इतकेच

Submitted by बेफ़िकीर on 28 August, 2016 - 12:45

एकोणतीस वर्षांची झाले. माझे लग्नच ठरत नव्हते. आलेल्या सगळ्या स्थळांमध्ये सांगण्यासारखे खूप गुण आणि काढण्यासारखे खूप दोष होते. गुण माझे बाबा ऐकवत होते आणि दोष माझी आई सांगत होती.

एकदा तर साखरपुडाही झाला. पावणेतीन लाख खर्च करून साखरपुडा झाला. पावणे दोनशे लोक जेवून गेले. लग्न आठ दिवसांवर आले आणि ते आम्हीच मोडले.

का तर मुलगा रोमॅन्टिकली वागतच नाही. सदोदीत आई वडील आणि भाऊ वहिनी ह्यातच मश्गुल!

माझ्याशी बोलतच नाही.

लोक म्हणाले, लग्नानंतर बोलेल. तो म्हणाला, मी तुझ्याबरोबर असतो तेव्हा इतर कुठला विषय काढतो का? पण तो माझ्याबरोबर असायचा किती? तर महिन्यातून दोन तास! लग्नाला आठ दिवस उरलेले! माझ्या चेहर्‍यावर लग्नाचा आनंद नाही. शेवटी आईने लकडा लावला. बाबांनी त्यांच्याघरी फोन लावला. बाबांनी सांगून टाकले.

"आम्ही येथे थांबण्याचा निर्णय घेत आहोत"

आश्चर्य अपेक्षित होते. धक्का बसणे अपेक्षित होते. काहीच नाही. उलट टीकाच! आत्ता का, आधी का नाही, नेमके काय झाले? सगळे सांगितले. चक्क पटलेही. एक मीटिंग झाली. ह्या मीटिंगला त्यांच्याकडचे सहाजण, आमच्याकडचे सहाजण! कागदावर सह्या झाल्या. आत्तापर्यंतची देणीघेणी, निमंत्रणे, सगळे विसरायचे. सगळे, सगळेच विसरायचे. हा भूतकाळ म्हणायचा. येथून पुढे निघायचे.

एक नाते निर्माण व्हायच्या आधी संपले.

दुसर्‍याचा शोध सुरू झाला.

हा दुसरा कसा असावा? नेमकी व्याख्याच निर्माण झालेली नाही. माझ्याशी भरपूर बोलू इच्छिणार्‍याच्या घरची परिस्थिती बेताची! गर्भश्रीमंत असलेल्याला अनेक मैत्रिणी! चांगले करिअर करू शकत असलेला मला न बघताच पसंत करून बसलेला! मला माझ्या कुटुंबियांसकट प्रेमाने स्वीकारण्यास तयार असलेला दिसायला थोराड! जिथे थोडेफार जुळत आहे तेथील थोरली जाऊ अबोल! तिला सासूने डॉमिनेट केले आहे का, ही शंका! एकाचे पॅकेज फक्त दहा लाख आणि मला माळ घालायला तयार! मी लक्षाधीशाची मुलगी! एका ठिकाणी भावी सासू म्हणते रोज चाळीस पोळ्या! 'मी बाई लावीन' ह्या विधानावर आठ्या! एक भावी सासू म्हणते दररोज साडी नेसावी लागेल. मला छान साडी नेसता येते. पण ती चॉईस म्हणून! जबरदस्ती म्हणून नव्हे.

लग्न ठरण्याच्या कारणांपेक्षा लग्न न ठरण्याच्या कारणांची संख्या कैकपटीने जास्त!

पूर्वीची लग्ने कशी व्हायची? माझ्या बाबांनी किती स्थळे नाकारली? माझ्या आईला कितीजणांनी पसंत केले? माझ्या भावाबहिणींचे काय?

आजच्या घडीला, प्रश्न फक्त माझा!

