कौतुक? चुकून कधीतरी !

Submitted by कुमार१ on 7 December, 2016 - 20:28

गेल्या अर्धशतकात शहरीकरण अफाट वाढले. महानगरांचा तर चेहराच हरवून गेला. तिथल्या गतिमान जीवनात माणसे पिचून निघाली. पैशापाठी धावता धावता आयुंष्यात भावनांना फारसे स्थान उरले नाही. निस्वार्थी विचारपूस तर दुर्मिळच झाली. ‘’मी माझा’’ हा माणसांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. माणसे अनेक शारीरिक व मानसिक रोगांनी ग्रस्त झाली. याच्या जोडीला काही ‘सामाजिक रोग’ ही आपल्याला चिकटले आणि त्यांचा प्रसारही झपाट्याने झाला. त्यापैकी एक रोग म्हणजे ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’. या रोगाचा विचार आपण या लेखात करूयात.

तसा हा रोग पूर्वापार चालत आला आहे पण, सध्याच्या जमान्यात तो अगदी उठून दिसण्याएवढा फोफावला आहे. तो समाजातील सर्व वयोगटात आढळतो. किंबहुना त्याची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, ’’मराठीतून काय सोपं असतं रे’’. अभिनंदनाच्या चार शब्दांऐवजी त्याने दिलेल्या या कडवट प्रतिक्रियेतून कौतुक न करण्याची रोगट मनोवृत्ती किती स्पष्ट दिसते. मग जसे आपले वय वाढते तशी ही वृत्ती आपल्यात घट्ट मुरत जाते.

आता हा एक किस्सा बघा परदेशस्थ भारतीयांचा. सुमारे २० वर्षांपूर्वीचा. शरद हे एक ज्येष्ठ संशोधक नोकरीसाठी परदेशात गेलेले व तेथे बरीच वर्षे स्थायिक झालेले. त्यांच्या आसपास काही मोजकी भारतीय कुटुंबे राहतात. त्यापैकी सुजय व सुजाता हे एक जोडपे. त्या दोघाना तिथे दोनच वर्षे झालेली. दोघेही उच्चशिक्षित व एका कंपनीत व्यवस्थापक. या कुटुंबाचा शरद यांच्याशी चांगला घरोबा जमलेला. शरद हे एक लेखकसुद्धा आहेत व त्यांची ललितलेखनाची एकदोन पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत आणि ती वाचकप्रिय आहेत. ते वर्षातून एकदा सुटीसाठी भारतात येतात व परत जाताना बरीच साहित्यिक पुस्तके खरेदी करुन नेतात. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह आता भरपूर आहे. सुजातालाही वाचनाची खूप आवड परंतु पुस्तके स्वतः विकत घेण्याबाबत मात्र कमालीचा कंजूषपणा! शरदांकडची पुस्तके हक्काने वाचायला नेणे हा तिचा नेहेमीचा उद्योग. गेल्या दोन वर्षात तिने त्यांच्याकडची बहुतेक पुस्तके वाचून संपवलेली.

एकदा शरद मोठ्या सुटीसाठी भारतात जायला निघाले होते.तेव्हा सुजाता त्यांची पुस्तके घेउन ठेवण्यासाठी त्यांच्याकडे धडकली. पण, आता तिच्या लक्षात आले की त्यांच्या संग्रहातली आहेत बहुतेक पुस्तके तिची वाचून झाली आहेत. शरद हे तसे प्रसिद्धीपासून दूर राहणारे असल्याने अद्याप त्यांच्या स्वतःच्या पुस्तकांबद्दल तिला बोलले नव्हते. पण आता तिने काहीतरी पुस्तके देण्याची गळ घातल्याने त्यांनी स्वतःची पुस्तके तिला दिली. घाईत तिने ती पुस्तके उचलली व त्यांचा निरोप घेतला. यथावकाश शरद सुटी संपवून तिथे परतले. दुसऱ्या दिवशी सुजाता त्यांची पुस्तके घेवून तिथे दाखल झाली. बराच वेळ तिने हवापाण्याच्या फालतू गप्पा मारल्या व अगदी निघताना त्याना ‘’सर, ही घ्या तुमची पुस्तके, झाली वाचून’’ असे म्हणून काढता पाय घेतला.

