ससा, कासव आणि गिधाडं !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 August, 2016 - 17:00

लहानपणी ससा आणि कासवाची कथा ऐकलेली. कासव हा स्लो बट स्टडी, तर ससा हा फास्ट बट लेझी. या दोघांच्या स्पर्धेत आळशीपणाला हलके लेखायला, आणि चिकाटी दाखवल्यास तुलनेत कच्चेही कसे बलाढ्यांवर विजय मिळवू शकतात हे दर्शवायला कथेत कासवाला विजयी केले होते. कथेची शिकवण - "एकवेळ कासव बना, पण ससा बनू नका" - ही अशी होती, की आणखी काही याची कल्पना नाही. मात्र इंजिनीअरींग पास करत कॉलेजच्या उंबरठा ओलांडताना एक गोष्ट मात्र समजलेली, ही फिल्ड गधामजूरी करणार्‍यांची नाही तर स्मार्ट वर्क करणार्‍यांची आहे. तब्बल नऊ महिने माझा हा समज टिकलाही. मग हळूहळू प्रखर वास्तवाची जाणीव होऊ लागली. तुम्ही हुशार असा किंवा नसा, स्मार्टवर्क करा किंवा नका करू, पण हार्डवर्क काही तुम्हाला सुटलेले नाही. नुसते हार्डवर्कच नाही तर लॉंग टाईम हार्डवर्क. ऑफिस आठ तासांचे आहे. कागदोपत्री. नऊ ते साडेपाच. पण साडेपाचला तुम्ही आयुष्यात कधी घरी जाऊ शकत नाही.

एखाद्या दिवशी सहालाच जायचेय. नो प्रॉब्लेम. काहीतरी जेन्युअन कारण तयार करा. जे कोणी तुम्हाला परवानगी नाकारू शकणार नाही.

एखाद्या दिवशी साडेसहाला निघालात. काय ऋन्मेष, वर्कलोड कमी दिसतेय तुमच्याकडे, आमच्याकडचे देऊ का?

सातला घरी निघालात. काय रे, कुठे चाललास, घरी काही काम आहे का?

साडेसातला निघालात. काय रे तुम्ही बॅचलर लोकं, काय करता एवढ्या लवकर घरी जाऊन.

आठला घरी निघालात. थांब अर्धा तास, मी पण निघणारच आहे. एकदमच निघू, तुला ड्रॉप करतो स्टेशनवर.

साडेआठला निघालात. आजचे आपले काम झाले ना सारे? उद्या मग त्या दुसर्‍या कामाला सुरुवात करू.

नऊ ते नऊनंतर कधीही आणि कितीही लेट निघालात. उद्या वेळेवर ये हा. सकाळी सर्वात पहिला तो एस्टीमेशनचा मेल आपल्याला टाकायचा आहे.
...

आता तुम्ही म्हणाल, दरवेळी हा टांग अडवणारा, चौकशी करणारा, स्वताला बॉस, सिनिअर, मॅनेजर म्हणवणारा टोणग्या जर एवढ्या उशीरापर्यंत मुकादमगिरी करत थांबून असतो तर तुला थांबायला काय धाड भरलीय.
अरे पण त्याला कदाचित त्याच्या कामाचा हिशोब द्यायचा नसेल. मुकादमगिरी करणे एवढेच त्याचे काम असेल. त्या कामाचाही त्याला माझ्या दुप्पट पगार मिळत असेल. भले मलाही जवळपास तेवढाच पगार द्यायला कंपनी तयार झाली. किंवा पगारापेक्षा चांगल्या रेटने ओवरटाईम देतही असली. तरी मला नाही करायचेय यार एक्स्ट्रा काम. जेवढे काम नऊ ते साडेपाच मध्ये करण्याची माझी क्षमता आहे तेवढाच मला पगार द्या. पुढच्या कामासाठी नाईट शिफ्ट चालू करा. त्यात जो काम करेल त्याला त्याने केलेल्या कामाचा पगार द्या. पण मला नऊ ते साडेपाचच काय ते राबवा.

