पार्थिवगणेशपूजा - चिंता आणि चिंतन

Submitted by शेखर खांडाळेकर on 24 August, 2016 - 21:31

निसर्गचक्रातील घटना देवतांच्या इच्छेने घडतात अशी सर्व जगातील प्राचीन लोकांची धारणा होती. भारत याला अपवाद कसा असेल? म्हणूनच भारतातील सर्व व्रते आणि उत्सव निसर्गाशी निगडीत आहेत. ज्या वेळी ही व्रते उत्सव इत्यादी चालू झाले असतील तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात कितीतरी फरक होता. ही व्रते निसर्गाच्या जवळ राहणाऱ्या लोकांनी तयार केली. गगनचुंबी इमारतींच्या संकुलातील शेकडो सदनिकांत राहणारी अथवा गाव सोडून दाटीवाटीच्या चाळीतल्या खोल्यात आयुष्य काढणारी कुटुंबे ही संकल्पना सुद्धा त्यांना अपरिचित असावी. त्यांची व्रते त्या काळातील परिस्थितीला अनुकूल होती. आज केवळ या व्रतांचे कलेवर राहिले आहे. त्यातील प्राण हरवून गेला आहे. असे प्राणहीन व्रताचरण पर्यावरणासकट आपला घात करत आहे. थोडक्यात आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत. शास्त्राचे मर्म जाणून व्रत उत्सव साजरे केले तरच धर्माची ग्लानी जाईल आणि समाजात चैतन्य येईल. या अनुषंगाने आपण पार्थिवपूजेबद्दल विचार करू.
पार्थिवपूजेची भूमिका :
चित्र अथवा मूर्ती ही मनातल्या देवतेशी संपर्क साधायची सोपी पद्धत आहे. मूर्ती घडवण्यासाठी निसर्गात सहज उपलब्ध असणारे माध्यम म्हणजे माती. ती मुबलक प्रमाणात मिळते, हाताने आकारता येते आणि पूजा झाल्यावर तिचे विसर्जनहि सोपे असते. जगातील अतिप्राचीन संस्कृतींमध्येसुद्धा अनेक देवतांच्या मातीच्या मूर्ति आढळतात. शास्त्रात अश्या पूजेला ‘पार्थिवपूजा’ म्हणतात. पार्थिव म्हणजे पृथ्वी पासून बनलेले.
‘धर्मसिंधू’ ग्रंथांत विविध मतांच्या आधारे देवमूर्ती घडविण्याच्या नाना द्रव्यांची यादी दिलेली आहे. रत्नमय मूर्ती, लोहमय म्हणजे धातूची मूर्ती, पाषाणमूर्ती, दारुज अर्थात काष्ठमूर्ती आणि पार्थिवमूर्ती हे काही मूर्तिप्रकार आहेत. आणखीही द्रव्ये त्यात सांगितली आहेत. परंतु एकेठिकाणी ग्रंथकाराने असे वचन उद्धृत केले आहे की कलियुगात सोने, चांदी इत्यादीपेक्षा पार्थिव मूर्ती श्रेष्ठ आहे. भावी काळातील माणसाची दयनीय स्थिती ताडून कदाचित शास्त्रकारांनी हा सोपा मार्ग सुचविला असावा. मुख्य म्हणजे आपल्या अजुबाजूच्या परिसरात सापडणाऱ्या नैसर्गिक द्रव्यांनी पूजा बांधून ती पुन्हा निसर्गातच विलीन करायची हे मुख्य सूत्र पार्थिव पूजेत असते.
