भारतीय जवानाची कैफियत

Submitted by आशुचँप on 10 January, 2017 - 07:46

भारतीय जवानाची कैफियत

आज तेज बहादुर यादव या बीएसएफ जवानाचा व्हिडीयो पाहिला आणि काटा आला अंगावर. आपले जवान कुठल्याही परिस्थितीत पडेल ते काम करत, कमालीच्या विषम हवामानात आपले कर्तव्य बजावत असतात. पण ती यंत्रे नाहीत तर माणसे आहेत याचा जणू वरिष्ठांना विसर पडला असावा आणि अगदीच असह्य झाल्यानंतर त्याने ही कैफियत सगळ्या जगासामोर मांडली असावी.

मला व्हिडीओ बघताना तेच जास्त जाणवत होते की आपल्याच देशबांधवांविरुद्ध, आर्मीच्या सगळ्या शिस्तीच्या आणि कायदेपालनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस त्याला करावे वाटले या प्रोसेस मध्ये त्याने किती सोसले असेल. कित्येक रात्री तळमळत घालवल्या असतील, संतापाने, असह्यतेने पोखरून निघाला असेल.

त्याने परिस्थितीला वैतागून जीव दिला असता तर त्यावर साधी चर्चाही झाली नसती. वृत्तपत्रात एखादी छोटा कॉलम बातमी आली असती, की जवानाची ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या. विषय संपला.

पण त्याने हा मार्ग निवडला. याचे परिणाम काय होतील याची त्याला पूर्ण कल्पना असणारच, कारण व्हिडीओमध्येच त्याने ते सांगितले आहे. आणि बीएसएफने दिलेले स्पष्टीकरण बघता आणि लगोलग घेतलेली अॅक्शन बघता त्याचे म्हणणे किती खरे होते याची जाणिव झाली.

त्याला आता दारूच्या नशेत राहणारा, मनोस्वास्थ्य बिघडलेला ठरवण्याची सुरुवात झाली आहे. अशा जवानाला तुम्ही सीमेवर रक्षण करायला पाठवू कसे शकता हे कुणी विचारू शकत नाही. त्याला हळू हळू इतके खच्ची करतील की पुन्हा कुणी जवान असे धाडस करणार नाही.

एक भारतीय म्हणून मी या सगळयाचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आता यावर इतक्या उलट सुलट बातम्या येतील की कोण खरे आणि कोण खोटे हे देखील कळणारनाही. पण आज तेज बहादुर यादवच्या पाठीशी उभे राहणारे गरजेचे आहे. इतकी वर्षे आपले जवान खंबीरपणे आपल्या आणि शत्रुच्या मध्ये उभे राहीले आहेत. आज वेळ आलीये आपण त्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या मध्ये उभे राहण्याची.

https://www.youtube.com/watch?v=OwWjZ7xlRjU

हाच तो व्हिडीओ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षानुवरशे असेच आहे... राजे महाराजे आमदार खासदार मजेत रहातात ... सैनिक फुक्कट मरतात ... ओम पुरीचे बरोबरच होते.

बीएसएफ चे म्हणणे आहे, की या माणसाचे प्रमोशन थांबवले, म्हणून त्याने हे केले. दुसरे हा दारूड्या आहे. तसेच शिस्त पाळत नाही. त्याला मनोरुग्ण ठरवायची ही तयारी सुरू आहे.

तेव्हा..

तो कसा यापेक्षा त्याने जे दाखवले आहे ते खरे आहे का खोटे आहे हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे.

मला खात्री आहे, त्याच्या सहकाऱ्यांवर दबाव टाकून हे असे काही झालेच नाही, आम्हाला नेहमीच चांगले जेवण मिळते, त्याने हा व्हिडीओ कुठून टाकला याची कल्पना नाही असे कबुलीजबाब घेतले जातील.

हा व्हिडिओ बघून वाईट वाटलं, पण आश्चर्य वाटलं नाही. काश्मीर, उत्तरांचल या भागांत सैनिक किती तुटपुंज्या साधनसामुग्रीवर जगतात हे पाहिलं आहे. वर्षानुवर्षं ही परिस्थिती बदललेली नाही, हे खेदजनक आहे.

