एक रुमाल अन २० लाख खून

Submitted by सोन्याबापू on 23 September, 2016 - 03:42

मित्रहो, आजवर जगातली सगळ्यात यशस्वी गुन्हेगारी संघटना कुठली ? असे जर कोणी आपल्याला विचारले तर आपला साहजिक कल कुठे जाईल ? एकतर महाशक्तिशाली असा अन शेकडो खून पाडलेला असा एखादा रशियन माफ़िया? सिसिलियन अप्रवासी लोकांच्या बनलेल्या गँग्स ऑफ़ न्यूयॉर्क? वेस्टकोस्ट अमेरिका मधला हिस्पॅनिक माफिया ?, मॅक्सिकन कोलंबियन ड्रग कार्टेल्स?, निंजा परंपरांतुन आलेला जपानी गुन्हेगारी गट, का धर्म अन क्रिकेट बेटिंग अन अमली पदार्थांच्या अभद्र युती मधुन जन्माला आलेली भारतीय अंडरवर्ल्ड?? उत्तर??

ह्यापैकी एकही नाही, जगातला सगळ्यात भयानक गुन्हेगारी गट आजच्या जगातल्या सगळ्या खंडातल्या सगळ्या गटांच्या क्रौर्याला पुरुन उरेल अशी एक गँग, इथेच आपल्या भारतात होती. तिची दहशत इतकी भयानक होती की तीर्थयात्रेला निघलेला माणुस निघताना घरदारावर तुळशीपत्र ठेऊन बायकापोरांना कवेत घेऊन ओक्साबोक्शी रडत असे. भीती एकच! वाटेत जर "त्यांच्या" तावडीत सापडलो तर? अन परत आलाच, तर जिवंत परत आल्याच्या ख़ुशीत गावाला "मावंद" घालत असे जेवणाचे !. ४५० वर्षांच्या आपल्या अस्तित्वात ह्या भयंकर "गँग" ने विविध आकड्यांनुसार जवळपास १० ते २० लाख खून केलेत. होय! अक्षरी वीस लाख खून, म्हणजे रोज सरासरी ११ खून हे प्रमाण, गुप्ततेच्या अतिरेकी आवरणाखाली अघोरी शाक्त तत्वाची पूजा करत हा गट काम करत असे, हा गट म्हणजे "ठग" किंवा इंग्लिश मधे "The Thugs", कोण होते हे ठग? का करत असत ते हे सगळे? काय होती त्यांची कार्यशैली? कोणी केले त्यांना कंट्रोल?