पार्थिवपूजा विधान असणारी दैवते :
मुख्यतः शिव, देवी आणि गणेश या देवतांसाठी पार्थिव पूजा सांगितली आहे. इतर देवतांसंबंधी अश्या पार्थिवपूजा अल्प प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ नागपंचमीला पुजल्या जाणाऱ्या नागप्रतिमा, बैल पोळ्याच्या बैलांच्या मूर्ती, हरतालिकेच्या मूर्ती आणि जन्माष्टमीला कृष्णपूजेत काही वेळा वापरली जाणारी मातीची प्रतिमा इत्यादि.
पार्थिव लिंग पूजा
शिव उपासकांनी पर्वकाळात अथवा नित्यच पार्थिवपूजा करावी अशी पारंपारिक मान्यता आहे. उदाहरणार्थ श्रावण मासात मध्यप्रदेशातील महेश्वर या ठिकाणी नर्मदाकाठी सहस्र अथवा लक्ष पार्थिव बनवून शिवपूजन करणारे लोक आहेत. आजही गंगेवर अंघोळ करणाऱ्या काशीतील अनेक स्त्रिया स्नान आटोपले की नदीतीरी वाळूचे शिवलिंग करतात. त्याच्या समोर मुठभर वाळूचा नंदी करतात. सोबत आणलेल्या सामुग्रीने पटकन पूजा करून मग घरी जातात. गंगेच्या लाटा आपोआप त्या विग्रहांचे विसर्जन करतात.
पार्थिव मातृदेवता
दुर्गासप्तशतीत देवीची मातीची मूर्ति करून तिची पूजा करण्याचे निर्देश आहेत. लज्जागौरी सह अनेक संतानदायी देवतांचे मातीचे टाक भारताच्या अनेक भागात सापडतात. मथुरेला कुशाण काळातील अनेक मातृकांचे मातीचे टाक सापडले आहेत. त्यात त्या लहान मुलांसोबत दिसतात. लक्ष्मी, वसुंधरा आणि महिषासुरमर्दिनी यांचे मातीचे टाकसुद्धा आढळतात.
नवरात्रीला गणेशोत्सवाप्रमाणे मोठे स्वरूप प्राप्त झाल्याने दुर्गेच्या मातीच्या प्रतिमा आपल्याला अलीकडील तीन चार दशकांपासून अधिक प्रमाणात पहायला मिळत आहेत. खरे तर देवीची क्षेत्रे सोडल्यास नवरात्र हा अतिशय घरगुती सण आहे. घटस्थापना त्यात मुख्य आहे. मूर्तीची प्रतिष्ठा घरामध्ये अपेक्षित नाही. बंगाल आणि उत्तरहिंदुस्तानात गेल्या शे-दोनशे वर्षात मोठ्या मूर्ती पुजण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. या व्यतिरिक्त तिथे दिवाळीत लक्ष्मीपूजन, वसंतपंचमीला सरस्वती पूजन इत्यादी साठी मातीच्या मूर्ती पूजतात.

