल्या विषयावरचे चित्रपट बघताना असे वाटते की यात मोठे लोकप्रिय कलाकार असते तर हा चित्रपट आणखी लोकांपर्यंत पोहोचला असता.
बाकी वर रसप म्हणतात तसे मार्केटींग हवीच. मलाही त्या ईरादाबद्दल आताच समजले. माऊथ पब्लिसिटीसाठीही निदान काही लोकांनी बघावा ईतपत तरी तो पोहोचायला हवा. आता हे त्यांचे भाग्य की रसप सारख्यांनी तो बघितला आणि त्यावर लेख लिहिला.

असे वेगवेगळे विषय पडद्यावर येताहेत ते मात्र खुप छान होतंय !
विनियोग चांगला हवा तर नियोजन चांगले हवे.. कलाकारांना अमूक रक्कम, तंत्रज्ञाना अमूक, प्रसिद्धीसाठी अमूक असे नियोजन हवेच. आणि मुख्य म्हणजे निर्मिती करताना शिस्त हवी. त्या त्या वेळेतच आणि तितक्याच खर्चात काम होणे गरजेचे आहे. पुर्वी जेव्हा फिल्म सुद्धा महाग होती आणि ति आयात करावी लागत असे, तेव्हा चक्क भरपूर रिहर्सल केल्या जात असत आणि शॉट पहिल्याच टेक मधे ओके होत असे ( लख लख चंदेरी गाण्यात मशाल फेकण्याचे दृष्य तसे चित्रीत झालेय. )

आयुशमान खुराना, पुलकित सम्राट, विद्युत झामवाल सारखे कितीतरी समर्थ अभिनेते मागे पडले आहेत.>>> पुलकित सम्राट. विद्युत झामवाल हे समर्थ अभिनेते?

ट्रेलर वरुन इंटरेस्टींग वाटलेला गाझी...
इरादा तुम्ही इथे लिहिल्यावर कळला..
पुलकित सम्राट इज ओके पण विद्युत जामवाल मात्र छान अ‍ॅक्टर वाटतो मला...

पुलकित आंणि विद्युत दोघे अगदीच आधूनिक भारत भुषण आहेत.
एक रेष हलली तर नशिब.
कमांडो मधे पहिल्य सीन मधे जसा चेहरा होता तोच शेवटच्या सीन पर्यंत कायम होता. कधी कधी वाटत होते की जत्रेत मुखवटे मिळतात ते लावून फिरतोय की काय.

पुलकीत आणि झामवाल कोण आहेत हे देखील मला माहीत नाही. कदाचित चेहरयाने ओळखत असेन.
आयुष्यमान खुरानाला मी फक्त विकीभाई डोनर मध्ये पाहिलेय. त्यात तो आवडलेला. पण फारच ब्रिलियण्ट आहे आणि अन्याय होतो अश्यातला भाग नाही. तसे मग त्या शर्मन जोशी बद्दल म्हणायला हवे. त्याचे एक अर्शद वारसी सारखे होते असे मला वाटते.

पण खरे तर आपल्याकडे पिक्चरचा हिरो म्हटले की एक जबरदस्त इमेज हवी अन्यथा ते हिरो म्हणून स्विकारले जात नाहीत. त्याचमुळे अर्शद वारसी वा शर्मन जोशी वगैरे कलाकार लीड हिरो म्हणून स्विकारले गेले नाहीत तरी सहाय्यक अभिनेता म्हणून जिथे चांगली संधी मिळते तिथे छाप पाडून जातात.

