तुला सांगू कसे मज कोणता आजार आहे...

Submitted by मुग्धमानसी on 9 February, 2017 - 04:20

कुणालाही न व्हावा हा असा आजार आहे
तुला सांगू कसे मज कोणता आजार आहे...

मला दिसतात सारी माणसे इतस्त: सांडलेली
निथळलेली पसरलेली मुळातुन गंडलेली
शहर सारे जणू एक चामडे मेल्या जिवाचे
भुशागत त्यात सारी माणसे ही कोंबलेली
अभावानेच कोणा मस्तकाचा भार आहे...

इथे रस्ते जणू हे माणसांचे घट्ट ओघळ
किती कोंदट चिकट घाणेरडे भलतेच ओंगळ
इथे धावून यांचे पाय हे बलदंड झाले
विचारांची अवस्था जाहली भलती अजागळ
इथे जगणार मी? माझाच हा आकार आहे?

मला माहीत नाही हे खरे की ते खरे
मला जाणीव आहे मात्र हे नाही बरे
तरिही हेच माझे माझिया साठीच हे
कुणाला गुदगुल्या सलती कुणा सुखवी चरे...
मला आता निराशेचाच या आधार आहे...

तसे सारेच काही एवढे बकवास नाही
मला माहीत आहे मीही काही खास नाही
मला तू भेटणे, वेडावणे, नि:शब्द होणे....
निखालस सूख आहे... कोणताही भास नाही!
तुझ्यापुरता, तुझ्यासाठीच हा अवतार आहे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसे सारेच काही एवढे बकवास नाही
मला माहीत आहे मीही काही खास नाही
मला तू भेटणे, वेडावणे, नि:शब्द होणे....
निखालस सूख आहे... कोणताही भास नाही!
तुझ्यापुरता, तुझ्यासाठीच हा अवतार आहे...>>>छान...

हे निखालस म्हन्जे काय असते???

छान !

धन्यवाद!
कावेरी, निखालस म्हणजे Pure / absolute.