आजचा बॅन्केचा नियम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 November, 2016 - 12:23

आजचा सुविचार काय ठरलाय हे जसे शाळेच्या बोर्डावर लिहिले असते,
आजचा मेनू काय बनलाय हे जसे हॉटेलाच्या पाटीवर दाखवले असते,
आजचा सोन्याचा भाव किती वाढलाय हे जसे वर्तमानपत्रात छापले असते,
आजच्या तापमानाचा पारा किती चढलाय हे जसे बातम्यांत सांगितले जाते,
तसेच आजच्यासाठी सरकारने आणि बॅंकेने आपल्या पैश्याची उलाढाल करायला काय नवीन नियम काढलाय हे रोजच्या रोज ईथे अपडेटूया.

धागा काढण्यास कारण की, आज आता संध्याकाळी गर्लफ्रेंडच्या जोडीने एका एटीएमच्या बाहेर लाईनमध्ये उभा होतो. तब्बल पाऊण तास!
ते एक सोडा. गप्पांमध्ये छान टाईम कटला. पण जसा नंबर जवळ आला तसे आम्हा दोघांच्याही एकाच वेळी ध्यानात आले की नेमके किती पैसे काढू शकतो याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती.
पुढच्याला विचारले, मागच्याला विचारले, जो पैसे काढून आला त्याला विचारले, अगदी ए टी यमाचा द्वारपाल, चित्तरगुप्तालाही विचारले, जो तिथे सर्वांच्या काळ्यापांढर्‍याचा हिशोब करायला उभा होता..

पण चौघांनी मिळून वेगवेगळी अशी तीन उत्तरे दिली !

त्यातल्या दोघाजणांनी दोन हजार हे सामाईक उत्तर दिल्याने आम्ही दोघांनी जोडीने दोन हजार रुपये काढायचे ठरवले. उगाच जास्तीचा आकडा दाबायचो आणि तुम्ही आजचा टर्न गमावला आहे असा संदेश स्क्रीनवर झळकायचा.. कोण रिस्क घेणार !!

असो, तर एकेकाळी एटीएममधून पैसे काढताना त्या मशीन मधून पैसे मोजायचा खडखड खडखड असा आवाज यायचा. पैसे पडतानाही असे वाटायचे की कसिनोमधून छनछन छनछन पैसे पडत आहेत. अगदी आपलेच पैसे असले तरीही काहीतरी जिंकल्याचा, काहीतरी कमावल्याचा आनंद व्हायचा.

पण गेले ते दिवस...

एकच काय तो खट् आवाज आला, (ट चा सुद्धा पाय मोडलाय बघा म्हणजे केवढा छोटा आवाज आला असावा), आणि सुळकन दोन हजार रुपयाची एकच नोट काय ती बाहेर आली.

आत जाताना आम्ही ठरवले होते की त्या दोन हजारातले हजार-हजार रुपये प्रत्येकी वाटून घ्यायचे. पण आता या दोन हजाराच्या नोटेचे सुट्टे ईसवीसन दोन हजार एकोणवीसपर्यंत मिळणे शक्य नसल्याने धर्म संकटात सापडलो.

एकवार मी त्या गुलाबी नोटेकडे पाहिले. एकवार मी माझ्या गर्लफ्रेंडकडे पाहिले. ती त्या नोटेपेक्षाही गुलाबी भासली. आणि नोट कोणाकडे जाणार याचा फैसला झाला.

एटीएममधून बाहेर पडताना एक जण आजचा आकडा पुटपुटला.. एक दोन अडीच!

काय तर म्हणे तब्बल अडीच हजार रुपये आज एटीएममधून काढू शकत होतो. खरे खोटे देव जाणे. पण आता आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागलो. वरचे पाचशे रुपये मला मिळाले असते म्हणून मला जरा जास्त वाईट वाटू लागले. त्या पाचशेमध्ये शंभराच्या पाच नोटा आल्या असत्या, याचेच खरे तर जास्त वाईट वाटत होते. कारण आता आमच्याकडे दोन हजाराचा पांढरा पैसा होता, मात्र त्याचे सुट्टे जोपर्यंत मिळणार नाही तो पर्यंत त्याची किंमत दोन रुपयाच्या गुलाबी लिफाफ्यापेक्षाही कमी होती. कधी नव्हे ते फोटोतले गांधीजी हसताना दिसले. बहुतेक आमच्या फजितीवर ...