श्री. तेज बहादुर यादव यांनी या व्हिडिओद्वारे परिस्थितीकडे लक्ष वेधून घेतलं हे उत्तमच झालं, पण त्याचबरोबर मी त्यांचा निषेधही करतो. काल मी त्यांच्या फेसबूक पानावर गेलो. तिथे इस्लाम, ख्रिश्चन या दोन्ही धर्मांविरुद्ध अद्वातद्वा पोस्टी त्यांनी लिहिल्या होत्या. 'हा देश केवळ हिंदूंचा आहे' असं त्यांचं म्हणणं आहे.

आज त्यांच्या सगळ्या पोस्टी गायब होऊन फक्त हा व्हिडिओ तिथे आहे. 'मै एक भोजी हू अपने देश का सचा सिपाई हु मेरा किसी ध्रम के प्रति कोई गलत विचार नहि है अगर मेरे से कोई गलती हूई है तो मै हर ध्रम से माफी मागता हु जय हिंद' अशी सारवासारवही आहे. पण ती केवळ एक पोस्ट नव्हती. अशा असंख्य पोस्टी होत्या. त्यांनी माफी मागितली तरी एका सैनिकाच्या तोंडी अशी भाषा बघून वाईटही वाटलं.

जवळजवळ सगळा समाज भ्रष्टाचारी असताना त्याच समाजातून बनलेले आर्म्ड फोर्सेस मात्र चिखलातल्या कमळाप्रमाणे अलिप्त असावेत हा भ्रम आहे. खर्‍या लोकशाही समाजात, त्याचा कोणताच भाग बियाँड डाऊट, अस्पर्श्य, पवित्र, ज्याच्या बद्दल शंकाच घ्यायला बंदी वगैरे नसला पाहिजे.
आता यावर 'सियाचीनला २ मिनिट नुसते उभे राहून दाखवा' वगैरे प्रतिवाद होईलच पण त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.

काल मी त्यांच्या फेसबूक पानावर गेलो. तिथे इस्लाम, ख्रिश्चन या दोन्ही धर्मांविरुद्ध अद्वातद्वा पोस्टी त्यांनी लिहिल्या होत्या. 'हा देश केवळ हिंदूंचा आहे' असं त्यांचं म्हणणं आहे.

अच्छा हे माहीती नव्हतं, रादर त्यांच फेसबुक अकाऊँट असेल अशी कल्पनाही नव्हती. म्हणजे मला वाटत होतं की त्यांना सोशल मिडीयाचा वापर करायला रिस्ट्रीक्शन्स असतील.

पण मी वर म्हणलं तस, यादव हे कसे भले बुरे आहेत ही चर्चा एकीकडे, आणि ज्या विषयाला तोंड फो़डले त्याची सत्यता अशा याच्या दोन बाजू आहेत.

इच्छा अशी आहे की दुसऱ्या विषयावर जास्त चर्चा आणि अॅक्शन घेतली जावी.

मुळात बॉर्डरवर व्हिडीओ शूट करून ते सोशल मिडीयावर टाकणे हाही बहुदा आर्मी कोड अंतर्गत गुन्हा ठरू शकत असेल. आणि त्याबद्दल काही अॅक्शन घेतली जाणे साहजिक आहे. पण म्हणून तो विषय दुर्लक्षिता येणार नाही.

<अच्छा हे माहीती नव्हतं, रादर त्यांच फेसबुक अकाऊँट असेल अशी कल्पनाही नव्हती. म्हणजे मला वाटत होतं की त्यांना सोशल मिडीयाचा वापर करायला रिस्ट्रीक्शन्स असतील. >

मलाही तसंच वाटत होतं. एका मित्रानं त्यांच्या फेसबूक पानाबद्दल सांगितलं म्हणून तिथे गेलो. हे गृहस्थ फेसबुकावर बरेच सक्रीय असलेले पाहून मला आश्चर्य वाटलं. आजही त्यांनी इतर सगळ्या पोस्टी काढून आपला व्हिडिओ चारपाच वेळा पोस्ट केला आहे. त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या सर्व प्रकरणावर सोन्याबापूंची प्रतिक्रिया काय येतेय हे बघणे राहिल...
त्यांनी इथे लिहिणे अपेक्षित आहे..
सोशल मिडियावर जवानांचा सहभाग कुठल्या हद पर्यंत असतो हे जाणुन घ्यायला आवडेल..
माझा एक दादा कॅप्टन आहे अन तो फेबु वर सक्रिय सुद्धा आहे..पण आत्तापर्यंत तरी त्याच्या कधी एककल्ली पोस्ट अथवा विधान बघीतले नाही..