आयुशमान ने प्रत्येक रोल मधे स्वतःला सिद्ध केलेच आहे. पुलकित आणि विद्युत ला किती मिळाले चित्रपट ?
पुलकितचा चेहरा खुप बोलका आहे. तो फुकरे मधे आवडला होता मला. विद्युत सर्व साहसदृष्ये स्वतः करतो. त्याच्या दोन्ही चित्रपटात ( मी बघितलेल्या ) भावनाहीन चेहराच गरजेचा होता.
माझा रोख प्रामुख्याने सलमान आणि शाहरुख वर होता. आणि हेच दोघे नव्हे तर दिलीपकुमार, अमिताभ, रजनीकांत, कमल हासन... हिरोच्याच भुमिका करायचा हट्ट धरत होते / आहेत.
योग्य त्या वयात निवृत्त होणे फक्त क्रिकेटच्याच क्षेत्रात होताना दिसते. ( विजय मर्चंट म्हणाले होते, व्हाय नाऊ ? असे विचारताहेत तोपर्यंत निवृत्त व्हा, व्हाय नॉट ? म्हणेपर्यंत थांबू नका ) पण त्या क्षेत्रात स्वतःला प्रत्येकवेळी सिद्ध करावेच
लागते. विग, स्पेशल इफेक्ट्स, स्पेशल मेकप असल्या युक्त्या हाताशी नसतात.

माहितीबद्दल धन्यवाद. दोन्ही पाहायला हवेत.

दोन्ही कडे समर्पक टॅग लाइन्स आवडल्या - भूजल प्रदूषणाबाबत "truth lies beneath the surface" आणि पाणबुडीबद्दलच्या चित्रपटाचा ट्रेलर "surfaces tomorrow" :). इतर अनेक चित्रपटांच्या फालतू इंग्रजी टॅग लाइन्स पाहता हे विशेष उठून दिसते.

पण बजेट आड आलं असावं. >>> करण जोहरला हा प्रश्न असेल तर इतरांनी काय करावे? Happy

सिनेमातली बहुतेक पात्र प्यायलाच बसतात. दुसरा काही पासटाईमच नसावा की काय ! >> गोष्ट भटींडा मधली आहे. मग दुसरी काय अपेक्षा करणार Happy

बघीतला गाझी .. बरा आहे.

तापसी पन्नू बहुतेक सहज म्हणून शूटिंग पाहायला आली असावी. आणि मग ही आलीच आहे तर करून घ्या हिचेही ४-५ सीन म्हणून घुसडलं आहे तिला सिनेमात>> +१०१

सिनेमा बघताना सतत मला crimson tide आणी U571 आठवण होत होती. अनेक प्रसंग तसेच्या तसे आहेत. तरीही आवडला मला.

गाझी ठीक आहे. काही गोष्टी पटल्या नाहीत. पाण्याखाली गायलेली देश्भक्तीपर गाणी एका पाणबुडीतून दुसर्या पाणबुडीत ऐकु जातील? पाकिस्तानने पाठवलेले ५-६ टौर्पेडो चुकवण्यासाठी भारतीय पाणबुडी वर खाली नेतात मग पाकिस्तानची पाणबुडी येणारा टोर्पेडो कळून देखील काहीच action का घेत नाही?

तापसी पन्नु नसली तरी चालली असती. तो ९० सेकन्दात पाणबुडीवर परत येण्याचा सीन तसाही पकड घेत नाही. मिलिन्द गुणाजी RAW मधून आल्यापेक्षा दारुच्या गुत्त्यातून आलेला जास्त दिसतो.

अशा बर्‍याच गोष्टी असूनही चित्रपट गुन्तवून ठेवतो यातच त्याचे यश आहे

पाहिला गाझी . वन टाइम वॉच आहे. के के मेनन सगळ्यात आवडला. चांगलं काम केलंय. ते जन गण मन गाणं पुरताच मेलोड्रामा आहे. तापसी पन्नुचा काय रोल होता ते समजलं नाही . अतुल कुलकर्णीही देखील छाप पाडतो. टॉर्पेन्डो सोडतात तेव्हा खरंच एक क्षण भीती वाटते. सिनेमा वेगवान असल्याने गुंतून राहतो प्रेक्षक .

