मुंगी उडाली....

Submitted by देवकी on 29 January, 2017 - 23:11

मुंगी उडाली आकाशीं ।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥

थोर नवलाव जांला ।
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥

विंचु पाताळाशी जाय ।
शेष माथां वंदी पाय ॥३॥

माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥

ह्या अभंगाचा नेमका काय अर्थ आहे तो कुणी सांगेल का? आंतरजालावर ही लिंक पाहिली
.http://www.oocities.org/dharmachintan/sant/mukta.html
पण माझ्या शाळकरी वयात असे वाचल्याचे आठवते की मुक्ताईने,ज्ञानेश्वरांची समजूत घालताना(ताटी उघडा व्यतिरिक्त) हा अभंग रचला आहे.मला फारसे आठवत नाही.कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.आगाऊ धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२व्या शतकातील ओव्यांचा २१ शतकात मला लागलेला/उमगलेला/भावलेला अर्थ

कितीही झाले तरी मानवी देहाचे षड्रिपु/भावभावना यांना ताब्यात ठेवणे अशक्य होऊन, आत्यंतिक अपमानित पावून, व ही जन्ता अशी निलाजरी /दुष्ट/क्रुर कशी या विचारांनी व्यथित होऊन निराशावस्थेकडे झपाट्याने वाटचाल करणार्‍या ज्ञानदेवांना उद्देशून मुक्ताबाई वरील आक्रितस्वरुप / अशक्यप्राय उदाहरणांमधुन सांगु पहाते की हे ज्ञानदेवा, तुझा क्रोध/सात्विक संताप, व्यथित होणे, निराश होणे हे वरील घटनांप्रमाणेच अशक्यप्राय असले पाहिजे, असेल. तेव्हामनोविकारांब्वर ताबा मिळव , क्रोध/निराशा/संताप आवर.
अन्यथा वरील बाबी (अशक्यप्राय असल्याने) प्रत्यक्षात उतरणे जितके हास्यास्पद वाटेल, तितकाच तुझा क्रोध/निराशा/संताप या मनोविकारांचे/षडरिपुंचे आहारी जाणे, हे हास्यास्पदच (अशक्यच) असले पाहिजे.

काल सोसायटीमधे एकीने गाणे म्हणताना वर दिलेल्या लिंकप्रमाणे थोडाफार अर्थ सांगितला होता.
ज्ञानदेवा तुझी योग्यता वेगळी आहे,अशा माणसांकडे तू लक्ष देऊ नये अशा अर्थाचे वाचल्याचे अंधुक स्मरते.
लिंबूटिंबू, तुम्ही दिलेला अर्थ जास्त पटतो.

नानबा, मलाही नीट आठवत नाही,म्हणून आईशी काल बोलले होते.तिला त्या लिन्कमधील अर्थ तितकासा पटला नव्हता.कारण आम्ही दोघींनी जे वाचले होते ते नीटसे आठवत नाही.तेव्हा ती म्हणाली ,अग तुझ्या मायबोलीवर विचार आणि मलाही सांग.लिंटींचा प्रतिसाद आवडला.
तुम्हाला माहित असेल अर्थ तर मलाही सांगा.नाहीतर हे कॅलिडोस्कोपप्रमाणे होतेय?

देवकी माझ्या मते हे enligtenment चे / साक्षात्काराचे / ज्ञान प्राप्त झाल्याचे वर्णन आहे. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये सुद्धा साधारणपणे तसाच अर्थ दिलेला आहे. मला तो अर्थ बरोबर वाटला.

मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगांमध्ये जी शिकवण दिलेली आहे त्यासाठी लिंबुटिंबु ह्यांचा प्रतिसाद अधिक योग्य वाटतो.

खूप खूप वर्षांपूर्वी आईबरोबर या गाण्याबाबत झालेल्या चर्चेतील काही सारांश मी वर मांडला आहे. तो सरधोपट आहे हे मान्य. लगेच पटेल असेही नाही.
>>>> देवकी माझ्या मते हे enligtenment चे / साक्षात्काराचे / ज्ञान प्राप्त झाल्याचे वर्णन आहे. <<<<
मात्र साक्षात्काराचे/ज्ञानप्राप्तीचे वर्णन अशा उदाहरणांमधुन मुक्ताई देईल, हेच मला पटत नाही. किंबहुना, साक्षात्कार्/ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर या अशा उदाहरणांची देण्याघेण्याची गरजच पडू नये/पडत नाही. कारण वरील सर्व उदाहरणे, ही सामान्य जनांस अचंबित करणारी/आक्रित /भौतिक व्यावहारिक स्वरुपातील आहेत, व ज्यास आत्मिकदृष्ट्या इश्वरप्राप्ती/इश्वराशी एकरुपता प्राप्त झाली आहे, त्यास अशा "भौतिक बाह्य" उदाहरणांची कुबडी घेण्याची गरजच नसते , हे माझे मत.

सबब, ही उदाहरणे, ज्ञानदेवांच्या तत्कालिक भावनिक उद्रेकास शमविण्याच्या उद्देशानेच दिली असावित अशा विचाराने वरील अर्थ मांडला आहे.