आता काय म्हणावे तिच्या या वागण्याला? त्या पुस्तकावरील कुठल्याही प्रतिक्रियेविना ते परत करणे ही हद्द झाली होती. ‘’सर, चांगले आहे तुमचे लिखाण’’ किंवा निदान ‘’आवडले हो’’ एवढीही औपचारिक प्रतिक्रिया नाही. आणि तेही स्वतः फुकटे वाचक असताना! बरे, नसले आवडले पुस्तक तरी तोंडदेखलं सुद्धा काही बरं बोलवलं नाही तिला. हीच ती मोठेपणी घट्ट मुरलेली रोगट मनोवृत्ती, नाही का?

अशा या कौतुक न करण्याच्या रोगाने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास! यादी तशी संपणारच नाही. एखाद्याने त्याच्या क्षेत्रात छोटे-मोठे यश संपादले असल्यास त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला आपल्याला किती जड जाते!

मनापासून कौतुक न करण्याची कला दोन प्रकारे प्रकट होते. पहिल्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीत किंचित कौतुकाचा औपचारिकपणा उरकला जातो पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे मात्र तिच्याबद्दल चांगले बोलणे हे जाणीवपूर्वक टाळले जाते. तर, दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्यातील कौतुकपात्र गुणांची नाईलाजाने कबुली दिली जाते पण, तिच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र कौतुकाचा विषय टाळून निव्वळ हवापाण्यावर बोलले जाते.

परीक्षा व स्पर्धांतील यश, कलाकौशल्य, नोकरीतील बढती, व्यवसायातील थक्क करणारी प्रगती, सार्वजनिक जीवनातील सन्मान अशा कितीतरी प्रसंगी यशस्वीतांवर कौतुकाचा वर्षाव संबंधितांकडून अपेक्षित असतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन वा संदेशवहनाची आधुनिक साधने अशी माध्यमे उपलब्ध असतात. प्रश्न असतो तो आपल्या अंतरंगातून दिलखुलास दाद देण्याचा. पण, तिथेच तर गाडे अडते.

भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले. एवढ्या उच्च पातळीवर देखील कौतुकाचा कंजूषपणा प्रदर्शित व्हावा याचे सखेद आश्चर्य वाटते.

दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो आणि कौतुकाच्या परतफेडीची संधीही निर्माण करून ठेवतो. कौतुक केल्याने आपल्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. तरीसुद्धा आपल्या अंतरंगातून प्रशंसेचे उद्गार पटकन बाहेर येत नाहीत खरे. मात्र, एखाद्याची छोटीशी चूक सुद्धा आपण किती तत्परतेने दाखवून देतो!

थोडक्यात काय, तर दुसऱ्याचे दोष उगाळणे हा मानवी स्वभाव आहे खरा आणि बऱ्याच जणांचा तो लाडका उद्योग आहे. त्यामुळेच समाजात निंदा करणारी तोंडे उदंड दिसतात पण, शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो.