पुन्हा अशी फजिती माझी तुमची कोणाचीच होऊ नये म्हणून एकमेका सहकार्य करू आणि आजचे पैसे काढायचे, भरायचे. काळ्याचे पांढरे करायचे नियम नक्की काय आहेत हे ईथे रोजच्या रोज जाणून घेऊ.
काय करणार, माय बाप सरकार तर आपल्याला झुलवायला बसले आहे, अश्यावेळी आपली माय बोलीच कामाला येणार Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
छान लिहीलंयस रे ऋ बाळा.
मला पण प्रश्न पडतो की दररोज बदलणार्‍या या नियमांत बँक कर्मचारी कसे काम करतात?

मस्तं!
छान लिहीलंयस रे ऋ बाळा.
>>> +१

@ ऋन्मेष, आपण लिहिलेलं वाचूनच पोट भरलंय. आता पैसे नाही मिळाले तरी चालतील.

तुम्ही ईतका वेळ मायबोलीवर असत्ता तर थोड्या बातम्या पाहील्या असत्या तर ही वेळ आलीच नसती.

गेल्या ४-५ दिवसांपासुन २५०० ₹ मर्यादा केलीय.

मी पण १९०० काढले त्यात ५०० च्या ३ आणी १०० च्या ४ नोटा मिळाल्या.

ऊगाच २५०० काढायला जायचे आणी ती २००० ची नोट खपवायची कुठे हा विचार करत बसायचे कशाला म्हणुन

आम्हाला बँकचा निर्णय वगैरे माहित नाही.
मी एटीएममधून शेवटचे पैसे काढूनच आता सहा सात वर्षे झालीत!
Happy

पण शेतकर्‍यांना जुन्या नोटांनीच बियाणे खरेदी करता येतील हा कालपासूनचा नवा निर्णय मला आवडला.
ज्यामुळे रब्बीबियाण्याकरता पैसे काढण्यासाठी बँकेत शेतकर्‍यांची गर्दी कमी होईलच पण शेतकर्‍यांचा बँकेत टाईमपास न झाल्याने माझ्या दवाखान्यातील सकाळच्या ओपिडीतली गर्दी अबाधित राहिल.

पण सरकारने ही सुविधा खत खरेदी साठी मात्र दिली नाहि . तसेच बियाने केंद्र व राज्य सरकार, सरकारी संस्था ,राष्ट्रीय व राज्य बियाणे मंडळे, कृषि विद्द्यापिठे येथूनच खरेदि केलेल्या बियाण्यांवरच हि सवलत आहे........

बाजार समितीत नोंदणीकृत असणाऱ्या व्यापाऱ्यांना दर आठवड्याला ५०,००० काढण्याची परवानगी दिली आहे

हो तनिष्का, वाचले ते.
पण बाजार समितीच्या लोकांना आठवड्याला ५०००० म्हणजे केवळ दर्यामें खसखस!

क वर्गातील कर्मचारी ना येत्या पगारातील दहा हजार रुपये रोखीने देण्यास आधिच प्रारंभ..........अाजच्या लोकसत्ता मध्ये आले आहेत हे नियम

पण त्यांना सवलत दिली नाही तर ते शेतकऱ्यांची अडवणूक करतील असं सरकार ला वाटत असेल काय??? कारण शेतकऱ्यांनी दिलेल्या जून्या नोटा बॅंकेत जाऊन बदलून घेण्याचा ताप पडेल ना आता त्यांना

वायदेबाजारात अजून तरी नोटा हिकडनं तिकडे जातायत.
बँकांत ट्रान्सफर बहुदा डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात होतील.