@आगाऊ, मी स्वतः एक पॅरामिलिटरी ऑफिसर आहे पण मी तुम्हाला 'सियाचीन ला उभे राहा' वगैरे म्हणणार नाही, किंवा तुमचा मुद्दाही अमान्य करणार नाही, सिविल असो वा फोर्स कोणीही परमपवित्र (सॅक्रोसंक्त) नाही, ह्यात वाद होऊच शकत नाही. मी स्वतः एक रेजिमेंटेड अधिकारी असून मी असे का बोलतो ? कारण माझा फंडा स्पष्ट आहे, राष्ट्रवादाला अर्थ तिथवरच आहे जोवर 'राष्ट्र' आहे , राष्ट्र असणे म्हणजे काय? तर आपण किंवा आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली घडी नीट सांभाळून ठेवणे, तिच्यात प्रसंगोचित बदल करणे, माझ्यासाठी ती घडी म्हणजे माझे संविधान आहे, माझे पहिले कर्तव्य माझा देश त्याचे संविधान, दुसरे माझे जवान, तिसरे माझ्या फोर्स माझ्या पलटणीची इज्जत, चौथे वरिष्ठ, पाचवी माझी प्रिय पत्नी अन इतक्यातून जिवंत राहिलो तर थोडेफार माझा आत्मसन्मान अश्या उतरंडीत आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला जर कोणी असले विखारी उन्मादी डोस पाजायला आले तर एक नागरिक म्हणून त्या वैचारिक विकृतीपासून तुमचे रक्षण करायला एक सैनिक म्हणून मी माझी ड्युटी कायम करेन अन इथेच तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा सापडेन.

@आशु भाऊ,
प्रथम थोडे स्पष्टीकरण

यादव हे आर्मीचे नाहीत अर्थातच भूदलाचे नाहीत ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नामक पॅरामिलिटरी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल आहेत (पॅरा मिलिटरी मध्ये रँक पोलिसांप्रमाणेच असतात थोड्याफार बदलासहित), भारतात आर्मी नेव्ही ऐरफोर्स ह्या ट्रायसर्व्हिसेस मुख्य आक्रमक दले होत, त्याशिवाय पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये २ प्रकार एक म्हणजे कोर पॅरामिलिटरी आर्मीच्या वेगवेगळ्या युनिट्स मधून डेप्युटेशन वर आलेले जवान+अधिकारी ह्या युनिट्स मध्ये असतात, ही युनिट्स अशांत भागात काम करतात आणि सगळ्या देशातल्या तौलनिक दृष्ट्या शांत भागातल्या बटालियनना युद्ध सराव हवा म्हणून रोटेशन वर ह्या युनिट्सला संलग्न केले जाते, अशी कोर पॅरामिलिटरी युनिट्स म्हणजे (माझ्या माहिती प्रमाणे)

१. राष्ट्रीय रायफल्स (आर आर) - कार्यक्षेत्र काश्मीर खोरे

२. लदाख स्काऊट्स - अर्थातच लदाख

३. आसाम रायफल्स - कार्यक्षेत्र पूर्वोत्तर भारत (७ सिस्टर्स भाग)

ह्याशिवाय बहुदा कोस्टगार्डना सुद्धा कोर पॅरामिलिटरीचा दर्जा असावा पक्के माहिती नाही/आठवत नाही

दुसरे पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (सीएपीएफ)

१ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (पाक बांगलादेश बॉर्डर)
२ इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (चीन, भूतान बॉर्डर उत्तराखंड अन लदाख चा काही भाग ते अरुणाचल)
३ सशस्त्र सीमा बल (नेपाळ बॉर्डर)
४ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) (अंतर्गत सुरक्षा अन अंतर्गत दहशतवाद विरोधी बळ)

