पासपोर्ट आणि पोलीस….

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 20 January, 2017 - 02:36

पासपोर्ट आणि पोलीस….

२० दिवसांपूर्वी मी नवीन आणि नवऱ्याने रिन्यूअल पासपोर्ट साठी ऍप्लिकेशन केलं. सगळंच ऑनलाईन. पासपोर्ट ऑफिसमध्ये त्यादिवशी तीन-चार तास गेले, पण त्यांनी सांगितलं पासपोर्ट कुरिअर ने येईल आणि सोबत एक पावती. ज्यावर लिहिलं होत पोलीस व्हेरिफिकेशन सुरळीत पार पडलं आणि तसा रिपोर्ट आला कि पासपोर्ट कुरिअरने येईल.

देणाऱ्यांनी न विचारताच सल्ले दिले, "पोलीस घर आयेगी तो चुपचाप हाथ में ५०० रखना.... अगर पासपोर्ट चाहिये तो..." दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनमधून फोनवर झालेलं फॉलो अप... पोलिसांनी स्वतःहून केलेला फोन, "हे नाही ते पोलीस स्टेशन तिथे पेपर्स पाठवू तुमचे, भेटून या... "तिथे (पोलीस स्टेशन) गेल्यावर "कॉन्स्टेबल घरी येतील मग इथे भेटायला या.... या या पेपर्ससोबत " असं आलेलं उत्तर आणि दोनच दिवसात घरी आलेले कॉन्स्टेबल कोकरे... आम्ही दोघे घरात नव्हतोच... घरी पप्पा होते त्यांसोबत केलेली महत्त्वाची चौकशी, डॉक्युमेंट्सची केलेली पडताळणी, आम्हा दोघांसोबत फोनवर विचारलेली उलट सुलट प्रश्न उत्तरे आणि माझ्या मुलींसोबत घालवलेला "फनी " वेळ. "पोलीस काका खूप फनी होते..." हे मुलींकडून आलेलं खेळकर उत्तर आणि "चान्गला माणूस होता" हा पप्पांकडून आलेला प्रतिसाद. ना चहाची मागणी ना सरबताची. "शनिवार किंवा रविवार या या वेळेत दोन दिवसात भेटून जा." नेमकं याच सुमारास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ आली. पोलिसांसोबत ची वेळ निघून गेली तर किती वेळ जाईल पासपोर्ट यायला देव जाणे हेच विचार डोक्यात. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच घरी जाण्याअगोदर एकदा पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. हातात हॉस्पिटलची फाईल घेऊनच पोहारीकर साहेबाना भेटलो. परिस्तिथी तशीच समजावून सांगितली आणि त्यांनी सगळी हातातली कामं बाजूला ठेऊन काही फॉर्म्यालिटीज पूर्ण करून , "ह्यांना (मला ) आधी घरी सोडून, तुम्ही परत या. मी आहे इथे.. मग चौकशीला बसू." असं माझ्या नवऱ्याला सांगून त्यांनी आम्हाला पाठवलं. "थँक्स" म्हटल्यावर, "आम्हाला पण माणुसकी आहे साहेब" एवढंच म्हटले. यथावकाश नंतर नवऱ्यासोबत मीटिंग झाली, चर्चा, वाद, संवाद, गोंधळ... जसं जसं होईल तसं तसं स्टेप बाय स्टेप. तिथून निघताना नवराच गोंधळून गेला... काही देऊ कि नको...? कारण आमच्यासाठी त्यांनी जे केलं ते ती त्यांची ड्युटी होती पण ....... ह्या पण वरच अडलं सगळं... मग कुठे तरी नवऱ्याला त्यांचे हावभाव वाचून निष्कर्ष काढावा असं वाटलं... आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण त्याला "ड्युटीच केली" हे हावभाव दिसले.

नवरा तिथून परतला... आणि आज आमच्या हातात आमचा कोराकरकरीत पासपोर्ट आला.

आम्हाला पोलिसांमध्ये फक्त माणुसकी आणि ड्युटीच दिसली.