images (36)
ठग

तर मंडळी, काळ होता संक्रमणाचा, संक्रमण राज्यकर्त्यांचे सुद्धा अन काळाचे सुद्धा. अंदाजे तेराव्या शतकाच्या अंती अन चौदाव्या शतकाच्या पूर्वर्धात, उत्तर भारतावर तेव्हा ग़ुलामवंशाचे शासन होते, घोंगावत आलेले परचक्र स्थिरावत होते, त्याच काळात कधीतरी सततच्या युद्धांमुळे कोसळलेल्या सुलतानी मुळे देशोधड़ीला लागलेल्या कोण्या एका माणसाने सुरु केलेला हा उद्योग होता ज्याचे नाव काळाच्या उदरात गड़प झाले. इतिहासाला अतिशय गुप्ततेत असणाऱ्या ह्या गँग बद्दल फार कमी माहीती आहे, जी मिळाली ती ही ह्या गँग च्या उतरणीच्या काळात कागदी घोड्यांस महत्व देणार फिरंग्यांच्या कागदातून मिळाली. तसे पाहता ठगांचे "एक घट्ट विण असलेली गँग" ह्या स्वरूपाचे वर्णन पहिले मिळते ते १३५६ मधे लिखित "ज़ियाउद्दीन बर्नी" ह्याच्या "तारीख-ए-फ़ीरोज़शाही" मधे. इथे १२९० मधे त्याकाळच्या सुलतानाच्या दिल्लीत एक ठगांचा गट पकडल्याचे अन त्या सगळ्यांस सुलतानाने लखनौतीकड़े (आजचा पूर्व उत्तर प्रदेश) तड़ीपार केल्याचे उल्लेख सापड़तात. ह्या नंतरचे उल्लेख अक्षरशः नगण्य, पार ब्रिटिश लोकांनी एक विशेष खाते काढून ठगांचा बंदोबस्त करे पर्यंत म्हणजे जवळ जवळ ४५० वर्षे. तर, वरती सांगितल्याप्रमाणे सततची धुमश्चक्री पारतंत्र्य ह्यांनी गांजलेल्या अन भुकेकंगाल लोकांनी सुरु केलेली ही परंपरा, ह्यांचे प्रार्थमिक उद्देश्य म्हणजे धन मिळवणे, पण तसे पाहता हे तर डाकू सुद्धा करत असत! मग फरक काय होता? मुख्य फरक दोन. डाकू अघोषित राजांसारखे वागत एखाद्या गावात दहशत माजवणे, रयतेला अपल्यासमोर झुकवणे प्रसंगी विशिष्ट गावा/समूहा/व्यक्तिकडून वार्षिक/अर्धवार्षिक खंडणीची बंदी करून घेणे, फिक्स अड्डे असणे ही डाकुंची वैशिष्ट होती, पण ठग? त्यांच्यासाठी अवघे विश्वाची माझे घर प्रकार होता, कुठल्या ही एका गावाला टारगेट न करता प्रवाश्याना टारगेट करायची त्यांची ती पद्धत, असे म्हणू नये पण त्याकाळी विलक्षण इनोवेटिव होती. अड्डे सुद्धा असत ठगांचे, फ़क्त ते त्यांचे अड्डे म्हणजे रस्त्यावर प्रवासी कोंडीत धरुन ख़तम करायची जागा असे (शक्यतो तीनबाजू बंद असलेली जागा, नदी किनारा, कातळभिंतीच्या तळाला वगैरे). त्यांचे गाव पाडा वगैरे सगळे अज्ञात असे! बरेचवेळी रात्री ठगीचे काम केलेले लोकच दिवसा रस्त्याकडेला वेशांतर करून फ़कीर बैरागी बनून बसत किंवा गावात जे उपलब्ध ते काम करत असत. काहींच्या म्हणण्यानुसार ठग हे शाक्त परंपरेचे भोक्ते असत पण बरेच ठग हे मुस्लिम सुद्धा असल्याचे नंतर आढ़ळुन आले होते. ठगांचे उद्देश्य सुद्धा मुख्यत्वे पैसे सोने मिळवणे असेच होते, पण त्यांची कार्यशैली ही विलक्षण थंड डोक्याची असे, अन ह्या कार्यात त्यांना कामी येत असे त्यांची डाइवर्सिटी, ठग ही एक जात अशी नव्हती तर त्या गँग मधे अक्षरशः अठरापगड़ माणसे असत (जात म्हणुन फार नंतर म्हणजे १८७१ साली लॉर्ड मेयो गवर्नर जनरल असताना "क्रिमिनल ट्राइब्स एक्ट" मधे ह्यांना जात म्हणुन नोटिफाय केले गेले होते) . ही ती डाइवर्सिटी होती जी त्यांना आपल्या कवर आइडेंटिटी बळकट करून आपली सावजे म्हणजेच सहाप्रवाश्यांचा विश्वास जिंकण्यास मदतीची ठरत असे. प्रसंग काल स्थळा नुसार हे लोक कधी डोंबार्याचे सोंग आणत तर कधी "काशीयात्रेला निघालेल्या कथेकरी