बेरंग - भाग ३

Submitted by अनंत ढवळे on 3 August, 2016 - 13:16

फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार. तरी अर्ध्याहून अधिक कामे आम्हीच करीत आहोत. म्होरक्या असणारा सदाशिव बोलत असतो. उच्चशिक्षित मुलगा. इतर काही मिळत नसल्याने हे काम करणारा. वागायबोलायला एकदम व्यवस्थित. म्हटला, कंत्राटदाराला अनेकदा सांगितलं, पण तो आमचं काहीच ऐकत नाही. यावर साहेब आणखी भडकतो. जवाबदारी ढकलू नका. तुम्ही सगळे कामचोर आहात. एवढा कचरा ? त्यानं नाही उचलला तर तुम्ही का नाही उचलत ? पत्रकारांनी तब्येतीने फोटो काढलेत इथल्या घाणीचे. ह्याची आता देशभरात बोंब होईल.दिवसभर टीव्हीवर दिसत राहील हा कचरा. एवढा महत्वाचा उपक्रम, तुम्हा लोकाना काही समजत नाही. नालायक कुठले. बेजबाबदार. यावर सदाशिव बोलू जातो पण चंदन त्याला मागे लोटीत पुढे जातो. ओ साहेब. शीदा. नीट बोलायचं. नालायक कोनाला बोल्ता ? हँ ? आमाला काय याचा पगार मिळतो काय ? फालतू नई बोलायचं. सदाशिव त्याला रोखू जातो. चंदन गुरकावतो, सद्या भेंचोद मधी पडू नको उगं. मुस्काटात हानीन तुझ्या. बाकीचे दोघे तिघे चंदनला मागे ओढतात.

सगळा घोळका आता दोन भागात विभागला जातो. अनेक आवाज येऊ लागतात. चंदन सगळ्यात लाऊड. लोक आपल्याकडे लक्ष देताहेत हे बघून तो आणखीनच चेकाळतो. जोरजोरात बोलू लागतो. प्रकरण बिघडते आहे म्हणून आपण मध्ये पडतो. साहेबाला तिथून थोडे बाजूला नेतो. साहेब हपकलेला असतो. ही प्रतिक्रिया त्याला अगदीच अनपेक्षित असते. आपण म्हणतो, हे प्रकरण हाताबहेर जाईल. चंदन आडमूठ आहे. आपल्याला बधणारा नाही. त्याच्यामागे सगळे कर्मचारी आहेत. शिवाय चूक तुमचीही आहेच. नालायक कसं काय म्हणू शकता ? लोक गेले चार दिवस राबताहेत. कंत्राटदाराचे लोक दमदाट्या करतात. तो वजनदार माणूस आहे. हे लोक तरी काय करतील ?
साहेब म्हणतो, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. मी देखील राबतोच आहे की गेले चार पाच दिवस. शिवाय तुम्ही आणि चंद्रकांतही. मग यानाच काय प्रॉब्लेम आहे? आपण म्हणतो, ते सगळं ठीक आहे पण जे झालं ते टाळता आलं असतं. हे आता वैयक्तिक पातळीवर घेतलं जाईल.सरळ माफी मागून टाका. साहेब एव्हाना वरमलेला असतो पण म्हणतो मी का माफी मागू ? अशाने कर्मचारी शेफारतील. जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे, निदान आपण आता इथे थांबू नका. चंदनचा भरवसा नाही. मोकाट आहे.

तिकडे चंद्या मध्ये पडलेला असतो. का बे चंदन. तुझं डोकं फिरलं का ? ही काय पद्धत तुझी साहेबांशी बोलायची ? हा काय मोहल्ला आहे का बे तुझा. यावर चंदन कावतो, हे बगा साहेब, तुमी उगा मधी पडू नका. हे प्रकरन या साहेबाला लई महाग पडनारे. बगून घेऊ. आता चंद्याचाही आवाज चढतो. हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. तुझी प्रकरणे कमी नाहीत. जास्ती करशील तर गोत्यात येशील. सदा, प्रकाश, याला घेऊन जारे. लाऊन आलेला दिसतो आहे. उद्या ऑफिसात बघू काय करायचं ते. चला निघा आता आपापल्या घराकडं. आपण दुरून बघत असतो. चंद्याने प्रकरण बघता बघता निकाली काढलेलं असतं. निदान तेंव्हापुरतं तरी. थोड्यावेळाने आपण साहेबाला निरोप देऊन चंद्यासोबत तेथून निघतो. चंद्या म्हणतो आज बसू राव निवांत बोलत. या कार्यक्रमाने वीट आणलाय बघ. सरकारी गाडीने मग आम्ही तिथून निघतो.