पार्थिवगणेशपूजा
शिवपुराणात चतुर्थीव्रताचे वेळी गणेशाची पार्थिव मूर्ती करून तिची पूजा करण्याचे निर्देश आहेत. विशेषतः भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशमूर्तीचे पूजन करण्याची महाराष्ट्रासह दक्षिण भारतात परंपरा आहे. हाच आपला सर्वांचा आवडता गणेशोत्सव. याच बरोबर हल्ली माघीगणेशोत्सव करण्यासाठीसुद्धा सार्वजनिक मंडळे मातीची मूर्ती आणत आहेत, परंतु याचे प्रमाण अद्याप कमी आहे.
पार्थिव मूर्तीतील बदल आणि समस्या
गणेशोत्सव आणि त्याची लोकप्रियता उत्तरोत्तर उदंड वाढते आहे. हिंदूच नव्हे तर काही पारशी, शीख आणि मुस्लिम कुटुंबेसुद्धा गणेशोत्सव कौटुंबिक स्तरावर अथवा सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊन साजरा करीत आहेत. याचे कारण “ सुखकर्ता दु:खहर्ता” अशी गणपतीबाप्पाची असलेली ख्याती. थायलंड मधील थाय लोकदेखील गणेशोत्सव साजरे करत असल्याची क्लिप यू-ट्यूबवर दिसत आहे. धर्म आणि देशाचे बंधन ओलांडून गणेशोत्सवाची लोकप्रियता ओसंडून वाहते आहे आणि त्यामुळे दर वर्षी गणेशमूर्तींचा खप वाढतच आहे.
गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे गणेशाची मूर्ती. गणेश चतुर्थी हे पार्थिवगणेशपूजेचे व्रत आहे. त्यामुळे ती मूर्ती मातीची असणे आवश्यक आहे. साधारणतः गावातील कुंभार शाडूची मूर्ती बनवत असत. पण कालांतराने हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. गणपती बनविण्याचे कारखाने तयार झाले. शाडूच्या किमती, जडपणा आणि मूर्ती सुकायला लागणारा वेळ यामुळे शाडूची जागा प्लास्टर ऑफ पॅरिस उर्फ पीओपीने घेतली. सार्वजनिक मंडळाच्या मागणीनुसार महाकाय मूर्ती आकाराला येऊ लागल्या. त्यात मूर्तीला स्थैर्य लाभावे म्हणून लोखंडाच्या सळ्या घालतात. मूर्तीवर चढणारे रंग अर्थातच निसर्गाला हानिकारक रसायनांनी बनतात. किंबहुना विघ्नेश्वराच्या अश्या सर्व मूर्ती पर्यावरणासाठी भयंकर मोठे विघ्नच उपस्थित करत आहेत.
विसर्जन झाल्यानंतर महानगरपालिकेकडे विसर्जित मूर्तींविषयी व्यवस्थित धोरण नाही. गेल्या वर्षी कृत्रिम तलावातील न विरघळलेल्या मूर्ती पुनः समुद्रात / नदीत सोडल्या गेल्या. ध्वनी प्रदूषण, फटक्यामुळे होणाऱ्या धुराचे प्रदूषण या बद्दल तर काही बोलणेच अवघड आहे. आधीच विविध कारणांनी नाजूक झालेल्या पर्यावरणावर प्रत्येक गणेशोत्सव कठोर आघात करत आहे.
या समस्येची तोड कशी काढणार? परंपरेच्या प्रेमामुळे, उत्सवप्रियतेमुळे, श्रद्धेमुळे किंवा गतानुगतिकतेमुळे गणपती आणणे बंधनकारक वाटते. पण आपल्या या भावनांचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम टाळायला पाहिजे. यासाठी थोडा व्यापक विचार आणि शास्त्राचे अवलोकन करणे आवश्यक आहे. त्यातून खालील मुद्दे लक्षात येतात.
१. एकाच कुळाच्या अनेक शाखांमध्ये वेगवेगळे गणेशोत्सव करणे अनावश्यक आहे. सर्वांनी एके ठिकाणी जमून गणेशोत्सव करावा. तसे एकत्र येणे शक्य नसेल तर आपल्या जवळच्या एखाद्या देवळातील अथवा सार्वजनिक गणपतीची सेवा गणेशोत्सवात करावी. एकाच कुळात अनेक मूर्ती आणण्याची प्रथा कटाक्षाने टाळावी.
२. मूर्तीचे माप शास्त्रानुसार असावे. जी मूर्ती घरात ठेवायची असेल तिच्या उंचीचे लहानात लहान माप अंगठ्याच्या वरील पेराइतके असावे आणि जास्तीतजास्त बारा अंगुल म्हणजे अंदाजे तळव्या इतकी मूर्ती घरी असावी असा शास्त्रनिर्देश आहे. ही शास्त्रमर्यादा पाळल्यास आपोआपच विसर्जनाच्या वेळी निर्माण होणारा मातीचा गाळ कमी होईल.
३. अशास्त्रीय पर्याय शक्यतो टाळा. ‘पेपर मशे’ म्हणजे कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीचा पर्याय सुचवला जात आहे. परंतु हे व्रत पार्थिव गणेशाचे असल्याने कागदाचा लगदा कितपत योग्य आहे हा प्रश्न उद्भवतो. तसेच या मूर्तीचे तात्काळ विसर्जन होत नाही. तेव्हां हा पर्यायही पर्यावरणाच्या दृष्टीने निकामीच ठरतो. मागील वर्षी एका हौशी महिलेने चॉकलेटचा गणपती तयार केला. त्याचे दुधात विसर्जन केले आणि ते दूध गरीब मुलांना प्यायला दिले. सोशिअल मिडियावर तिचे भरपूर कौतुक झाले. असे प्रयोग नाविन्यपूर्ण आणि सद्भावनायुक्त आहेत. परंतु पुन्हा पार्थिव सिद्धिविनायक व्रत असल्याने इथे चॉकलेट हे द्रव्य म्हणून कितपत योग्य आहे हा मुद्दा विचारणीय आहे.
४. शाडूची माती पूर्णतः पर्यावरणस्नेही नाही. शाडू नैसर्गिक द्रव्य खरे, परंतु समुद्रातील किंवा नदीतील पर्यावरणाला सुद्धा मूर्तींच्या विसर्जनामुळे निर्माण होणारा चिकटमातीचा प्रचंड अनैसर्गिक गाळ घातक ठरतो.
काही लोक असे सुचवितात की शाडूच्या मूर्तीचे घरी बालदित विसर्जन करून ते पाणी झाडांना घालावे. परंतु शाडू साध्या मातीत मिसळला तर पाणी मातीत नीट झिरपत नाही तसेच हवेतील प्राणवायूसुद्धा मातीत मिसळू शकत नाही. झाडाची मुळे कुसून जातात. तसेच मूर्तीवरील रंग नैसर्गिक नसल्यास निश्चितच जल प्रदूषण होईल.
५. दोन मूर्तींची योजना करणे हा चांगला पर्याय आहे . शास्त्रानुसार पूजेसाठी कुंडीतल्या अथवा बागेतल्या मातीने अंगठ्याच्या पेराइतकी अथवा तळव्या इतकी मूर्ती स्वतः बनवावी. दगडी, धातूची अथवा अन्य कुठलीही दुसरी मोठी उत्सव मूर्ती पूजामूर्तीच्या मागे ठेऊन तिची मनपसंत सजावट करावी. या उत्सव मूर्तीचे विसर्जन करू नये.
६. घरच्या घरी विसर्जन शक्य आहे . पार्थिव पूजेची मूर्ती झाडाला चालणाऱ्या मातीची बनवली असेल तर घरच्या घरी विसर्जन करून ते पाणी बागेतल्या अथवा कुंडीतल्या झाडांना घालावे. याने काहीच दुष्परिणाम होणार नाही. विसर्जन वाहत्या पाण्यात अथवा विहिरीत, नदीत कुठेही केले तरी पर्यावरणाला काहीच धोका नाही.
७. घरच्या मंडळींना महत्त्व समजवावे. बऱ्याच वेळा आपल्याला मुद्दा पटूनही मुलांच्या हट्टामुळे अथवा घरच्यांच्या दबावामुळे पुनः पीओपीच्या रंगीबेरंगी आकर्षक मूर्ती घ्याव्या लागतात असे कारण लोक देतात. आपल्या हौशीखातर आपण पर्यावरणाला वेठीला धरत आहोत हे त्यांना आग्रहपूर्वक पटविले पाहिजे. अविवेकीपणे केलेले धर्माचरण आणि वास्तवाचे भान नाहीसे करणारी हौस हे आपल्या ऱ्हासाचे कारण झाले तर याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली?
८. मुलांना मूर्ती बनवायला प्रेरित करावे. मुलांना उत्सवात सहभागी व्हायचा अत्यंत उत्साह असतो. त्यांनाच जर मूर्ती बनविण्यास प्रोत्साहन दिले तर ती आनंदाने हा पर्यावरण स्नेही गणपती घडवतील. शाळांमधून हा उपक्रम राबवला जाऊ शकतो. आंध्रप्रदेशात अनेक शाळांतून असे कार्यक्रम होतात.
९. मूर्तिकारांना लाल माती वापरून गणपती बनविण्यास भाग पाडावे. हैदराबाद येथे लाल मातीचे गणपती सहज उपलब्ध होतात. याचे अनुकरण महाराष्ट्रासह अन्य प्रांतातसुद्धा व्हावे. हे गणपती नैसर्गिक रंग वापरून रंगवले जातात. हल्लीच कोकणातील शेतातल्या चिकणमातीचे गणपती बऱ्याच काळानंतर पुनः घडवले जात आहेत. हे गणपती कमी किमतीचे आणि विसर्जनास सोपे असल्याचे सांगितले जाते. परंतु यातही मूर्तीच्या उंचीचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. कारण जर शेतातल्या मातीने मोठ्या प्रमाणात असे गणपती बनू लागले तर उद्या गणपती साठीच शेते खणली जातील आणि त्यावरील उपजाऊ मातीचा थर निघून जाईल. शक्यतो या मूर्ती वेगळ्या विसर्जित करून ती माती पुनः शेतात अथवा मूर्तीकारांकडे पोहोचवली जावी.
१०. मोठ्या मूर्तींसाठी पेंढा आणि बांबूचा वापर. बंगाली मूर्तीकारांप्रमाणे बांबूच्या सांगाड्यावर गवत बांधून शरीराचा ढाचा तयार करून त्यावर शेण आणि मातीचा लेप देऊन मोठ्या मूर्ती घडवता येतील. या मूर्ती वजनाने हलक्या असून कृत्रिम तलावात विसर्जन झाल्यावर आतला सांगाडा पाण्याबाहेर काढून तो रिसायकल करता येईल. त्यावर रंग मात्र नैसर्गिक असावेत आणि अंगावरील वस्त्र आणि दागिने मातीनेच सकारावेत.
पार्थिवगणपती बनविण्याचा विधी :
पुण्यातील थोर सत्पुरुष कै. दत्तमहाराज कवीश्वर गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी मातीचे गणपती स्वतः वेगळे करीत असत असे ऐकिवात आहे. त्याच प्रमाणे ठाण्यातील वैदिक श्री.रवी मुरलीधर तांबे यांजकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे वडीलही गणेश चतुर्थीला पूजेच्या वेळी हातात माती घेऊन तात्काळ गणेश प्रतिमा करून तिची स्थापना करीत असत. ही संकल्पना शास्त्रप्रणित आहे. तांबे गुरुजींच्या सौजन्याने मिळालेला पार्थिवगणेश निर्माणविधी लोकांच्या उपयोगास्तव इथे देत आहे. सराव नसलेल्या लोकांनी या मूर्ती पूजेच्या आधीच करून ठेवाव्यात हे वेगळे सांगायला नकोच.
१. हेरम्बाय नमः | या मंत्राने माती आणावी/ समोर घ्यावी. यासाठी खडे नसलेली स्वच्छ मुलायाम माती घ्यावी. टेराकोटा ची माती मिळत असेल तर उत्तम अथवा कुंडीतली/ बागेतली/ शेतातली माती काही दिवस कोरडी करून ती थोडी कुटून वापरावी . अथवा नर्सरी मध्ये लाल मातीच्या पिशव्या उपलब्ध होतील. ती माती पिठाच्या चाळणीने चाळून केवळ पिठासारखी माती घ्यावी. चाळताना मातीत शेणाची गोवरी कुसकरून घातली तर मूर्ती अधिक बळकट होईल पण हे अगदी आवश्यक नाही.
२. गणनायकाय नमः | या मंत्राने मातीत हळू हळू पाणी घालावे आणि माती मळावी. जितकी जास्त मळली जाईल तितकी मातीतली हवा निघून जाईल.
३. सुमुखाय नमः | भेगा न पडता आकार देता येईल इतक घट्ट मातीचा गोळा करावा. पाण्याचा हात लावून हळू हळू त्याचे अवयव करावेत. पुन्हा नवीन माती जोडू नये. संपूर्ण आकृती अगदी रेखीव करण्याची गरज नाही. कान आणि सोंडेसह डोके इतका साधारण आकारही पुरेसा आहे. सरावाने हात पाय इत्यादी अवयव सुद्धा घडवता येतील. तिथपर्यंत अष्टविनायाकातील एखादा सोपा गणपती मॉडेल म्हणून वापरला तरी हरकत नाही. त्याबरोबर एखादा उंदीर शक्य असेल तर वेगळा करावा. बारीक काडीने मूर्तीच्या पायाजवळसुद्धा उंदराची आकृती काढता येईल. अश्या रीतीने पार्थिव गणेश तयार होतो.
४. गौरीसुताय नमः | या मंत्राने पार्थिव गणेशाला आसनावर ठेऊन प्राणप्रतिष्ठा इत्यादी पुढील पूजा करावी.
हा विधी शास्त्रानुसार सांगितला. दोन तीन इंचांची मूर्ती पूर्ण सुकायला तीन चार दिवस लागतील.
हरिद्रागणेश : तंत्रशास्त्रात पृथ्वी तत्त्वाला पिवळा रंग दिलेला आहे. तसेच पार्वतीच्या अंगवरील हळदीतून तिने गणेश बनविला असे दक्षिण भारतात मानतात. त्यामुळे हरिद्रागणेश म्हणजे हळदीच्या गणपतीची पूजा त्या प्रांतात प्रचलित आहे. ज्यांच्याकडे दीड दिवसाचे गणपती असतील त्यांना हा पर्याय सुद्धा सोयीचा आहे पण ही मूर्ती पूजेच्या आधी थोडा वेळ निर्माण करावी.
यू-ट्यूब वर ‘मेकिंग टेराकोटा गणेश’ किंवा ‘ईको-फ्रेंडली गणेश मेकिंग’ ‘ टरमरिक गणेश’ अश्या मथळ्याची अनेक प्रात्यक्षिके पाहायला मिळतील. ती पाहून आपल्याला गणेश चतुर्थीच्या पूर्वी सोप्या रीतीने गणपती बनवता येईल.
व्रते-उत्सव साजरे करताना विवेकाचा अभाव
औडंबरयुक्त धार्मिक भावना, भक्तीचा वर्ख लावलेले पैश्याचे जाचक प्रदर्शन इत्यादीमध्ये माणसाचा साक्षेप हरवला आहे असे वाटते. रेडीमेड सोवळी, रेडीमेड मोदक, रेडीमेड फराळ, थर्माकोलची मखरे, बाजारची महागडी फुले यात केवळ पैशाचा धूर आहे भक्तीचा सुगंध नाही. या धुरानेच आपल्याला विवेकाची वाट दिसेनाशी झाली आहे का याचा विचार करावा लागेल.
कृष्णाने दुर्योधनाचे राजसी आतिथ्य न स्वीकारता विदुराघरच्या कण्या खाल्ल्या अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आपण किती भपकेबाज उत्सव साजरा करतो या पेक्षा त्यात आपली भावना किती निर्मळ आहे, ते महत्त्वाचे ठरते. गीतेत श्रीकृष्ण म्हणतो की भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहं-स्फुरणा अशी माझी अष्टविध प्रकृती आहे. जो उत्सव साजरा करताना निर्माल्याचे टनांनी ढीग जमा होऊन भूमी दूषित होते, घातक रंग आणि द्रव्यापासून बनलेल्या मूर्तीच्या विसर्जनाने जल प्रदूषित होते, फटाक्याच्या धुराने हवा प्रदूषित होते, क्लेशकारक कानठळ्या बसवणाऱ्या मिरवणुकांच्या आवाजाने माणसे, पक्षी व प्राणी बेजार होतात, तो उत्सव देवाला प्रिय होईल का हा विचार करायला हवा.
खरे तर उत्कृष्ट मूर्तीच्या स्पर्धेत अश्याच मूर्तीला बक्षीस मिळाले पाहिजे जी पर्यावरणाला घातक नसेल. थर्माकोल, पीओपी सारखे पर्यावरणचे संतुलन बिघडवणारे पदार्थ जीत नसतील त्याच सजावटीला पुरस्कार मिळावेत. देवाची सेवा आपल्याला मनापासून जमेल तशी आणि तितकीच करावी. विश्वात्मक देवाची सेवा करण्याचे पाहिले पाऊल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत आपले सण उत्सव साजरे करणे. काही लोक निश्चितच हा विचार करीत असतील, परंतु अधिकाधिक लोकांनी यासंबंधी विचार करावा म्हणून हा लेखन प्रपंच.
चंद्रशेखर सुनील खांडाळेकर
(वास्तुतज्ञ आणि भारतीय संस्कृती अभ्यासक)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच पटले, शाडू सहज न मिळाल्यास विसर्जनाची मूर्ती शक्य तितकी लहान हा पर्याय चांगला वाटतो.मुंबई मध्ये शेणाच्या मूर्त्या, ज्यांचे विसर्जन केल्यावर खत म्हणून झाडात टाकता येईल,आणि मातीच्या आत व्हेजिटेरियन माशांचे खाद्य भरलेल्या मूर्त्या पण आहेत

लेख चांगला व माहितीपूर्ण आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
यात मूर्ति बनविण्याचे उपाय्/कृति दिलि आहे ती उपयोगी.

मात्र त्याकरीता "पर्यावरणाची भीती" घातली जाते ती अजिबात मान्य नाही.
तरीही, उत्सवाचे स्वरुपात सुधारणा होण्याचे दृष्टीने काही विधायक होत असेल, तर ते हवेच आहे, मात्र सालाबाद प्रमाणे त्यावर "पर्यावरणाच्या भित्या" घालण्याच्या अंधश्रद्धा नकोत.

लेख आवडला.
भारतातील उजवे (लिंबू तुम्ही उजवे आहात असं समजतो) पण पर्यावरण बदल आणि ग्लोबल वार्मिंग मानत नाहीत बघून छान वाटले.

चांगला लेख. माझ्या सासरी दरवर्षी नदी किनार्‍याची ओली माती एका साच्यात घालून गणपतीची मूर्ती बनवतात. रंग, सजावट वगैरे काहि नाहि. . चतुर्थीच्या दिवशी पहाटे नदीवर जाऊन एकाच साच्यातून आसपासच्या १०-१२ घरच्या मूर्ती बनवून आणतात .

मात्र सालाबाद प्रमाणे त्यावर "पर्यावरणाच्या भित्या" घालण्याच्या अंधश्रद्धा नकोत. ? >>

तुमची श्रद्धा असेल किंवा तुमच्या सोयीची असेल ती संस्कृती आणि हजारो वर्षांचे संशोधन वगैरे.
आणि मुंबैत / इतरत्र महाकाय मूर्तींच्या ( अर्धवट ) विसर्जनाने जी हानी होते, प्रॉब्लेम्स उद्भवतात ती अंधश्रद्धा ?

अवांतर भिती चे भित्या हे अनेकवचन प्रमाण आहे का ?

औडंबरयुक्त धार्मिक भावना, भक्तीचा वर्ख लावलेले पैश्याचे.............विवेकाची वाट दिसेनाशी झाली आहे
हे मला पटले. विशेषतः
जो उत्सव साजरा करताना निर्माल्याचे टनांनी ढीग जमा ..............उत्सव देवाला प्रिय होईल का

हे सगळे आजकाल इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असते की नको वाटते तो उत्सव करणे नि त्यात सहभागी होणे. नि आजकाल तर भाराभर लोक बोलावून, प्रचंड पैसे गोळा करून (कित्येकदा जबरदस्तीने) अचकट विचकट गाणी नि नाच यांचे कार्यक्रम करणे, दारू पिऊन विसर्जनाची मिरवणूक काढणे हे सगळे कशाला?

धार्मिक बाबतीत सरकारने ढवळा ढवळ करू नये असे म्हणणे सोपे आहे, पण जे चालले आहे त्यात धार्मिक काही नाही. नुसती बेशिस्त, पर्यावरणाचा नाश, पैशाचा अपव्यय नि दंगे. समाजात सभ्य लोकांपेक्षा गुंड, बेशिस्त लोकांचे अति जास्त प्रमाण वाढले आहे, त्याला सरकारच्या मदतीने काबूत आणलेच पाहिजे.

भारतातील उजवे (लिंबू तुम्ही उजवे आहात असं समजतो) पण पर्यावरण बदल आणि ग्लोबल वार्मिंग मानत नाहीत बघून छान वाटले.>>>>>>>

अमितव, निदान वरच्या कमेंटित तरी लिंबू असे म्हणताहेत कि गणपती उत्सव लेखात लिहिलंय तसा साजरा करा कारण तसा साजरा करणे हे धर्मशास्त्रीय दृष्टया योग्य आहे. पर्यावरण संवर्धन हे लेबल लावून ते करु नका. एकूण जे करताय ते योग्य करताय का हे पाहून करा, अमुक केले तर तमुक होईल या भीतीने ते केले तर त्याला काही अर्थ नाही. उद्या पर्यावरण परत ठीकठाक झाले तर आज जसे गणपती उत्सव होताहेत तसे परत सुरु करावे का?