बुआचे" कधी जोग्याचे सोंग तर कधी बनिया कधी तेली कधी लोहार कधी कोण तर कधी कोण, अंडरकवर रहायची कला आधुनिक जगात आपण जशी पाहतो त्याच्या महत्वाच्या कंट्रीब्यूटर्स पैकी हे ठग एक म्हणल्यास हरकत नाही. ह्यांची मोडस ऑपरंडी म्हणजे पहिले लांबच्या प्रवासाला निघालेला एखादा गट हेरणे, लांबच्या प्रवासवाला इतक्यासाठी की लहान पल्ल्याचे प्रवासी शक्यतो लोकल्स असतात अन ते त्यांच्या गंतव्यास न पोचल्यास संशय बळावु शकण्याचे चांसेस जास्त असतात, उदा माझा एखादा पाहुणा अमुक गावाहुन माझ्याकडे येणार आहे तर कमी पल्ला असल्यामुळे एकतर घोड्यावर एका दिवसात पोचेल किंवा रात्र झाली तरी त्याला कुठे कसा मुक्काम करायचा हे पक्के माहीती असेलच, अश्या शक्यतांमुळे ठग कमी पल्ल्याचे प्रवासी कटाक्षाने टाळत असत अगदी सोन्याने मढलेले असले तरीही!. हा संयम अन गुप्तता ह्याच्यामुळे ते इतके वर्ष टिकले हे आवर्जून अधोरेखित करावे वाटते. प्रथम ठगांची एखादी गँग लांब पल्ल्याच्या प्रवासी गटाला हेरत असे, असे प्रवासी शक्यतो एकटेदुकटे नाही तर चांगले २५ च्या वगैरे गटात असत त्यामुळे लूटीची शक्यता वाढत असे. असा गट हेरल्यावर लगेच कुठलाच ठग काहीच करत नसे तर ते त्या गटांच्या निर्दिष्ट वाटांवर काही काही पडावांनंतर असे विखुरत, गट चालू लागयच्या वेळी एखादा गप्पीष्ट माणुस किंवा दोनचार हसमुख माणसे त्या गटात सामिल होत असे / असत, मजल दर मजल करत दोन चार मुक्काम गेले की सगळी गँग बेमालुमपणे त्या गटात मिसळून जाई त्यात कोणीही एकमेकांस ओळख दाखवत नसत, चौथ्या पाचव्या मुक्कामी सुरुवातीला गटात सामिल झालेले एक किंवा दोन ठग काहीही कारण काढून पुर्ण गटाला जेवण देतो म्हणत असत (आज एक व्रत पुर्ण झाले त्याचे पारणे आहे किंवा चाँद दिसला म्हणून काय वाटेल ते जे त्या खास प्रवासी गटाला कन्विनसिंग अन आनंद क्षण वाटावे असे) त्यावेळी जेवणात धतुरा/धोत्रा ह्या वनस्पती च्या विषारी बियांचा अर्क पाहुणे मंडळी उर्फ़ सावजांस दिला जात असे, कारण चार पाच ठगांना तसे पाहता 25 माणसे आवरणे कठीणच नाही का ? अशी ही प्रवासी मंडळी खाऊन अर्धवट बेशुद्ध झाली की ठगातला एखादा खड्या आवाजात गाणी म्हणी किंवा डफली चा ताल धरीत असे , जेणेकरून रुमालाने गळे आवळताना कोणी आरडले तर तो आवाज दबावा. स्वतःच्या गँगची गुप्तता अबाधित ठेवायची म्हणुन हे लोक कोणालाच जिवंत सोडत नसत. कार्यभाग आटोपल्यावर ते लोक आपल्या ठरलेल्या जागी प्रेते पुरुन टाकत असत अन त्या जागी मुद्दाम थोड़े विस्कटलेला पालापाचोळा वगैरे मुक्काम वाटावा अश्या खुणा सोडत जेणे करून त्या पाचोळया खाली गाडलेल्या प्रेतां मुळे वर खाली झालेली जमीन कोणाला दिसू नये. आता रुमालच का? तर परत कारण गुप्तता हेच समोर येते , रेशमी झुळझूळीत रुमाल प्रवासी म्हणून सोबत बाळगला तरी कोणाला शंका येणार नाही, concealmeant चे टेंशन नाही, मारताना कुठेही रक्तपात नाही, म्हणुन रेशमी रुमाल वापरला जात असे. बरेचवेळा रुमालाची पट्टी करून त्याच्या बरोबर मध्यात एक जड़ पितळी पदक ठेवले जात असे अन सावजाचा गळा घोटताना ते पदक बरोबर माणसाचे गळगुंड उर्फ़ एडम्स ऍपल वर येईल असे पाहिले जात असे जेणेकरुन श्वास नलिकेवर अतिरिक्त प्रेशर येऊन माणुस लवकर मरावा. नंतर तोच पदक असलेला रुमाल कंबरबंद म्हणून गुंडाळत असत.