तीन ज्योतिषांनी हात आणि दोन ज्योतिषांनी कुंडली बघितलेली! वेगवेगळे निष्कर्ष! पुढचे सहा महिने महत्वाचे आहेत. त्यात ठरले तर ठरले नाही तर तीन वर्षे थांबा! सध्या योग नाही. दोन महिन्यानंतर जबरदस्त योग आहे. नवरा इथला नसेल. उत्तम स्थळ नशिबात आहे. गेल्या वर्षी योग होता. आता सव्वा दोन वर्षे नाही.

काहीही!

मला घडीची पोळी करता येते, पण वर्तुळाकार होईलच असे नाही. 'ते आम्ही शिकवू' असे म्हणणारी सासू आमच्याकडे व्हीलन ठरते. ही सासू नक्की डॉमिनेट करणार! एकत्र कुटुंबात राहावे लागेल ही अट घालणारे स्वतः आयुष्यात एकत्र कुटुंबात राहिलेले नसतात. त्यांना विचारणार कोण? 'माझ्यामुळे' आम्ही मुलीकडचे! आमच्याकडे फक्त धुण्याभांड्याला बाई आहे म्हणणारे सून आणू इच्छित असतात की हक्काची मोलकरीण हे पहिल्या भेटीत समजत नाही. हाच मुद्दा पहिल्या भेटीत निघाल्यावर दुसरी भेटही होत नाही. ह्या काय लग्नाच्या अटी?

'आम्ही दोघे' कसे जगू ह्यावर भाष्यच झालेले नाही आजवर! ना माझ्यात आणि भावी नवर्‍यात, ना दोन्हीकडच्या व्याह्यांमध्ये!

कुमार अज्वानी! सिंधी! समोर राहतो. आधी टक लावून पाहायचा. आता नजर चोरतो. एकटाच असतो. तो इकडेच पाहतोय की नाही हे पाहायला मी खूप काही करते. कधी खिडकीतून चोरून बघते. कधी पार्किंगमधून वर बघते. कधी हॉलमधून नजर वळवते. कधी बिनदिक्कत टेरेसमध्ये जाऊन केस विंचरते.

प्रत्येकवेळी तो दिसतो.

पडद्याआडून, नजर लावून बसलेला!

आता मला त्याची सवय झाली आहे. त्याच्या लपून असण्याची सवय! बिनधास्त नसण्याची सवय! हा कुमार अज्वानी गणेशोत्सवात गातो. त्यामुळे त्याचे नांव माहीत आहे. मध्यंतरी नीले नीले अंबरपर मस्त म्हणाला होता.

त्याची लांबलचक, चकचकीत स्कोडा त्याच्या पार्किंगमध्ये नसली की मन हिरमुसले होते.

परवा अचानक समोरासमोर आलो. बावचळला. मी त्याच्याहून बावचळले.

मग फेसबूकवर सर्च केले. त्या नावाचे कोणी नव्हतेच. त्याचा सेल नंबरही माझ्याकडे नव्हता.

परवा मी फोनवर बोलत चुकून टेरेसवर गेले. चुकून म्हणजे काय, तर आजकाल टेरेसवर जाताना 'तो कुठून बघतोय की काय' ह्याचा तपास घेऊन जायचे, तो तपास न घेताच गेले.

तर काय? समोरच्या टेरेसवर तोही फोनवरच बोलतोय!

नजरानजर! थोड्यावेळाने फोन आटोपले.

खूप लांबून, तो हसला. मला काय झाले मला माहीत नाही. मी मनमोकळेपणाने हसले. त्याने हात केला. मीही केला.

मागून आईने पाहिले.

दोन दिवस! सलग दोन दिवस मी भयंकर शिव्या खाल्ल्या.

रड रड रडले. काहीच चूक नव्हती. तो जितक्या लांब होता तितक्या लांबूनच मला आवडला होता. अधिक जवळ जावे किंवा यावे असे काहीच मनात नव्हते. ह्या जगात एक कोणीतरी माझ्यासाठी ताटकळून असायचा हेच किती महत्वाचे होते. मनात तर येत होते की लग्न कुठेही झाले आणि माहेरी आल्यानंतर हा असाच दिसणार असला तर सासरी पोळ्या किती कराव्या लागतात, जाऊ बोलते की नाही, साडीच नेसावी लागते का, वगैरे प्रश्न मी मनातही आणले नसते.