लग्नासाठी अडिच लाख काढण्याबद्दल बँकांना काल सांगितलं गेलं. त्याआधी काहीही सांगितलं नव्हतं.
https://m.rbi.org.in/Scripts/BS_CircularIndexDisplay.aspx?Id=10729

८ नोव्हेंबरच्या आधी जर बँकेत पैसे असतील तर त्यातलेच अडिच लाख काढता येणार. आधीच काढून ठेवले असतील व आता बदलून वा जुन्या नोटा भरून चेकने रक्कम काढून घ्यायची असेल तर तसे करता येणार नाही.

लग्न होत असलेल्या व्यक्तींना वा त्यांच्या पालकांना स्वतःच्या खात्यातुन एकदाच पैसे काढता येणार. यावर अंमलबजावणू कशी करता येईल? माझे लग्न असेल व माझ्या आईवडिलांचे लेगवेगळ्या बँकेत खाते असेल तर आम्ही तिघे व नवऱ्याकडचे तिघे प्रत्येकी अडिच लाख काढू शकतीलच की! पत्रिका घेऊन ठेवून काय होणार?

मी काल एटीएममधुन पैसे काढले. २५०० लिमिट होते. द्वारपालानी ५०० च्या नोटा नाहीत असं सांगितलं. मी एकच कार्ड दोन्दा स्वाइप करुन एकदा १९०० मग ६०० काढले. सगळ्या १०० च्या नोटा. काही एक्ष्ट्रा खर्च आला नाही तर नोव्हेंबर निघेल आरामात.

माझ्या गर्लफ्रेंडला मी हे १९०० चे सांगितले, ती म्हणाली की तिने तसेच केले होते. पण पैसे आलेच नाही.

बहुधा एटीयमात फक्त २००० च्याच नोटा असाव्यात. मग २५०० नियमाचा फायदा तरी काय?

ज्यामुळे रब्बीबियाण्याकरता पैसे काढण्यासाठी बँकेत शेतकर्‍यांची गर्दी कमी होईलच पण शेतकर्‍यांचा बँकेत टाईमपास न झाल्याने माझ्या दवाखान्यातील सकाळच्या ओपिडीतली गर्दी अबाधित राहिल.
>>
हायला डोक्टर लोक असा विचार करतात तर आमच्या बद्दल! Uhoh
रांगा आणि पर्यायाने पैसे देणारे मशिन! Sad

बँकेच्या रांगेत गर्लफ्रेंडला चार तास उभे केलेस ? दुसरी एखादी असती तर चार पाच तासात शॉपिंग करून आली असती. बाकि गप्पा काय मारल्या ? नाव आणि आडनाव बदलायच्या तर नाहीत ना ?

असा विचार करतात तर आमच्या बद्दल! अ ओ, आता काय करायचं
रांगा आणि पर्यायाने पैसे देणारे मशिन! अरेरे>>

मग, घोडा अगर घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या?

आमचा डॉक्टरकी हा धंदा आहे.
त्याला लागणारे स्कील मिळवण्यात आयुष्याची १०-१२ वर्षे इन्वेस्ट केली आहेत.
त्याला लागणारी जागा, स्टाफम, सामुग्री मिळवण्याकरिता कर्ज काढून पैसे घातले आहेत.
त्याला लागणारे सगळे परवाने, आणि धंदा करण्यासाठी शॉप अ‍ॅक्ट नुसार सर्टीफिकेट घेतले आहे.
त्यात काही चुक झाली तर माझे ग्राहक ग्राहक मंचाकडे तक्रार करतात तेव्हा 'अरेरे' म्हणत नाहीत.
हॉस्पिटल ही पार्टनरशीप फर्म असल्याने १०० पैसे फायदा झाल्यास मला ३० पैसे कर द्यावा लागतो सरसकट, उत्पन्नानुसार वाढत जाणारे स्लॅब्ज जे इंडिविज्युअल असतात ते पार्टनरशिप फर्मकरता नाहीत.
जेव्हापासून लोकांनी आणि शासनाने या सेवेला कमर्शीयल केलं तेव्हापासून आम्हीही नफा/तोटा या प्रकारातच तुम्हा पेशंटाना बघतो.
आणि त्यात मला (तरी) काडीची लाज वाटत नाही.

धन्यवाद!