Thugs_Strangling_Traveller

(रुमालाने गळा आवळणारे ठग)

images (37)

(अड्ड्यावर प्रेते पुरायला नेताना)

ठगांच्या टोळीत सामिल व्हायला विशेष काही प्रशिक्षण नसे फ़क्त कॉन्टेक्ट हवा अशी अट असे, एक असा कॉन्टेक्ट जो तुम्हाला गँग मधे इंट्रोड्यूस करेल, एकदा गँग मधे आले की एक वरिष्ठ ठग तुम्हाला चालण्याबोलण्या पासुन ते गळा आवळण्यापर्यन्त सारी ट्रेनिंग देत असे. गँगच्या राजाला "जमेदार" असे म्हणत, असाच एक प्रसिद्ध जमेदार म्हणजे "बेहराम जमेदार" किंवा "ठग बेहरा" हा होता, १७६५ मधे जन्माला आलेला बेहराम हा कदाचित आजही जगातला सर्वात जास्त बळी घेणारा सीरियल किलर ठरावा, ह्याने १७९० मधे पहिल्या खूनापासून ते १८४० मधे पकडला जाईपर्यंत ९३१ लोक खलास केले होते, १८४० मधे त्याला फासावर लटकवले गेले. ह्याचा एरिया म्हणजे अवध विभाग होता. वेषांतर म्हणून हा बेहराम जमेदार अतिशय धनी व्यापार्याचे सोंग वठवत असे.

images (32)

(व्यापार्याच्या वेशात बेहराम जमेदार)

images (31)

पंडित झालेला बेहराम जमेदार

ठगांच्या गँगचा राजा मात्र वंशपरंपरागत ठगीचे काम करणाऱ्या फॅमिली मधला असे किंवा सहसा जुन्या जमेदाराचा मुलगा असे, बरेचवेळी ठग आपल्या सावजांसोबत असलेली मुलेबाळे ठार न करता जिवंत ठेऊन दत्तक घेत असत व त्यांना पुढे ठग बनायचे प्रशिक्षण देऊन टोळीत सामिल करून घेत असत, लूटीच्या मालाचे वाटप जमेदाराच्या मार्गदर्शनात होत असे. अगदी सुरुवातीला भुकेकंगाल अवस्थेला तोड़ म्हणून सुरु झालेली ही भयंकर गँग नंतर नंतर खुप जास्त फोफावली कारण "इजी मनी"चं खुळ त्याकाळी सुद्धा होतेच की!. सुरुवातीला साधन म्हणजे खून करणे जरी शुचिर्भूत नसले तरी साध्य निरलस होते ते म्हणजे "पोटची भुक मिटवणे" नंतर नंतर विकृती इतकी वाढली ठगांमधे की भुक मिटवणे किंवा धन प्राप्त करणे ही "साध्यं" सुद्धा दुय्यम झाली अन लोकांना "साधनाची" सवय किंबहुना व्यसन लागले, बेहराम जमेदार ह्याच विकृत काळाचा प्रतिनिधी होय.