हे सगळं इथे लिहिण्याचा घाट घालण्याचं कारण म्हणजे, नेहमी वाईट काही अनुभवी पडलं कि त्याच्या नावाने आपण टाहो फोडतो... मग जेव्हा कधी काही चांगलं अनुभवलं तर त्याचाही उदो उदो व्हावा हि माझी उद्दात्त इच्छा. "काही चहा पाणी देऊन काही होईल का? " हा प्रश्न आपण जेव्हा एखाद्याला विचारतो तेव्हा त्या अधिकार्यापेक्षा जास्त गुन्हेगार आपण ठरतो ह्याची जाणीव झाली. लोकांनी आम्हाला आधी सांगितलं... की "पैसे द्यावेच लागतील..." पण कोणत्या निष्कर्षावर?. मला हेच सांगायचं आहे की असं काहीच नाहीये... आपल्या सगळ्यांना शॉर्ट कट ची सवय झालीय... आणि म्हणूनच भ्रष्टाचार वाढलाय...

जर लोक सुधारत असतील तर त्यांना सुधारू द्या... उगाच पूर्वदृष्टिकोन ठेऊन त्यांची अब्रू काढू नका... कारण तेही "माणूसच" आहेत... आणि त्यांनाही माणुसकी आहे. ती माणुसकी त्यांना प्रूव्ह करायला लावू नका... त्यांच्यात शोधायला शिका.

आणि सगळ्यांत शेवटी... मनःपूर्वक आभार... मुंबई पोलीस... तुमचे

…...... मयुरी चवाथे - शिंदे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहमी वाईट काही अनुभवी पडलं कि त्याच्या नावाने आपण टाहो फोडतो... मग जेव्हा कधी काही चांगलं अनुभवलं तर त्याचाही उदो उदो व्हावा हि माझी उद्दात्त इच्छा. ++++११११११११
पटले

आपल्या सगळ्यांना शॉर्ट कट ची सवय झालीय... आणि म्हणूनच भ्रष्टाचार वाढलाय... >>> सहमत

जर लोक सुधारत असतील तर त्यांना सुधारू द्या... उगाच पूर्वदृष्टिकोन ठेऊन त्यांची अब्रू काढू नका... कारण तेही "माणूसच" आहेत... आणि त्यांनाही माणुसकी आहे. ती माणुसकी त्यांना प्रूव्ह करायला लावू नका... त्यांच्यात शोधायला शिका.>>> खूप छान आहे हे वाक्य.

तुमचा इतका छान अनुभव इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

मस्त अनुभव!

ती माणुसकी त्यांना प्रूव्ह करायला लावू नका... त्यांच्यात शोधायला शिका.>>> खूप छान विचार.

छान अनुभव.
ती माणुसकी त्यांना प्रूव्ह करायला लावू नका... त्यांच्यात शोधायला शिका.>> छान

हे सगळं इथे लिहिण्याचा घाट घालण्याचं कारण म्हणजे, नेहमी वाईट काही अनुभवी पडलं कि त्याच्या नावाने आपण टाहो फोडतो... मग जेव्हा कधी काही चांगलं अनुभवलं तर त्याचाही उदो उदो व्हावा हि माझी उद्दात्त इच्छा. "काही चहा पाणी देऊन काही होईल का? " हा प्रश्न आपण जेव्हा एखाद्याला विचारतो तेव्हा त्या अधिकार्यापेक्षा जास्त गुन्हेगार आपण ठरतो ह्याची जाणीव झाली. लोकांनी आम्हाला आधी सांगितलं... की "पैसे द्यावेच लागतील..." पण कोणत्या निष्कर्षावर?. मला हेच सांगायचं आहे की असं काहीच नाहीये... आपल्या सगळ्यांना शॉर्ट कट ची सवय झालीय... आणि म्हणूनच भ्रष्टाचार वाढलाय...

जर लोक सुधारत असतील तर त्यांना सुधारू द्या... उगाच पूर्वदृष्टिकोन ठेऊन त्यांची अब्रू काढू नका... कारण तेही "माणूसच" आहेत... आणि त्यांनाही माणुसकी आहे. ती माणुसकी त्यांना प्रूव्ह करायला लावू नका... त्यांच्यात शोधायला शिका.>>> + १११ हे सगळं आवर्जुन इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