गाझी अटॅक

एक नाविन्यपुर्ण युध्दपट म्हणून नोंद घेतली जाईल. नीटनेटका अभिनय, वेगळी कथा, अंडरवॉटर सीन्स, यांची चांगली भट्टी जमून आली आहे.
काही अतिशयोक्ती सोडल्यास एक युध्दाची हुबेहूब स्थिती उभे करण्यास दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. चित्रपटांमधे शेवटी काय होईल याची कल्पना प्रेक्षकांना आधीपासून असते. पण ते कसे होईल ? या थराराचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक असे चित्रपट बघायला जातो. त्याची ही अपेक्षा ६०-७०% हा चित्रपट पुर्ण करतो.
चित्रपटात काही ढोबळ चुका आहे. तर काही केल्या आहे. उदा. पीएनएस गाझी ही a Tench-class या कॅटेगरीतील होती. अमेरिकेकडून मिळालेली ही पाणडुब्बी त्याकाळातील सर्वोत्तम होती. एका वेळेस १४ टॉरपिडो घेउन जाण्याची क्षमता गाझी मधे होती. तसेच ४०० फुट खोल जाण्याची अधिकृत क्षमता होती. ही माहीती खरी आहे. चित्रपटात या माहीतीचा आधार घेतला नाही. अन्यथा भारतीय पाणबुडी पहिल्या अटॅक मधे बुडून ४०० फुटावर जाऊन थांबते पण गाझीची क्षमता ४०० फुट असुन सुध्दा तिथपर्यंत ती जात नाही उलट २५० फुटापेक्षा खाली गाझी गेलीच नाही असे दाखवले. दुसरीकडे भारतीय कॅप्टनची पाणबुडी जीची क्षमता २५० फुट अधिकृत आहे. तीला तो ३५०फुटावर घेऊन जाण्याचे धाडस करतो.
३०० फुटापर्यंत जाताना जी पाणबुडी मधे बिघाड होतात ती ४०० फुटावर गेल्यावर सुखरूप कशी राहते ? ते ही तब्बल १०० फुट जास्त .
पाण्याखाली एका मर्यादेनंतर निव्वळ ५-१० फुट खोल सुध्दा गेल्यावर अतिप्रचंड दबाव सहन करावा लागतो. लाखो लिटर पाण्याचे प्रेशर असते. तिथे दिग्दर्शक मर्यादेपेक्षा १५०-२०० फुट खाली घेऊन जातो काय आणि पुन्हा वर घेउन येतो काय. अर्थात सिनेलिबर्टी नावाखाली हे सगळे खपून जाते. उदा. माईक टायसनसमोर गल्लीत मारामारी करणारा पिंट्या ४ मिनिट आरामात लढू शकतो. पण खर्‍या बॉक्सरला ठाऊक असते की माईक चा एक ठोस्याचे प्रेशन फोर्स किती प्रचंड असतो. आणि त्यासमोर कुणाचा टीकाव लागू शकतो.
अंडर माईन्संना डिअ‍ॅक्टीव करण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा वापरत केला जातो. इथे पाणबुडीला एका रॉड ने मारून आणि आवाज करून कंपन निर्माण केली गेली. पाणबुडीची बॉडी फार जाड असते. त्यामुळे असे नुसते मारून कंपने निर्माण करता येणे कितपत शक्य आहे हे जानकारांना विचारायला हवे.
त्यात राष्ट्रगीत गाऊन त्याचे कंपने इतर पाणबुडीतल्या लोकांना ऐकू येते. आणि त्यांना हे ही कळते की हे जे काही कंपने आहे ते भारतीय राष्ट्रगीत आहे.

असो. चित्रपट मात्र एक वेळेस नक्की बघावा. सत्य घटना आहे अथवा नाही पण भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम आहे. काही ऑपरेशन्स गुपित ठेवली जातात. बहुदा तेव्हा सैनिकांचे श्रेय स्वतः लाटायची फॅशन नसावी.