तोवर चारशे सवाचारशे वर्षे उलटून गेली होती अन अजुन एक नवसंक्रमण होऊ घातले होते, ह्या नव्या संक्रांतीचं नाव होतं "यूरोपियन्स" मसाल्यांच्या शोधात आलेले हे लोक पुढे औद्योगिक क्रांतिनंतर कच्च्या मालाला हपापलेले होते, त्यानंतर ब्रिटिश साम्राज्य ईस्ट इंडिया कंपनी वगैरे सगळ्या घडामोडी झाल्या होत्या, रेनेसांसचं वारं प्यायलेल्या ह्या लोकांनी सगळ्या आधुनिक कल्पना ह्या आपल्या वसाहतीचं शोषण करण्यासाठी मॉडिफाई करून घेतल्या होत्या, ह्यातलीच एक म्हणजे मुख्यभूमीवर तयार होणार कच्चा माल उदा नीळ, अफु, ताग, कापुस बंदरापर्यंत पोचवणे अन त्याच्यासाठी तेव्हा प्रवासी अन व्यापारी राज्यमार्ग सुलभ सुकर अन सुरक्षित करणे क्रमप्राप्त होते, १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमराच्या अगोदर तर कंपनी ची माणसे अगदी धार्मिक बाबी जसे सती वगैरे च्या विरोधात सुद्धा लुड़बुड करू लागले होते. १८१२ मधे पेशवाई गार केल्यावर इंग्रज यूनियन जॅक भारतात घट्ट रोवला गेला अन ते संक्रमणचक्र हळू होऊ लागले काळाचे, नव्या गड्याच्या नव्या राज्यात हे संक्रमण ठगांचे कर्दनकाळ ठरले, ह्याला कारण होता तो एक इंग्रज गवर्नर जनरल, लॉर्ड विलियम बेंटिक. बेंटिक भारतात आला तो बंगाल सुभ्याचा गवर्नर जनरल म्हणुन, ब्रिटिश पार्लियामेंट ने त्याला एकच काम सोपवले होते, फ़क्त अन फ़क्त कंपनीचा नफ़ा वाढवणे, १८२८ मधे भारताचा गवर्नर जनरल व्हायच्या आधी बंगालचा गवर्नर असताना ह्याने राजा राम मोहन राय ह्यांच्या समवेत सतीबंदी वर भरपुर कार्य केले होते अर्थात हे कार्य त्याने रेनेसांस ने शिकवलेल्या मुल्यांमुळे केले की इंग्रजी शिक्षण देऊन देशी कारकुन तयार करुन कंपनीचा नफ़ा वाढवणे ह्या हेतु ने केले हा इतिहासप्रेमी लोकांत वादाचा विषय असू शकतो. १८२८ मधे भारताचा गवर्नर जनरल झाल्यावर बेंटिक समोर प्रश्न फ़क्त बंगाल प्रेसीडेंसी पुरते उरले नव्हते तर बंगाल खुद्द अन सोबत मुंबई अन मद्रास प्रेसीडेंसी अश्या उर्वरीत दोन्ही प्रेसीडेंसी चा कारभार सुद्धा तो पाही, तंत्रिकदृष्टया तो मद्रास अन मुंबई प्रेसीडेंसीच्या गवर्नर्सचा मुकादम झाला होता. ही जबाबदारी त्याने संधीयुक्त आवाहनासारखी वापरली अन कंपनीला भारतभरातुन वांछित कच्चामाल निर्धोक मिळावा म्हणुन देशाच्या कायदासुव्यवस्थेत सूक्ष्म लक्ष घालायला सुरुवात केली, जिच्यावर तसेही इंग्रज नेहमी लक्ष ठेवत खुप आधीपासुन. ह्याचवेळी त्याची दृष्टी ठगांच्या गँग वर पडली, ही नजर पडायला कारण म्हणजे इंग्रज लोकांची गुन्हेअन्वेषण करायची काटेकोर पद्धत, ह्यात गुन्हा तर समोर येतच असे शिवाय इंग्रज लोकांच्या कागदाला अतिमहत्व दिल्यामुळे त्या गुन्ह्याचे स्वरुप अन इतर माहीती भविष्यासाठी उपलब्ध होऊ लागली होती. हा तो काळ होता जेव्हा ४००+ वर्षांची गुप्ततेची चादर ठग लोकांवरून हळूहळू उचलली जाऊ लागली अन त्यांची कुंडली आकार घेऊ लागली. अर्थात, ह्या कामाचा अवाका ठगांचे पूर्वकर्तृत्व पाहता प्रचंड असणे साहजिक होते, तेव्हा बेंटिकला एक हुशार माणुस हे प्रकरण हाताळायला गरजेचा वाटू लागला. नाट्याच्या ह्या अंकात प्रवेश होतो तो ठगांचा कर्दनकाळ ठरलेल्या अश्या मेजर जनरल विलियम हेनरी स्लीमनचा जो त्याकाळी कर्नल होता.

images (34)

(लॉर्ड विलियम बेंटिक)

