समदुःखी

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 15 December, 2016 - 04:31

समदुःखी..........

"कोणती भाजी आणलीस ग आई?" मेघाने घरात पाऊल टाकताच अन्वी ने तिला प्रश्न विचारला.

"अनु... तिला बसू तर दे .. आत्ताच आलीय ना ऑफिसवरून. जा तू आधी तुझा अभ्यास पूर्ण कर. पळ. " शामराव तात्या म्हणजे अन्वी चे आजोबा त्यांनी अन्वीला तिच्या रूम मध्ये पळवलं अन स्वतः तिच्या मागे जात तिचा अभ्यास घेऊ लागले. रुक्मिणी माई म्हणजे अन्वीची आजी, तिने मेघाला पाणी आणून दिलं. मेघा फ्रेश झाली; चहा पिऊन थोडा वेळ बसली आणि स्वयंपाक खोलीत शिरली.

"माई आजही जवळ जवळ सगळा स्वयंपाक केला आहेस तू... का ग अशी करतेस? थोडा आराम करायचा ना... " मेघा ओरडतच बाहेर आली. माई मेथीची भाजी निवडत बसल्या होत्या.

"अगं असूदेत, आपला रोजचाच साधा बेत होता.. म्हणून केला, नाहीतर तुमचा वेस्टर्न पिझ्झा / पास्ता / नूडल्स वगैरे असता तर मला अडाणीला थोडंच जमणार होता... " तिच्या या बोलण्याने मेघा निरुत्तर झाली आणि तिच्यासोबत गप्पा मारत मेथी निवडायला बसली. १०-१५ मिनिटे झाली असतील आणि अन्वी धावत बाहेर आली. "आई हा सम सांग ना कसा सॉल्व्ह करायचा ? ह्या अज्जूना नाहीये कळत... आणि हे काय मेथीची भाजी, प्लिज तू नको करुस हां; तू शॉर्ट कट घेतेस, आजीला बनवू देत, मस्त डाळ-शेंगदाणे टाकून."

"अन्वी जास्त बोलतेस हां तू आजकाल. फटके पडतील" असं म्हणत मेघा ने हात उचलला तसा तात्यांनी तिला मागे घेत म्हटलं... "जाऊ दे मेघा लहान आहे ती... "

"तुम्हीच तिला लाडावून ठेवलं आहात, जीभ किती चुरुचुरु चालतेय बघा... "

"ते सगळं सोड, तिचा अभ्यास बघ थोडा.जा.. रुकमी तू कर भाजी. मी मदत करू का निवडायला?"

"अज्जीबात नको, पानं फेकून द्याल आणि देठ खाऊ घालाल." यावर सगळेच हसले. मेघा अन्वीचा अभ्यास घेण्यासाठी तर माई पुढच्या जेवणाच्या तयारीसाठी तिथून निघून गेल्या. जयदीप ला घरी यायला अजून एक-दीड तास बाकी होता. संध्याकाळ आणि रात्र या दोन प्रहारांमधला वेळ घरातल्या कर्त्या स्त्रिया स्वतःला कामात नाहीतर मराठी सीरिअल्स मध्ये व्यस्त ठेवत, तर शामरावांना त्यांच्या भूतकाळात. मागच्या ४०-४५ वर्षांचा काळ अगदी काल घडल्यासारखा त्यांच्यासमोरून निघून जात असे………………………………………

शामराव आणि रुक्मिणी यांच्या लग्नाला ५ वर्षे उलटून गेली होती, पण घरात काही पाळणा हलला नव्हता. "हे बघ शाम मी तुला शेवटचं सांगतेय, मूल दत्तक वगैरे घ्यायला मी तुला अजिबात देणार नाही... कोण कुठलं कोणाच्या जातीचं पोर मी माझ्या घरात वाढू देणार नाही.. त्यापेक्षा दुसऱ्या लग्नाला तयार हो..." शामरावांची आई त्याला ठणकावून सांगत होती.