मला सुदैवाने पोलिसांचा वाईट अनुभव नाही आला पण पासपोर्ट च्या वेळेला मात्र फारच विचित्र अनुभव. पासपोर्ट ला apply केल्यावर कागदपत्रांची पूर्तता पोलीस स्टेशन ला करावी लागते. त्या दिवशी अख्ख्या पुण्यातून त्या विशिष्ट डेट ला ज्यांनी apply केलं होतं ते सगळे लोटले होते पोलीस स्टेशनात मग तुम्हीच विचार करा, कुणाकुणाचे कोणते कोणते पेपर्स पोलीस तपासतील? त्यात अनेक गोष्टी विचारल्या होत्या. माझाच जवळ जवळ १००-१२५ पानांचा गठ्ठा होता. ते काही असो. पण त्याच दिवशी पोलीस report क्लीअर होण्यासाठी एका पोलीस वरिष्ठ माणसाची सही होणं सक्तीचं होतं. मग काय सही हवी असेल तर ५०० द्या. असा हळूच निरोप मिळाला मला. पोलीस नव्हे कुणी भलताच माणूस गोळा करत होता पैसे. लोकांना शंभर खेटे घालायला वेळ नसतो, शिवाय पैसे दिले नाहीत म्हणून तुमच्या कागदपत्रात खोट काढून तुमचे काम अडवले जाऊ शकते. शकते नाही अडवले जातेच.

तिथून बाहेर पडताना माझ्या डोक्यात विचार आला की मी प्रामाणिकपणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, पण निव्वळ ५०० रुपयांच्या जोरावर मला पोलिसांचा चांगला शेरा मिळाला, पण त्याच पाचशे रुपयांच्या जोरावर एखादा गुन्हेगार/देशद्रोही सुद्धा पासपोर्ट सहज मिळवू शकला असता त्या दिवशी. किंवा एखाद्याने मिळवला ही असेल.
मग आपल्या देशाच्या सुरक्षिततेचं काय? भयंकर वैषम्य वाटलं मला.

काही उपयोग नाही...., लोकाना काही चान्गले समजावयला गेले की, ते आपल्यालाच वेडे ठरवतात...!!! त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटते तेच करावे....!!!

अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
>>मग काय सही हवी असेल तर ५०० द्या. असा हळूच निरोप मिळाला मला. पोलीस नव्हे कुणी भलताच माणूस गोळा करत होता पैसे. लोकांना शंभर खेटे घालायला वेळ नसतो, शिवाय पैसे दिले नाहीत म्हणून तुमच्या कागदपत्रात खोट काढून तुमचे काम अडवले जाऊ शकते. शकते नाही अडवले जातेच.>> लोकं पैसे देतात म्हणून काम अडवले जाते. लाईन मधे व्यवस्थित कागदपत्रे असलेले ८०% लोकं असतीलच ना. त्यातल्या ५०% लोकांनी तिथेच मोठ्याने विचारले असते की हे असे असे ५०० रुपये मागत आहेत ते कशाचे तर ? नुसते वैषम्य वाटून काय उपयोग? या ऑफिसमधे असा अनुभव आला म्हणून तक्रार नक्कीच करु शकता.

दक्षिणा, माझ्या मनातही हा विचार आला होता. पण मग विचार केला, की पोलीस आपल्या घरी येऊन अन पोलीस स्टेशनमध्ये बोलावून नक्की चेक काय करणार, तर ही तीच व्यक्ती आहे की नाही आणि दिलेल्या पत्त्यावर खरच रहाते की नाही.
बाकी ही व्यक्ती गुन्हेगार आहे का हे त्यांच्या रेकॉरड्सवरुन ठरवणार. एकदा व्यक्तीची ओळख, पत्ता व्हेरिफाय झाला की पोलीसांना त्यांचे रेकॉर्ड्स व्हेरिफाय करणे सोपे असावे. जर असेल नोंद गुन्ह्याची अथवा कुठल्या तक्रारींची तर त्या व्यक्तीची पुढील चौकशी होत असावी, असे लगेच क्लिअर करत नसावेत.

अर्थात मोठे गुन्हेगार, राजकीय दडपण इत्यादि बाबी वेगळ्या.

स्वाती२ मला पटला प्रतिसाद. मला अशा प्रश्नाची अपेक्शा होती म्हणून मी एक गोष्ट इथे सांगितली नाही. अर्थात इतके लोक गोळा करण्याची माझ्यात त्यावेळी क्षमता नव्हती हे खरंय . पण हे ५०० कसले? आणि कशाबद्दल हे मी विचारलं नक्कीच. त्यावर 'सही आजच हवी असेल तर' द्यावे लागतील हे अपेक्षित उत्तर मिळालं. त्यावर मी म्हणाले मी कागदपत्र मॅनिप्युलेट करून दिली असतील तरिही तुम्ही मला सही द्याल ? त्यावर तो पोलिस मला म्हणाला 'मॅडम आमची नजर मुरली आहे, उगिच पोलिस नाही झालो, कोण काय करू शकतो याची आम्हाला बरोबर समज आहे.