विलियम हेनरी स्लीमन, किंवा मेजर जनरल विलियम हेनरी स्लीमन हे एक अफ़लातून प्रकरण होते, १७८८ साली इंग्लॅण्ड मधे एका सरकारी बाबुच्या पोटी आलेले हे पुत्ररत्न हरहुन्नरी अन डेरिंगबाज होते. १८०९ साली २१ वर्षांचा तरुण विलियम लेफ्टनंट म्हणून बंगाल आर्मी मधे रुजू झाला अन नंतर पूर्णपणे भारतात विरघळुन गेला. १८२० साली त्यांची नेमणूक मुलकी अधिकारी म्हणून झाली अन ते Assistant to the Agent of Governor General, जिल्हा सागर, मध्यप्रांत म्हणून रुजू झाले, नंतर १८२२ अन १८२८ मधे त्यांना अनुक्रमे नरसिंहपुर, मध्यप्रांतचा जिल्हाधिकारी अन जबलपुर, मध्यप्रांतचा जिल्हाधिकारी म्हणून बढ़ती मिळाली. १८३५ मधे ते मजिस्ट्रेट जिल्हा सागर म्हणून परत सागरला पोस्टेड झाले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात डायनासोर जीवाश्म शोधून त्यांनी एशिया खंडात डायनासोर जीवाश्म शोधणार पहिला माणुस अशी ख्याती सुद्धा कमवली होती. बंगाल आर्मी अन मध्यप्रांत म्हणजे ठगीच्या बालेकिल्ल्यात उमेदीची वर्षं घालवलेला हा इसम साहजिकच बेंटिकच्या नजरेत भरला अन त्यांचा मुलकी अन लष्करी अनुभव जमेला धरता बेंटिकने त्यांची आपल्या ठगी निर्मूलन कार्यक्रमाचे अधीक्षक म्हणून नेमणूक केली. General Supritendent, Thuggee and Dcoity Supression Department असे ते पद होते. जवळपास 2 वर्षे घालवुन आपली पूर्वपुण्याई , लोकांत मिसळण्याचे कसब अन सागरचे मजिस्ट्रेट असतानाचा अनुभव पणाला लावुन, स्लीमन ह्यांनी १८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले. पोलिसी चौकशीअंती फिरंगिया ने माफीचा साक्षीदार व्हायची तयारी दर्शवली. त्याने स्लीमन ह्यांना ठगांचे अड्डे दाखवले, एक अशी जागा दाखवली जिथे १०० च्या वर माणसांची प्रेतं ठगांनी गाडली होती. ते खून करणाऱ्या ठगांची नावे सांगितली. ह्या नंतर स्लीमन ह्यांनी आपला झपाटा सुरु केला. पुर्ण राज्यात जिथे कुठे ठगीच्या घटना झाल्या तिथे भेटी देणे, कितीही अतिरंजित वाटले तरी ग्रामीण लोकांनी दिलेली वर्णने सूचीबद्ध पद्धतीने लिहून काढणे, ठग लोकांस भौगोलिक फायदा देतील अशी ठिकाणे, त्यांचे प्रोबेबल अड्डे ह्यांना नकाश्यावर नोंदवणे, जास्तीत जास्त प्रवासी कुठल्यामार्गाने प्रवास करतात हे निरिक्षण करणे, साध्यावेषातली माणसे खबरी सगळीकडे पसरवणे अन माफीचे साक्षीदार झालेले ठग ह्यांना ठगांच्या टोळी मधे मोल म्हणुन घुसवणे हे सगळे प्रकार ह्या आधुनिक इंटेलिजेंसच्या पितामह ठरणाऱ्या माणसाने केले, अन १८३६ ते १८५२ ह्याकाळात एकतर हजारो हजार ठग ठार केले किंवा पार अफगानिस्तान खुरासान कड़े तड़ीपार केले. त्यांची ही प्रोएक्टिव लॉ एनफोर्समेंटची पद्धत इतकी नवीन होती की पुढे चालून त्याच Thuggee and Dacoity supression department चे रूपांतर अतिशय कार्यक्षम अन गुप्त अश्या ब्रिटिश CID मधे झाले जे स्वातंत्र्यप्राप्ती नंतर इंटीलिजेंस ब्यूरो उर्फ़ IB मधे रूपांतरित झाले, ह्यप्रकारे आयबी ही आधुनिक जगातली सर्वात जुनी गुप्तहेर संघटना झाली. त्यांनी प्रथम पकडलेल्या फिरंगियाची केस इतकी प्रसिद्ध झाली होती की १८३९ मधे फिलिप मेडो टेलर नामक इंग्लिश लेखकाने सईद आमीर अली उर्फ़ फिरंगियाला केंद्रस्थानी ठेऊन "कंफेशंस ऑफ़ अ ठग" ही कादंबरी लिहिली होती जी त्याकाळी लंडन मधे बेस्टसेलर झाली होती.

images (35)

(मेजर जनरल विलियम स्लीमन)

बरीच वर्ष नंतर गेली, १८७१ मधे ठग ही जात म्हणून गणली गेली अन क्रिमिनल ट्राइब्स एक्ट मधे अंतर्भूत झाली खरी, पण तोवर प्रवासाला रेलवे झाली होती, ठग ही एक दंतकथा झाली होती, काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला प्रत्येक क्षणाला जगातल्या ह्या सर्वाधिक भयानक गँगची स्मृती पुसट करत, तरीही एक वाक्य इतिहासाच्या प्रत्येक पुस्तकाच्या कोपर्यात कायम आहे, अन राहील.....