थ्री इडियटसारखे म्हणावं का 'यार कभी ऐसा तो सोचो, वाह आज इतनी बडी कतार है, आज लोगोंकी सेवा करनेका मौका मिलेगा, आज नॉलेज युज करनेका चान्स मिलेगा, बडा मजा आयेगा!'

:d

सॉरी हां नानबा, पण काय आहे ना, ही जालिम दुनिया मला अन्नधान्य विकत घ्यायला लावते, जालिम बँका कर्जाचे हप्ते फेडायला लावते आणि जालिम इतर सेवादाते कुठलीच सेवा फ्री देत नाहीत.
फार काय आमच्यासारखेच ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या शाळाही माझ्यामुलांकडून फीज घेतात.

काय करणार ना गं मी तरी गरीब बिच्चारी!

सॉरी हां नानबा, पण काय आहे ना, ही जालिम दुनिया मला अन्नधान्य विकत घ्यायला लावते, जालिम बँका कर्जाचे हप्ते फेडायला लावते आणि जालिम इतर सेवादाते कुठलीच सेवा फ्री देत नाहीत.
फार काय आमच्यासारखेच ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या शाळाही माझ्यामुलांकडून फीज घेतात.>>>> हायला आम्हाला हे काय फुकट मिळते का?
परत डॉ.कडे गेल्यावर रिसिट तर नसतेच,पण एका/दुसर्‍यावेळी काम होण्यासारखे असेल तरी पुढचा पेशंट सिक्युअर करण्यासाठी थोडंसे काम करून पुढची अपाँट्मेंट दिली जाते.(डेंडिस्टबद्दलचे सध्या अनुभव सुरू आहेत.) आपलाच खिसा कातरून घेऊन थँक्स डॉ.म्हणावे लागते.;) ;

आम्ही कुठं म्हटलं तुम्हाला फुकट मिळतं. उलट का फुकट मिळावं हा आहे.

प्रश्न नानबा पेशंटबद्दल 'रांगा आणि पैसे देणारे मशीन ' असा विचार करता का विचारतायत ते आहे.
आणि उत्तर हो, 'रांगा आणि पैशे देणारे गिर्हाईक ' असा विचार करतो हे आहे.

Happy

तुमची डेंडिस्ट हुशार आहे. प्रोफेशनल आहे.

तिचे काम आवडले नाही तर तुम्ही डेंटीस्ट बदलू शकता.
रिसीट चा आग्रह धरूच शकता..

आम्ही कुठं म्हटलं तुम्हाला फुकट मिळतं. उलट का फुकट मिळावं हा आहे.>>>>> तो कळलाच साती.तुमचे प्रतिसाद आवडले म्हनूनच मजेने मी लिहिलंय.
रिसीट चा आग्रह धरूच शकता..>>>> नको रे बाबा.आपली शेंडी( दात) त्याच्या हातात आहे.

अवांतराबद्दल सॉरी रे ऋन्मेऽऽष!

टोलनाके १ डिसेंबर पर्यंत नि:शुल्क राहणार. काही बिगबझार मधे डेबिटकार्ड वापरून २००० रुपये रोख मिळणार (तुमच्या अकाउंटमधे असतील तर, नाहीतर त्या अडिच लाखासाठी लग्नपत्रिका घेऊन गेलेल्या गरिबाच्या विनोदाप्रमाणे कोणीही उठून जाईल पैसे घ्यायला Wink )

अजून पेट्रोलपंपांबद्दल काही आले नाहीय.

: सरकारी इस्पितळं, रेल्वे स्टेशन इ ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जाण्याची मुदत आज रात्री १२ ला संपेल.

(अर्थात त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली नाहीतर).

हो टोल नाक्यांवर १५ डिसेंबरपर्यंत चालतील असं वाचलं. म्हणजे १ तारखेपर्यंत नो टोल. २ ते १५ जुन्या नोटा चालणार.

सरकारला गरिबांचा किती तो कळवळा आहे.

आला नवा नियम. आता नोटा बदलून मिळणार नाहीत.बँक खात्यात जमाच कराव्या लागतील. पण ५०० च्या जुन्या नोटा पेट्रोल पंप, शाळा , सहकारी भांंडार अशा काही ठिकाणी चालतील. १००० ची नोट नाही चालणार.

Pages