रच्याकने.............
आपल्या या संस्थळावर मात्र आपण एकमेकाचे बरेच कौतुक करतो बुवा !! ( स्मित)
*************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ कुमार१, अगदी, अगदी माझ्या मनातलं लिहिलंय आपण! माझ्याही हे जास्त ध्यानात यायला लागलं होतं, जेव्हा मी WhatsApp वर कार्यरत असायचो. कोणी गाडी घेतली, कोणी परीक्षा पास झालं, कोणी पर्यटन करून आलं किंवा कोणाच्या कुत्रीला पिल्लं झाली कि ते WhatsApp वर पोस्ट करायचे. कौतुक करण्याच्या माझ्या सवयीने मी त्यांच्या पोस्टवर मनमोकळेपणाने दोन कौतुकाचे शब्द लिहायचो. पण माझ्या असे निदर्शनास यायचे कि मी माझ्या बाबतीत घडलेल्या चांगल्या गोष्टीचे पोस्ट पाठविले असता त्यावर त्यांचे हूं कि चूं नसायचे. तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प! फार वाईट वाटायचे मला. वाटायचं, काय लोकं आहेत! कौतुकाचे साधे दोन शब्द ह्यांच्या तोंडून उमटू नयेत.

बरोबर म्हणताय तुम्ही. समाजात निंदा करणारी तोंडे उदंड दिसतात पण, शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो.

आवडले लिखाण आणि पटलेही ! Happy

छोट्या मुलांचे छोट्या गोष्टींचे कौतुक केले की ती शेफारून जातात असा एक गैरसमज मोठ्या मराठी माणसात खूप जास्त प्रमाणात आढळतो.
आणि मग कौतुक ऐकायची सवय नसली की करता ही येत नाही. शिवाय त्यामुळेच की काय कोणी आपले कौतुक केले तर ते कौतुक झेलायची ही सवय नसते. माझ्यातही असावा हा दोष, सुधारणा स्वतःपासूनच करायला लागेल मला तरी. कोणी आपले कौतुक करत असेल तर ते ग्रेसफुली कसे स्विकारावे हे पण शिकायला हवे आहे.

सर्व प्रतिसाद़कांचे मनापासून आभार.

सचिन काळे, अगदी सहमत तुमच्याशी.
हर्पेन, तसा हा दोष प्रत्येकातच असतो. प्रयत्नांती आपण आपल्याला सुधारत राहायचे. हळूहळू बदल होउ शकतो.
....
असे वाचण्यात आले होते की सचिन तें चे गुरू आचरेकर त्याने शतक काढल्यावर् सुद्धा त्याचे कौतुक करीत नसत.लगेच पुढच्या वेळेस काय सुधारणा करायच्या याची चर्चा सुरू करीत.अर्थात, ते मनातल्या मनात त्याचे कौतुक नक्की करत असणार !

आपले कौतुक करत असेल तर ते ग्रेसफुली कसे स्विकारावे हे पण शिकायला हवे आहे

ह्याच्या पुढचा भाग असा असू शकतो का ? की मला ते कौतुक नीट झेलता न आल्याने जो कौतुक करणारा आहे तो पुढच्या वेळेस कौतुक करण्यात हात आ़खडता घेतो.

हे दुष्टचक्र भेदायचे कसे ते ही सांगा कोणीतरी

आपले कौतुक करत असेल तर ते ग्रेसफुली कसे स्विकारावे हे पण शिकायला हवे आहे>>>>.हर्पेन सर,
जी गोस्ट चांगली वाटते तीच कौतुक केलंच पाहिजे ,आणि समजा आपले कोणी कौतुक केले तर त्याचा अहंकार न बाळगता,उलट त्याहीपेक्षा अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करावा.
नाहीतर काही लोक मग स्वतःला चारचौघांपेक्षा वेगळे समजतात,कि हे अमुक काम फक्त मीच करू शकते/शकतो .

छान लेख, पटला.

आपल्याकडे जोडीदाराचेही त्याच्या तोंडावर कौतुक करायला लोकं तयार नसतात, का तर तो डोक्यावर चढेल. पण प्रत्यक्षात त्याच्या गुणांचे कौतुक वाटत असते म्हणूनच प्रेमात असतात.