"एक काळ होता जेव्हा भारतात एक अतिशय भयानक गुन्हेगारी गँग होती, जिचे नाव होते............

.....ठग"

(लेखनसीमा) बाप्या

सर्व चित्रे इंटरनेट वरुन साभार

(आधी इतरत्र प्रकाशित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू, छान माहितीपुर्ण लेख!

नाहीतर ठग म्हणजे फक्त फसवणुक करणारे लुटारू एव्हढीच माहिती होती. त्यांच्या कार्यपध्दतीत एव्हढे कौर्य असेल हे आज तुमच्या लेखामुळे समजले.

आर्या जी, नाही ठग वेगळे, डाकू वेगळे अन पेंढारी वेगळे, पेंढारी म्हणजे भाडोत्री सैनिक असत जे युद्ध प्रसंगी राजे मंडळी करता लढाया करत अन त्याच्या मोबदल्यात ते राजा कडून एक गाव लुटायची परवानगी मागत असत, त्यांची गावे लुटायची विधी फार भयानक असे. धन कुठे आहे ते काढायला गावकरी मंडळीच्या तोंडात गरम कोळसे अन राख भरणे, बलात्कार, लहान मुले मारून भाल्याच्या टोकावर नाचावणे इत्यादी भयानक प्रकार असत

भयंकर.
इतक्या प्लॅन्ड रॉबर्‍या आणि खून त्या काळात व्हायचे हे वाचून भीती वाटली.आता च्या काळात कोणा चुकीच्या माणसांनी हे वाचायला आणि आयडिया घ्यायला नको असंही वाटलं.
(खरं तर याच्याशी डायरेक्ट संबंधित नाही पण १३ डिसेंबर ला निर्भया आणि तिच्या मित्राला बस मध्ये बसलेले इतर लोक वेगवेगळे प्रवासी आहेत असं दाखवून बसवलं होतं ते आठवलं.एखाद्या घटनेचा अप्रत्यक्ष परीणाम आणि ट्रॉमा मनावर बराच असतो.)

बाप रे. त्या काळात हे इतक्या संघटीत पणे होत असे यावर विश्वास बसणे कठीण आहे.. आणि यापुर्वी याबद्दल काहिही वाचले नव्हते.

आभार बापू,
EPIC channel वर ह्याची मालिका पाहिली होती , माफिचा साक्शिदार फिरन्गिया वर बघितल्याचे आठवले.

EPIC छान channel आहे.

माहितीपूर्ण लेख.
यावरुन नक्कीच कळते की "इंग्रजांच्या राज्यात काठीला सोने बांधुन जरी प्रवास केला तरी धोका नाही" असे का म्हणत.

भारी. हे सगळं फिक्शनल वाटावं इतकं अद्भुत (?) आहे. चारशे वर्ष सुगावा लागू दिला नाही कुणाला म्हणजे डेंजरच.

बापु, भारी लिहिलंय तुम्ही.
एकदम डॉक्युमेंटरी / पिक्चर मटेरीअल आहे.

महितीपुर्ण लेख. फार भयंकर आहे. पेंढारी बद्दल नव्यानेच कळलं. त्यांची कार्यपद्धती अजुनच क्रुर आहे.

बापू,
मस्तच लिहिलं.. डॉक्युमेंटरी वाटली...
खुप काही नव्याने कळलं..
बाकी वाचताना मलासुद्धा मीअनू सारखी भिती वाटली कि न जाणो हि कल्पना वाचुन लोकं काही शक्कल लढवून नसत्या गोष्टी करायला सुरुवात करतील असे... रिकामं डोक शैतानाच घर..
असो.. लिहित राहा..

पेंढारी म्हणजे भाडोत्री सैनिक असत जे युद्ध प्रसंगी राजे मंडळी करता लढाया करत अन त्याच्या मोबदल्यात ते राजा कडून एक गाव लुटायची परवानगी मागत असत, त्यांची गावे लुटायची विधी फार भयानक असे. धन कुठे आहे ते काढायला गावकरी मंडळीच्या तोंडात गरम कोळसे अन राख भरणे, बलात्कार, लहान मुले मारून भाल्याच्या टोकावर नाचावणे इत्यादी भयानक प्रकार असत
>>>>>
हे तर आणखी खतर नाक आहे.. इमॅजिन करूनच काटा येतोय

कडक माहिती दिलीत बापू! ठग म्हणजे काय ते आज नेमके समजले

Pages