साधना,
>> मात्र सालाबाद प्रमाणे त्यावर "पर्यावरणाच्या भित्या" घालण्याच्या अंधश्रद्धा नकोत. >> यातून मला तरी पर्यावरण बदल इ. सगळं म्हणजे अंधश्रद्धा आहे.असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटलं. इकडे ही उजवे लोकं सगळ्याची भरमसाठ नासाडी करतात आणि त्याने काय होणारे? पर्यावरण बदल हे फार थोतांड आहे. इ. इ. सांगत बसतात. म्हणून गम्मत वाटली.

नोप, तसे नाहीये. अमुक एवढे फोर्वर्ड्स करा म्हणजे मन:पुर्ती होईल असे फोर्वर्ड्स जसे येतात तसेच आमच्या इथे भारतात होळी, दिवाळी, गणपतीला अमुक करू नका म्हणजे पर्यावरण वाचेल असे फोर्वर्ड्स येतात. पर्यावरण वाचवा पण ते फक्त गणपती, होळी आणि दिवाळीलाच नाही तर वर्षभर वाचवा. नैतर दिवाळीला फटाके फोडायचे नाहीत, मात्र वर्षभर ढेंगभर अंतर जायलाही चारचाकी वापरायची. अमुक सणाला अमुक केले नाही तरच पर्यावरण वाचेल हीही अंधश्रद्धाच असे ते म्हणताहेत. म्हणून मी सहमत आहे असे म्हटलेले. बाकी मी स्वतः वर्षभर जागरूक असते.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. त्यातील काही मुद्द्यांवर स्पष्टीकरणाचा प्रयत्न .

" पर्यावरणाच्या भित्या" किंवा अमुक अमुक करून "पर्यावरण वाचेल" असा भ्रम माझ्या मानत नाही. कारण पर्यावरण वाचविणे आपल्या हाताबाहेर केव्हांच गेले आहे. आपल्या पर्यावरणघातकी जीवनशैलीच्या समोर आपण इतके हतबल आहोत, की आता केवळ तार्किक कसरती करून आपल्या अश्या वागण्याचे समर्थन करणे इतकेच आपल्याला शक्य आहे. त्याने कदाचित स्वतःचे मानसिक सांत्वन होऊन शकेल. पर्यावरणाच्या अटळ ऱ्हासाला धार्मिक उत्सवामुळे भरीव हातभार लागू नये या प्रामाणिक इच्छेतून हा लेख लिहिला. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या उत्सवामुळे निसर्गाला हानी व्हावी हाच एक दारुण विरोधाभास आहे.

मेधाताईंच्या घरच्यांचे कौतुक वाटले. साच्याच्या गणपतीची कल्पना चांगली आहे. खरे तर तुम्ही याचा व्हिडिओ बनवून त्याला प्रसिद्धी द्यावी. अन्य लोकांना सुद्धा त्याने प्रेरणा मिळेल. एखाद्या प्रसार वाहिनीच्या माध्यमातून याला प्रसिद्धी मिळायला हवी.

पुलावर कार थांबवून प्लॅस्टिकच्या पिशवीत जमवलेलं निर्माल्य नदीत फेकणारे लोक पाहून मला आश्चर्य वाटते. पुलाखालची नदी बहुदा गटारगंगाच झालेली असते. तिच्यात हे पवित्र निर्माल्य फेकावेसे तरी कसे वाटते लोकांना?

काल गणपती आणायला गेलो, तिथे विक्रेत्याने ऐकविलेले ज्ञान :

"प्लास्टर ऑफ पॅरिसही एक प्रकारची मातीच असते. हा घेतला तरी चालतो. शाडू मातीचाच घ्यायला पाहिजे असं काही नाही."

Pages