एकमेकांकडे बघून हासणे, हात करणे, सगळे त्या शिव्यांच्या भडिमारात क्षुद्र ठरले, ठरवले गेले.

मी नेहमीसारखी जॉबला जाऊ लागले. अनेक दिवस गेले. एके दिवशी संध्याकाळी घरात पोचल्यावर माझे स्वागत झाले ते कपाळावरच्या आठ्यांनी, विस्फारलेल्या डोळ्यांनी, वळलेल्या मुठींनी!

सिंधी दुपारी घरी येऊन गेला होता. माझा हात मागून गेला होता. त्याचा अपमान झालेला नव्हता. उलट सस्मित चेहर्‍याने संवाद झाले होते. पण निक्षून सांगितले गेले होते. आपले जमणे नाही.

मला जाब विचारण्यात आले. आमच्यात काही नव्हतेच. उत्तरे काय देणार? विश्वास ठेवायला दोन तास लागले. मग उगाच कुशीत घेऊन वगैरे थोपटण्यात आले. मी रडत होते वेगळ्या कारणांनी, आई वेगळ्या कारणांनी!

रात्री झोपायच्या वे़ळी मी माझ्या खोलीतला लाईट लावून काहीवेळ खिडकीत उभी राहिले. काही वेळाने पलीकडच्या खिडकीत एक आकृती आली. तिनेही लाईट लावला. अनाकलनीय मूक संवाद झाला. मी लाईट बंद केला. खिडकी उघडीच ठेवून खूप वेळ पलीकडे बघत बसले. ती आकृती काही हालली नाही. शेवटी माझे डोळे मिटले. सकाळी बघितले तर आकृती दिसली नाही.

अनेक दिवसांनी मला स्थळ आले. आई वडील वृद्ध! शुश्रुषा करावी लागेल. ही एकच अट! पोळ्या नाहीत, साडी नाही, एकत्र कुटुंब नाही, भावी नवर्‍याचे पॅकेज बारा लाख, माझे त्याच्याहून जास्त! पण मान्य झाले. दोन्हीकडून!

माझी समस्या वेगळीच होती. जिथे पाहिजे तिथे असणे जमत नसले तर मग कुठेही असले तरी काय!

कार्यालयात निघाले, त्या दिवशी संध्याकाळी....

....समोरच्या खिडकीवर बाहेरून दोन मजूर कायमस्वरुपी लाकडी फळ्या ठोकत होते.

माझ्यामुळे जगणारा आणि माझ्यावरती मरणारा ह्यांच्यापैकी मी एकाला निवडले होते इतकेच!

=============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिहिलय बेफी,

कमी शब्दात खूप सान्गून गेलयं हे ललित... अश्या काही मैत्रिणी आणि त्यांचे आयुष्य जवळून बघतोय Sad

'आम्ही दोघे' कसे जगू ह्यावर भाष्यच झालेले नाही आजवर! ना माझ्यात आणि भावी नवर्‍यात, ना दोन्हीकडच्या व्याह्यांमध्ये!>> bull's eye, बेफिकीर सर! इतकी maturity प्रत्येक मुला-मुलींमध्ये येवो _/\_
ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सोडून बाकी सटरफटर गोष्टींवरच किती भर दिला जातो...

मस्तच...
बरयं निदान घरचे पोरीच्या मनाने तर ऐकले आत्तापर्यंत.. इथं तर कुणाकुणाला तीपन प्रोविजन नसते अज्ज्याब्बात..

मस्त,...

माझ्यामुळे जगणारा आणि माझ्यावरती मरणारा ह्यांच्यापैकी मी एकाला निवडले होते इतकेच!

हे नाहि कलल्ले

माझ्यामुळे जगणारा आणि माझ्यावरती मरणारा ह्यांच्यापैकी मी एकाला निवडले होते इतकेच!>>>>>>++++१
खुप्च छान......