थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - २ ( मिनिस्ट्रोन सूप)

Submitted by विद्या भुतकर on 12 December, 2016 - 18:06

स्वनिकच्या भाषेत आज 'पास्ता सूप' ची रेसिपी देणार आहे. भरपूर भाज्या असलेले हे सूप मस्त लागते. एकदम भारी! त्यात मुख्य म्हणजे एक कुठलेही बीन्स घातल्याने प्रोटिन्सही भरपूर मिळते. नेहमीच्या टोमॅटो सूप पेक्षा वेगळी चव मिळते. इटालियन सूप आहे 'मिनेस्ट्रोन' नावाचे. ते एकच शाकाहारी(?) सूप इथल्या इटालियन रेस्टॉरंट मध्ये मिळायचं जे बऱ्यापैकी भारतीय चवीचं आहे असं आम्हाला वाटायचं. हे सूप बरंचसं त्याच्यासारखं बनतं.मी भाज्या थोड्या घरात शिल्लक आहे त्याप्रमाणे टाकते आणि तयार पिझ्झा किंवा पास्ता सॉस घालते त्यामुळे जरा त्याला रंग आणि चव चांगली येते.

आणि माझे बरीचशी सूप आम्ही गार्लिक ब्रेड किंवा सॅन्डविच सोबत खातो, त्यामुळे फोटोतही ते तशीच दिसतील. पण थंडीत सूप काय कधीही पिऊ (खाऊ ?) शकतो. Happy आता जास्त न बोलता या सूपबद्दल लिहिते:

साहित्य:
२/३ टोमॅटो
१ मध्यम आकाराचा कांदा
१ झुकिनी
लसणाच्या मोठा ३ पाकळ्या
१०-१५ ऑलिव्ह
१-२ गाजर
१ कप राजमा किंवा काळा घेवडा किंवा छोले या पैकी कुठलेही एक बीन्स शिजलेले.
चिकन सूप करायचे असल्यास शिजलेल्या चिकनचे छोटे तुकडे (चिकन किंवा व्हेजिटेबल स्टॉक हवा असल्यास. मी तो घालत नाही घरी केलेला नसेल तर. )
४ चमचे पिझ्झा किंवा पास्ता सॉस (नसल्यास नुसते इटालियन सिझनिंग आणि एक ज्यादा टोमॅटो चालतो)
ताजे बेसिल असल्यास काही पाने
ऑलिव्ह ऑईल २/३ चमचे (नसल्यास नेहमीचे जेवणाचे तेलही चालते. पण याने चव छान येते. )
मीठ चवीनुसार
लाल मिरच्या ३-४ (मला आवडतात घालायला म्हणून. )
लाल तिखट (तिखट करायचे असल्यास. नाहीतर सॉसचा तिखटपणा पुरेसा असतो. )
काली मिरपूड
कुठल्याही आकाराच्या पास्त्याचे मूठभर तुकडे.

कृती: सर्व भाज्या, कांदा किंवा टोमॅटो कापतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या कापून घ्याव्यात. म्हणजे खाताना तोंडात त्याचे तुकडे येतात. ऑलिव्हच्या चकत्या कापून घ्याव्या. लसूण एकदम बारीक कापून घ्यावा.

एका भांड्यात गरम झल्यावर, ऑलिव्ह ऑइल मध्ये आधी मिरच्या, इटालियन सिझनिंग, बारीक कापलेला लसूण घालावा.

तो लालसर झाला की कांदा परतून घ्यावा. कांदा थोडासा शिजला की टोमॅटो घालून परतावे.

मी यावेळीच मीठ घालते म्हणजे पुढच्या स्टेपला घातलेल्या भाज्याना मिठाची चव लागते.

टोमॅटो पूर्ण शिजायच्या आधी बाकी सर्व भाज्या (गाजर, झुकिनी, ऑलिव्ह) भांड्यात घालावे. थोडे परतून शिजायला झाकून ठेवावे.

पाचच मिनिटात, झाकण काढून त्यात ४ मोठे चमचे पास्ता/पिझ्झा सॉस घालावा. त्या सॉसमध्ये भाज्या परताव्यात. पाच मिनीटात त्यात पाणी घालून उकळी येऊ द्यावी. साधारण दोन कप पाणी घालते. हे सूप पातळ छान लागते त्यामुळे मी जास्त घट्ट करत नाही.

सूप उकळत असतानाच जे कुठले बीन्स शिजवून ठेवले आहेत ते घालावे. मी कधी कॅन मधले राजमा किंवा छोले घालते कपभर. ते नसतील तर काळा घेवडा कुकरमध्ये ४-५ शिट्या घेऊन शिजवून घेते. ते बीन्स घालून सूपला उकळी येऊ द्यावी.

जो कुठला पास्ता घरी असेल त्याचे थोडे तुकडे सूप मध्ये घालावेत. आणि साधारण २-३ मिनिटात सूपचा गॅस बंद करावा. मी गरम सूप मधेच पास्ता शिजू देते.

थोड्या वेळाने कापलेले बेसिल घालून सूप सर्व्ह करावे. आम्ही यात सूर्यफुलाच्या भाजलेल्या खाऱ्या बियाही घालतो, कुरकुरीत लागतात. ब्रेडक्रम ही छान लागतात.
IMG_0589.JPGIMG_0561.JPG

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Good.

छान आहे. तूम्ही पाककृती विभागात या पाककृती लिहित जा, तिथे तयार फॉर्मॅट आहे. >> हे कसे करायचे?

THank you all. Happy

>>>>>छान आहे. तूम्ही पाककृती विभागात या पाककृती लिहित जा, तिथे तयार फॉर्मॅट आहे.---

हो, फॉर्मॅट मध्ये असली की लवकर समजते (मला तरी)

urmilas>> अरे वाह, मस्तच ! Happy बाकीचेही बनवून बघा नक्की. मस्त वाटते थन्डीत गरम गरम. Happy

विद्या.