आपल्याकडे जोडीदाराचेही त्याच्या तोंडावर कौतुक करायला लोकं तयार नसतात, का तर तो डोक्यावर चढेल. पण प्रत्यक्षात त्याच्या गुणांचे कौतुक वाटत असते म्हणूनच प्रेमात असतात.>>> व्वा: ऋन्मेष!!! एकदम सही पकडेंं हैं !!!!

आपण मराठी लोकं फारच कंजूष असतो कौतुकाच्या बाबतीत तितके नांवं ठेवण्याच्या बाबतीत नसतो. हे एक माझं निरीक्षण ...हिंदी लोक .. बढीया, बहोत बढीया.. पालुपद प्रत्येक गोष्टीला लावत असतात. शिकलेय अश्या लोकांमध्ये राहून...

छान आहे लेख!!

कौतुक ऐकायची सवय नसली की करता ही येत नाही. >>>> +१
आपले कौतुक करत असेल तर ते ग्रेसफुली कसे स्विकारावे हे पण शिकायला हवे आहे >>> +१

आपल्याकडे जोडीदाराचेही त्याच्या तोंडावर कौतुक करायला लोकं तयार नसतात, का तर तो डोक्यावर चढेल. पण प्रत्यक्षात त्याच्या गुणांचे कौतुक वाटत असते म्हणूनच प्रेमात असतात.>>>>+१००

हिंदी लोक .. बढीया, बहोत बढीया.. पालुपद प्रत्येक गोष्टीला लावत असतात.
>>>>
हो रे खर्रच, चांगली सकारात्मक सवय आहे ही..
मलाही आहे अशी सवय.. `सही आहे' बोलायची.

रुन्म्या, मलाही आहे अशी सवय.. `सही आहे' बोलायची.>>>> मलाही आहे अशी सवय... 'सही आहे' म्हणायची हे वाक्य दहा वेळा लिही मोठ मोठ्याने बोलून ....

अहो, मी नुसतं ओळखीच्याच नाही, तर अनोळखी लोकांचेही कौतुक करतो. बिनधास्त!! सहज एक गंमत आठवली ती सांगतो. एकदा मी लोकलट्रेनने प्रवास करीत होतो. गाडीत अगदी तुरळक गर्दी होती. माझ्या समोरच्या सीटवर एक पंचविशीचा तरुण आपल्या मित्राबरोबर बसला होता. त्या तरुणाच्या मिशा देशभक्त 'चन्द्रशेखर आझाद'च्या फोटोत दाखवतात ना, अगदी तशा किंवा जुन्या चित्रपटात फेटा बांधलेल्या गावच्या पाटलाच्या दाखवतात ना, अगदी तशा आकडे काढलेल्या होत्या. जो तो त्याच्या मिशांकडे चोरून चोरून पहात होता. मी सुद्धा बराच वेळ त्याच्याकडे पहात होतो. माझं उतरायचं स्टेशन आलं. मी उठून दरवाजात जाऊन उभा राहीलो. पण मला त्याच्या मिशा आणि त्याचा रुबाब एव्हढा आवडला होता, कि मला काही राहवलं नाही. मी हात हलवून त्याचे लक्ष माझ्याकडे वेधले. पैलवान आपल्या मिशांवर फिरवतात, तशी माझ्या हाताची उलटी मूठ माझ्या मिशांवर फिरवून त्याला दाखवली. मग त्याच्या मिशांकडे बोट दाखवून, त्याला आपण हाताने 'छान! छान!' चा इशारा करतो ना, तस्सा तर्जनी आणि अंगठ्याचा गोल करून, बाकी तीन बोटे उभे ठेऊन त्याला नाचवून दाखवली. त्याला कळले कि मी हाताच्या इशाऱ्याने त्याच्या मिशांचे कौतुक करतोय ते!! इतका काही लाजला ना म्हणता तो!! कि यंव रे यंव!!! Rofl

"सही आहे/बढिया" सहज बोलताना निघून जात असेल, पण ऐकणारा त्यात कौतुक मानत असेल असे मला वाटत नाही.