तर,

यादव हे बीएसएफचे जवान आहेत, आजवर ह्या सीएपीएफच्या लोकांना 'हुतात्मा' हा दर्जा सुद्धा नव्हता, तो सद्य सरकार ने ओरोप निमित्त सुरु केला हे सुरुवातीलाच मान्य करावे लागेल, मुळात ह्या फोर्सेस मध्ये असे का होते ते पाहणे आता रोचक ठरेल, अतिशय मूलभूत फरक हा की ट्रायसर्व्हिसेस ह्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करत असतात अन त्यांची नियमावली ही घटनेत विहित कलमांच्या नुसार स्थापन केलेल्या 'आर्मी ऍक्ट' 'नेव्ही ऍक्ट' 'ऐरफोर्स ऍक्ट' च्या नियमावलीला अनुसरून असते, तेच जर इतर सीएपीएफ पाहिले तर ते सगळे फोर्सेस हे गृहमंत्रालयांतर्गत काम पाहत असतात, ह्याचा अर्थ हा की बरेचसे नागरी कायदे जसेच्या तसे त्यांना लागू होतात, आर्मी वाल्यावर केस केल्यास ती 'आयपीसी' अर्थात इंडियन पिनल कोड सोबतच आर्मी पिनल कोड अर्थात 'आर्मी ऍक्ट अंतर्गत अन जॅग कोर (जजेस अँड आडवोकेट जनरल कोर, इंडियन आर्मी) ने ठरवलेल्या आर्मी पिनल कोड नुसार चालवतात. ह्यामुळे एक होते, आर्मी मध्ये न्यायदान खूप वेगाने होते (त्यांच्या केसेस सुद्धा कोर्ट मार्शल जनरल कोर्ट प्रोसीडींग मध्ये म्हणजे त्यांच्या वेगळ्या कोर्ट मध्ये होते) सीएपीएफ केसेस नॉर्मल कोर्टातच हाताळल्या जातात बहुतांशी

पुढील प्रतिसादात, काम अन यादव हे विषय घेतो, ब्रेक के बाद Happy

धक्कादायक आहे तो व्हिडिओ, त्या जवानाचे इतर विचार वादग्रस्त असतीलही पण जर जेवणाचे असे हाल होत असतील तर अवघड आहे.
सोन्याबापु छान माहिती देताय.

सोन्याबापू, छान माहिती.

मी आशूचँप यांच्या म्हणण्याशी मात्र सहमत आहे.
यादव व्यक्तिगतरित्या कसेही असोत, त्यांनी जगापुढे आणलेली माहिती खरी असेल तर खूपच दु:खदायक आहे.

यानिमित्ताने संरक्षक दल आणि इतर तत्सम दलांत कार्यरत असणार्‍या लोकांवर चर्चा झाली, त्या लोकांना न्याय मिळाला तर उतमच!

प्रतिसाद भाग २,

पहिल्या प्रतिसादात आपण मुख्य भूदल आणि इतर पॅरा ह्यांच्या कामातील फरक, अन्याय झाल्यास न्यायदानाच्या वेगाबद्दल मूलभूत माहिती घेतली, आता आपण वळूया पॅरामिलिटरी मध्ये होत असलेल्या अन सध्या ऐरणीवर असलेल्या प्रश्नांकडे.

थेट मुद्द्याला हात घालतो

१. यादव ह्यांनी व्हिडीओ मध्ये दाखवलेले कितपत सत्य अन कितपत अतिरंजित ?

- माझ्या अनुभवानुसार ७०% सत्य ३०% अतिरंजित , जेवण भरपूर असते, फक्त ते क्वालिटी नसते, एखादा फारच हरामी अधिकारी आला (शब्दाला माफी असावी पण थोडा फौजी बाज आवरत नाही) , तर एखाद आऊट पोस्ट वर काही महिने (तो अधिकारी तिथून जाईपर्यंत) अशी परिस्थिती होते, फक्त यादवांना सदासर्वकाळ प्रत्येक पोस्टिंग मध्ये असे अधिकारी मिळत गेले ह्यावर विश्वास ठेवणे कठीण पडते आहे मला (महाहलकट अधिकारी असतात अन ते असली कृत्य करतात हे मान्य करूनही) , शेवटी 'उडदामाजी काळे गोरे' हे तत्व आपण सगळेच मान्य करतोय नाही का?