यावर अधिक चर्चा होऊ शकेल. (फक्त पुरेसा वेळ व चित्तास शांतता मिळाली पाहिजे)

मुंगी उडाली आकाशीं ।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥

केवळ या दोन ओळींबाबत आईने एक वेगळीच भुमिका मांडली होती. ती म्हणजे, असेच झाडाखाली बसले असता, मुंगी आभाळात उडते, तर तिच्या सजातीय मुंग्यांच्या दृष्टीने, तिची सावली पडल्यावर त्या सावलीतुन त्या उडत्या मुंगीने सुर्यास गिळल्यासारखेच भासते. हे असे भासणे, त्या बाकी जमिनीवरिल मुंग्यांच्या दृष्टीने (भ्रामक) पण तत्कालिक "सत्यच" असते की मुंगी आकाशी उडाली अन तिने सुर्यास गिळले !
हा भ्रम त्या त्या जीवांस जगण्याच्या "अर्थाची एक मिती" प्राप्त करुन देतो. मानवी जीवन देखिल बहुतांशी असेच चालत असते व अशाच असंख्य भ्रमात माणुस प्रत्यही जगत असतो.
अशाच भ्रमांची बाकी उदाहरणे देऊन, मग त्या भ्रमांबाबत मुक्ताई हसली असावि.

हे पटेल वा न पटेल, केवळ विचारार्थ मांडले आहे, व इतकी वर्षे होऊन गेली तरी मी आजदेखिल याबाबत अंतिम नि:ष्कर्षास आलेलो नाही.

कदाचित आपल्यात असे सर्व (असमान्य) शक्ती सामर्थ्य आहे जे आपण आत्मबळाने मिळवु शकतो, असे सांगायचेय त्यांना?

छान चर्चा चालली आहे. मुक्ताबाईने या ओळी लिहिल्यानंतर तात्कालीन समाजात याची चर्चा, निरुपण झालेच असेल, पण ते आपल्याला उपलब्ध नाही.

थोडे अवांतर...
संत ज्ञानेश्वर या मराठी चित्रपटात, हा अभंग आशा भोसले यांच्या आवाजात आहे. सी रामचंद्र यांचे संगीत आहे. ( नवल वर्तले गे माये, तो हा विठ्ठल बरवा, काय करु मी ते सांगा.. अशी अनेक सुंदर गीते, या चित्रपटात आहेत. )

ही सामान्य जनांस अचंबित करणारी/आक्रित /भौतिक व्यावहारिक स्वरुपातील आहेत >>>> कदाचित सामान्य जनांसाठी केलेले साक्षात्काराचे / ज्ञान प्राप्त झाल्याचे वर्णन असावे. किंवा जग हे मिथ्या/माया आहे असेही सांगितले असण्याची शक्यता आहे. ज्ञानदेवांसाठी ताटीच्या अभंगांअधून स्पष्ट कळेल अशा भाषेत त्यांनी उपदेश केलाच आहे.

अस्ति

अस्ति
मुंगी सारखा क्षूद्र कण सूर्यासारख्या प्रचंड आकारमानाच्या तेजोगोलाला गिळंकृत करू शकेल? (स्वतःत सामावून घेऊ शकेल?) हो, शकेल. कारण तो क्षूद्र कण आणि तो तेजोगोल एकाच तत्वाचे बनले आहेत. म्हणजे मूळात ते वेगळे असे नाहीतच.

भाती
निर्जीव (काहीच प्रसवू न शकणारी) वस्तू एका सजीवाला जन्म देऊ शकेल? हो, शकेल. कारण ते चैतन्य दोघांमध्येही आहे.

प्रिया
विंचू सतत सोयीचा निवारा शोधत फिरत असतो. तो कधी अढळपदाचा आनंद उपभोगू शकेल? हो, शकेल. कारण तो आनंद त्याच्यामध्ये आहेच.

या जगाच्या घाणीलाच आपले जीवन समजणारी माशी जेंव्हा अनेक जन्मांनंतर उंच आकाशात उडणारी घार होते, तेंव्हा तिला खरी दृष्टी (perspective) प्राप्त होतो आणि तिला अस्ति-भाती-प्रिया या परम तत्वांचा बोध होतो. तीच मुक्ती - मुक्ताई !

आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने बघितले तरः

सारे जग एकाच मूलकणांनी बनले आहे
मातेचे उदर हे जन्माला येण्याचे एक साधन आहे. क्लोनींग आणि त्याही पुढे जाऊन संपूर्णपणे नवीन जीवाची निर्मीती अन्य मार्गांनी शक्य आहे.
अस्थीर अशी उर्जा आणि त्या मानाने स्थीर असे द्रव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

बापरे माधव. बरेच क्लिष्ट असणारा अर्थ तुम्ही छान समजवलात हो

अस्ति-भाती-प्रिया या परम तत्वांचा बोध होतो....... ही परम तत्वे आजच कळली.मा.बु.दो.