आपल्याकडे अगदी कट्टर शत्रुकडूनसुद्धा कौतुक होते, पण यश मात्र खरोखरच सैराटसारखे छप्पर फाडके असावे लागते. लोकांना खात्री पटावी लागते, की हे यश एकमेवाद्वितीय आहे. मग त्याबद्दल केलेले कौतुक हे लोकांनी खरॊखर मनापासून केलेले असते. अशा कौतुकाचे चार शब्दसुद्धा कायम स्मरणात राहतात.

पण तुलनेने किडुक-मिडूक यशासाठी आपल्याकडे कौतुक करणारे विरळाच. चुकून माकून एखाद्याने केलेच तरी त्यामागे "हे करायला काही फार कष्ट लागत नाहीत/ आम्हीही हे केले असते" अशा प्रकारची भावना असते. त्यातून कौतुक झेलणाऱ्या व्यक्तीला मनातून वाटत असेल की आपण काय फार मोठा तीर नाही मारलाय, तर कौतुकाची देवाणघेवाण नुसती "अहो रुपम, अहो ध्वनी" सारखी वरवरची वाटते. त्यापेक्षा दोन चार शिव्या कानावर पडलेल्या बऱ्या.

चांगली चर्चा.
अजून एकः
कुठल्याही बाबतीतले समानधर्मी लोक एक्मेकाचे कौतुक करणे टाळतात. समजा, मी एक दुकानदार असेन तर मी एखाद्या खेळाडू वा कलाकाराचे कौतुक अगदी सहज करेन. पण्,माझ्यापेक्षा तिप्पट व्यवसाय असणार्‍या दुकानदाराचे नाही करणार.

कलाकारांच्या कौतुकाबद्दल असे दिसते की सामान्य माणूस ते अगदी सहज करेल पण, समीक्षक ही जमात ते सहजासहजी नाही करणार !

कुठल्याही बाबतीतले समानधर्मी लोक एक्मेकाचे कौतुक करणे टाळतात. >> हे मात्र १००% खरे.

मी स्वतः शाळेत असताना याचा अनुभव घेतलाय. स्पर्धेत प्रोजेक्टसाठी मित्राला पहिला नंबर मिळाला, तेव्हा खोटे खोटे अभिनंदन करतानाचा प्रसंग अजून मला आठवतो. जळून अक्षरश: कोळसा व्हायचा तेवढा बाकी होतो. नंतर मला जाणवले, मित्राने मैदान मारले म्हणून मला वाईट कधीच वाटले नव्हते. संधी असूनसुद्धा मी पुरेशी मेहनत घेतली नाही म्हणून मी स्वतःवरच रागावलो होतो.

पण एखाद्याला नशिबाने म्हणा, सगळी साधने हातात असल्याने म्हणा, वा लायकी नसताना यश मिळाले, तर मात्र त्याचे एवढे काही वाटत नाही. आजचा दिवस आपला नाही, असे म्हणून आपण पुढच्या कामाला लागतो. अशा येनकेन प्रकारे मिळालेल्या यशाचे तोंड फाटेस्तोवर कौतुक केले तरी मनाला काही वाटत नाही.

पण जेव्हा खरोखर लायक माणसे निव्वळ मेहनतीने आपल्या पुढे जातात, तेव्हा मनाला जी घरे पडतात, त्याचे शब्दात वर्णन अशक्य. त्यांचे यश आपल्या अपयशाला अधोरेखित करते. अशावेळी आपल्याच तोंडून दुसऱ्याचे कौतुक करणे म्हणजे आपल्या अपयशाला आपण स्वतःच पावती दिल्यासारखे वाटते. माझीसुद्धा जीभ अशांचे कौतुक करायला धजत नाही.