- अधिकारी जर वरती वर्णन केल्याप्रमाणे असला तर तो ह्या रेशनचा अपहार करू शकतो, पॅरामिलिटरी मध्ये अधिकारी २ प्रकारे येतात एक म्हणजे डायरेक्त रिक्रुट (यूपीएससी असिस्टंट कामांडन्ट परीक्षा) दुसरे म्हणजे डेप्युटेशनिस्ट , यूपीएससी देऊन नागरी सेवा परिक्षांतर्गत आयपीएस झालेली जनता, ह्यातले काही आयपीएस हे खरेच त्या त्या फोर्सवर मनापासून प्रेम करतात अन काही आयपीएस फक्त रिलॅक्स पोस्टिंग म्हणून येतात (रोज चोर दरोडेखोर मंत्री संत्री राजकारण पाहून साहेब थकले की डेप्युटेशन घेऊन निवांत राहायचे काही दिवस ह्या अर्थाने) , अश्या अधिकाऱ्यांना आम्ही लोक 'दामादजी' म्हणतो! कारण कळलेच असेल ? Wink

- सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्यामते, बजेट अलोकेशन मध्ये सुस्पष्टता नसणे, डिफेन्स सेगमेन्ट हा भारतीय अर्थसंकल्पात क्रिस्टल क्लियर असतो, अमुक इतके लाख कोटी डिफेन्स वर खर्च होणार, त्यातला सामायिक (ट्रायसर्व्हिसेस अन पॅरामिलिटरी) खर्च म्हणजे ऑर्डिनान्स वरचा खर्च, बाकी आर्मी ला पैसे देताना अतिशय सुस्पष्ट निर्देश असतात खर्च, ताळेबंद इत्यादींचे तरीही करणारे लोक मिलिटरी अकाउंट्स मध्ये बसून गबन करतातच, ते एक असो. पॅराच्या बाबतीत अशी सुस्पष्टता काहीच नाही आधीच ४/५ फोर्सेस त्यातही सगळे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत, मग इकडे किती तिकडे किती कपड्यांना किती जेवणाला किती हे झोल होतात बऱ्यापैकी, त्यातूनही आदेश असे असतात की फॉरवर्ड लोकेशनला आर्मी सोबत टायअप करून रेशन प्रोक्युर करा, मग तिकडे अजून झोल वाढतात, बरं ह्यात कोणीच साव नाही कोणीच चोर नाही सगळेच साव अन सगळेच चोर, सगळे अधिकारी काळे नाहीत अन सगळेच जवान गोरे सुद्धा नाहीत, कितीतरी जवान सुद्धा ह्यात लिप्त असतात, स्टोर ड्युटी लागावी म्हणून धडपडत असतात , हे ही दुर्लक्षून चालणार नाही, हे जे काही मी लिहितोय ते माझे अनुभव आहेत, मला स्वतःला असले धंदे पटत नाहीत म्हणून मी चालून आलेली स्टोर ड्युटी सोडून ट्रेनिंग विंगला ड्युटी मागितली , तेव्हा सगळे मला हसले होते. पण बर्फात उभ्या एखाद्या जवानाची हाय त्याच्याच काही सहकाऱ्यांच्या मदतीने घेण्यात मला रस नव्हता.

२. मी यादवांना सपोर्ट करतो का?