पण हे शक्य नाही. जरी तुम्ही कितीही स्मार्ट आणि फास्ट काम केले, जरी आठ तासाचे काम सहा तासात केले. तरी मग तुमची ही क्षमता ओळखत तुम्हाला चौदा तासांचे काम देत दहा-बारा तास ऑफिसमध्ये थांबवलेच जाते. भले मग पगार चौदा तास कामाचा देत असले. म्हणजेच ईतर दहा तासात दहा तासांचेच काम करणार्‍या सर्वसामान्य कर्मचार्‍यांपेक्षा जास्तीचा देत असले. तरी तो पैश्यातला फरक वगळता तुम्हीही कंपनीत दहाबारा तास राबणारे वर्करच असता. ईतरांसारखेच तुमच्याही आयुष्यातील दहाबारा तास ओरबाडून खरवडून खेचून घेतले गेले असतात. आणि तुम्ही देखील नाईलाज असल्यागत, ज्याला ईतर आक्षेप घेत नाहीत त्याला विरोध करणारा मीच कोण शहाणा असे म्हणत, स्वत:ला घाण्याला जुंपलेला बैल समजून, स्वताच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि छंद मारून, स्वताच्या फॅमिलीला कमी वेळ देऊन, बस्स ऑफिसच्या कामाचा गाडा ओढत राहता..

कधीतरी कोणीतरी बॉस खूश होत आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारतो. कंपनी एक दिवस आपल्यालाही छोट्यामोठ्या टीमचा बॉस बनवते. मग आपण आपल्या हाताखालच्या लोकांची अशीच पिळवणूक करतो. ती करताना आपलाही वेळ ऑफिसमध्ये त्यांच्यासारखाच सडतोय हे विसरून जातो. आपल्या हाताखालचे आपण सांगतोय म्हणून थांबत आहेत, तर आपण स्वत: आपल्या मर्जीने थांबत आहोत, असे स्वत:चे खोटेखोटे समाधान करतो. आपल्या बॉस असण्याचा अहंकार कुरवाळत स्वताचीही जिंदगी झंड करतो आणि दुसर्‍याचीही जहन्नुम करतो.

अरे हो, काही कंपन्यांमध्ये नावालाच ‘फाईव्ह डे वीक’ असतो पण दर शनिवारी आणि गरज पडल्यास रविवारीही राबवले जाते हे यात राहिलेच. त्यातही बदल्यात कॉम्पेनसेटरी ऑफ न देता ओवरटाईमच काय तो घ्या अशी गळ घातली जाते. कारण तो कॉम्पऑफ वापरून कामगाराने रजा घेऊ नये हि त्यामागची कुटील बुद्धी.
सणांच्या दिवशीही मग बोलावले जाते. मुलाचा बारसा काय संध्याकाळी आहे, सकाळी तासभर लवकर येऊन चारलाच निघून जाशील, असे सुनावले जाते. सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला मात्र नाईलाजाने सुट्टी द्यावीच लागत असल्याने तिथे तेवढी चरफड होते.

यातही गंमत एका गोष्टीची वाटते. या सर्वातूनही कधी फुरसत काढून आपण मायबोलीवर एखाद्या दिवशी जास्त वेळ रेंगाळलोच. तर लोकं बोलतात, याला ऑफिसमध्ये काही काम दिसत नाही....
आपला जन्म नऊ ते साडेसात काम करण्यासाठीच झाला आहे यावर लोकांचा ईतका ठाम विश्वास बघून मला खरंच मीच चुकीच्या युगात जन्माला आलोय असे कधीकधी वाटते..

त्या दिवशी अतरंगी यांच्या त्या समानतेच्या धाग्यावरची चर्चा मी हे सारे विचार मनात येताच तिथेच सोडली. जिथे माणसाला माणसासारखे न वागवता ओझ्याच्या गाढवासारखे वागवले जाते तिथे आणखी समानतेच्या काय अपेक्षा करायच्या..

चला खूप रात्र झाली. आता रजा घेतो. उद्या देखील लेट गेलो तर या महिन्यातला दुसरा लेटमार्क व्हायचा. तिसर्‍याला हाल्फ डे कटतो. पाचव्याला पगार कटतो. सातव्याला सर्वांसमोर उठाबश्या काढायला लावतात. इथे लेटनाईट थांबणार्‍यांचे रात्रीच्या अंधारात कौतुक आहे, मात्र सकाळच्या उजेडात लेट येण्याची मुभा त्यांनाही नाही..

पण जाता जाता डेडलाईन या शब्दाचा मला लागलेला अर्थ सांगतो,
माणूस मेला तरी चालेल, पण त्या आधी काम झाले पाहिजे !

शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages