एक अबोल संवाद

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 16 February, 2017 - 03:29

एक अबोल संवाद

खूप वाट पाहिली तुझ्या मेसेजची... एका फोनची... १४ फ़ेब्रुअरी.. व्हेलेंटाईन डे म्हणून बिलकुल नाही....तर आपल्याला शेवटचं बोलून महिना उलटून गेला म्हणून... तू म्हणायचास , " मी राहू शकतो का इतके दिवस न बोलता...? कितीही रागावलो तरी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय...." हाहाहा ... रेकॉर्ड ब्रेक केलास तू.. नाही केलास फोन यावेळेस , तुला माहितीय अतिरेक कधी झाला? मी चक्क वाट पाहिली तुझी ... तू अचानक ऑफिसमध्ये येशील.. लंच ब्रेकमध्ये म्हणशील, "तुझ्या ऑफिसच्या खाली आलोय.. तुझा डब्बा घेऊन ये" आणि मग आपण दोघे तो डब्बा आणि तू आणलेलं पार्सल तुझ्या बाईकवर बसून आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन खाऊ.. च्छे.. काहीच झालं नाही असं, तू आलाच नाहीस. असं कसं रे सगळं बिघडत गेलं? जिवापाड जपलेलं नातं असं कसं जीवघेणं ठरलं? जीवघेणच रे... कारण आत्ता नाहीयेस ना तू सोबत... भांडण केलंस तू... अबोला धरलास तू .. तुझं म्हणणं, “ गप्प बसल्याने वाद वाढत नाहीत...” पण एक कळलंच नाही कधी... आपल्यातलं बोलणं तुला वाद का वाटायचं ? ती कधी चर्चा का नाही वाटली तुला? शेवटी तू धरलेल्या अबोल्यानें दुरावा वाढला...आणि आता इतका वाढलाय की... मी जातेय तुझ्या आयुष्यातून कायमची... बाबांनी तिसरं स्थळ दाखवलं.. नकार देण्यासारखं त्यात काहीच वावगं नव्हतं, आता तरी घरी येऊन भेट... मी म्हटलेलं तुला... पण तू गप्प राहिलास... आणि मग, मी हि... मी हि गप्पच राहिले, घरच्यांसमोर काहीच नाही बोलू शकले... होकार कळवलाय मी मुलाकडच्यांना...लग्न ठरलं माझं…

……………… तुझी(च) मी...{(च) आता कंसातच लिहायला हवा...}

खूप काही लिहायचं होत तिला, पण सगळ्याच भावना अशा शब्दांत मांडता येत नाहीत ना... भावनांना बंधन नसतं शाब्दिक मर्यादेचं... त्या वाहत राहतात...लिहून कुठे त्या पोहचतात? मग तोडकं मोडकं अश्रूभरीत डोळ्यांनी जेवढं जमेल तेव्हढं लिहिलं तिने.. फक्त आत्ता मी तुझी नाही राहिले की अजूनही तुझीच आहे नक्की काय सांगायचं होत तिला ? तिला स्वतःलाच खरं तर कळत नव्हतं, जो हवा होता तो नसेल आता आयुष्यात आणि आता हे आयुष्य जगायचं त्याच्यासोबत ज्याला याआधी कधी पाहिलंही नव्हतं... पण होईल सगळं म्यानेज आई म्हणते असं... तिचंही अरेंज म्यारेजच ना... पण कसं समजाऊ तिला... प्रश्न अरेंज अन लव्ह म्यारेजचा नाहीये... प्रश्न " प्रेम" या संवेदनशीलतेचा आहे...

शेवटचा निरोप म्हणून तिला हे त्याच्यापर्यंत पोहोचवायचं होतं... पण नाही पोहोचवलं तिने...त्याची अगतिकता आणि त्याने परिस्तिथीला शरण जाऊन घेतलेला निर्णय तिने मान्य केला होता ... प्रेमात खूप ताकद असते असं म्हणतात... हो... बहुतेक तीच ताकद घेऊन ती यापुढचं आयुष्य जगणार होती..

**************************************************************************************************

महिना झाला ना ग आपण एकमेकांशी बोलून? खरं तर वर्षे उलटून गेली असं वाटतंय... खूप आठवण येतेय तुझी.. पण नाही.. नाही भेटायचं मला.. किती भांडू तुझ्याशी? नेहमीच भांडतोय.. पण नाही सांभाळू शकत ग मी तुला.. आत खोलवर कुठेतरी जाणीव व्हायची, कि मी हरतोय, तुला गमावतोय आणि मग आणखीन चिडायचो... का गप्प व्हायचो मी? तुझा हात मागण्याची हिम्मतच नव्हती माझी.. काहीच नाहीये माझ्याकडे, कधी सेटल होईन माहित नाही.. घरात आम्हीच गुदमरून राहतो, तुला कुठे ठेऊ? प्रेम करताना नाही कळत ग हे सगळं, पण जबाबदारीची जाणीव होते ना... तेव्हा कळत कि आपली लायकी नाही.. तू तयार होतीस असही राहायला पण मीच तयार नव्हतो तुला असं ठेवायला... नाही ग... YOU DESERVE SOMEONE BETTER ... माफ कर... तुझ्या बाजूनेही मीच निर्णय घेऊन मोकळा झालो... पण तेच योग्य होतं.. आहे ... आता राहशील आनंदात.. माहितीय नाही विसरणार तू मला.. पण मीही तुझ्या आठवणींशिवाय नाही जगू शकणार.. "ARE YOU OKAY ?" हे असं आता मला कोण ग विचारणार? पण होईल सवय हळूहळू.. कसंय ना... हे प्रेम झालं ना की मग दुसरं कुठलं नातं झेपतंच नाही ग.. नाही तर तुझा बेस्टेस्ट फ्रेंड म्हणून राहिलो असतो... फ्रेंड म्हणून मस्तीत तुझ्या हातावर टाळी मारली असती पण तोच नाजूक हात हातात घेऊन चालू शकलो नसतो... गळ्यात गळे घातले असते पण मिठी मारू शकलो नसतो .. प्रियकर झाल्यानंतर नवराही होऊ शकलो नाही तुझा आणि मित्रही.. म्हणून नाही आलो फिरून परत..वाट नको पाहूस माझी.. सुखी राहा ... शेवटची कविता लिहितोय आज...

दिवस आजचा
तुझ्या माझ्या गप्पानविना
मनात सल असली तरी
सवय करून घ्यायला हवी.

दिवस आजचा
भन्नाट कामात गेलेला
कामात बिझी कसला?
तुला विसरण्याचा असफल प्रयत्न केलेला.

दिवस आजचा
तुला दूरवर लांब नेणारा
आपल्यातील अंतर वाढवणारा
हृदयातील धडधड थांबवणारा.

दिवस आजचा
नेहमीचेच वाद टाळणारा
तरीही त्रास देणारा
उजेडातही अंधारात लोटणारा

दिवस आजचा
आठवणींच पारड जड करणारा
स्वप्नांना तोडणारा
नवीन शेवटाची सुरुवात करणारा.

……….. फक्त तुझाच मी.

प्रेम केलं त्याने तिच्यावर, अगदी त्याच्याही नकळत, कधी प्रेमात पडला कळलं नाही त्याला... पण सत्य परिस्तिथीचा विचार केल्यावर भानावर आला तो... एक साधा ऑफिस बॉय...फारसं शिक्षण नाही, घरून मालमत्तेची तजवीज नाही ...फक्त त्याची साथ आहे म्हणून ती सुखात राहिली असती कदाचित पण तडजोड करून जगली असती.. तिला आनंद देताना खूप धडपड करावी लागली असती दोघांनाही... प्रेमात समोरच्याच हित पाहायचं असत ना? मग त्याने तेच केलं... तिच्या मार्गातून बाजूला झाला.. एकत्र नाही म्हणून प्रेम संपलं असं नाही होतं ना...? ते तर कायम जिवंत राहत फक्त आता साथ नव्हती तिची.. आजही वाटलं त्याला सांगावं तिला..हे लिहिलेलं दाखवावं तिला.. पण नको... हे वाचून उभ्या मांडवातूनही परत येईल ती..नकोच.. नाही पाठवलं हे त्याने तिला...

एक अबोल संवाद दोघांच्या मनातला... तसाच राहिला सोबत दोघांच्या... विभक्त होऊन....

……………. मयुरी चवाथे - शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

so sad.....
अस ना व्हाव कधी कोणाबरोबर....
खूप छान आहे कथा ताई,कविता पण आवडली.....
पु. ले.शु....

मस्त..आवडली.
(च) आता कंसातच लिहायला हवा... >>>

खूप छान. आवडली.
पण वाईट वाटले दोघान्साठी.

कसं असत ना हे ..........प्रेम
परिस्थिति ला तो समजु शकतो. ति हि समजु शकते......
त्यांना आपल्या नात्यातला गोडवा घालायचा नहोता.
खरच प्रेम प्रेरना देनारच असाव............

अशीचं एक क्रमश: कथा आहे माबो वर, तुमची का कोणाची आठवत नाही. मुलगा गरीब असतो तरी मुलगी लग्न करते, मुलीच्या नोकरीवर चालू असतं. नीट आठवत नाही.

सुरेख!