ड्रायवर गाडी गावाबाहेर असणार्‍या एक हॉटेलाजवळ आणतो. शहराच्या वीसेक किलोमीटर बाहेर ही हॉ टेलांची अख्खी रांगच उभी राहिलेली. पूनम. चांदनी. उजाला अशी नावे असलेली हॉटेलं. हायवेच्या दुतर्फा दिव्यांप्रमाणे चमचमत असतात. काहींच्या दारात उसनं अवसान आणल्यासारखी रोशनाईही असते; अशी की जणू इथे येणारे हा उजाळा पाहून हरखून जात असावेत. काय मौज आहे. बाहेरचा उजेड आणि आतला अंधार ह्यांची सांगड अशा ठिकाणी किती सहज घातली जाते. ह्या हॉटेलांचं एक बरं आहे. इथं रात्रभर दारू पीत बसा कोणी हटकणारं नाही. तसंही आपण सरकारी, आपल्याला कोण काय करणार ? पण एक भीड असतेच माणसात. बाकी चंद्याची ओळख असते इथेही. सरबराई होते. सगळ्यात चांगलं टेबल मिळतं.थोडा वेळ हॉटेलचा मालक येऊन काही बाही बोलत बसतो. आपलं लक्षच नसतं. मघाशी झालेला प्रकार डोक्यात घोळत असतो.हा नेमका कुठला संघर्ष आहे. ह्याला वर्ग संघर्ष म्हणावे का. चतुर्थ श्रेणीबद्दल आपल्याला तसंही नेहमीच वाईट वाटतं. आपण एकेकाची कथा घेऊन मनातल्या मनात चाळत असतो. सदाशिवसारखा मुलगा. थेट एम ए आहे. अत्यंत समजदार, हुशार तरुण. याला याहून चांगली नोकरी मिळू नये? कुणाची चूक होत असावी. व्यवस्थेची, समाजाची की निव्वळ नशीबाची. चंदनसारख्याचं आपण समजू शकतो, तो शिकलेला नाही फार. मुळातच यंग्रट आहे. वालंटर टायपातला. दुसर्‍या बाजूला आपण आहोत. किंवा चंद्या, साहेब. भरपूर पैसे छापणारा या हॉटेलाचा मालक. आपण चंदन किंवा सदाशिव म्हणून जन्माला आलो असतो तर काय झाले असते असा दैवव्यपाश्रयी विचारदेखील आला. नदीच्या दोन तटांवर असल्यासारखे दोन विभक्त समाज आपल्यातून जगत असतात. थोडेसे बरे असणारे थोडेसे बरे नसणार्‍यांचा निवाडा करायला सतत सज्ज असतात. मघाशी आपण चंदनला वालंटर ठरऊन मोकळे झालोत तसे.

बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. चंद्या काही योजना बनवून सांगत असतो. आपल्याला त्याच्या डोक्याची कमालच वाटते. आपण म्हणतो साला तू काही निचिंतीने बसूच शकत नाहीस. आत हे काय नवीन खूळ काढलंस. म्हणे पंढरपूरला जायचं. कोणत्या तोंडाने देवाला भेटायचं रे.आपण शंभर लफडी केलीत. खा खा पैसा खाल्ला. विठोबा म्हणेल एक हेच राहिले होते मला भेटायला यायचे. चंद्या यावर हसून म्हणतो, अरे चालायचंचं. ल्फडी कोण करत नाही? हँ ? बिनल्फड्याचा माणूस दाखव मला तू ह्या जगात. तुला एक उदाहरण सांगतो. आमचा एक काका होता. दूरचाच पण एका गावत असल्याने बर्‍यापैकी घसट होती. मोठा सात्विक माणूस होता. सगळे म्हणायचे माणूस असावा तर असा. एक दिवस आमच्या बाबांनी ह्याना शेजारच्या गावात बघीतलं दुसर्‍या बाईसोबत. नंतर कळालं की हे साहेब अनेक वर्‍षांपासून दोन घरे चालवीत होते. आता बोल. हँ? यावर आपण हसून म्हणतो अरे चालायचंचं. असेल काही अडचण बिचार्‍याची. काय सांगावे त्याची पहिली बायको त्याला समजूत घेत नसेल. किंवा ती दुसरी बाई जेन्युइन असेल आणि हा खरेच तिच्या प्रेमात पडला असेल? हेच तर. चंद्या उसळून म्हणतो. आपली देखील अडचणच आहे की रे. गरज म्हण वाटल्यास. कोणाला गरज नाही जगात? गरजेपोटी होतात गोष्टी. आपण जे केलं ते कुणीही केलंच असतं. एरवी तू न मीच काय, ही अख्खी दुनियाच करप्ट आहे.