आता बोला.

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी केली त्याचा त्रास सोसून पुन्हा अशी ५०० रुची नोट सर्रास घेतली जणार असेल तर तक्रार करावीच. अगदी ठरवून जावून रेकॉर्ड करुन तक्रार करावी. भारताच्या वाढत्या मध्यमवर्गाने एकजूटीने प्रयत्न केले तर बरेच काही साध्य होईल.

पण त्याच पाचशे रुपयांच्या जोरावर एखादा गुन्हेगार/देशद्रोही सुद्धा पासपोर्ट सहज मिळवू शकला असता त्या दिवशी. किंवा एखाद्याने मिळवला ही असेल.
>>>>>
५०० घेतात याचा अर्थ काहीच तपासणी न करता ५०० दिलेत म्हणजे काम झाले असे नसते. तपासणीचे काम करतातच. आणि काही संशयास्पद सापडले तर तुमचे ५०० तुमची होणारी चौकशी रोखू शकत नाही. मुळात ५०० ही ईतकी मोठी रक्कम नाहीये की तेवढे देऊन एखादा गुन्हेगार देशद्रोही बिनधास्त आपला पासपोर्ट काढून फरार होईल.

आपला अनुभव छान. माझी तर ओळखच आहे. ५०० देणे दूरची गोष्ट, बसून थंडा वगैरे प्यायलो साहेबांबरोबर. ईतरा़कडून घेतले की नाही कल्पना नाही, मी विचारायला गेलो नाही.

धन्यवाद सर्वांचे.

दक्षिणा :- आता ऑनलाईन बऱ्याच गोष्टी झाल्यामुळे, कागद्पत्रक कमी असतात. (निदान आमची तरी नव्हती.) सिव्हिल रेकॉर्ड हि असतोच ऑनलाईन. उलट पासपोर्ट ऑफिसमध्येच काही ना काही कारण देऊन लोकांना परत बोलावलं जात.

स्वाती२ :- तुमचं म्हणणं हि पटलं, पण बऱ्याचदा लोकही मदतीसाठी पुढे येत नाहीत. हि एकजुटच शिकायला हवी सगळ्यांनी.

च्रप्स :- त्यांना नको होता चहा. :\

मयुरी पण खरंच तुम्ही त्यांना चहा पाजायला हरकत नव्हती..
प्रश्न फक्त ईतकाच होता की सर्वांनीच असा चहा पाजला असता तर पोलिसमामांना किती चहा प्यावा लागला असता Happy

हाहाहा ... ऋन्मेऽऽष

घरी आलेल्या काकांना माझ्या पप्पानी बनवून दिलेला चहा नको होता बहुतेक आणि पोलीस स्टेशनमधले साहेब ड्युटी सोडून बाहेर येऊ शकले नसते चहा प्यायला आणि तिथेच मागवण रास्त नव्हतं बहुतेक.

मयुरी माझा फ्रेश पासपोर्ट होता, रिन्युअल ला कमी डॉक्युमेण्ट्स लागत असतील.
मी ढिग घेउन गेले होते.

मला ही खुप छान अनूभव आहे मूंबई पोलिसांचा . Verification च्या वेळी त्यान्च्या कडे पेन नव्हतं म्हणून माझं rbi च पेन मी त्याना दिलं होतं . आमच काम झाल्यावर आम्ही निघालो पेन द्या सांगणं आम्हालाच बरं नाही वाटलं पण त्याने हाक मारुन माझं पेन मला परत केलं बक्षिसी तर त्यामुळे फार दूरची गोष्ट वाटली .

धन्यवाद- मनीमोहोर , अदिति

@दक्षिणा:- माझाही नवीन पासपोर्ट होता, मीही बरेच पेपर्स घेऊन गेले होते पण पासपोर्ट ऑफिसमध्ये पहिल्याच खिडकीवर जेवढे आवश्यक आहे तेवढेच पेपर्स काढून ठेवायला सांगितले. पुढे तेच मोजके पेपर्स तीन-चार खिडक्यांवर परत परत तपासून घेतले.

होय ते माहित आहे मला... पण आमचे जे पेपर्स पासपोर्ट ऑफिस ने फायनल करून दिले तेच आणि तेवढेच पोलीस स्टेशनमध्ये बघितले.

फक्त करंट आणि जुनं लाईट बिल पोलिसांनी एक्स्ट्रा म्हणून पाहिलं.

Pages