जेव्हा संधी समान असते, तेव्हा जर आपण आपल्या कर्माने मागे राहिलो, तर त्याची बोच मनात कायम राहते. या परिस्थितीत सुद्धा जे मनमोकळेपणाने (तोंडदेखले नव्हे) दुसऱ्याचे अभिनंदन करतात, त्यांचे मला खरोखर कौतुक वाटते (हो , हे कौतुक मनापासूनचे ;)). मला तर बुवा अजून असे करणे जमलेले नाही.

बाकी सर्व जाऊ दे, साधी भाजी चान्गली झाली आहे किन्वा साडी छान दिसतेय असेही म्हणायला तोन्ड उघडत नाही.
लेख पटला आणि आवडला.

बाकी सर्व जाऊ दे, साधी भाजी चान्गली झाली आहे किन्वा साडी छान दिसतेय असेही म्हणायला तोन्ड उघडत नाही.
>>>>

नाही हं, मी ऑफिसमधील प्रत्येक मुलीला, बाईला तिच्या नवीन साडी आणि ड्रेसबद्दल न चुकता चांगली कॉम्प्लीमेंट देतो. सर्वच पुरुष सारखे नसतात.

जावेला, सुनेला, बायकोला, आईला, भावजयीला, वहिनीला, गर्ल्फ्रेन्ड्ला?
>>>>

माझी आई साड्याच घालते आणि सध्या त्या सर्व मीच घेतो. अर्थात कधी माझ्या चॉईसने तर कधी तिच्या चॉईसने तिला बरोबर नेत. त्यामुळे एक कौतुक घेतानाच होते. तसेच त्यामुळे घातल्यावरही साहजिकच ती कशी दिसतेय अशी कौतुकाची चर्चा होतेच.

बाकी मी स्वतःच्या जावेला सुनेला बायकोला भावजयीला वहिनीला बोलू शकत नाही कारण त्या नाहीयेत मला, म्हणून लोकांच्या जावेला सुनेला बायकोला भावजयीला वहिनीला आवर्जून बोलतो .. Happy

गर्लफ्रेंडला बोलावेच लागते. तिने काही नवीन घातले आणि माझ्या ते लक्षात आले नाही तर तो माझा मायबोलीवरचा शेवटचा दिवस ठरेल.
त्यामुळे मी सवयच लाऊन घेतली आहे, दिसली बाई की कर कौतुक !

आता काय म्हणावे तिच्या या वागण्याला? त्या पुस्तकावरील कुठल्याही प्रतिक्रियेविना ते परत करणे ही हद्द झाली होती. ‘’सर, चांगले आहे तुमचे लिखाण’’ किंवा निदान ‘’आवडले हो’’ एवढीही औपचारिक प्रतिक्रिया नाही. आणि तेही स्वतः फुकटे वाचक असताना! बरे, नसले आवडले पुस्तक तरी तोंडदेखलं सुद्धा काही बरं बोलवलं नाही तिला. हीच ती मोठेपणी घट्ट मुरलेली रोगट मनोवृत्ती, नाही का?

--> कशल पहिजे हो कौतुक ? नस्तिल अवदलि पुस्तके

नसतील आवडली पुस्तके >>>>>>>>

येस्स ही एक शक्यता आहे. अश्या केसमध्ये काय करावे?

१) खोटे कौतुक करावे, ते देखील असे भरभरून की करताना समोरच्याला संशयही येऊ नये.
२) खोटे कौतुक करावे, पण तोंड देखले, जर समोरच्याला समजले की याला आवडले नाहीये तरी काही हरकत नाही.
३) खरे प्रामाणिक मत सांगावे, बाबा नाही जमलेय काही, मला नाही आवडले.
४) काहीच सांगू नये. न बोलता मुकाट निघून जावे. खोटेपणाचे पाप आपल्या माथी घेऊ नये.

आवडला लेख.

माझे एक निरिक्षण आहे, मालवणी लोक सहसा कुणाचे कौतुक करत नाहीत. " बरां असा तां " हि सीमा असते !

Pages