जिथून होती दाद पाहिजे .. तिथून आली नाही

Submitted by -शाम on 12 August, 2016 - 01:10

असे वाटते मैफिल काही जमून आली नाही
जिथून होती दाद पाहिजे .. तिथून आली नाही

सहजच होता पाण्याला मी स्पर्श एकदा केला
एक लाट जी गेली मागे फिरुन आली नाही

आयुष्याने मारून ठोकर केले खरे शहाणे
सारी अक्कल काही शाळा शिकून आली नाही

तिला बहूधा खूप आठवण येत असावी आता
याच्या आधी कोरी चिठ्ठी चुकून आली नाही

इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी लागत असते
प्रेमाची ही भाषा तेंव्हा कळून आली नाही

त्या मातीला तसा देखणा स्पर्श मिळाला होता
उगाच काही तिथे अबोली उगून आली नाही

सणासुदीला लेकीवाचुन सुने वाटते अंगण
निरोप येतो ‘‘निरोप नव्हता’’ म्हणून आली नाही

जरी नोकरी संसाराचे अवघड गणित जुळवते
तरी असे दाखवते की ती दमून आली नाही

हंबरडा फोडत गोठ्याशी गायी कधीच आल्या
गुरे चारण्या गेलेली ती अजून आली नाही

बरेच झाले की मी माझी व्यथा मांडली येथे
इथल्या इतकी गर्दी कोठे जमून आली नाही

___________________________ शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी लागत असते
प्रेमाची ही भाषा तेंव्हा कळून आली नाही

त्या मातीला तसा देखणा स्पर्श मिळाला होता
उगाच काही तिथे अबोली उगून आली नाही

सणासुदीला लेकीवाचुन सुने वाटते अंगण
निरोप येतो ‘‘निरोप नव्हता’’ म्हणून आली नाही

जरी नोकरी संसाराचे अवघड गणित जुळवते
तरी असे दाखवते की ती दमून आली नाही

हंबरडा फोडत गोठ्याशी गायी कधीच आल्या
गुरे चारण्या गेलेली ती अजून आली नाही<<<

एक से एक शेर! उत्तम गझल, उत्तम जमीन!

आहा हा! भारीच!
थॅंक्यू सामो गझल वर काढल्याबद्दल!

अहाहा! भारीच!
थॅंक्यू सामो गझल वर काढल्याबद्दल!

लाट !

Pages