"आणि....? तिलाही मूल नाही झालं तर तिसरं लग्न करू? आणि मग चौथं?, आम्ही दोघे असेच राहू... नकोय आम्हाला मूल नि काय... हा विषय इथेच संपला. " शामनेही तेव्हढ्याच ठामपणे आपल्या आईला सांगितलं. त्यांच्या घरात पुन्हा तो विषय निघालाच नाही. श्यामच्या धाकट्या भावाचं लग्न पार पडलं आणि वर्षातच घरात पाळणा हलला. आजीला नातू मिळाला, नंतर नातही झाली आणि घर फुलायला लागलं. धाकट्या जावेने मात्र रुक्मीणीला तिच्या मुलांपासून दूरच ठेवले. दोघांच्याही आयुष्यात ममतेचं पारडं रितच राहील. त्यांच्या हृदयात असलेली अपार माया, फक्त लोकांच्या हेकेखोर स्वभावामुळे कधी पाझरलीच नाही. वर्षे सरत गेली. पुढची पिढी देखील बोहल्यावर चढली आणि आता श्याम आणि रुक्मिणीची खरीखुरी अडचण भासू लागली. पूर्ण आयुष्यच मान खाली घालून जगत आलेल्या रुक्मिणीची आता होणारी अवहेलना सहन न झाल्याने श्यामरावांनी स्वतः,पिढीजात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, मोजकीच ठेव सोबत घेऊन त्यांनी वृद्धाश्रम गाठला. पण आयुष्याच्या सरत्या काळात त्या परमेश्वराला दया आली असावी अन त्या वर्षी मेघा अन जयदीप ची भेट झाली. अजूनही लक्षात आहेत ती प्रश्नोत्तरे. कोणाच्याही आयुष्यात बांडगुळ होऊन जगायचं नव्हतं म्हणून घर सोडलेल्या त्यांनी पहिल्या क्षणात वृद्धाश्रमात भेटीला आलेल्या त्या दोघांच्या प्रस्तावाला नकार दिला होता. "आम्हाला काय पोर सांभाळायला नेत आहात का? आजकाल Care taker मिळणं फार मुश्किल झालाय हे माहितीय. " आयुष्यात भेटलेल्या जिवाच्या माणसांनी खूप कडवट बनवलं होत त्यांना. रुक्मिणी अजूनही शांत. नवरा म्हणेल ती पूर्वदिशा, पण तिच्या डोळ्यात वाचलेलं त्यांनी... "जाऊयात ना आपण". तरीही खरं मतपरिवर्तन झालं ते जयदीपच्या बोलण्याने.

"तात्या... (त्याने त्या क्षणालाच त्यांना वडिलांचा दर्जा दिला होता.)आम्ही दोघेही अनाथ आहोत... आई- वडिलांचं प्रेम मिळालंच नाही कधी, पण म्हणून माझ्या होणाऱ्या बाळाला आजी अन आजोबांच्या प्रेमापासून का वंचित ठेऊ? तुम्हाला इथे केअर टेकर मिळत नाहीत म्हणून नाही घ्यायला आलो आम्ही, जेव्हा इथला रेकॉर्ड चेक केला तेव्हा कळलं, तुम्हाला स्वतःच मुलं नाही. जे दुःख आमचं तेच तुमचं. समदुःखी असलेले आपण एकमेकांना नक्कीच समजून घेऊ. आजी आजोबा देत असलेले संस्कार आई-बाबा कधीच देऊ शकत नाहीत. तुम्ही एका पीढीहून मोठे आमच्यापेक्षा. संसारातल्या गोष्टी तुम्हीच सांभाळणार. बाळाच्या आगमनाची फक्त चाहूल पुरे... आईपेक्षा जास्त हुरूप आजीलाच... स्वेटर, झबली शिवायचा. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आजी अंघोळ घालणार, टीटी लावणार, मऊ मऊ खिचडी भरवणार... अंगाई गाऊन झोपवणार.. आणि आई बाबा रागावले तर आजोबा पाठीशी घालणार. बाळाला कडेवर घेऊन फिरायला जाणार.... कधी लागलं-खुपलं तर आजीच्या बटव्यातील दवाच उपयोगी येणार. आम्ही लहानाचे मोठे झालो...तात्या पण...... या सगळ्या गोष्टी कधीच अनुभवल्या नाहीत...आता मित्राच्या तोंडी ऐकल्या तेव्हा वाटलं, खूप मोठं काही हिरावून घेतलं देवाने आमच्याकडून.... थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतात हो ...आणि मग आम्ही वृद्धाश्रमात येऊन आई-वडिलांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला... " तिथे उपस्थित असलेल्या चौघांचे डोळे पाणावले होते, आणि मग काहीच कोणी न बोलता... रुक्मिणी आणि शामराव , मेघा आणि जयदीप चे आई वडील झाले.

पुढे अन्वीचा जन्म झाला आणि कितीतरी वर्षांपासून अपूर्ण राहिलेला चौघांचा संसार खऱ्या अर्थाने फुलला....

"आज्जू जेवायला चला...कुठे हरवलात ?" अन्वीच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली... " आज्जू आज तुमचा टर्न आहे हा स्टोरी सांगायचा...." "बरं बाई ... सांगेन हां मी स्टोरी... " म्हणत ते उठले. जेवणाच्या ताटावर नेहमीसारखाच चिवचिवाट नि गलबलाट होता.

... नाती रक्ताची असणं गरजेचं नसत, जर भावनांमध्ये ओलावा असेल तर अनोळखी माणसे अन अनोळखी नातेसुद्धा रक्तापेक्षा जास्त जीवाचे होते.

……………… मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आवडली.

नाती रक्ताची असणं गरजेचं नसत, जर भावनांमध्ये ओलावा असेल तर अनोळखी माणसे अन अनोळखी नातेसुद्धा रक्तापेक्षा जास्त जीवाचे होते. + १११

काही गोष्टी घडण्यासाठी लिहाव्या लागतात>>>> हे भारीये.

Pages