आपण म्हणतो, चंद्या तू गोष्टी जास्तच सरळ करून समजून घेतोस. इतकं साधं आहे का हे ? मार्ग निवडण्याची ढब म्हण हवं तर, पण ती चुकते आहे आपली कुठेतरी. मग आपण काही बाही बोलून गप्प बसतो. हा दारूचा प्रभाव असावा बहुतेक. पण पुन्हा विचार येतो, चंद्या तरी काय चूक बोलतोय. ह्या सगळ्याची पक्की सवय झाली आहे; या इथून दहा वर्षं मागं जायची तयारी नाहीच व्हायची आपली आता. तो अभाव,ते जीवन नकोच पुन्हा.

- अनंत ढवळे

(क्रमश: / संपुर्णतः काल्पनिक )

आधीचे भाग :

http://www.maayboli.com/node/59512

http://www.maayboli.com/node/59545

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

शब्दकळा अतिशय उत्तम!

आधीच्या भागाखाली सरकारी कर्मचार्‍याची भाषा इतकी सौंदर्यपूर्ण कशी काय वगैरे मुद्दे आले होते ते गौण आहेत.कथा नायकाच्या मनात उसळणार्‍या विचारांतून पुढे सरकत आहे. त्यामुळे त्याच्या मनातल्या भावना/विचार नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी लेखकाने निवडलेल्या भाषालंकाराबद्दल मला लेखकाचे कौतुक करावेसे वाटत आहे.

जाणीवपूर्वक वापरात नसलेल्या भाषेचा योग्य तो वापर करणार्‍या साहित्यीकांना प्रोत्साहन द्यायला हवे.

जाप, +१.

उदा. हा 'दैवव्यपाश्रयी' हा शब्द मी पहिल्यांदाच वाचलाय?
म्हणजे काय?

यंग्रट, वालंटर हे शब्द त्यांच्या इंग्रजी शब्दांची गावठी नक्कल आहेत.
मला टमरेल, टावरान, डॅमलाडीबिस्कीट असे अश्या टाईपमधले शब्द आठवले.

Happy

अनघा, फिल्मी, अमितदादा, धन्यवाद. नायकाचा कथेतून कादंबरीकडे प्रवास सुरू झालाहे हे नक्की.

जाप, साती प्रतिसाद आवडले..आपण बारकाईने वाचताहात वीच इज सिंप्ली ग्रेट..

हा नायक ( सूत्रधार म्हणा हवातर) अधिकारी आहे - स्पर्धा परिक्षा देऊन आलेला आहे. तो जगाकडे उघड्या डोळ्यानी बघतो, विचार करतो. त्याचे विचार गुंतागुंतीचे असल्याने भाषेची आंदोलने (ऑसिलेशन्स ) अपरिहार्य आहेत. त्यामुळे त्याचे मोनोलॉग्स दीर्घ परिच्छेद होऊन येतात..

दैवव्यपाश्रयी म्हणजे स्पष्टीकरण देण्यापलीकडच्या गोष्टी ज्या नशीबावर ढकलल्या जातात.

हा नायक ( सूत्रधार म्हणा हवातर) अधिकारी आहे - स्पर्धा परिक्षा देऊन आलेला आहे. तो जगाकडे उघड्या डोळ्यानी बघतो, विचार करतो. त्याचे विचार गुंतागुंतीचे असल्याने भाषेची आंदोलने (ऑसिलेशन्स ) अपरिहार्य आहेत.>>>>> आता मला वाचण सोप जाईल. Happy