......नहीं तो शिववाघ आ जाएंगे।

Submitted by अदीजो on 10 January, 2017 - 12:12

(संदर्भ: ३१ डिसेंबरला विसापूर किल्ल्यावर तथाकथित शिवभक्तांनी/संस्कृतीरक्षकांनी केलेला प्रकार. बातमीसाठी दुवा:
http://www.mid-day.com/articles/trekkers-celebrating-new-year-thrashed-s...
हे लोक स्वतःला शिवभक्त/ शिववाघ /शिववाघिण म्हणवतात. सोशल मीडीयावर याचे समर्थक यांचा अभिमान बाळगत आहेत आणि ज्यांनी मार खाल्ला, त्यांना औरंगजेबाची अवलाद म्हणत आहेत.)

सगळीकडे स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांचा, गोरक्षकांचा, साहित्यशुद्धीगटांचा सुळसुळाट झालेला आहेच. त्यात आता स्वयंघोषित शिवभक्त, शिवभक्तिणी, शिववाघ, शिववाघिणी यांचीही भर पडली आहे. लवकरच प्रत्येक गडकिल्ल्यावर या स्वयंघोषित शिवभक्त, शिवभक्तिणी, शिववाघ आणि शिववाघिणींच्या गस्तीचौक्या बसवल्या गेल्या तर त्यात आश्चर्य वाटायला नको. अशा परिस्थितीत आपल्या शिवप्रेमाचं, इतिहासप्रेमाचं, दुर्गप्रेमाचं, सह्याद्रीप्रेमाचं कसलंही प्रदर्शन न करता सह्याद्रीतून भटकणा-या भटक्यांनी आता एक आचारसंहिता ठरवायला हवी. यासाठी हा धागा. आचारसंहितेची कलमे देत आहे. त्यात आपणही भर घाला.
१. गडावर जाताना तुमच्याबरोबर भगवा झेंडा असायलाच हवा.
२. तुमच्या तोंडी फक्त आणि फक्त आणि फक्त शिवरायांचीच गाणी हवीत. त्याव्यतिरिक्त गाणी गाणा-यांना औरंगजेबाची अवलाद असे ठरवले जाईल.
३. शिववाघांच्या गस्तीचौकीवर आपापल्या सॅका उघडून दाखवाव्यात. तुमच्याकडे भले दारू सापडणार नाही, पण ज्युस, कोल्ड्रिंक, सूप, असे पातळ पदार्थही शिववाघांनी प्रमाणित केलेले असावेत. ती दारू नाही हे त्यांनी ठरवायला हवे.
४. तुम्ही विवाहित स्त्री असाल तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र हवे. कपाळावर कुंकू हवे. सवाष्णपणाची सर्व लक्षणे ठसठशीत दिसायला हवीत.
(तुम्ही अविवाहित स्त्री असाल तर तुम्ही गडावर यायचेच नाही किंवा कसे, याबद्दल अद्याप शिववाघांचा विचार झालेला दिसत नाही. पण तुम्ही भारतीय पोशाखातच यायला हवे.)
५. घसे ताणून बेंबीच्या देठापासून किंचाळत शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्या घोषणा तुम्ही द्यायलाच हव्यात. मनातला आदर वगैरे शिववाघ ओळखत नाहीत.
६. गडावर मुक्काम करणार असाल तर तुमचे मोबाईल शिववाघांकडे जमा करावेत. तुम्ही सांगत असलेल्या माहितीची सत्यासत्यता ते तुमच्या घरी फोन करून पडताळून पहातील तसेच गडावरील तुमच्या वर्तनाबद्दल घरच्यांशी विचारविनिमय करीत रहातील.
७. सर्वात महत्वाचे म्हणजे याऊप्परही तुमच्या वर्तनात खोट आढळली, तर शिवभक्त, शिवभक्तिणी, शिववाघ, शिववाघिणी तुम्हाला बांबूचे फटके देतील, पण त्याबद्दल तुम्ही पोलिसांकडे तक्रार करायचे धाडस करू नये कारण ते तुमची तक्रार दाखलच करून घेणार नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिव शिव शिव.... शिव शिव शिव.... व्हाय हे? Happy

(संताप समजला व संतापाला सहानुभूती आहे)

कुठलातरी झेंडा लागतोच ! भडक रंगाचा असला आणि गळा ताणून घोषणा दिल्या कि लोकांच्या नजरेत येतो आणि राहतो. यापेक्षा लई मागणं नाही महाराजा !

बातमी देण्याचे कौशल्य(?) किति अनर्थ घडवु शकते ते इथे दिसते आहे.
बातमी एकतर्फी दिलि गेली आहे.
तक्रारदार जोडप्याव्यतिरिक्त, बाकी तिस पस्तिस जण तिथे काय "तयारीने" गेलेले होते ते कोणीच बोलत नाहीये.
ज्याने माणशी रुपये ३,००० भरुन आयोजन केले, त्याला गड/किल्ले म्हणजे मौजमस्तीकरताची फुकटची जागा वाटली काय ?
माझा व्यक्तिशः अनुभव सांगतो की, बहुतांश गडकिल्ल्यावर येणार्‍यांमधे बहुतेक वेळा हुल्लडबाजी व बेशिस्त वर्तन करणारेच जास्त असतात. इतके की पोरीबाळींची सर्रास छेड काढणारे तर स्वतः अनुभवलेत (माबोवर इतरत्र तो अनुभव कथन केला आहे ) .
गावकर्‍यांना हे अनुभव नवे नसतात, पण अति होते तेव्हा त्यांचाही संयम सुटलेला असू शकतो.
तरी बरे आहे, फेबु अन इकडेही बातम्या झळकताहेतच, की अमक्या तमक्या किल्ल्यावरुन सफाई मोहिमेत अमुक तमुक शे किलो कचरा/अमुक तमुक शे दारूच्या बाटल्या गोळा केल्या गेल्या वगैरे.... ! तर तो कचरा/दारुच्या बाटल्या काय आभाळातुन घारी/गिधाडे किल्ल्यावर आणुन टाकीत नसतात.

अन त्यामुळेच, वरील बातमी वर अंतिम "मत न बनवता" मला बाकी तपशील मिळणे महत्वाचे वाटते.

टीव्ही९ वर देखिल या बातमीवर चर्चेचे दळण चाललेले बघितले होते अन त्यातिल शहरी बाळबोध अक्कलेचे तोडलेले तारे ऐकुन हसावे की रडावे कळत नव्हते.

limbutimbu तुमचा मुद्दा पटण्याजोगा वाटतो...
अशी एतीहासीक स्थळ कँप /पार्टी साठी भाड्याने देता येतात.. आणि ति पण ३१ डिसेबंर ला?

चूक दोन्ही बाजूनी आहे.

३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी किंबहुना कोणत्याही पार्टी साठी गड किल्ल्यांसारख्या पवित्र ठिकाणी जाणे चूकच. त्यात पण परवानगीचा मुद्दा बातमी मध्ये आलेला आहे.

जर अशी कोणी पार्टी करत असेल तर उगाच स्वघोषित कायद्याचे, संस्कृतीचे रक्षक म्हणून लोकांना बांबूने मारणे, त्यांचे कपडे उतरवणे, लहान मुलांना मारणे हे सुद्धा निषेधार्ह.