मुद्द्यावर होय, व्यक्त करायची पद्धत नाही त्रिवार नाही, कारण? ते कारण सांगायला मी फ्यु गुड मेन मधल्या जॅक निकोल्सन चा डायलॉग वापरतो ' we do what we do the way we do else people die' असा काहीसा तो संवाद आहे, अर्थात एका नकारात्मक पात्राचे वाक्य मी माझ्या भोळ्या भावना व्यक्त करायला वापरतोय ह्याचे भान मला आहे, यादवांवर अन्याय किंवा जवानांवर अन्याय होत असल्याचे मी कबूल करून चुकलोय पण तो व्यक्त करायची पद्धत मला पटलेली नाही, सतत लेफ्ट राईट करून माझ्या मेंदूची वाढ खुंटली असेल कदाचित पण मला तो रस्ता मान्य नाही, कित्येक प्रसंग मी पाहिलेले आहेत! मी पण विडिओ तयार करावेत काय? तर नाही, अजिबात नाही , मुक्त विचारांच्या ह्या बुद्धिवादी सभेत कदाचित माझे विचार जरब असणारे किंवा जुलमी वाटतील पण ती एक मिलिटरी/युनिफॉर्म नेसीसीटी असते, यादवांना कायम खुल्या कोर्टात जायचा मार्ग उघड होता, आहे. व्हिडीओ तयार करून त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यास दगड मारला आहे, एक अतिशय उज्वल परंपरा अन मान असलेल्या फोर्सला कांगारू कोर्ट सारख्या मीडिया अँड सोशल मीडिया ट्रायल नामे दळभद्री प्रकारासमोर उभे केले आहे, ही तीच कांगारू कोर्ट आहेत जी आजकाल पैश्याला पासरी देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात, ही तीच कांगारू कोर्ट आहेत जी कोणालाही एका कॉमेंटच्या आधारे पाकिस्तान मध्ये पाठवतात किंवा सरसावून शिक्के मारतात, हा भक्त , तो आप्तार्ड, तो लिबटार्ड, तो संघी, हे सगळे एका उज्वल फोर्स सोबत झालेले मला तरी आवडणार नाही, पण आता उपयोग नाही, यादवांना बीएसएफच्या रिटायर्ड सैनिकांची संघटना ठाऊक नसणे अशक्य वाटते, त्यांनी किमान त्यांच्याकडे जायला हवे होते, मी माझ्या जवानांचा विचार करतो, तसेच बीएसएफ मध्ये एक अधिकारी नसेल जो जवानांचा विचार करतो? यादवांनी सगळ्या अधिकारी जमातीला एकदमच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सर्वत्रिकरण केले असे म्हणले तर चूक असेल?

'उडदामाजी काळे गोरे' हे तत्व मी आधीच मान्य केले आहे, तेच बापू , यादव सहित सगळ्या जवान अधिकाऱ्यांना लागू होते, यादवांच्या मुद्द्यात दम लाख असेल नाही आहेच, त्याचा उहापोह सुद्धा मी यथामती केलाय, पण त्यांचा रस्ता मला पटलेला नाही पटणे शक्य नाही

लेखनसीमा

_____/\_____

बापू, __/\__ आमच्याकडून घ्याच. काय सुंदर दृष्टिकोन देता आहात तुम्ही! अभिमान वाटतो तुमच्यासारख्यांचा बापू. कधी एकदा भेटा, तुम्हाला साष्टांग दंडवत घालायचा आहे.

सोन्याबापू,

बीएसएफ ने म्हटले आहे, की ड्यूटीवर असताना या जवानाजवळ स्मार्टफोन कसा काय होता, याची चौकशी करणार आहेत. अर्थात, कॅमेरावाले फोन अगदी डॉकयार्डसारख्या ठिकाणीही अलाऊड नसतात, सोशल मेडीया अ‍ॅक्सेस रेस्ट्रिक्टेड असावा असे वाटते.

या बाबत तुमच्याकडून अधिक माहिती आवडेल.

सोन्याबापू , टेलिपथी असते का वगैरे माहीत नाही .
पण तुम्ही लिहिलेलं <<<< यादवांना कायम खुल्या कोर्टात जायचा मार्ग उघड होता, आहे. व्हिडीओ तयार करून त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यास दगड मारला आहे, एक अतिशय उज्वल परंपरा अन मान असलेल्या फोर्सला कांगारू कोर्ट सारख्या मीडिया अँड सोशल मीडिया ट्रायल नामे दळभद्री प्रकारासमोर उभे केले आहे, ही तीच कांगारू कोर्ट आहेत जी आजकाल पैश्याला पासरी देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात, ही तीच कांगारू कोर्ट आहेत जी कोणालाही एका कॉमेंटच्या आधारे पाकिस्तान मध्ये पाठवतात किंवा सरसावून शिक्के मारतात, हा भक्त , तो आप्तार्ड, तो लिबटार्ड, तो संघी, हे सगळे एका उज्वल फोर्स सोबत झालेले मला तरी आवडणार नाही, पण आता उपयोग नाही, यादवांना बीएसएफच्या रिटायर्ड सैनिकांची संघटना ठाऊक नसणे अशक्य वाटते, त्यांनी किमान त्यांच्याकडे जायला हवे होते, मी माझ्या जवानांचा विचार करतो, तसेच बीएसएफ मध्ये एक अधिकारी नसेल जो जवानांचा विचार करतो? यादवांनी सगळ्या अधिकारी जमातीला एकदमच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सर्वत्रिकरण केले असे म्हणले तर चूक असेल?>>>> हे तंतोतंत मनात आलेलं. साध्यश्या ऑर्गनायझेशनमध्येही हायरार्की नावाची गोष्ट फॉलो होते . ही तर किती संवेदनशील गोष्ट आहे. यादवांना हे माहीत नसेल असं मुळीच वाटत नाही.
तुम्ही उल्लेख केलेला फ्यू गुड मेन मलाही आठवला ही घटना वाचून.

सोन्याबापु , दोन्ही प्रतिसाद आवडले.

कॅमेरावाले फोन अगदी डॉकयार्डसारख्या ठिकाणीही अलाऊड नसतात, सोशल मेडीया अ‍ॅक्सेस रेस्ट्रिक्टेड असावा असे वाटते. >>> आरारा +१, आर्मीचे काय रुल्स आहेत ह्याविषयी ?

सोन्याबापू छान माहिती, लेखनसीमा नको, अजूनही माहिती बहुधा येत राहील तुमच्याकडून या निमित्ताने.

विडिओ अजून पाहिले नाहीत. पण एकंदरीत पोस्ट आणि वर्णन वाचून अंदाज आलाय.

सोन्याबापू, प्रतिसाद पटले.
यावर कारवाई म्हणून त्या यादावांवर कदाचित कारवाई होईल पण त्याच बरोबर मूळ समस्येवर उपाय शोधला गेलेलं बघायला आवडेल. आता मिडीया ट्रायल होणारच असेल तर पर्यवसान चुका टाळण्यात व्हावं.

सैनिक हे देशाच्या लोकांमधूनच आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी धार्मिक उन्मादजनक पोस्ट टाकल्या तर त्यात मला तरी फार काही आश्चर्य वाटलं नाही. (हे आश्चर्य न वाटणे प्रोटोकॉल/ तो मोडला इ. बद्दल नसून मूळ मनोवृत्तीबद्दल आहे). आडात आहे तेच आणि त्याच प्रमाणात पोहोऱ्यात येणारच. वाचून शिकून त्यात बाकी लोकांत जितका बदल होतो तितका (थोडा कमी जास्त असेल )फरक पडत असेलच.

सोन्याबापू अतिशय सुरेख प्रतिसाद, विशेषत: दुसर्‍या पोस्ट मधले शेवटचे परीच्छेद जबरदस्त.

आगाऊ, सोन्याबापू प्रतिसाद आवडले.

लष्करी, निमलष्करी दलांमधे चालणारे शोषण आणि भ्रष्टाचार या विषयांवर चर्चा होत नाहीत सहसा.

सोन्याबापू उत्तम माहिती.
आम्ही लोकं सैनिकांकडे नेहमी भावनिकदृष्ट्या बघतो. त्यामुळे या घटनेबद्दल नेमके मत मांडू शकणार नाही.
पण मला त्या सैनिकाने केलेले कृत्य आवडलेय. सैनिक स्वत:च्या हक्कासाठी नाही लढू शकला तर देशासाठी कसा लढणार.
सैन्याचे शिस्तीचे नियम, प्रोटोकॉल असतात ते पाळायला हवेत सारे कबूल. आता त्याला या कृत्याची जबरी किंमतही चुकवावी लागणार. एका अर्थी तो सैनिक शहीदच होणार. कदाचित त्याचे हे बलिदान अगदीच व्यर्थ जाणार नाही. या घटनेला योग्य ती प्रसिद्धी मिळाली तर काही प्रमाणात नक्कीच सुधारणा होईल

Pages